मराठी छपाईचा पहिला देवनागरी फॉन्ट जपानी माणसानं असा तयार केला

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
"तुमच्या जपानी कंपनीत 50-60 वर्षांपूर्वी प्रशिक्षणासाठी कोणी भारतीय माणूस आला होता का?"
'इन्स्टिट्यूट फॉर जापनीज् लँग्वेज अँड लिंग्विस्टिक' या टोकियोतल्या संस्थेत प्राध्यापक असलेले पुण्यातले प्रशांत परदेशी जगातल्या सगळ्यात मोठ्या फॉन्ट बनवणाऱ्या 'मोरीसावा' या कंपनीला फोन करून असा प्रश्न विचारत होते.
हा प्रश्न त्यांना स्वतःला जरा वेगळाच किंवा अगदी वेड्यासारखा वाटत होता.
पण असा प्रश्न त्यांनी विचारला नसता तर देवनागरी लिपितला पहिला फोटोटाईप सेटिंग फॉन्ट कसा तयार झाला, याबाबतच्या इतिहासाची काळाच्या पडद्यामागे दडलेली गोष्ट कदाचित कधीच बाहेर आली नसती.
कारण हा फॉन्ट पुढं भारतातल्या छपाई व्यवसायाचं भवितव्य बदलून टाकणारा ठरला.
'फॉन्ट'च्या शोधाआधी कशी व्हायची छपाई?
फोटोटाईप सेटिंग फॉन्टच्या शोधाआधी खिळ्यांचा वापर करून छपाई केली जात असे. प्रत्येक स्वर आणि व्यंजनासाठी वेगळे खिळे असत.
मजकूर बनवताना एक-एक खिळा जुळवून वाक्य तयार करावे लागायचे. मात्र, मोरीसावा यांच्या कंपनीने लावलेला शोध पुण्यात आला आणि छपाईचं सारं तंत्रज्ञानचं पालटलं.
त्याचीच माहिती घेण्यासाठी 4 ऑगस्ट 2015 ला प्रशांत परदेशी मोरीसावा कंपनीला फोन लावत होते. तेव्हा फोन कंपनीच्या जनसंपर्क विभागात लागला.
त्यांच्या प्रश्नावर चिडचिड न करता फोनवरची महिला कर्मचारी जपानी भाषेत म्हणाली, "मला तुम्हाला लगेच सांगता येणार नाही. मी थोडी माहिती काढून अर्ध्या-एक तासात सांगते."


त्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
फोन लावण्याआधी जेवणाच्या सुटीत परदेशी हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जपानी फॉन्टबद्दल चर्चा करत बसले होते.
जपानी भाषेत वेगवेगळ्या लिपी असल्याने कॉम्प्युटरवरही कसे वेगवेगळे फॉन्ट आहेत आणि त्याची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत अशी चर्चा सुरू होती.
तेव्हा जपानमधली फॉन्ट बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी कोणती, असा प्रश्न परदेशी यांनी सहकाऱ्यांना विचारला. गिनिज वर्ल्ड बूकमध्ये रेकॉर्ड असलेली ओसाका या भागातली मोरीसावा हीच ती कंपनी असल्याचं त्यांना समजलं होतं.
फॉन्ट बनवणारी जपानमधील सर्वात मोठी कंपनी
टोकियोपासून ओसाका जवळपास 500 किमी लांब आहे. तिथून जवळच परदेशी यांनी पीएचडी केलेली ती कोबे युनिव्हर्सिटी होती. शिकण्यासाठी आणि नंतर शिकवण्यासाठी परदेशी यांनी कोबेमध्ये जवळपास 16 वर्षं वास्तव्य केलं होतं. त्यामुळं तो भाग त्यांचा तसा ओळखीचा होता.
परदेशी यांनी गुगलवर 'मोरीसावा कंपनी' सर्च केलं. तिथल्या शिस्तबद्ध संस्कृतीप्रमाणे कंपनीने स्वतःबद्दलची सगळी माहिती व्यवस्थितपणे आपल्या वेबसाईटवर दिली होती.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
तिथंच त्यांना कंपनीचा फोन नंबर मिळाला आणि त्यांनी फोन लावून तो प्रश्न विचारला.
