चांगला पगार आणि करियर मिळवून देऊ शकतात असे टॉप 5 AI कोर्सेस कोणते? जाणून घ्या

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार, एआय केवळ नोकऱ्या हिरावून घेत नाहीये, तर रोजगाराच्या लाखो नवीन संधीही निर्माण करत आहे. तंत्रज्ञानाचा हा बदल म्हणजे प्रगतीची नवी दारे आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार, एआय केवळ नोकऱ्या हिरावून घेत नाहीये, तर रोजगाराच्या लाखो नवीन संधीही निर्माण करत आहे. तंत्रज्ञानाचा हा बदल म्हणजे प्रगतीची नवी दारे आहेत
    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

आजकाल ऑफिस असो, घर असो किंवा मित्रांसोबतची गप्पांची मैफल, सगळीकडे एकच चर्चा आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपली नोकरी तर खाणार नाही ना?

ही धास्ती फक्त नवीन कामाला लागलेल्या लोकांनाच नाही, तर मोठ्या खुर्च्यांवर बसलेल्या साहेबांनाही वाटू लागली आहे. सगळ्यांच्या मनात एकच धाकधूक आहे. जर 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' माणसापेक्षा जास्त वेगाने आणि कमी खर्चात काम करणार असेल, तर मग आपलं काय होणार?

याचं नेमकं उत्तर आज कोणाकडेच नसलं, तरी एक गोष्ट मात्र 100 टक्के खरी आहे. AI आता 'येणारा काळ' राहिला नसून, तो 'आजचा काळ' आहे.

आज आपल्या खिशातल्या मोबाईलपासून ते बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया आणि अगदी दवाखान्यापर्यंत सगळीकडे AI चं साम्राज्य पसरलंय.

अनेकांना वाटतंय AI नोकऱ्या संपवेल, पण चित्र काहीसं वेगळं आहे. जानेवारी 2026 च्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या रिपोर्टनुसार, AI मुळे उलट जगभरात लाखो नव्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

जर तुम्ही आत्ताच 12 वी पास झाला असाल आणि तुम्हाला या 'स्मार्ट' जगात आपलं नाव कमवायचं असेल, तर त्याची सुरुवात होते एका योग्य कोर्सपासून.

चला, करिअरची गाडी 'AI' च्या ट्रॅकवर आणूया

'करिअर कनेक्ट'च्या आजच्या भागात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 AI कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला केवळ एक भक्कम करिअरच देणार नाहीत, तर तुम्हाला भारी पगारही मिळवून देऊ शकतात.

त्याआधी 'AI' हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेऊया.

AI म्हणजे नेमकं काय?

तुम्ही कधी विचार केलाय का की, तुमच्या मोबाईलला तुमचा चेहरा कसा काय समजतो? किंवा तुम्ही एखादा सिनेमा पाहिला की लगेच नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब तुम्हाला तुमच्या आवडीचेच दुसरे सिनेमे कसे सुचवतं?

बरं, ते जाऊ द्या, ड्रायव्हरशिवाय कार रस्त्यावर धावते तरी कशी?

या सगळ्या चमत्काराचं नाव आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जसं आपल्याला बुद्धी आहे, तसंच जेव्हा एखादा संगणक किंवा मशीन स्वतःहून विचार करायला लागते, शिकते आणि निर्णय घेते, तेव्हा त्याला आपण एआय म्हणतो.

शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या एआय विभागाचे प्रमुख, प्रोफेसर आकाश सिन्हा यांनी हे अगदी साध्या शब्दात सांगितलंय. ते म्हणतात की, "एआय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, संगणक किंवा मशीनला आलेली 'माणसासारखी' समज! म्हणजे जेव्हा एखादी मशीन आपल्यासारखा विचार करायला लागते आणि गोष्टी समजून घेऊ लागते, तेव्हा त्याला आपण 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणतो."

