AI समिटमधून काय मिळालं? पहिल्या प्रयत्नात उत्तर मिळत नाही, अगदी AI सारखंच! - ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, नवी दिल्ली
- वाचन वेळ: 5 मिनिटे
इंडिया AI इम्पॅक्ट समिटने खरंच काय मिळवलं, याचं उत्तर तुम्ही ज्याला विचाराल, त्याच्याकडून वेगवेगळं मिळू शकतं.
- सरकारला विचाराल तर ते सांगतील की भारताचं AI विश्वात नाव झालं, भारताचा दबदबा निर्माण झाला. देशाची शक्ती सिद्ध झाली.
- विरोधकांना विचाराल तर हा AI समिट म्हणजे PR इव्हेंट असं उत्तर आल्याचं आपण पाहिलं.
- टेक विश्वातल्या बॉस मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा इव्हेंट भारतात होणं चांगली बाब आहे, पण यावर आणखी काम करण्याची गरज आहे.
- आणि नवीन लहान-लहान उद्योजकांना विचाराल तर त्यांच्यासाठी हे नवीन क्षितिजं खुली करणारं पर्व होतं.
दिल्लीच्या भारत मंडपममध्ये पार पडलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेवर केंद्रित परिषदेत, मेळाव्यात काही विषय विशेष गाजले, ज्यांची चर्चा अधिक झाली.
पहिल्याच दिवशी पंतप्रधान, मंत्री आणि इतर VVIP मंडळींमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.
मग काही एक्झिबिटर्सनी म्हटलं की त्यांचं सामान चोरीला गेलं होतं, तर काहींना तर आवारातच प्रवेशच नाकारण्यात आल्यामुळे त्रास झाला. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने केले होते. त्यांच्यावर गैरव्यवस्थापनाचे आरोपही झाले.
पण सर्वांत जास्त गाजली ती उत्तर प्रदेशमधल्या एका खासगी विद्यापीठावर ओढवलेली नामुष्की... त्यांच्या स्टॉलवरचा रोबोडॉग त्यांच्यावर असा भुंकला की सर्वत्र टीका झाली, सोशल मीडियावर मीम्स बनले, आणि काही राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांना या समिटमधून माघार घ्यावी लागली.
पण या एकूण कार्यक्रमाच्या मध्यभागी असलेला आर्टिफिशल इंटेलिजेन्सचा मुद्दा किती लोकांना कळला, आणि किती लोकांच्या डोक्यावरून गेला, हा खरा प्रश्न आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मला इथे लोक रिकाम्या हातांनी, काही काही तर कुतुहलाने फिरताना दिसले. कुणाला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की AI काय आहे, तर काही जण इथे फक्त 'रिळा' बनवायला आले होते, कारण अख्खं जग इथे ट्रेंड्सच्या शोधात होतं.
पण काही खरोखर चांगली, होतकरू मंडळी मला इथे चर्चा करताना दिसली, प्रत्यक्षात भेटली... कुणाला त्यांचं स्टार्टअप स्केल-अप करायचं होतं, तर काही इनव्हेस्टर्स त्यांचे पैसे गुंतवायला चांगली कल्पना आणि जबरदस्त इच्छाशक्ती असलेली तरुण मंडळी शोधत होते.
पुण्यात काम करणारे काही अत्यंत तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर्स जेमतेम तीन वर्षं काम केल्यानंतर नोकरी सोडून स्वतःची AI सेवा पुरवणारी कंपनी थाटण्याच्या बेतात होते. ते इथे नवीन तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या शोधात होते.
मला प्रदर्शन स्थळाच्या मुख्य रस्त्यावर एक पंचविशीतला मुलगा दिसला... अचानक रस्त्याच्या मधोमध, एका कोट घातलेल्या वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीला त्याची आयडिया पूर्ण उत्साहात पिच करत होता.
"माझ्याकडे माझ्यापुरतं सगळं काही आहे. मी आत्ताही चार-पाच जणांच्या टीमसोबत चांगलं काम करतोय. पण मला देशासाठी काहीतरी करायचंय. माझी आयडिया देशाची एक मोठी सामाजिक समस्या सोडवेल," असं त्याने मला नंतर सांगितलं. त्याला अपेक्षा पैशांची नव्हती, संधी मिळण्याची होती.
दुसरीकडे या एक्सपोसोबतच एक समिटही होत होतं. एक अशी शिखर परिषद, जिथे मोठमोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांपासून ते अनेक राष्ट्र प्रमुखांपर्यंत, बरेच VIP, VVIP उपस्थित होते. त्यामुळे हा इव्हेंट एक प्रकारे मोदी सरकारच्या 2023मधल्या G20 परिषदेचा दुसरा सीझन वाटला.
तेच पाहुणे, तेच ठिकाण, तेच आदरातिथ्य. थोडीबहुत त्याच धाटणीची भाषणं, आणि त्याच शैलीतील हातमिळवणी, आलिंगनं.