कंपनीला विचारलेल्या प्रश्नातला हा 'एखादा भारतीय माणूस' म्हणजे दिगंबर दामोदर गांगल असावा, अशी शंका परदेशी यांना आली होती.
पुण्यातल्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या लोकसंग्रह छापखान्याची व्यवस्था ते पाहत होते.
प्रिटिंग क्षेत्राचा अभ्यास करणारे दिगंबर दामोदर गांगल
परदेशी आणि गांगलांची भेट एकदाच 1986 साली झाली होती. तीही ओझरती.
"मी तेव्हा नुकतीच जपानी भाषा शिकायला सुरुवात केली होती. एके दिवशी एका जपानी माणसाचं श्राद्ध आहे आणि त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी जपानवरून तीन लोक आले होते. तेव्हा तुम्ही संगमावर या, असा निरोप मला मिळाला," असं परदेशी सांगतात.
मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या प्राध्यापक हिरोशी फुकाझावा यांचं ते श्राद्ध होतं. ते अस्खलित मराठी बोलायचे. त्यांच्या अस्थी मुळा-मुठा नदीत सोडल्या जाव्यात अशी त्यांची इच्छा होती.
त्या कार्यक्रमाला एक धोतर, खादीचा शर्ट घातलेले दि. दा. गांगल तिथंच उभे होते. गांधीवादी असल्यानं ते नेहमी असाच पेहराव करत.
"तुमचं नाव काय? असा बेधडक प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून मात्र एकदम कावराबावरा झालो," असं परदेशी सांगतात.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
'इंडो-जापनिज असोसिएशन' या संस्थेचे संस्थापक असणाऱ्या गांगल यांचं नाव त्या काळी जपानी शिकणाऱ्या मुठभर लोकांपैकी सगळ्यांनाच माहीत होतं.
प्रिटिंगच्या क्षेत्रात अभ्यास करायला जपानला भेट दिल्याची माहिती तेव्हा गांगल यांनी परदेशींना दिली. 1986 मधील हा धागा पकडून 2015 साली मोरीसावा कंपनीत चौकशी करण्याचं धाडस परदेशी करत होते.
आश्चर्य म्हणजे, मोरीसावा कंपनीकडून खरंच तासाभराने फोन आला. आमच्या कंपनीचे मानद अध्यक्ष तुमच्याशी बोलू इच्छितात, असं ती महिला कर्मचारी सांगत होती.
जगातल्या सगळ्या लिपिंचे फॉन्ट बनवणाऱ्या इतक्या मोठ्या कंपनीच्या माजी प्रमुखाला आपल्याशी बोलावं वाटावं, असं आपल्या प्रश्नात काय होतं याचं कोडं परदेशी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
"तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामुळं मला माझ्या लहानपणीची आठवण आली आणि माझे डोळे पाणावले," योशीआकी मोरीसावा (आजचे वय वर्षे 90) नावाचे कंपनीचे चेअरमन फार भावूक झाले होते. मला ओसाकाला भेटायला या असा प्रेमळ हट्टच त्यांनी धरला.
मराठी फॉन्ट आणि गांगलांचं योगदान
दोन एक महिन्यांनी प्रशांत परदेशी त्यांना भेटायला गेले तेव्हाही त्याचं जंगी स्वागत झालं. जपानमध्ये सात आठ शाखा असणारी ती एक मोठी कंपनी होती.
दुपारी जेवताना योशिआकी स्वतः परदेशी यांच्याशी गप्पा मारत होते. ते लहान असताना त्यांचे वडील, नोबुओ मोरीसावा भारतात गेले होते, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा भारतातून त्यांनी अनेक गोष्टी आणल्या होत्या.
योशिआकी मोरीसावा यांचा मुलगा आकिहिको सध्या मोरीसावा कंपनीचं काम पाहतो. त्यालाही योशिआकी त्याच्या आजोबांची, नोबुओ मोरीसावा यांची, गोष्ट सांगत होते.