एआय म्हणजे माहितीच्या आधारे स्वतःहून निर्णय घेण्याची मशिनची क्षमता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एआय म्हणजे माहितीच्या आधारे स्वतःहून निर्णय घेण्याची मशिनची क्षमता

प्रोफेसर सिन्हा पुढे असंही सांगतात की, हे काय फक्त लॅबमधलं तंत्रज्ञान नाहीये. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जिथे जिथे संगणक किंवा मोबाईल वापरतोय, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे हे AI पडद्यामागून काम करत असतं.

प्रोफेसर सिन्हा पुढे एक उदाहरण देतात. ते म्हणतात, "तुम्ही जेव्हा यूट्यूब उघडता, तेव्हा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता दाखवायचा, हे तिथे बसलेला कोणी माणूस ठरवत नाही. तर त्यामागे AI अल्गोरिदम काम करत असतो."

अगदी असंच काहीसं फेसबुकवर होतं. तुम्हाला कोणती पोस्ट दिसावी, कोणती जाहिरात दाखवावी किंवा बँकेच्या व्यवहारात कुठे फ्रॉड होतोय का? या सगळ्यावर एआयची करडी नजर असते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसा माणूस अनुभवातून शहाणा होतो, तसंच हे AI सिस्टम सुद्धा वेळेनुसार नवनवीन गोष्टी शिकत जातात आणि स्वतःला अधिक 'स्मार्ट' बनवतात. यामुळेच, जिथे माणसांना तासनतास लागतात, तिथे AI काही सेकंदात काम फत्ते करतं.

आणि नेमकं हेच कारण आहे, ज्यामुळे आज AI ला अनेक नोकऱ्यांचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

'AI' शी निगडित कोर्सेस

दिल्लीतील नामांकित एआय एक्सपर्ट मेघना बल एक खूप मोलाचा सल्ला देतात. त्या म्हणतात की,

AI अशा लोकांसाठी मुळीच धोका नाही जे स्वतःला सतत अपडेट ठेवतात. उलट, जे लोक हे नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन त्याच्यासोबत काम करायला शिकतील, त्यांच्यासाठी प्रगतीची ही एक सुवर्णसंधीच आहे.

यांच्या मते, एआयच्या या जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने काही बेसिक कोर्सेस करणं गरजेचं आहे.. विशेष म्हणजे, यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज नाही.

  • SWAYAM पोर्टल- भारत सरकारच्या या पोर्टलवर तुम्ही अनेक कोर्सेस अगदी मोफत करू शकता.
  • जनरेटिव्ह AI - जनरेटिव्ह एआय चे टूल्स जसे की चॅट जीपीटी (ChatGPT) हे नेमके कसे वापरायचे, याचे 'फंडामेंटल कोर्सेस' सर्वांसाठीच फायद्याचे आहेत.

मेघना सांगतात की, एआयच्या जगात पाय रोवण्यासाठी हे काही खास कोर्सेस तुम्ही नक्कीच करायला हवेत-

  • मशीन लर्निंग- हे नाव जरी जड वाटत असलं, तरी यात तुम्ही शिकता की मशीन नक्की काम कसं करते? तिचा 'मेंदू' कसा चालतो, हे समजून घेण्यासाठी हा पाया आहे.
  • AI इन बिझनेस अँड डेटा ॲनालिटिक्स- आजच्या काळात 'डेटा' हीच खरी संपत्ती आहे. हा कोर्स तुम्हाला शिकवेल की, साध्या माहितीचा वापर करून व्यवसायाचा नफा कसा वाढवायचा आणि किचकट डेटा कसा हाताळायचा.
  • AI प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट- जर तुम्हाला लीडर बनायचं असेल, तर हा कोर्स बेस्ट आहे.
एआय

फोटो स्रोत, Getty Images

व्यवसायाचे मोठे निर्णय घेताना किंवा नवीन प्रॉडक्ट लाँच करताना तसेच व्यवसायाची पुढची स्ट्रेटेजी काय असावी, जेणेकरून नफा वाढेल. यात AIची मदत कशी घ्यायची हे तुम्ही या कोर्स मध्ये शिकू शकता.

