फॅटी लिव्हर आजार का होतो? व्यायाम करत नसाल तर ही बातमी नक्की वाचा

यकृतामध्ये (लिव्हर) थोड्याशा प्रमाणात चरबी (फॅट) असणं सामान्य मानलं जातं. पण जर ही चरबी लिव्हरच्या एकूण वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली, तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यकृतामध्ये (लिव्हर) थोड्याशा प्रमाणात चरबी (फॅट) असणं सामान्य मानलं जातं. पण जर ही चरबी लिव्हरच्या एकूण वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली, तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात.
    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

यकृताच्या (लिव्हर) पेशींमध्ये (कोशिका) जास्त प्रमाणात मेद (फॅट) साठतो तेव्हा फॅटी लिव्हर ही स्थिती तयार होते.

लिव्हरमध्ये थोड्या प्रमाणात मेद/चरबी असणं सामान्य आहे, पण जर ही चरबी लिव्हरच्या एकूण वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक झाली, तर त्याला फॅटी लिव्हर मानलं जातं, आणि यामुळे गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

फॅटी लिव्हरमुळे नेहमी नुकसान होतंच असं नाही, पण काही प्रकरणांमध्ये ही जास्तीची चरबी लिव्हरमध्ये सूज निर्माण करू शकते. या स्थितीला स्टिएटोहेपेटायटिस म्हणतात, आणि ही स्थिती खर्‍या अर्थाने लिव्हरचं नुकसान करते.

कधी कधी ही सूज जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होते, आणि अशा स्थितीला अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस म्हणतात. पण जर मद्यपान हे कारण नसेल, तर त्याला नॉन-अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस असं म्हटलं जातं.

जेव्हा लिव्हरमध्ये सूज दीर्घकाळ टिकते, तेव्हा लिव्हर कडक होतं आणि त्यात जखमा होतात.

या गंभीर स्थितीला सोरायसिस म्हणतात, ज्यामुळे लिव्हर आपलं काम करणं थांबवू शकतो.

फॅटी लिव्हरची पातळी

ग्रेड 1 म्हणजे सौम्य (हलका) फॅटी लिव्हर

या अवस्थेत लिव्हरच्या सुमारे 33 टक्के पेशींमध्ये चरबी जमा झालेली असते. साधारणतः याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. जीवनशैलीत बदल, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊन ही स्थिती सुधारता येते. ही फॅटी लिव्हरची सुरुवातीची आणि सर्वात सौम्य अवस्था असते.

ग्रेड 2 म्हणजे मध्यम फॅटी लिव्हर (मॉडरेट फॅटी लिव्हर)

या अवस्थेत लिव्हरच्या सुमारे 34 ते 66 टक्के पेशींमध्ये चरबी जमा होते. थकवा, पोटात जडपणा किंवा हलकासा त्रास/दुखणं ही लक्षणं असू शकतात. जर वेळेवर जीवनशैलीत बदल केला नाही, तर ही स्थिती पुढे जाऊन गंभीर लिव्हर विकारामध्ये बदलू शकते.

ग्रेड 3 म्हणजे गंभीर फॅटी लिव्हर (सीव्हियर फॅटी लिव्हर)

ही फॅटी लिव्हरची सर्वात गंभीर आणि प्रगत अवस्था आहे. या अवस्थेत लिव्हरच्या 66 टक्क्यांपेक्षा जास्त पेशींमध्ये चरबी जमा होते. अशा स्थितीत लिव्हरमध्ये सूज (स्टिएटोहेपेटायटिस), जखमा किंवा गाठी (फायब्रोसिस) आणि सोरायसिससारखी गुंतागुंतीची लक्षणं दिसू शकतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्लीच्या सर गंगा राम हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅन्क्रिएटिको-बिलिअरी सायन्सेसचे उपाध्यक्ष डॉ. पियूष रंजन यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं की, "ढोबळपणे पाहिलं तर फॅटी लिव्हर आजार दोन प्रकारचे असतात.

एक म्हणजे मद्यपानामुळे (अल्कोहोल) होणारा आणि दुसरा प्रकार ज्याचं कारण मद्यपान नसतं, त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज असं म्हणतात."

ते सांगतात की लठ्ठपणा, मधुमेह (डायबेटीस), थायरॉइडचं असंतुलन आणि कोलेस्ट्रॉल वाढणं यामागे फॅटी लिव्हर हे एक कारण असू शकतं.

डॉ. रंजन यांच्या मते, जेव्हा लिव्हरमध्ये जास्त चरबी साचते, तेव्हा शरीराची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता कमी होते. अशा परिस्थितीत टाइप-2 मधुमेह (डायबेटीस) होण्याचा धोका वाढतो. कारण अशा लोकांचे लिव्हर इन्सुलिनचे संकेत (सिग्नल्स) योग्य प्रकारे प्रोसेस करू शकत नाही.

डॉ. रंजन सांगतात की, आजच्या घडीला फॅटी लिव्हर हे सोरायसिसचे सर्वात मोठे कारण आहे. त्यांच्या मते, सुमारे 35 टक्के लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास असतो, आणि त्यापैकी 25 टक्के लोकांमध्ये ही स्थिती पुढे जाऊन गंभीर होण्याचा धोका असतो.

फॅटी लिव्हरचे संभाव्य धोके कसे ओळखाल?

