12 वी परीक्षेआधीच व्हॉट्सअपवर 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका, तरीही बोर्ड म्हणतंय पेपर फुटलाच नाही

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
नागपुरात 12वीचे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले होते. आता त्याची चौकशी सुरू असतानाच गणिताचाही पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून यामधून मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सेंट उर्सुला शाळेतील पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे 18 फेब्रुवारीला रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते.
संबंधित केंद्रातील एक विद्यार्थिनी वारंवार लघुशंकेसाठी जात होती. ती एकदा गेली तर 15 मिनिटं परतली नाही. त्यामुळे पर्यवेक्षकाला संशय आला. शिक्षिकेनं तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळला. यामध्ये तिच्या फोनचे लॉक उघडायला सांगितल्यावर त्यामध्ये एका ग्रुपमध्ये 10 वाजून 37 मिनिटाला रसायनशास्त्राचा पेपर आला होता.
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आली होती. त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे देखील होती. याच ग्रुपवर 16 फेब्रुवारीला झालेला भौतिकशास्त्राच्या पेपरचे फोटो काढून पाठवल्याचे चौकशीदरम्यान दिसले.
एकाच ग्रुपमध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पेपर फुटल्यानं सदर पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरुवातीला ज्या व्हॉट्सअप नंबरवरून हे पेपर पाठवण्यात आले आणि ज्यांनी या प्रश्नांची उत्तरे पाठवली त्यांना पोलिसांनी अटक केली.
यामध्ये आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून आज 27 फेब्रुवारी रोजी दिनेश कोटंगले, मनीष शंभरकर, प्रदीप भैयालाल जांगडे, संदीप सरटकर या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
निशिकांत मूल (45, मानकापूर) याला अटक करण्यात आली असून तो खासगी शिकवणी वर्ग चालवतो. तसेच फरहान अख्तर असं बारावीच्या विद्यार्थ्याचं नाव असून त्यालाही अटक करण्यात आली होती. तो बारावीचा विद्यार्थी असला तरी तो अल्पवयीन नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
'XII' अशा रोमन अंकात हा ग्रुप होता. यामध्ये निशिकांतने बारावीचे पेपर फॉरवर्ड केले आणि त्याखाली फरहानने उत्तरं पाठवली होती. त्यामुळे दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पण, त्याचे बारावीचे पेपर सुरू असल्यानं त्याला जामीन मिळाला आहे. तरी या अटकेमुळे त्याला बारावीचा एक पेपर देता आला नाही, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
याच प्रकरणात चौकशी करत असताना पोलिसांना आणखी काही लिंक सापडल्या. त्यामधून त्यांनी मोमिनपुरा भागातील एक्स्लेन्ट अकादमीचा संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद या दोघांना अटक केली आहे. हे दोघंही खासगी शिकवणी वर्गात काम करणारे असून त्यांनी प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्याचं समोर आलं आहे.
गणिताचा पेपरही फुटला
पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी केली असता यापैकी मुस्तफा खानच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप ग्रुपवर काही मेसेज डिलिट झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता गणिताचाही पेपर फोडल्याचं त्यांनी कबुल केलं.
याप्रकरणी त्यांनी ज्यांची नाव घेतली अशा एका खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याचं नाव दिनेश कोटंगले आहे. तर नागपूर शहरातीलच एका अनुदानित शाळेतील शिक्षकालासुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
आतापर्यंत एकूण 4 व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका फॉरवर्ड झाल्या असून ज्यांनी या प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्या त्यांना पोलिसांनी चौकशी करून अटक केली आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना अटक झाली असून त्यामध्ये एकाला जामीन मिळाला आहे. यामध्ये 2 बारावीचे विद्यार्थी असून एक अल्पवयीन आहे.
तसेच आणखी एका खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याचं नाव दिनेश कोटंगले आहे. तो बीसीए शिकला असून बॉयोलॉजीची शिकवणी घ्यायचा. त्यानं सुद्धा पेपर फॉरवर्ड केल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
मूळ आरोपी अजूनही मोकाट
बारावीची पेपर फुटीप्रकरणात एसआयटीद्वारे तपास होत आहे. याप्रकरणात आतापर्यंत ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांनी फक्त पेपर फॉरवर्ड केले होते.