"तुम्ही विचारलेल्या प्रश्नानंतर आमच्या कंपनीच्या ग्रंथालयातून मी सगळी माहिती शोधून काढायला लावली. ती तुम्हाला देतो," असं म्हणत त्यांनी एक फाईल पुढे केली. त्यात त्यांचे वडील पुण्यात आले होते, तिथे काय काय झालं या सगळ्याचे फोटो होते.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
भारतातून परत आल्यानंतर नोबुओ मोरीसावा यांनी जपानी भाषेत लिहिलेला लेखही त्यात होता. तारीख, वार आणि अगदी छोट्या छोट्या तपशीलांसह सगळी माहिती त्यांच्याकडे नोंदवून ठेवली होती.
परदेशी यांची शंका खरी ठरली. त्या लेखात गांगलांचं नाव होतं, त्यांचा फोटोही होता. मोरीसावा गांगल यांना पहिलं मराठी देवनागरी फॉन्ट असलेलं मशीन भेट देतायत, ही माहितीही त्यात होती.
ते मशीन कसं होतं, काय होतं? याची बहुतेक माहिती परदेशी यांना मोरीसावा कंपनीकडून मिळाली. पण गांगल जपानपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांच्या कामामागची प्रेरणा काय होती असे काही प्रश्न अनुत्तरीत होते.
तिथे उपलब्ध होती ती सगळी माहिती घेऊन परदेशी टोकियोला परतले आणि गांगल यांच्याबद्दल माहिती काढणं सुरू केलं.
परदेशी यांनी त्यांच्याआधी काही जपानी शिकलेल्या पुण्यातल्या लोकांना गांगलांबद्दलची माहिती विचारली. गांगल यांना ओळखणारे, त्यांच्या सहवासात राहिलेले अनेक लोक होते.
पण गांगल जपानला नेमके कधी - कधी आणि का गेले? ते काही त्यांना माहीत नव्हतं.
त्यावेळी बोटीने जपानला जायला मुंबईवरून 22 दिवस लागायचे. त्यामुळे त्याचा खर्चही फार मोठा होता. मग गांगल यांचा जपानला जायचा खर्च कोणी केला, हेही शोधायचं होतं.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
शेवटी गांगल जिथं काम करत होते त्या अनाथ विद्यार्थीगृहात विचारपूस केल्यावर त्यांच्या तीन मुलांचा संपर्क मिळाला. ते तिघेही पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त स्थलांतरित झालेले.
"त्या तिघांनाही फोन करून तुमचे वडील जपानला का गेले होते? आणि भारत पारतंत्र्यात असताना तिकडे जायला त्यांना पैसे कोणी दिले? असं आम्ही त्यांना विचारलं. तेव्हा त्या तिघांनी एकमेकांशी चर्चा करून सगळी माहिती उपलब्ध करून देतो, असं सांगितलं," प्रशांत परदेशी सांगतात.
त्याशिवाय, गांगल यांच्या एकसष्ठी निमित्त अनाथ विद्यार्थी गृहाने 'दि.दा. गांगल गौरव ग्रंथ' नावाचं पुस्तक छापलं होतं. मात्र त्याची एकही प्रत प्रकाशकाकडेही उपलब्ध नव्हती.
खूप शोधल्यानंतर ते पुस्तक परदेशी यांना ठाण्याच्या एका ग्रंथालयात सापडलं. एका माणसाला कामाला लावून ते पुस्तक फोटोकॉपी करून घेतलं आणि गांगल यांच्याबद्दलची सगळी माहिती उपलब्ध झाली.
काही दिवसांत गांगल यांच्या तीन मुलांनी चर्चा करून एक टिपण लिहून पाठवलं. हे सगळं मिळेपर्यंत जवळपास तीन वर्ष गेली.
पण त्यातून महत्त्वाची माहिती हाती लागली.