इंजिनिअर्ससाठी गोल्डन चान्स - सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्स

मेघना बल पुढे सांगतात की, ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय त्यांच्यासाठी AI ही एक मोठी संधी आहे.

जसे की,

  • AI + सायबर सिक्युरिटी- आजकाल इंटरनेटवर चोरी आणि हॅकिंगचे धोके वाढले आहेत. पण, जर AI आणि सायबर सिक्युरिटी एकत्र आली, तर हॅकर्सची डाळ शिजणार नाही हा एक खास कोर्स आहे जो तुम्हाला 'डिजिटल बॉडीगार्ड' बनवेल.
  • रोबोटिक्स- हे नुसतं सॉफ्टवेअर नाही, तर चालणारे-बोलणारे यंत्र बनवायला कोणाला आवडणार नाही? रोबोटिक्समध्ये AI वापरून तुम्ही भविष्यातले स्मार्ट रोबॉट्स तयार करू शकता.
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रोफेसर सिन्हा यांनी ज्यांना करिअरची भक्कम सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी एक जबरदस्त मार्ग सुचवला आहे. विशेषतः कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हा 'जॅकपॉट' ठरू शकतो.

1. एआय आणि बिझनेस ॲनालिटिक्स (MBA/PG Diploma)

जर तुमची आवड बिझनेस, मॅनेजमेंट किंवा कॉमर्समध्ये असेल आणि तुम्हाला कंपनीचे मोठे निर्णय घ्यायला आवडत असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. यात तुम्ही शिकता की AIचा वापर करून बिझनेस कसा वाढवायचा.

भारताचे नामांकित IIMs, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) किंवा अपग्रॅड (upGrad) आणि ग्रेट लर्निंग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही हे कोर्सेस करू शकता. आणि याची फी

साधारण 2.5 ते 7 लाख रुपयांपर्यंत असते. हा खर्च तुम्ही कोणते कॉलेज निवडता त्यावर अवलंबून आहे.

हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला वर्षाला 6 लाखांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं.

घरबसल्या बना एआय एक्सपर्ट.. हो हा दुसरा पर्याय अशा लोकांसाठी आहे ज्यांना घरबसल्या आणि आपल्या वेळेनुसार काहीतरी नवीन शिकायचं आहे.

2. AI सर्टिफिकेट प्रोग्राम (ऑनलाइन)

ज्यांना एआयच्या जगात अगदी शून्यातून सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी हे ऑनलाइन सर्टिफ़िकेट कोर्सेस म्हणजे एक उत्तम संधी आहे. युडॅसिटी (Udacity) सारख्या जागतिक दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर हे कोर्सेस उपलब्ध असून, नोकरी सांभाळून किंवा कॉलेज करता-करता तुम्ही एआयची मूलभूत गणितं शिकू शकता. प्रोफेसर सिन्हा यांच्या मते, या कोर्सेसची फी साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास असते.

सर्वात भारी गोष्ट म्हणजे, हे कोर्सेस तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूर्ण करू शकता. जरी तुम्ही या क्षेत्रात नवीन असलात तरी हे सर्टिफिकेट पूर्ण केल्यावर वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. ज्यांना तंत्रज्ञानाची आवड आहे पण शिक्षणासाठी ठराविक वेळेचं बंधन नकोय, अशा धाडसी तरुणांसाठी हा एक 'स्मार्ट' मार्ग आहे.

तंत्रज्ञानाचे 'मास्टरमाइंड' बना आणि मिळवा 22 लाखांचे पॅकेज म्हणजे हा मार्ग अशा लोकांसाठी आहे ज्यांना या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाऊन काम करायचं आहे.

एआय

3. AI आणि मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स (MCA/M.Tech)

ज्यांना तंत्रज्ञानाची मनापासून आवड आहे आणि ज्यांना या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे यशाची खात्रीच आहे. आयआयटी (IITs), एनआयटी (NITs) आणि आयआयआयटी (IIITs) सारख्या देशातील सर्वोच्च संस्थांमधून तुम्ही ही पदवी घेऊ शकता. इतकंच नाही, तर आयआयटीमध्ये एआयशी संबंधित अनेक छोटे पण प्रभावी 'क्रैश कोर्सेस' देखील उपलब्ध आहेत.

