मोठ्या लढतींचे निकाल : सना मलिक, फहाद अहमद यांच्यात अटीतटीची लढत, तर महेश सावंत अमित ठाकरेंविरोधात आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. स्पष्ट बहुमत मिळवत महायुतीनं सत्तेच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केलं आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला पराभवाची धूल चाखावी लागली आहे.
एका बाजूला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी असा हा सामना झाला.
राज्यातील महत्त्वाच्या लढतींची नेमकं काय घडलं, हे पाहूया.
कोण आघाडीवर कोण पिछाडीवर
- संभाजीनगर पूर्व मतदारसंघात 5 व्या फेरीअखेर इम्तियाज जलील 39 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर
- कालिना विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस 414 मतांनी आघाडीवर
- भांडुप पश्चिम मतदारसंघात चौथ्या फेरीत ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आघाडीवर
- अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सना मलिक आघाडीवर
- माहीम विधानसभा मतदारसंघा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर, अमित ठाकरे पिछाडीवर
- सातारा विधानसभा मतदारसंघातून 61,600 मतांनी शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
- चेंबूर मतदारसंघात प्रकाश फातरपेकर आघाडीवर
- वरळीत आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात अटीतटीची लढत, आदित्य ठाकरे केवळ 478 मतांनी आघाडीवर
- अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम 3486 मतांनी आघाडीवर
- गडचिरोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मनोहर पोरेटी 3006 मतांनी आघाडीवर
- आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रामदास मसराम 2415 मतांनी आघाडीवर
- देवेंद्र फडणवीस सहाव्या फेरीअखेरीस 12,009 मतांनी आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
बल्लारपूरमधून महायुतीचे सुधीर मुनगंटीवार 3372 मतांनी आघाडीवर
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील 8 हजार 397 मतांनी आघाडीवर.
बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड (शिंदे शिवसेना) 3017 मतांनी आघाडीवर
नाशिक अपडेट
1. येवलात छगन भुजबळ 6900 मतांनी आघाडी
2. नांदगाव मध्ये सुहास कांदे 27465 आघाडीवर
3. पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे 18209 आघाडीवर दिनकर पाटील दुसऱ्या क्रमांकावर
4. देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे 18477 आघाडीवर
5. मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे 3842 आघाडीवर
6. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले 7830 आघाडीवर
7. मालेगाव मध्ये दादा भुसे 30190 आघाडीवर
8. इगतपुरीत हिरामण खोसकर 13500 आघाडीवर
9. दिंडोरीतून नरहरी शिरवळ 15457 आघाडीवर ( नववी फेरी )
10. निफाड मधून दिलीप बनकर 14491 आघाडीवर
11. चांदवड मधून राहुल आहेर 25956 आघाडीवर
12 मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख 3637 मतांनी आघाडीवर
13 बागलान मधून दिलीप बोरसे 10660 आघाडीवर
14 कळवण मधून जे पी गावित 99 मतांनी आघाडीवर
15 सिन्नर मधून माणिकराव कोकाटे 13900 आघाडीवर