या बातम्याही वाचा:
- 'हडप्पाकालीन लिपिचा उलगडा करेल, त्याला 8 कोटी 65 लाखांचं बक्षीस', स्टॅलिन यांनी ही घोषणा का केलीय?
- जुळ्या भावांची कमाल; एक अनोखी भाषा जी फक्त ते दोघेच बोलतात
- 'अभिजात' मराठी: भालचंद्र नेमाडे, गणेश देवींसहित साहित्यिक-विचारवंतांना या निर्णयाबद्दल काय वाटतं?
- मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर, एखादी भाषा अभिजात कशी ठरते?

कोण होते दि. दा. गांगल?
मुरबाडमध्ये जन्मलेले दि. दा. गांगल वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यातल्या अनाथ विद्यार्थी गृहात दाखल झाले होते. काही दानशूर ब्राम्हण मंडळींनी सुरू केलेल्या या संस्थेचा अनाथ मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण द्यायचं हा उद्देश होता.
प्रिटिंगचं तंत्रज्ञान, साबण, खडू, शाई, कागद, काडेपेट्या अशा वस्तूंचं उत्पादन करणं अशा गोष्टी तिथं शिकवल्या जात. गांगल मात्र 1934 साली एमएससीपर्यंत शिकले होते.
त्या जोरावर त्यांना अनेक चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण अनाथ विद्यार्थीहाचं ऋण म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्यच तिथं बहाल केलं होतं. तिथेच ते मुलांना विज्ञानही शिकवायचे.
आता जशा चीनच्या वस्तू असतात तशा त्या काळी जपानच्या वस्तू बाजारपेठेत असायच्या. सांगलीचे उद्योगपती धनी वेलणकर यांनी जपानवरून 80 हातमागाची यंत्र आणली होती. त्यावर मऊ, पातळ साड्या विणल्या. त्यामुळे साडीचं 'पातळ' हे नाव रुजू झालं.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
जपानचं भूत भारतातल्या बहुतेक जहालमतवाद्यांच्या डोक्यावर होतं. "1905 च्या युद्धात रशियाला हरवणाऱ्या जपानच्या प्रेमात लोकमान्य टिळकांपासून ते सुभाषचंद्र बोसांपर्यंत सगळे पडले होते," असं परदेशी सांगतात.
एकीकडे ब्रिटिश राजसत्तेविरोधात बंड पुकारण्याची प्रेरणा जपानकडून मिळत होती.
तर दुसरीकडे भारत स्वतंत्र झाल्यानंतरची शिक्षण पद्धती कशी असावी याबद्दल अनेक विचारधारा होत्या. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पुरोगामी विचारांचे गोपाळ कृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू असं प्रत्येकाचं वेगळं मत होतं.
मानसिक आणि शारीरिक विकास करणारं शिक्षण मुलांना देण्यात यावं असा एक विचार तेव्हा रुजत होता. तो जपानकडूनच घेण्यात आला होता.
त्याचा अभ्यास करण्यासाठी अनाथ विद्यार्थी गृहाकडून दि. दा. गांगल आणि ग. श्री. खैर 1937 मध्ये जागतिक शिक्षण परिषदेच्या अधिवेशनासाठी पहिल्यांदा जपानला गेले. त्यासाठी त्यांना श्री. करंदीकर नावाच्या एका माणसाने शिष्यवृत्ती दिली होती.
"त्या परिषदेला भारतातून 50 लोकं गेली होती. त्या सगळ्यांची नावं, व्यवसाय, त्यांचे प्रांत याची यादी आजही जपानमध्ये उपलब्ध आहे," प्रशांत परदेशी सांगतात.
मराठीतून पाठ्यपुस्तकं छापण्याची इच्छा
सात दिवसांच्या परिषदेत त्यांची जिओ मुराता यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याशी बोलताना गांगल यांनी मुलांसाठी मराठीतून पाठ्यपुस्तकं छापण्याची इच्छा व्यक्त केली.
तेव्हा शाई कशी बनवायची आणि छपाई कशी करायची हे शिकण्यासाठी मदत करण्याची विनंती गांगल यांनी त्यांना केली.
