मृत्यूनंतरही मेंदू सक्रिय असतो का? मृत्यूच्या वेळी मेंदूमध्ये काय होतं? वाचा

ज्या लोकांनी मृत्यूचा जवळून अनुभव घेतला आहे. अशा व्यक्ती त्यांचं संपूर्ण आयुष्य एकापाठोपाठ एक झपाट्यानं समोरुन जाताना पाहू शकतात किंवा महत्त्वाचे क्षण आठवू शकतात, असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्या लोकांनी मृत्यूचा जवळून अनुभव घेतला आहे. अशा व्यक्ती त्यांचं संपूर्ण आयुष्य एकापाठोपाठ एक झपाट्यानं समोरुन जाताना पाहू शकतात किंवा महत्त्वाचे क्षण आठवू शकतात, असं ते म्हणतात.
    • Author, मार्गारीटा रॉड्रिग्ज
    • Role, बीबीसी मुंडो

मृत्यूच्या प्रक्रियेदरम्यान मेंदूमध्ये काय घडतं, हे एक गूढ आणि संशोधन योग्य क्षेत्र आहे. त्यावरील संशोधनातून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत.

मज्जासंस्थेचा (नर्व्हस सिस्टिम) अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ जिमो बोर्जिगिन यांना मृत्यूच्या वेळी मेंदूमध्ये काय होतं हे समजलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं.

मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे, तरीही त्याबद्दलचं आपलं ज्ञान फार मर्यादित आहे. बोर्जिगिन यांना मृत्यूच्या वेळी मेंदूच्या स्थितीबाबतची जाणीव जवळजवळ एक दशक आधी तेही योगायोगानं झाली होती.

"आम्ही उंदरांवर प्रयोग करत होतो आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल तपासत होतो," असं त्यांनी बीबीसीच्या स्पॅनिश भाषेतील सेवेला सांगितलं.

मात्र अचानक त्यातील दोन उंदरांचा मृत्यू झाला. यामुळं त्यांना मेंदूच्या मृत्यूच्या प्रक्रियेदरम्यान मेंदूमध्ये होणारे बदल समजून घेण्याची संधी मिळाली.

त्यापैकी एका उंदरामध्ये सेरोटोनिन नावाचं रसायन जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलं. यामुळं त्यांना वाटलं की त्या उंदराला भ्रम होत होता का?

त्या म्हणाल्या, "सेरोटोनिन मेंदूच्या भ्रमांशी जोडलेले आहे." मूड नियंत्रित करणारे सेरोटोनिन केमिकल पाहून त्यांना याबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्या म्हणाल्या, "म्हणून मी आठवड्याच्या शेवटी याबाबतच्या पुस्तकांमध्ये ते शोधू लागले. त्यामागं काहीतरी योग्य कारण असावं असा विचार करून मी शोध सुरु केला. मरण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे हे जाणून मला आश्चर्य वाटलं."

डॉ. बोर्जिगिन या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात शरीर आणि मेंदूच्या संरचनेबद्दल शिकवतात. तेव्हापासून त्यांनी आपण मरत असताना मेंदूमध्ये काय होतं हे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

त्या म्हणतात की, त्यांना जे दिसलं ते त्यांनी विचार केलेल्या गोष्टीपेक्षा अगदी विरुद्ध होतं.

मृत्यूची व्याख्या

त्या सांगतात की, दीर्घकाळ कार्डिॲक अरेस्टनंतर (हृदयाचे ठोके थांबणे) जर एखाद्या व्यक्तीची नाडी चालत नसेल तर त्याला मृत मानलं जात असे.

या प्रक्रियेत मुख्यत्वे हृदयावर लक्ष केंद्रित केलं जातं. याला "कार्डिॲक अरेस्ट" म्हणतात. परंतु, यात मेंदू थांबण्याबद्दल काहीही सांगितलं जात नाही.

त्या म्हणतात, "वैज्ञानिक समज अशी आहे की, मेंदू काम करत नाही असं वाटतं, कारण व्यक्ती कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो बोलू शकत नाही, उभं राहू शकत नाही, बसू शकत नाही."

मेंदूला कार्य करण्यासाठी भरपूर ऑक्सिजनची गरज असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेंदूला कार्य करण्यासाठी भरपूर ऑक्सिजनची गरज असते.

मेंदूला कार्य करण्यासाठी भरपूर ऑक्सिजनची आवश्यकता असते. जर हृदय रक्त पंप करत नसेल तर ऑक्सिजन त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

"म्हणून सर्व संकेत हे सांगतात की, मेंदू आता कार्य करत नाही. शिवाय, तो कमीतकमी खूप निष्क्रिय आहे, फार सक्रिय नाही," असं त्या स्पष्ट करतात.

मात्र, त्यांच्या टीमचं संशोधन काही वेगळ्याच गोष्टी सांगतं.

मेंदू जास्त क्रियाशील होणं

उंदरांवरील 2013 च्या अभ्यासात, संशोधकांनी उंदरांच्या हृदयाची धडधड थांबल्यानंतर मेंदूतील अनेक रसायनांमध्ये वाढलेली क्रिया पाहिली.