एकानं उत्तरं पाठवली होती. पण, मूळ पेपर कुठून फुटला? कोणी पहिल्यांदा पेपरचे फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवले? याचा तपास मात्र अजूनही पोलिसांना लागलेला नाही.
मूळ आरोपी कोण आहे? हा पेपर कुठल्या केंद्रातून फुटला? फोडणाऱ्याला पेपर कसा मिळाला? याची सविस्तर चौकशी सदर पोलीस करत आहेत.
4 व्हॉट्सअप ग्रुपवर हे पेपर फॉरवर्ड झाले होते. यामध्ये जवळपास 50-60 विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या वेळेआधी तिन्ही पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले होते.
आता खरंच चारही ग्रुपमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला का? कोणाला या पेपर फुटण्याचा फायदा झाला यासंदर्भात देखील तपास सुरू असल्याचं सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
"आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या चौकशीत कुठंही पैशांचा व्यवहार आढळला नाही. कदाचित काही विशिष्ट खासगी शिकवणी वर्गाच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी हे पेपर फोडले असावे असा संशय पोलिसांना आहे."
पेपर फुटला नाही – बोर्ड
या पेपरफुटीप्रकरणावर नागपूर विभागीय बोर्डानं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पेपर फुटला नसल्याचा दावा बोर्डानं केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "हा प्रकार पेपरफुटीचा नाही. पेपर सार्वत्रिक होण्याला पेपर फुटला असं म्हणतात. पण, हा पेपर सुरुवातीला एकाच विद्यार्थिनीजवळ दिसला. तिला लाभ व्हावा यादृष्टीनं हा पेपर फुटल्याचं दिसलं."
"याला आपण परीक्षेतील गैरप्रकार म्हणू शकतो. पेपर फुटला नसल्यानं पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रश्न येत नाही. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असून त्यांच्या चौकशीत जे आढळून येईल त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पुढे जाऊ."
एकूण 8 आरोपींना अटक
यामध्ये आतापर्यंत दिनेश कोटंगले, मनीष शंभरकर, प्रदीप भैयालाल जांगडे, संदीप सरटकरसह एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली.
यापैकी गणित आणि रसायनशास्त्राचा पेपर दिनेश कोटांगले याने मुस्तफाच्या मोबाईलवर पाठवल्याचे चौकशीत समोर आले. त्याला अटक करून चौकशी केली असता कोटांगले याला एका अल्ताफ गोडिल नावाच्या व्यक्तीने पेपर मिळू शकतो का विचारणा केली होती.
यावेळी मनीष शंभरकर तर्फे विशाखा ज्युनियर कॉलेजचे येथील मुख्याध्यापक प्रदीप जांगडे याला भेटायला लावले. त्यावरून त्यांनी जांगडेला भेटून रसायनशास्त्राचे पेपर आणि MCQ आणले. तसेच गणिताचे पेपर सुद्धा अल्ताफ आणि मुस्तफाच्या मोबाईलवर पाठवले.
यावरून आरोपी प्रदीप जांगडे याला विचारले असता संदीप सरटकर यांनी पाठवल्याचे सांगितले. यापैकी अल्ताफ नावाचा आरोपी अजून फरार असून त्याला अटक व्हायची आहे.
इतर आरोपींना अटक केली आहे. तरीही अजून पेपर कोणी फोडला, पेपर कुठून आणला? याचा शोध मात्र लागला नाही. या सगळ्या आरोपीच्या लिंकमधून आता मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
यापैकी एका शाळेच्या व्यवस्थापकासोबत आम्ही संपर्क साधला. पण पोलीस चौकशी करत आहेत आणि तो शिक्षकाचा वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणत शाळेची बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
तसेच खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सुद्धा त्या शिक्षकांचा प्रश्न आहे म्हणत बोलण्यास नकार दिला.
आरोपी दिनेश कोटांगले यांचे भाऊ गणेश कोटांगले यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं, "माझ्या भावाचा यामध्ये इतका काही दोष नाही. आता यासंदर्भात पोलीस व्यवस्थित चौकशी करतील त्यामधून जे काही समोर यायचं आहे ते येईल. आमचे वकील सुद्धा कोर्टात बाजू मांडतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