फोटो स्रोत, facebook
- दहावी फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके 42780 मतांनी आघाडीवर
- हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे यांना पाचव्या फेरीअखेर 16500 मतांची आघाडी
- भोर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर तिसऱ्या फेरीअखेर 17730 मतांनी आघाडीवर
- कसबा विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे हेमंत रासने 6919 मतांनी आघाडीवर
- चौथ्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर
- पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर काँग्रेसचे रमेश बागवे 1074 आघाडीवर
- परळी विधानसभा मतदारसंघात 5 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे 22585 मतांनी आघाडीवर
- कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या फेरीत जनसुराज्य महायुतीचे अशोकराव माने 9500 मतांनी आघाडीवर
- सांगली : शिराळामधून भाजपचे सत्यजित देशमुख 750 मतांनी आघाडीवर
- सांगली : इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील पाचव्या फेरीत 4488 मतांनी आघाडीवर
- सांगली : जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे गोपीचंद पडळकर दुसऱ्या फेरीअखेर 625 मतांनी आघाडीवर
- सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पाटील 4 हजार 267 मतांनी आघाडीवर.
- अचलपूर विधानासभा मतदारसंघातून महायुतीचे प्रवीण तायडे 6128 मतांनी आघाडीवर, बच्चू कडू पिछाडीवर
- बुलढाणा मतदार संघात आठव्या फेरीत संजय गायकवाड 1980 मतांनी आघाडीवर
- भोकरदन मतदारसंघात महायुतीचे संतोष दानवे दुसऱ्या फेरीअखेर 3272 मतांनी आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
- माहीम : दुसऱ्या फेरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर
- कराड दक्षिण : अतुल भोसले 1500 मतांनी आघाडीवर
- माण-खटाव : जयकुमार गोरे 12761 मतांनी आघाडीवर
- पाटण : शंभुराज देसाई 1268 मतांनी आघाडीवर
- फलटण : सचिन पाटील 1493 मतांनी आघाडीवर
- वाई : मकरंद पाटील 4593 मतांनी आघाडीवर
- कराड उत्तर : मनोज घोरपडे 2884 मतांनी आघाडीवर'
- नागपूर दक्षिण पश्चिम : देवेंद्र फडणवीस 4029 मतांनी आघाडीवर
- सातारा : शिवेंद्रराजे 18360 मतांनी आघा़डीवर
- अमरावती : सुलभा खोडके 3297 मतांनी आघाडीवर
- येवला : चौथ्या फेरीअखेर छगन भुजबळ 3 हजार मतांनी आघाडीवर
- कळवण : जेपी गावित 99 मतांनी आघाडीवj
- चंद्रपूरमध्ये : काँग्रेसचे प्रवीण पडवेकर 113 मतांनी आघाडीवर
- रत्नागिरी : पाचव्या फेरीअखेर उदय सामंत 10525 मतांनी आघाडीवर
- सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील तिसऱ्या फेरीअखेर 3,338 मतांनी आघाडीवर
- जिंतूर : भाजपच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
- पुण्याच्या पुरंदरमधून विजय शिवतारे 5580 मतांनी आघाडीवर
- कराड उत्तरमध्ये भाजप उमेदवार मनोज घोरपडे 2884 मतांनी आघाडीवर
- वरळी मतदारसंघात पहिल्या फेरीत आदित्य ठाकरे 495 मतांनी आघाडीवर
- शिवाजीनगर मतदार संघात दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
- इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर
- परळी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडे यांची एकूण 9116 मतांची आघाडी
- कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले 2624 मतांनी आघाडीवर, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
- बारामतीत तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार 11174 मतांनी आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
- छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे 517 मतांनी आघाडीवर
- छत्रपती संभाजीनगर - कन्नड विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संजना जाधव 70 मतांनी आघाडीवर
- चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले 1563 मतांनी आघाडीवर.
- बुलढाणा मतदारसंघात महायुतीचे संजय गायकवाड 1480 मतांनी आघाडीवर
- मावळ मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर सुनील शेळके 24617 मतांनी आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
- सिंदखेड राजा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजेंद्र शिंगणे दुसऱ्या फेरी अखेर 154 मतांनी आघाडीवर
- मध्य नागपूर मध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर. शेळके 6149 मते तर प्रवीण दटके यांना 2249 मते.
- गडचिरोलीच्या आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे यांना पहिल्या फेरीत 1402 मतांची आघाडी .
- नागपूरच्या उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेश्राम 4463 मतांसह आघाडीवर, भाजपच्या सुधीर पारवेंना 3650 मते.
- पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या फेरीत 5749 मतांनी आघाडी घेतली आहे.
- पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे 2500 मतांनी आघाडीवर आहेत.
- मावळ मतदार संघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके 5399 मतांसह आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पहिल्या फेरीत 2108 मते मिळाली आहेत.
- कराड दक्षिण मतदारसंघातून पहिल्या फेरीत भाजपचे अतुल भोसले 2400 मतांनी आघाडीवर.

फोटो स्रोत, Facebook
- पाटण मतदारसघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील शंभूराज देसाई 400 मतांनी आघाडीवर आहेत.
- जालन्यात पोस्टल मतमोजणीत घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर आहेत. तर जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत.
- भोकरदनमध्ये शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर आहेत तर, बदनापूर भाजपचे नारायण कुचे आघाडीवर
- गडचिरोलीत अहेरीमध्ये पहिल्या फेरीत माहायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम 1118 मतांनी आघाडीवर आहेत.
- कोल्हापूरमधील चंदगड मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर.
- सांगली मतदार संघ - भाजपाचे सुधीर गाडगीळ दुसऱ्या फेरीअखेर 5 हजार 42 मतांनी आघाडीवर.
बारामती
या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती बारामती मतदारसंघावर. पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाचीही लढाई असणार आहे.
आपले काका असलेल्या शरद पवारांना आव्हान देणारे अजित पवार आणि त्याच अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांच्याच पुतण्याला म्हणजे युगेंद्र पवारांना त्यांच्याच विरोधात उभं करणारे शरद पवार, हे या लढतीकडे लक्ष जाण्याचं मुख्य कारण.
युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांविरोधात उमेदवारी देण्यात आल्याने 'काका-पुतण्या' लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे.
'पवार विरुद्ध पवार' संघर्षाच्या पहिल्या अंकात 'अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरीत पवार कुटुंबीय' अशी लढत दिसली होती.

