अजित पवारांना बारामतीत एवढं लक्ष का घालावं लागतंय? 'असं' आहे त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान

फोटो स्रोत, Facebook/AjitPawarSpeaks
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नेमकी आधी दिवाळी आल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांना प्रचारासाठी आणखी एक चांगली संधीच या निमित्ताने मिळाली. त्यामुळे भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचारावर त्यांनी जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामतीत तर गेल्या दोन-तीन दशकात सहजपणे पाहायला मिळालं नाही, असं चित्र हल्ली दिसून लागलंय. ते म्हणजे, स्वत: अजित पवार त्यांचं होमग्राऊंड असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचारात उतरलेत.
एरव्ही दर निवडणुकीला अजित पवार राज्यभर पक्षाचा प्रचार करयचे आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवार व पवार कुटुंबीय त्यांचा प्रचार सांभाळायचे. पण यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांनी बारामतीतलं चित्रच पालटून टाकलंय.
दिवाळीच्या निमित्ताने बारामतीत मुक्कामी असलेले पवार कुटुंबीय यावेळी प्रचार आणि भेटीगाठींवरही भर देताना दिसत आहेत.
मतदारसंघात मुक्कामी असलेले अजित पवार सलग तीन दिवस दौरे, भेटीगाठी करत मतदारसंघ पिंजून काढतायत, तर दुसरीकडे शरद पवार देखील नेहमीच्या भेटींसह प्रचार सभा घेणार आहेत.
आजवर बारामतीत दिवाळी पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी ओळखली जायची. पण त्या पवार कुटुंबात यंदा दिवाळीतही राजकीय नाट्य रंगताना दिसतं आहे.
पण ही ऐन दिवाळीत प्रचार करण्याची परिस्थिती नेमकी कशामुळे आली. फॅार्म भरल्यानंतर थेट शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घेणारे अजित पवार यंदा लोकांमध्ये जात प्रचार का करतायत? हे जाणून घेऊयात.
अजित पवार सलग तीन दिवस मतदारसंघात
बारामतीत गेली अनेक वर्ष 'केंद्रात ताई' आणि 'राज्यात दादा' हे समीकरण ठरलं होतं.
संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरत असल्यामुळे आणि राज्यातल्या प्रचाराची धुरा सांभाळायची असल्यामुळे अजित पवार प्रचाराला बारामतीत यायचे ते पहिल्या म्हणजे फॅार्म भरण्याच्या आणि प्रचार संपण्याचा दिवशीच, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील राज्यात दौरे करत असताना सांगता सभेला बारामतीत येणार हे ठरलेलं असायचं.
लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने असायची, ती इतर पवार कुटुंबीयांवरच. यात मध्ये कोणाचा दौरा झालाच तर स्थानिक पातळीवर भेटीगाठी किंवा बैठका व्हायच्या. एवढंच.
यंदा मात्र अजित पवार बारामतीत दिवाळीच्या निमित्ताने सलग तीन दिवस मुक्कामी आहेत.
या तीन दिवसांमध्ये ते मतदारसंघात ठिकठिकाणी भेटीगाठी देत आहेत. त्यांचा 1 नोव्हेंबरचाच दौरा बघितला तर या एका दिवसात त्यांच्या नियोजनात जवळपास 59 गावांच्या भेटी होत्या. संपूर्ण दिवस अजित पवार मतदारसंघातील गावोगावी प्रचारासाठी फिरत होते.
यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत गाव पातळीवरच्या बैठका, मेळावे आणि भेटीगाठी हे प्रामुख्याने जय पवार आणि सुनेत्रा पवार सांभाळत होते. यंदा मात्र थेट अजित पवार स्वत:च प्रचार करत बारामती पिंजून काढताना दिसतायत. त्यांच्यासोबत कुटुंबातल्या इतर सदस्यांचे दौरे सुरु आहेतच.

फोटो स्रोत, Facebook/AjitPawarSpeaks
दुसरीकडे, शरद पवार हे देखील युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याचं दिसतंय.
दिवाळीच्या निमित्ताने होणारा संगीत महोत्सव, गोविंद बागेत लोकांच्या भेटीगाठी हे कार्यक्रम शरद पवार करत आहेतच.
मात्र, यंदा ते 5 नोव्हेंबरला बारामतीमधल्या शिर्सुफळ, सुपे, मोरगाव आणि सोमेश्वरला सभा घेणार आहेत. त्याच बरोबर वकील, डॅाक्टर आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
निवडणूक असल्यावर राजकीय रणधुमाळी सुरु राहणार हे तर झालंच, पण यावेळी मात्र थेट ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणावर होणारा प्रचार हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरतंय.
पवार काका-पुतण्यांचे आरोप-प्रत्यारोप
राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं अशी मांडणी केली जात होती. पण लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकींसमोर आल्या आणि त्यानंतर मात्र वक्तव्यं बदलली.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी 'चूक झाली' म्हणत माफी मागितली होती. पण बारामतीमध्ये झालेल्या अजित पवारांच्या प्रचारसभेने पहिल्याच दिवशी हे चित्र पालटलं.
अजित पवारांनी भाषणात भावूक होत थेट 'आपलं घर फोडल्याचा' आरोप शरद पवारांवर केला. आई कुटुंबात ही लढत नको, असं म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Facebook/PawarSpeaks
प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी त्यांची नक्कल केलीच, शिवाय हेच तर आम्हाला भावनिक होऊ नका म्हणून सांगत होते असंही पवार म्हणाले.
याबरोबरच शरद पवारांनी मलिदा गँग, युगेंद्र पवारांचं शिक्षण असे अनेक मुद्दे मांडले, तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी आईचा मुद्दा खोडून काढला.
त्यापाठोपाठ अजित पवारांनी आर आर पाटलांचा सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा मुद्दा पुढे आणला. त्यालाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर दिलं गेलं.
'सोपी वाटणारी लढत चुरशीची बनली'
या सगळ्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नेमकी कशी बदलली हे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, "अजित पवारांनी सोपी असलेली निवडणूक भावूक करण्याचा प्रयत्न करत आणखी अवघड केली. त्यांचं आर. आर. पाटील यांच्याबद्दलचं स्टेटमेंट फक्त रोहित पाटलांच्या मतदारसंघातच नव्हे, तर सर्वत्र परिणाम करणारं आहे.
"त्यांचा मूळ स्वभाव उफाळून येत आहे. आधी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. त्यामुळं पुढचे चौदा दिवस महत्वाचे आहेत. अजित पवार किती संयम पाळतायत आणि सेल्फ गोल किती कमी करतायत हे महत्वाचे आहे.
"शरद पवारच बॅास आहेत हे चित्र दिसतंय. काका विरुद्ध पुतण्या हा लढा दुहेरी आहे. अजित पवार एकाच वेळी काका आणि पुतण्याशी लढतायत. पुतण्याची पाटी कोरी आहे. त्याला गमावण्यासारखं काही नाही.
"शरद पवार बॅलन्स करत आहेत कुटुंबाचं संमेलन आणि जनसंपर्क याचा. इतकं सगळं दिलं तरी काही लोकांना जाण नाही हे म्हणून अजित पवारांवर त्यांनी नाव न घेत स्टेटमेंट केलं आहे.”