त्यांच्या मदतीनं गांगल यांनी 'तोक्यो कोग्यो दाईगाकु' या विद्यापीठात 10 महिने छपाईच्या शाईचा तात्त्विक आणि प्रायोगिक अभ्यास केला. त्यासाठीही त्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
नंतर 'मोरोहोशी इंक' या शाई बनवणाऱ्या कंपनीच्या प्रयोगशाळेत अनुभव घेतला. तेव्हा ते तोक्यो मधल्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहात ते राहत होते.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
जपानमध्ये सव्वा वर्ष काढल्यावर त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली. त्यावेळी त्यांच्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या.
"त्यावेळी क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस यांच्यासह गांगल भारत मुक्तीसंघाच्या दर महिन्याच्या बैठकांनाही जात असत," असं परदेशी सांगतात.
हा दुसऱ्या महायुद्ध सुरू होण्याचा काळ होता. देशातले पुतळे वितळवून जपानने बॉम्ब बनवण्याची सुरुवात केली होती. त्यामुळं जपानी नागरिकांना धनधान्याचाही तुटवडा जाणवत होता. प्रत्येकाला मर्यादीत स्वरुपात धान्य मिळत असे.
भारत पारतंत्र्यात असल्याने गांगल यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट होता. त्यामुळे गांगल यांना जास्तीचं धान्य दिलं जाई. आजूबाजूच्या जपानी लोकांना गांगल ते धान्य वाटत. त्यामुळं स्थानिक जपानी लोकांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते.
पुण्यात परत आल्यानंतर जपानमध्ये शिकलेल्या गोष्टी इतरांना शिकवायला, पुस्तकं छापायला त्यांनी सुरुवात केली. पण 1948 मध्ये गांधी हत्येनंतर त्यांचा छापखाना जाळला गेला.
त्याचं वाईट वाटून न घेता गांगल यांनी पुन्हा छापखाना उभारला. आता नव्या छापखान्यात आधुनिक यंत्रसामग्री असावी यासाठी ते पुन्हा दुसऱ्यांदा जपानला गेले.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
नव्या यंत्रांमुळे छापखाना उत्तम चालू लागला. पूर्वी फक्त 15 कामगारांवर चालणारा कारखाना आधुनिक यंत्रणेमुळे 150 कामगारांना रोजगार देऊ लागला. त्यात त्यांची व्यावसायिक दृष्टी होती.
छापखान्यातून आलेल्या उत्पन्नावर अनाथ विद्यार्थीगृहातल्या 275 विद्यार्थ्यांचं पालनपोषण होत असे. शिवाय, 600 च्या वर विद्यार्थ्यांना संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मोफत दिलं जाई.
"1957 मध्ये जपानला आशियाई मुद्रांक परिषद होती. त्यासाठी ते पुन्हा जपानला गेले. तेव्हा त्यांची भेट नोबुओ मोरीसावा यांच्याशी झाली," प्रशांत परदेशी पुढे सांगत होते.
नोबुओ मोरीसावा यांनी मोकीची इशीइ यांच्यासोबत संशोधन करून पहिलं जपानी लिपी असलेलं 'फोटोटाईप सेटिंग' नावाच्या मशीनचं प्रोटोटाईप तयार केलं होतं. त्याचं 23 जून 1925 ला त्याचं पेटंटही त्यांना मिळालं होतं.
देवनागरी फॉन्टसाठी गांगलांनी कसे केले प्रयत्न?
दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी त्यात आणखी सुधारणा करून मशीन अद्ययावत केलं होतं.
या फोटोटाईप सेटरमध्ये खिळ्यांचा वापर न करता थेट अक्षरं टाईप करता येत होती. ती अक्षर प्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संवेदनशील कागदावर उमटवली जात असत.
पुढे या कागदावर रासायनिक प्रक्रिया करून छपाईसाठी तयार मजकूराची पट्टी बनत असे. त्याचा वापर करून कमी वेळात खूप जास्त मजकूर छापता येई.