फोटो स्रोत, facebook
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुंटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्याविरोधातल्या प्रचारात उतरली होती.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार निर्णायक ठरला होता. अजित पवार यांचा सख्खा भाऊसुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचला होता.
अर्थात बारामतीमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असल्याचं चित्र दिसतं आहे. तसंच विकास हा मु्द्दा सुद्धा महत्वाचा राहणार आहे. त्यासाठी अजित पवारांचं बारामतीमध्ये असलेलं लक्ष हा मतदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा राहील.
वरळी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 साली याच मतदारसंघातून ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते.
आदित्य ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक वरळीतलं आपलं वर्चस्व राखण्याची आहे. मात्र, त्यांच्यासमोर आव्हानंही आहेत.
एकनाथ शिंदेंनी मिलिंद देवरा यांच्या रूपानं उमेदवार दिलाय, तर राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांच्या रूपानं उमेदवार दिलाय.

फोटो स्रोत, Getty Images/Facebook
2019 मध्ये आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यातली समीकरणं बदलली, तशी वरळीतलीही बदलली आहेत.
महायुतीत वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडे आहे.
एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले आणि राज्यसभेचे खासदार बनलेले मिलिंद देवरा यांना उतरवलं आहे.
शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढवत आहेत.
यामुळे वरळीत आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देवरा (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध संदीप देशपांडे (मनसे) अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेतच दोन गट झाल्यानंतर म्हणजे शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने शिवसैनिक आणि स्थानिक मतदार यापैकी कोणत्या शिवसेनेला कौल देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
परळी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ. संपूर्ण राज्याचं या परळी मतदारसंघातील निवडणुकीवर लक्ष आहे.
आधी रेणापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी पाचवेळा विजय मिळवला. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोनदा परळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
यानंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं मोठ्या स्वरुपात बदलली. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकमेकांसोबत उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे.
असं असलं तरी यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक मुंडे भाऊ-बहिणीला आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनजंय मुंडेंविरोधात दिलेला मराठा उमेदवार.
परळी मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 40 वर्षांनी पहिल्यांदाच इथं निवडणुकीत कमळ चिन्ह नसणार आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर महायुतीत हा मतदारसंघ भाजपऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं आला आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आला आहे. त्यांच्याकडे अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली.
अखेर शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष होते. नुकताच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
कोल्हापूर उत्तर
'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनं इतकी वळणं घेतली आहेत की, आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे दोन तर विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. त्यातही कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात उमेदवार देण्यामध्ये काँग्रेसकडून झालेल्या चुकांमुळे ही निवडणूक प्रचंड रंगात आली आहे.
आधी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर होणं, मग ऐनवेळी त्यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी देऊ करणं, राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणं आणि अगदी शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी आपला अर्ज माघारी घेणं, त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर अधिकृत उमेदवार नसणं या सगळ्या नाट्यमय वळणांमुळेच ही निवडणूक इतकी चुरशीची बनली आहे.

फोटो स्रोत, facebook
'अर्ज माघारनाट्या'मुळे काँग्रेसचे कोल्हापूरचे प्रमुख नेते सतेज पाटील यांनी आधी संतापून जाण्याचे आणि नंतर कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडण्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने या निवडणुकीला आता भावनिक किनारही प्राप्त झाली आहे.
कोल्हापूर दक्षिण
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या सहा मतदारसंघापैकी सर्वाधिक चुरशीची आणि इर्ष्येची निवडणूक असते ती 'कोल्हापूर दक्षिण'ची! कोल्हापूर शहराचा दक्षिण-पूर्व भाग आणि लगतचा ग्रामीण भाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो.