या मास्टर्स कोर्सची फी वर्षाला 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते, जी तुम्ही निवडलेल्या संस्थेवर अवलंबून आहे. पण एकदा का तुम्ही हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला, की तुमच्यासाठी पगाराचे आकडे थक्क करणारे असू शकतात. वर्षाला 22 लाख रुपयांपर्यंतची सॅलरी या क्षेत्रात सहज शक्य आहे. इथे तुम्ही फक्त तंत्रज्ञान वापरत नाही तर ते कसं घडवायचं आणि कसं चालवायचं याचे तज्ज्ञ बनता.

पदवीसोबतच बना एआयचे स्पेशलिस्ट. ज्यांना पदवी घेतानाच भविष्यातील तंत्रज्ञानावर पकड मिळवायची आहे त्यांच्यासाठी हा एक 'परफेक्ट' मार्ग आहे.

4. एआय आणि डेटा सायन्समध्ये पदवी (B.Sc/B.Tech)

जर तुम्हाला 12 वी नंतर लगेचच एआयच्या जगात दमदार एन्ट्री करायची असेल, तर ही पदवी तुमच्यासाठी सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरू शकते.

दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), एमिटी किंवा सेंट झेवियर्स सारख्या देशातील नामांकित कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विषयातील बारकावे शिकून पूर्णपणे तयार असता.

या पूर्ण प्रोग्रामची फी 1 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते, जी तुम्ही कोणत्या संस्थेत प्रवेश घेता यावर अवलंबून आहे. पण एकदा का तुमचं शिक्षण पूर्ण झालं, की तुम्हाला वर्षाला 6 ते 18 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. पदवीचं शिक्षण घेता घेता ज्यांना AI मध्ये स्वतःची तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी हा मार्ग उत्तम आहे.

हा पाचवा पर्याय म्हणजे अशा लोकांसाठी आहे ज्यांना कमी वेळात मोठी झेप घ्यायची आहे. म्हणजे जसं की नोकरीत राहूनच एआय एक्सपर्ट बनू शकता.

एआय

फोटो स्रोत, Getty Images

5. AI बूटकॅम्प आणि इंडस्ट्री प्रोग्राम

जर तुम्ही आधीच कुठे काम करत असाल किंवा तुम्हाला तुमचं करिअर पूर्णपणे बदलून एआयच्या क्षेत्रात यायचं असेल, तर हे 'बूटकॅम्प्स' तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. आयआयटी मद्रास (IIT Madras), आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) आणि अनेक मोठमोठ्या खाजगी संस्था हे कोर्सेस चालवतात. हे कोर्सेस खूप जास्त काळ चालत नाहीत, तर अगदी कमी वेळात तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये लागणारे प्रत्यक्ष कौशल्य शिकवतात.

या कोर्सेसची फी साधारण 1 लाख ते 3.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. पण या गुंतवणुकीचा फायदा असा की, कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला वर्षाला 6 ते 18 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पगार मिळू शकतो. ज्यांना सध्याच्या कामात प्रगती हवी आहे किंवा ज्यांना तंत्रज्ञानाच्या या नव्या प्रवाहात सामील व्हायचं आहे, अशा 'नोकरदार वर्गासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

प्रोफेसर सिन्हा सांगतात की, सीनियर एआय प्रोफेशनल म्हणून तुम्ही वर्षाला 25 ते 40 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त कमाई करू शकता.

बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या 'टेक हब' शहरांमध्ये आणि जगभरातील मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये अशा तज्ज्ञांना प्रामुख्यानं घेतलं जातं. तिथे फक्त तुमच्या कौशल्याची किंमत केली जाते आणि पगारही त्याच तोडीचा दिला जातो.