छपाई क्षेत्रातली ही क्रांतीच होती. आत्ताच्या प्रिंटर आणि कीबोर्डच्या शोधाचं मूळ या मशीनमध्ये होतं.
नोबुओ मोरीसावा यांनी या मशिनीसाठी जपानी लिपीचे फॉन्ट तयार केले होते. जपानी भाषेत लिपीचे तीन प्रकार असतात. त्यामुळे त्यांचे फॉन्टपण तसेच गुंतागुंतीचे होते.

फोटो स्रोत, Morisawa Inc.
मग आपल्या सोप्या देवनागरीचे फॉन्ट बनवणं त्यांच्यासाठी काय अवघड असणार! म्हणून गांगलांनी नोबुओ यांना देवनागरी फॉन्ट असलेलं मशीन बनवून देण्याची विनंती केली.
"मग देवनागरी भाषा काय असते, त्यात कोणते स्वर, व्यंजनं असतात हे समजून घेण्यासाठी नोबुओ हे गांगल यांना दोन दिवस त्यांच्या कंपनीत, ओसाकाला, घेऊन गेले. गांगल यांना जपानी येत असल्यानं त्यांच्यातला संवादही सहज होत होता," असं परदेशी पुढे सांगतात.
"एका वर्षांत नोबुओ मोरीसावा यांनी जगातलं पहिलं, देवनागरी फॉन्ट असलेलं फोटोटाईपसेटिंग मशीन बनवलं आणि भारतात पाठवून दिलं."
भारताची भाषा, लिपी, तिथली संस्कृती अनुभवल्यानंतर नोबुओ यांनाही भारत भेटीची ओढ लागली होती. म्हणून मशीनपाठोपाठ तेही भारतात आले.
27 डिसेंबर 1959 च्या सकाळी मुंबईच्या एअरपोर्टवर ते उतरले. तिथून सासवडच्या पेपर मिलमध्ये उत्पादनाचं प्रशिक्षण देणाऱ्या दोन जपानी अभियंत्यांना भेटून पुण्याला गांगल यांच्याकडे आले.
अनाथ विद्यार्थीगृहाकडे दिलं पहिलं मशीन
1 जानेवारी 1960 ला पुण्याचे तेव्हाच्या महापौरांच्या उपस्थितीत नोबुओ मोरीसावा यांनी ते फोटोटाईप सेटिंग मशीन अनाथ विद्यार्थीगृहाला भेट दिलं. ते कसं वापरायचं याचं पहिलं प्रात्यक्षिकही दाखवलं.
पुण्याच्या महापौरांनी आपलं तोंडभरून कौतुक केल्याचं नोबुओ यांनी जपानला परत गेल्यावर लिहिलेल्या लेखात सांगितलं आहे. "भारतीय भाषांची काहीही समज नसलेला एक जपानी माणूस इतका चांगला फॉन्ट बनवतो ही किती आश्चर्याची गोष्ट असल्याचं महापौरांनी म्हटलं," असं नोबुओ लिहितात.
"यात पैसे ही दुय्यम गोष्ट आहे. मात्र, या मशीनच्या वापरानं भारताच्या सांस्कृतिक विकासाला हातभार लागेल ते महत्त्वाचं.
औद्योगिक क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या देशातल्या लोकांनी अनेक पुस्तकं वाचणं आणि नवीन ज्ञान आत्मसात करणं फार गरजेचं आहे.
माझं फोटोटाईप सेटिंग मशीन भारताच्या उज्वल भवितव्याला हातभार लावत असेल तर ते माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे. संस्कृती आणि तंत्रज्ञानाला सीमा असत नाहीत," असं नोबुओ भाषणात म्हणाले होते.

फोटो स्रोत, Morisawa Fonts Inc.
त्यांनी लिहिलेल्या जपानी लेखाचा अनुवादही प्रशांत परदेशी यांनीच बीबीसीला सांगितला.