त्यांना आढळलं की, सेरोटोनिन 60 पट आणि डोपामाइन 40 ते 60 पटीनं वाढलं आहे. तर नोरेपाइनफ्राइनचे प्रमाण 100 पटीनं वाढलं आहे.

डोपामाइन एक रसायन आहे, ज्यामुळं तुम्हाला चांगलं वाटतं. नोरेपाइनफ्राइनमुळं तुम्हाला खूप सतर्क किंवा अलर्ट झाल्यासारखं वाटतं.

त्या म्हणतात की, प्राणी जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्यांच्यात इतक्या उच्च दर्जाचं दिसणं अशक्य असतं.

2015 मध्ये त्यांच्या टीमनं मरणाऱ्या उंदरांच्या मेंदूवर आणखी एक अभ्यास प्रकाशित केला.

"दोन्ही अभ्यासात 100 टक्के उंदरांच्या मेंदूमध्ये खूप क्रियाशीलता दिसून आली. त्यांचा मेंदू खूप काम करत होता आणि खूप सक्रिय स्थितीत होता," असं डॉ. बोर्जिगिन म्हणतात.

गामा व्हेव्ज

2023 मध्ये, त्यांनी एक संशोधन प्रकाशित केले. ज्यामध्ये त्यांनी कोमात असलेल्या आणि लाइफ सपोर्टवर (रुग्ण जिवंत ठेवण्यासाठीच्या विविध वैद्यकीय पद्धती) असलेल्या चार रुग्णांचा अभ्यास केला होता.

त्यांनी त्याच्या मेंदूची क्रिया स्कॅन करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर विशेष इलेक्ट्रोड (विद्युत सिग्नल पाठवणारे उपकरण) लावले.

ते चौघंही मृत्यूच्या दारात होते. त्यामुळं त्यांची मदत करणं अशक्य असल्याचं डॉक्टर आणि कुटुंबीयांनी मान्य केलं, म्हणून त्यांनी नातेवाईकांच्या परवानगीनं त्यांना जिवंत ठेवणारे व्हेंटिलेटर बंद केले.

त्यातील दोन रुग्णांचे मेंदू अतिशय सक्रिय असल्याचे संशोधकांना आढळून आलं. यावरून त्याचा मेंदू अजूनही कार्यरत असल्याचं दिसून येतं.

त्यांना गामा लहरी देखील पाहायला मिळाल्या, ज्या मेंदूच्या सर्वात वेगवान लहरी आहेत. गामा लहरी कठीण माहिती आणि स्मरणशक्तीवर प्रक्रिया करण्यास मदत करतात.

गामा व्हेव्ज किंवा गामा लहरी कठीण माहिती आणि स्मरणशक्तीवर प्रक्रिया करण्यास मदत करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गामा व्हेव्ज किंवा गामा लहरी कठीण माहिती आणि स्मरणशक्तीवर प्रक्रिया करण्यास मदत करतात.

एका रुग्णाच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंच्या टेम्पोरल लोबमध्ये वाढलेली क्रिया दिसली. टेम्पोरल लोब हा मेंदूचा एक असा भाग आहे, जो तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं जग समजून घेण्यासाठी तुमच्या इंद्रियांचा वापर करण्यास मदत करतो.

डॉ. बोर्जिगिन म्हणाल्या की, मेंदूचा उजवा भाग, ज्याला टेम्पोरोपॅरिटल जंक्शन म्हणतात, सहानुभूती वाटण्यासाठी किंवा इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे असते.

त्या म्हणतात, "हृदयविकाराच्या झटक्यातून (कार्डिअक अरेस्ट) वाचलेले आणि मृत्यूच्या जवळ गेलेले बरेच रुग्ण चांगला व्यक्ती बनतात. यामुळं त्यांना इतरांबद्दल अधिक सहानुभूती वाटते."

मृत्यूच्या जवळ गेल्यानंतरचे अनुभव

काही लोक ज्यांना जवळ-जवळ मृत्यूचा अनुभव आला आहे, असे म्हणतात की ते त्यांचं संपूर्ण आयुष्य एकापाठोपाठ एक झपाट्यानं समोरुन जाताना पाहू शकतात किंवा महत्त्वाचे क्षण आठवू शकतात.

अनेक लोक म्हणतात की, त्यांनी एक तेजस्वी प्रकाश पाहिला. काही लोक म्हणतात की, त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या शरीराच्या बाहेर आहेत आणि वरून काय होत आहे ते पाहत आहेत.

डॉ. बोर्जिगिन यांनी त्यांच्या अभ्यासात ज्या अतिक्रियाशील मेंदूचं वर्णन केलं आहे, त्या हे स्पष्ट करु शकतील का की काही लोकांना मृत्यूच्या इतक्या जवळ गेल्यावर इतके तीव्र अनुभव का आणि कसे आले?

ज्यावर त्या म्हणतात, "हो, मला वाटतं की हे असंच आहे."