डॉ. रंजन सांगतात की, लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा होण्यापासून ते सोरायसिस होईपर्यंत साधारणपणे 5 ते 10 वर्षांचा काळ लागू शकतो.

लिव्हर सोरायसिसच्या धोक्याला सिग्निफिकंट फायब्रोसिस असं म्हटलं जातं. याची ओळख फायब्रोस्कॅन या तपासणीद्वारे होते. इलॅस्टोग्राफी या तंत्रानेही हे ओळखता येतं.

फॅटी लिव्हरचे संभाव्य धोके कसे ओळखाल?

फोटो स्रोत, Getty Images

जर लिव्हरमध्ये जास्त कडकपणा (स्टिफनेस) आढळून आला, तर त्यावर औषधं देऊन उपचार करावे लागतात. त्यासोबतच जीवनशैलीत सुधारणा आणि व्यायाम यांद्वारेही ही स्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो.

औषधांव्यतिरिक्त, लठ्ठपणा, मधुमेह (डायबेटीस) आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवूनही फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अँटी-ओबेसिटी (स्थूलता कमी करणारे) औषधं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतात.

काय खाऊ नये?

तज्ज्ञांच्या मते, काय खावं आणि काय टाळावं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

आहारात अतिरिक्त साखर टाकू नका – कुकीज, बिस्किट, कँडी, सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक, पॅकेज्ड ज्यूस, मिठाई आणि चॉकलेट यांसारख्या गोष्टींपासून दूर राहा.

तळलेले आणि प्रोसेस्ड अन्न खाणं टाळा – मासे आणि लीन मीट डीप फ्राय करण्याऐवजी उकडून खा. प्रोसेस्ड मीटपासून दूर रहा, फ्रायड चिकन, डोनट्स, चिप्स, बर्गर यांसारख्या पदार्थांचा त्याग करा.

प्रोसेस्ड अन्नपदार्थांमध्ये बहुतेक वेळा फ्रक्टोज किंवा हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप सारखे घटक असतात, जे फॅटी लिव्हर वाढवण्याचं मुख्य कारण ठरू शकतात.

काय खाऊ नये?

फोटो स्रोत, Getty Images

अतिरिक्त मीठाचं सेवन टाळा – याचा अर्थ असा आहे की, अशा पॅकेज्ड फूडपासून दूर रहा ज्यामध्ये जास्त मीठ (सोडियम) असतं. दररोजच्या आहारात सोडियमचं प्रमाण 2,300 मिलीग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवा.

व्हाइट ब्रेड, पॉलिश केलेला तांदूळ किंवा पास्ता खाणं टाळा – हे पदार्थ ब्लड शुगरचं प्रमाण वाढवू शकतात. त्याऐवजी संपूर्ण धान्य खा, कारण त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं, जे शुगरच्या शोषणाची प्रक्रिया मंदावते.

जास्त खाणं टाळा – जास्त खाल्ल्यास शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅलरी जमा होते, ज्या सहजपणे फॅटच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि त्यामुळे फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो.

तज्ज्ञांचा सल्ला: काय खाल्लं पाहिजे?

सकाळी चांगला नाश्ता करा, दुपारी मध्यम आहार घ्या आणि रात्री हलकं जेवण करा. रात्रीचं जेवण सायंकाळी सात वाजायच्या आत करा.

ब्लॅक कॉफी पिऊ शकता. अनेक अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, ब्लॅक कॉफी फॅटी लिव्हर आणि लिव्हर एन्झाइम्सचा धोका कमी करते.

पालेभाज्या भरपूर खा, कारण त्यामध्ये नायट्रेट आणि पॉलीफेनॉल्स असतात, जे फॅटी लिव्हर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

तज्ज्ञांचा सल्ला: काय खाल्लं पाहिजे?

फोटो स्रोत, Getty Images

  • अर्ध्या प्लेटमध्ये फायबरयुक्त फळं, भाज्या आणि पूर्ण धान्य (प्रक्रियामुक्त) ठेवावीत.
  • जेवणात डाळ, हरभरा, सोयाबीन आणि वाटाणा यांसारख्या कडधान्यांचा समावेश करा.
  • ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असलेले मासे ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यात मदत करतात.

आरोग्यदायी लिव्हरसाठी काय करावं?

  • तळलेलं, भाजलेलं आणि प्रोसेस्ड (प्रक्रियायुक्त) अन्न खाणं टाळा.
  • अन्नामध्ये जास्तीची साखर घालणं टाळा.
  • पांढरा ब्रेड, पास्ता खाणं टाळा.
  • खूप जास्त खाणं टाळा.
  • मीठ जास्त खाऊ नका.
  • नियमित व्यायाम करा.

व्यायाम करणं गरजेचं

नियमित व्यायाम, विशेषतः एरोबिक व्यायाम, फॅटी लिव्हर आजार नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

तज्ज्ञांच्या मते, आठवड्यात किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करणं आवश्यक आहे. यामध्ये वेगानं चालणं, सायकल चालवणं आणि पोहणं यांचा समावेश आहे.

वेटलिफ्टिंगसारखे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात. आठवड्यात किमान दोन दिवस हे व्यायाम करता येऊ शकतात.

व्यायाम करणं गरजेचं

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारतात फॅटी लिव्हरची समस्या वेगाने वाढतेय. खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोक या आजाराचे बळी ठरत आहेत.

लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसलं तर हे आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)