"मशीनचा एकही नवा पैसा नोबुओ यांनी अनाथ विद्यार्थी गृहाकडून किंवा गांगल यांच्याकडून घेतला नव्हता. शिवाय, हे फॉन्ट वापरून भारतात हव्या तेवढ्या मशीन्स बनण्याची मुभाही दिली. एवढ्या महत्त्वाच्या शोधाचं पेटंटही त्यांनी मागितलं नाही," प्रशांत परदेशी पुढे सांगतात.
जपानला परत जाण्यापूर्वी नोबुओ यांनी मशीनची तीनं प्रात्यक्षिकं पुढे मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता विद्यापीठातही दाखवली. त्याचाही खर्च त्यांनी स्वतः उचलला होता.
मशीन भारतात आणण्यासाठी त्यांना जकातीचे अनेक नियम लागत होते. तिथेही त्यांनी स्वतःचं पैसे भरले.
अनेक वर्ष ते मशीन पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहाकडे होतं. काही वर्षांपूर्वीच ते भंगारात विकलं गेलं. पण त्या मशीनचा एक नमूना ओसाकाला मोरीसावा कंपनीकडे आजही आहे.
नव्या शोधानं घातला भारतातल्या छपाई तंत्रज्ञानाचा पाया
"मराठी किंवा देवनागरीची ओळख नसलेल्या जपानी माणसानं देवनागरी लिपीचे फॉन्ट तयार केले आणि असं आधुनिक मशीन विनामूल्य भारताला देऊनही टाकलं ही त्यावेळेची फार मोठी बातमी होती," असं प्रशांत परदेशी सांगतात.
या नव्या शोधानं भारतातल्या छपाई तंत्रज्ञानाचा पाया घातला गेला. एवढ्या मोठ्या शोधामागची ही रुचकर गोष्ट भारतात किंवा जपानमध्येही आजवर कोणालाही माहीत नव्हती.
प्रशांत परदेशी यांनी फोन करून प्रश्न विचारल्यानंच ती जगासमोर आली.
इंग्रजित आणि मराठीत लिहून ती माहिती परदेशी यांनी जपान आणि भारतात संशोधन निबंध आणि व्याख्यानाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
"पुढे 1962 मध्ये जपानमधे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या अधिवेशनासाठी गांगलांची निवड झाली. ही त्यांची जपानला दिलेली चौथी भेट होती," असं परदेशी पुढे सांगतात.
त्यावेळी विशेषतः मोनो टायपिंगवर नागरी लिपी बसवून ती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तिथून परत आल्यावर गांगलांनी मुद्रणशाळा सुरू करून आयटीआयसारखा कोर्स सुरू केला.

फोटो स्रोत, Prashant Pardeshi
छपाईची यंत्रे आणि नंबरींग मशीन जपानवरून आयात करून अनाथ विद्यार्थीगृहाच्या माध्यमातून विकली. त्यातून बराच नफा झाला.
"विज्ञान शिक्षक संघटनेची स्थापना, दंतमंजन, फटाके, शाई अशा वस्तूंचं प्रशिक्षण, महाराष्ट्र मुद्रण परिषदेची स्थापना अशी अनेक महत्त्वाची कामे गांगल यांन करून ठेवली आहेत."
"1951 मध्ये त्यांनी पहिला मराठी-जपानी शब्दसंग्रह" प्रसिद्ध केला. विनोबा भावेंनीही त्याचा अभ्यास केला होता. पुढे विनोबांच्या विनंतीवरून त्यांनी 1975 ला जपानी बोलभाषा हे पुस्तक जपानी शिकणाऱ्यांसाठी लिहिलं," परदेशी पुढे सांगत होते.
गांगल यांच्याच संकल्पनेतून इंडो-जॅपनीज असोसीऐशन ही संस्था पुण्यात स्थापन झाली.
"याच संस्थेत शिकून गांगल यांच्याच पुस्तकाचा वापर करून मी जपानी भाषा शिकलो. माझ्यासारखे अनेक जपानी भाषेचे विद्यार्थी जपानशी जोडले गेले असून भारत आणि जपान या दोन देशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं प्रशांत परदेशी सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