फोटो स्रोत, Getty Images
19 फेब्रुवारीला शिखर परिषदेत जेव्हा जागतिक नेत्यांची भाषणं झाली, तेव्हा दोन-तीन ठळक वक्तव्य समोर आली. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो ग्युतेरेस म्हणाले की "कृत्रिम बुद्धिमत्तेची फळं फक्त काही श्रीमंत किंवा काही शक्तिशाली लोकांना नाही, तर सर्वांना चाखायला मिळावीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत."
तर पंतप्रधान मोदींनी "ऑनलाईन जग लहान मुलांसाठी कसं सुरक्षित करता येईल," यावर भर देण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच भारताला AIमधील मोठी शक्ती म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला.
एक वक्तव्य जे या गदारोळात कदाचित दुर्लक्षित झालं, ते आलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्या तोंडून. "अनेक युरोपियन देश 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याच्या विचारात आहेत, आणि मला आनंद आहे की भारतही लवकरच या क्लबमध्ये सामील होईल."
याचा अर्थ सरकार टीनएजर्ससाठी सोशल मीडिया बंदीचा विचार करत आहे का? या समिटच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना हा प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं.

फोटो स्रोत, Getty Images
2025च्या मध्यात सोशल मीडियावर बंदीच्या आदेशानंतर शेजारच्या नेपाळमध्ये सरकारविरोधात जोरदार निदर्शनं झाली होती, तरुणाई रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे मोदी सरकार असं काही करण्याची जोखिम इतक्यात पत्करेल, याची शक्यता कमी वाटते.
दुसरा विषय होता संशोधनाचा. या समिटमध्ये देशभरातून अनेक लहान-सहान स्टार्टअप्स त्यांच्या सुंदर आयडियाज घेऊन आले होते. यापैकी काही आयडियाज खरंच चांगल्या आणि भारतातल्या मातीतून आलेल्या होत्या, निव्वळ पाश्चत्त्य तंत्रज्ञानाची कॉपी नाही हे त्यातून दिसत होतं.

फोटो स्रोत, ANI
मात्र या तरुणांची एकच ओरड होती – "आपल्याकडे संशोधनाला प्रोत्साहन नाही, तशी तंत्रज्ञानाची इकोसिस्टिम नाही."
अनेक जण त्यांच्या एक टेबल-खुर्चीच्या पॉडवर त्यांच्या प्रोडक्टचं डेमो देत होते, पण जगातल्या सर्वांत मोठ्या डिजिटल उत्सवाच्या वस्तीत इंटरनेट मात्र रेंगाळत होतं.
ज्या पातळीवर AI वर जगभरात संशोधन चाललंय, वेगवेगळे आणि क्रांतिकारी विचार मांडले जात आहेत, बळ आणि पैसा ओतला जात आहे, त्या शर्यतीत भारत मागे पडताना दिसतोय, अशी अनेकांची ओरड होती.
या AI एक्सपोमध्ये सामील झालेल्या 'पर्पल फॅब्रिक' या AI सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीचे संस्थापक अरुण जैन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "देशात संशोधनावर आणखी गुंतवणूक करण्याची गरज आहे. पण या AI समिटमुळे किमान सामान्य लोकांमध्ये या तंत्रज्ञानाची चर्चा सुरू झाली आहे, हे चांगलं आहे. आधी सरकारी अधिकारी आम्हाला समजूनच घेत नव्हते, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला गोंधळून जायचे. आता मात्र त्यांनी AIच्या शाळेत पहिलीत प्रवेश केला आहे, असं म्हणता येईल."
लोकांच्या आयुष्यात थोड्याअधिक प्रमाणात AIच्या संधी आणि भीती दोन्ही शिरलेल्या आहेत – लोक एखादा इमेल, नोकरीचा अर्ज किंवा अगदी राजीनामेही आता AIच्या मदतीने लिहू लागलेत. गाणी, सिनेमे AIमुळे बदलू लागलेत.
आणि ओपन AI पासून ते ग्रॉक पर्यंत तमाम कंपन्या भारतात मोफत सेवा पुरवत आहेत, कारण त्यांना माहितीये ही किती मोठी आणि किती विविधतेने भरलेली बाजारपेठ आहे. "भारतात चाललेलं कोणतंही AI मॉडेल जगात कुठेही डिप्लॉय केलं जाऊ शकतं," असं पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या भाषणात अधोरेखित केलं होतं.
पण त्या AIच्या मोहात, कमी डिजिटल साक्षर असलेल्या आपल्या लोकांचा डेटा किती सुरक्षित राहील, आणि आपला कष्टकऱ्यांचा देश मेंदूने आळशी तर होत जाणार नाही ना, याचीही भीती अनेकांना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुन्हा जाऊ आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे जाऊ या... AI समिटमधून खरंच काय निष्पन्न झालं?
याचं उत्तर एखाद्या चॅटGPT किंवा जेमिनीला विचारल्यावर जसं मिळतं, तसंच आहे - पहिल्या प्रॉम्प्टमध्ये पक्कं आणि मनासारखं उत्तर मिळत नाही, पण वारंवार सांगितल्यावर, आपला प्रॉम्पट थोडाफार बदलल्यावर अगदी योग्य उत्तर मिळतं.
भारताचं हे पहिलं AI समिट त्या पहिल्या प्रॉम्पटच्या उत्तरासारखंच होतं. बरंच काही घडलं, बरंच काही बिघडलं. पण असेच कार्यक्रम, जरा इव्हेंटबाजी कमी आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त आखले गेले, तर चांगली उत्तरं मिळू शकतील ही आशा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.