गेल्या कित्येक वर्षांपासून इथलं राजकारण 'बंटी विरुद्ध मुन्ना' अर्थात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या दोन कुटुंबांभोवतीच फिरताना दिसतं.
इथं ऋतूराज पाटील आणि अमल महाडिक एकमेकांसमोर उभे ठाकले असले, तरीही प्रत्यक्षात ही लढाई नेहमीप्रमाणे 'सतेज पाटील विरुद्ध धनजंय महाडिक' अशीच दोघांच्याही प्रतिष्ठेची असणार आहे, हे स्पष्ट आहे.
भोकरदन
जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघ जरांगे फॅक्टर आणि रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. कारण या ठिकाणाहून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे निवडणुकीत उभे आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगाव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो.


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर राजकीय पटलावर जालना जिल्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
चंद्रकांत दानवे यांनी तीन वेळा तर संतोष दानवे यांनी दोन वेळा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही लढत भाजपच्या रावसाहेब दानवेंसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण मागील 35 वर्षांपासून आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केलेले रावसाहेब दानवे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
सलग पाचवेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
इंदापूर
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
आता इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधे असलेले परंतु अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा सामना रंगणार आहे.

लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूने कल देणारी इंदापूरची जनता विधानसभेला कोणाच्या बाजूने उभी राहणार? राज्यात सुरू असलेल्या मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा इंदापूर मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार का? हे मुद्दे या निवडणुकीत कळीचे मानले जात आहेत.
इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर चर्चा होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज हा हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यात विखुरला जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. याचा फायदा दत्तात्रय भरणेंना होईल का?
याहून महत्त्वाचं म्हणजे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सामन्यात अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? ते आज स्पष्ट होईलच.
कर्जत जामखेड
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या शहरांनी मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे.
रोहित पवारांनी 2019 साली जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करण्याचं ठरवलं, तेव्हा बारामतीला खेटून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली.
पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या रोहित पवारांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवड केली. या मतदारसंघामध्ये भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होतं. ते तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्य मंत्री होते.

फोटो स्रोत, Facebook
रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत झाल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं आणि लढतीची चुरस कमालीची वाढली.
2009 आणि 2014 अशा सलग दोनवेळा इथून आमदार आणि 2014 सालच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राम शिंदेंचा तब्बल 43 हजार मतांनी पराभव करत, रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली.
2019 ला झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राम शिंदे यांनी त्यानंतरच्या पाच वर्षात गावोगावी फिरून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
या पराभवाची सल एवढी होती की, अवघ्या काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेवर संधी मिळूनसुद्धा राम शिंदेंना विधानसभा लढवण्याची इच्छा होती. आता विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय कुस्ती रंगणार आहे.
आता या कुस्तीत रोहित पवार पुन्हा एकदा प्राध्यापक राम शिंदेंना अस्मान दाखवतात की प्राध्यापकी करून राजकारणात आलेले राम शिंदे रोहित पवारांना धोबीपछाड देतात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
काटोल
काटोलमध्ये अनिल देशमुख सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. पक्षानं त्यांना उमेदवारीही जाहीर केली. पण, अचानक अर्ज भरण्याच्या दिवशी अनिल देशमुखांनी माघार घेतली आणि मुलगा सलील देशमुखनं उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपनं इथून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर अशी लढत पाहायला मिळत आहे. चरणसिंग ठाकूर यांनी 2019 ला अनिल देशमुखांना चांगली टक्कर दिली होती. आता अनिल देशमुखांनी मैदानातून माघार घेतली. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख निवडणूक लढवत आहे.

फोटो स्रोत, Facebook/SalilDeshmukhNCP
काटोल विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुका आणि नागपूर ग्रामीणमधल्या नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडीपासून शिवा, बाजारगावपर्यंतच्या गावांचा समावेश होतो.
काटोल तालुक्यात संत्र्यांचं उत्पादन जास्त होतं. यासोबतच कापूस, सोयाबीनचंही उत्पादन घेतलं जातं.
माहीम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहिम मतदार संघातील ही विशेष लक्षवेधी बनली आहे.
त्यांच्या समोर शिवसेना (शिंदे गटा)कडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचं तगडं आव्हान आहे. बसपाचे सुधीर जाधव देखील या शर्यतीत आहेत.

खरंतर 1990 पासून माहिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवाय महेश सावंत आणि सदा सरवणकर यांची या मतदार संघावर चांगली पकड आहे.
जर अमित ठाकरे विजयी झाले तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य असतील जे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या शिवसेनेशी संबंधित खास असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील.
कारण शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि शिवसेनेची स्थापना झालेले शिवाजी पार्क मैदान हे माहीम विधानसभा मतदारसंघात येते.
या तिरंगी लढत असलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