तर ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे म्हणतात की, "अजित पवारांसाठी स्ट्रगल आहे हे दिसतंय. कारण पहिल्यांदाच त्यांच्यासमोर घरातला उमेदवार आणि पुतण्या उभा आहे.
"एरव्ही बारामतीत अजित पवार नसले, तरी शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार आणि इतर प्रचार करायचे. आता मात्र पवार कुटुंब एकत्र नाही. त्यातच लोकसभेची पार्श्वभूमी आहे. ज्या बारामतीमध्ये अजित पवारांचं एक लाखांचं लीड होतं, तेवढ्याच फरकाने त्यांच्या पत्नीचा सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
"शरद पवार हार मानायला तयार नाहीत. त्यांनी अजित पवारांना थेट लक्ष्य केलं आहे. तसंच, अजित पवार आपण साथ का सोडली हे मतदारांना कन्व्हिन्स करण्यात अपयशी ठरले आहेत.”


विकासाच्या श्रेयवादाचीही लढाई
बारामतीच्या निवडणुकीत एकीकडे कुटुंब हा फॅक्टर महत्वाचा ठरतो आहेच. त्याचबरोबर विकासाचा मुद्दाही दोन्ही गटांमध्ये प्राधान्याने मांडला जात आहे.
'अजित पवारांनी मी कामाचा माणूस' अशी मांडणी केली होती. बारामतीचा विकास कोणी केला, असं सांगत लोकसभा निवडणूकीत देखील बारामतीत झालेल्या विकासकामांचा अहवाल मांडला गेला होता. आताही ते हाच विकासाचा मुद्दा घेत बारामतीत प्रचार करत आहेत.
शरद पवार गटाकडून याला प्रत्युत्तर देताना विकास हा शरद पवारांमुळेच झाला, विकासाचा पाया त्यांनी रचला असं म्हटलं जात आहे. बारामतीच्या विकासाचं मॅाडेल घेऊनच युगेंद्र पवार प्रचार करतायत.

विकासाच्या या नरेटिव्हचा परिणाम किती होईल याबद्दल बोलताना कुटे म्हणाले, "मी 80 वर्षांचा तरुण लढतो आहे, विकासाची पायाभरणी मी केली आणि यापुढे लक्ष घालणार हे पवारांनी स्पष्ट केलंय. तसंच युगेंद्र पवारांचं शिक्षण सांगत अजित पवारांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
"अजित पवारांकडे विकास सांगण्याशिवाय काही नाही आणि त्याचा पायाही आपण रचला हे शरद पवार सतत सांगतायत. त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक चुरशीची होतेय आणि पूर्वीप्रमाणे प्रचार न करता अजित पवार राहू शकणार नाहीत, हे स्पष्ट झालंय.”
तर अद्वैत मेहता यांच्या मते, "अजित पवारांनी कामं, विकास केलाय का, तर केलाय. बारामतीकरांना अजित पवार हवेत का, तर हवेत. पण ते पुन्हा अशी वक्तव्यं करायला लागले आणि सुप्रिया सुळे, शरद पवार, आर. आर. पाटील यांच्याबाबत वक्तव्य करणं हे झालं तर मात्र चुरस वाढेल.
"शरद पवार दिवाळीच्या दिवशी लोकसंपर्क करतातच. गेल्यावेळी वातावरण वेगळं होतं. लोकसभेला व्यापारी मेळावा वगैरे रद्द करणे प्रकार झाले होते. ते वातावरण आता बदललेलं दिसतंय.
त्यामुळे शरद पवार आता जोमाने भेटायला लागले आहे. ते यातून आमचं कुटुंब एकच आहे अजित पवारच येत नाहीत असं सांगतायत असं दिसतंय.”
निवडणूक जाहीर झाली तेव्हा बारामतीमध्ये शहरात अजित पवारांचं पारडं जड असलेलं दिसत होतं, तर ग्रामीण भागात संमिश्र परिस्थिती होती. आता मात्र ही लढत तितकी सरळ साधी होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