या नोकऱ्यांवर AI चा प्रभाव असेल सर्वात कमी

एआयच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या मनात नोकरी जाण्याची भीती आहे, पण काही क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घेणे मशीनला कधीच शक्य होणार नाही.

गोल्डमन सॅक्स या प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकेच्या रिपोर्टनुसार, 2030 पर्यंत जगभरातील 30 कोटी फुल-टाइम नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होऊ शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण तज्ज्ञांच्या मते अशी अनेक क्षेत्रं आहेत जिथे अनुभवाची आणि मानवी कौशल्याची गरज लागते, तिथे एआय माणसांना रिप्लेस करू शकणार नाही.

बल यांच्या मते, "हेल्थकेअर आणि नर्स जसे की रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मशीन नाही, तर माणूसच हवा असतो. अश्याचप्रकारे फिझिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक या क्षेत्रातही माणसांचीच गरज लागते."

जिथे भावना, अनुभव आणि प्रत्यक्ष मानवी संपर्क येतो, तिथे एआय काहीच काम करू शकत नाही. केवळ ऑटोमेटेड उत्तरांनी लोकांचं समाधान होऊ शकत नाही, त्यामुळेच ही क्षेत्रं नेहमीच सुरक्षित राहतील.

मेघना बल यांच्या मते, "क्रिएटिव्ह डायरेक्टर्स, लेखक आणि कॉन्टेंट स्ट्रॅटेजिस्ट यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांत एआय तुमची जागा घेऊ शकत नाही. जिथे 'क्रिटिकल थिंकिंग' म्हणजे सखोल विचार करून निर्णय घ्यावे लागतात, तिथे एआय फक्त तुमचा एक साहाय्यक म्हणून काम करू शकतो. मात्र, जी कामं साचेबद्ध आहेत आणि ज्यात रोज काहीतरी नवीन घडत नाही, ती कामं एआय सहजपणे स्वतःकडे घेईल."

जिथे 'ह्यूमन कनेक्शन' महत्त्वाचे आहे, तिथे एआय माणसांना कधीच रिप्लेस करू शकणार नाही

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जिथे 'ह्यूमन कनेक्शन' महत्त्वाचे आहे, तिथे एआय माणसांना कधीच रिप्लेस करू शकणार नाही

प्रोफेसर आकाश सिन्हा म्हणतात, "चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, नर्स, एआय इंजिनीअर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, वकील... याच पाच-सहा फील्डमध्ये लोक सुरक्षित आहेत, अट फक्त एवढीच की तुम्ही यात तुमचे कौशल्य कायम ठेवायला हवे . तुम्ही स्वतः एआय टूल्सचा वापर करायला शिका, जेणेकरून तुमचं काम अधिक वेगाने होईल."

जरी काही क्षेत्रं सुरक्षित वाटत असली, तरी प्रोफेसर सिन्हा त्या पर्यायांना पूर्णपणे एआय-सुरक्षित मानत नाहीत. ते म्हणतात:

"जिथे कुठे तुम्हाला एक तज्ज्ञ म्हणून पाहिले जाईल, तिथेच तुमची नोकरी सुरक्षित आहे. कारण एआयवर एखाद्या तज्ज्ञाच्या पातळीइतका विश्वास ठेवण्यास लोकांना अजून वेळ लागेल. पण जर तुम्ही याच क्षेत्रांमध्ये एन्ट्री किंवा मिड लेव्हलला असाल, तर मात्र तुमच्या नोकरीवर धोका आहे. अशा वेळी तुम्ही AI टूल्सचा वापर करून स्वतःचं काम अधिक उत्तम बनवा आणि आपली नोकरी सुरक्षित ठेवा.

लक्षात असूद्या, एआय तुम्हाला मागे टाकणार नाही, तर एआय वापरणारा माणूस तुम्हाला मागे टाकू शकतो. त्यामुळे सज्ज व्हा, शिका आणि स्वतःला भविष्यासाठी तयार करा. निवड तुमची आहे, मशीनशी स्पर्धा करायची की मशीनला हाताशी धरून जग जिंकायचं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)