कार्डिअक अरेस्टमधून वाचलेल्या सुमारे 20 ते 25 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना पांढरा शुभ्र प्रकाश किंवा काही वस्तू दिसल्या

फोटो स्रोत, Getty Images

कार्डिअक अरेस्टमधून वाचलेल्या सुमारे 20 ते 25 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना पांढरा शुभ्र प्रकाश किंवा काही वस्तू दिसल्या, ज्यातून समजतं की त्यांच्या मेंदूचा तो भाग (व्हिज्युअल कॉर्टेक्स) अजूनही सक्रिय होता, जो आपण पाहू शकतो.

व्हेंटिलेटर बंद केल्यानंतर ज्या दोन रुग्णांचे मेंदू खूप सक्रिय होते, त्यांच्या बाबतीत, संशोधकांना असं आढळून आलं की दृष्टीसाठी जबाबदार मेंदूचा भाग (व्हिज्युअल कॉर्टेक्स) खूप सक्रिय होता. हे त्यांच्या त्या अनुभवांशी संबंधित असू शकतं, जसं की पांढरा शुभ्र प्रकाश पाहणं.

एक नवीन विचार

डॉ. बोर्जिगिन मान्य करतात की, मानवावरील त्यांचा अभ्यास फारच कमी आहे. आपला मृत्यू होत असताना आपल्या मेंदूमध्ये काय होतं यावर त्यांना अजून संशोधन करण्याची गरज आहे.

दरम्यान, 10 वर्षांहून अधिकच्या संशोधनानंतर, डॉ. बोर्जिगिन एका गोष्टीची खात्री बाळगतात.

त्यांचा असा विश्वास आहे की, हृदयविकाराच्या वेळी हायपोॲक्टिव्ह (कमी सक्रिय) होण्याऐवजी मेंदू खूप सक्रिय होतो.

पण जेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, हे लक्षात येतं तेव्हा काय होतं?

यावर त्या म्हणतात, "आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं पुस्तकांमध्ये त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. खरं म्हटलं तर त्याबद्दल कोणालाच माहिती नाही."

त्या हायबरनेशनचा उल्लेख करतात. हायबरनेशन ही अशी अवस्था आहे, जेव्हा एखादा प्राणी ऊर्जा वाचवण्यासाठी आपल्या हृदयाची गती कमी करतो आणि जास्त अन्न न खाताही हिवाळ्यात जिवंत राहतो.

डॉ. जिमो बोर्जिगिन मिशिगन विद्यापीठात शिकवतात.

फोटो स्रोत, Jimo Borjigin

फोटो कॅप्शन, डॉ. जिमो बोर्जिगिन मिशिगन विद्यापीठात शिकवतात.

डॉ. बोर्जिगिन आपलं मतं मांडताना म्हणाल्या की, उंदीर आणि मानवांसह प्राण्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता हाताळण्याची एक नैसर्गिक क्षमता असते.

"आतापर्यंत असं मानलं जात होतं की, जेव्हा हृदय थांबतं तेव्हा मेंदूला अत्यंत असहाय्य वाटतं. जेव्हा हृदय थांबतं, तेव्हा मेंदूचाही मृत्यू होतो. अजूनही असा विचार केला जातो की, मेंदू त्याला सामोरं जाऊ शकत नाही आणि मरतो."

पण ते खरं आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, असं त्या ठामपणे सांगतात. त्यांच म्हणणं आहे की, मेंदू किंवा मन सहजासहजी हार मानत नाही. इतर संकटांप्रमाणेच ते जगण्यासाठी संघर्ष करतात.

त्या म्हणतात, "ऑक्सिजनची कमतरता असताना मेंदू नैसर्गिकरित्या कसा टिकून राहतो याचं हायबरनेशन हे उत्तम उदाहरण आहे. पण या कल्पनेवर अजून अभ्यासाची गरज आहे."

अजून खूप काम शिल्लक आहे

डॉ. बोर्जिगिन यांचं म्हणणं आहे की, त्यांना आणि त्यांच्या टीमला आपल्या अभ्यासात जे काही आढळलं आहे. ते एका मोठ्या शोधाचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळं अजून बरंच काही शोधणं बाकी आहे.

"मेंदूमध्ये हायपोक्सिया (ऑक्सिजनची कमतरता) हाताळण्याचे नैसर्गिक मार्ग आहेत, जे आपण समजू शकत नाही," असं त्या म्हणतात.

त्या पुढं सांगतात, "वरवर, आपल्याला माहीत असतं की ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअक अरेस्ट येतो त्यांना आश्चर्यकारक, वैयक्तिक अनुभव येतात. आमचा डेटा दर्शवितो की, हा अनुभव मेंदूच्या वाढीव क्रियांमुळं होतो."

आता प्रश्न पडतो की मरताना किंवा मृत्यू होताना मेंदू खूप सक्रिय का होतो?

यावर त्या म्हणतात की, "आम्हाला समजून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आणि शोधण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे.

सध्या आपण लाखो लोकांना त्यांच्या वेळेपूर्वीच त्यांना मृत मानतो. कारण आपल्याला पूर्णपणे समजत नाही की, मरण्याच्या प्रक्रिये दरम्यान काय होतं."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.