उदय हुसैन : बापाने दुसऱ्या बाईशी लग्न केलं म्हणून नोकराला ठेचून मारणारा सद्दामचा मुलगा

फोटो स्रोत, Getty Images
बदामचा एक्का नाव ठेवलं होतं त्याला. गुलछबू, रंगेल, क्रूर, हिंस्र आणि जराशी वेडसरपणाची झाक असलेला.
आपल्या बापाने दुसऱ्या बाईशी संबंध ठेवले, तिच्याशी लग्न केलं म्हणून त्यांच्या भेटीगाठी होतात हे माहिती असणाऱ्या, त्यांच्या ओळखीला कारणीभूत ठरणाऱ्या बापाच्या एका नोकराला त्याने ठेचून ठार केलं. 50-100 लोकांसमोर, एका पार्टीत, त्याच्याच घरात.
जो मेला त्याचं नाव केमाल हाना, ज्याने मारलं त्याचं नाव उदय हुसैन आणि त्याच्या वडिलांचं नाव सद्दाम हुसैन.
इराकने कुवेतवर हल्ला केला होता. ती आठ वर्षं इराक इराणशी लढत होता. सैन्य थकलं होतं. सतत एका युद्धातून दुसऱ्या युद्धात जनतेला ढकललं जात होतं. अशावेळी त्यांना कोणीतरी धीर द्यायला हवं ना? तोही एक मोठा नेता हवा.
तो नेता आला, त्याने कुवेतच्या शेखांना भरपूर शिव्या दिल्या. आपल्या तोंडाचा घास ते हिरावून घेत आहेत, मुस्लीम असून मुस्लीम बांधवांशी दगाबाजी करत आहेत, आपलं तेल चोरून आपल्या मुलाबाळांना उपाशी मारत आहे, त्यांना अद्दल घडवायलाच हवी आणि म्हणूनच हे युद्ध आपण लढतो आहोत अशी गर्जना केली.
हा नेता दुसरा तिसरा कोणी नव्हता तर उदय हुसैन होता. खुद्द सद्दाम हुसैन यांचा मुलगा आपल्याला प्रेरित करायला आला म्हटल्यावर सैन्याचा हुरुप दुणावला. काम झालं होतं, सैन्याला आपल्या नेत्यांपैकी कोणीतरी दिसलं होतं. पण खरं काय ते एकाच माणसाला माहिती होतं. लतिफ याहिया.
'द डेव्हिल्स डबल' या चित्रपटातला सीन इथे का सांगितला ते पुढे येईलच ओघाने.
ही गोष्ट सुरू होते 1987 साली, जेव्हा इराकी सैन्यात अधिकारी बनण्याचं ट्रेनिंग घेणाऱ्या 23 वर्षांच्या लतिफ याहियाला त्याच्या जनरलने तातडीने बोलावलं होतं. लतिफ जनरलच्या ऑफिसात गेला आणि जनरलने त्याला प्रश्न विचारला, "तू नक्की केलंस तरी काय?"
"काहीच नाही. मला तरी माहिती नाही," लतिफ म्हणाला.
"तुझ्या नावे पत्र आलंय. तुला रिपब्लिक पॅलेसमध्ये बोलवलंय, बगदादला," ते म्हणाले
यतिफ यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय, "मला धडकीच भरली. मी नाखुशीनेच सैन्यात आलो होतो. मला सैन्यात सक्तीचा काळ संपवून मग घरच्या व्यवसायाकडे वळायचं होतं. इराणशी आठ वर्षं चाललेलं हे युद्ध म्हणजे इराकी तरुणांना, पुरुषांना खाणारी अवदसा होती. बगदादच्या चौकात दोन दृश्यं दिसायची, ट्रकमध्ये बसून युद्धावर जाणारे तरुण, आणि तशाच ट्रकमध्ये बसून परत येणारे हात-पाय तुटलेले, आंधळे झालेले, अर्धवट जळालेले, अपंग, खुरडत चालणारे सैनिक."
"पण सैन्यात दाखल न होणं, हा पर्याय नव्हता कोणाकडेच. सैन्य सोडून पळालेल्यांना सर्वांसमक्ष, भर चौकात मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची. कुटुंबावर कायमचं लांच्छन लागायचं. भरती न होणं सोडाच, पण या युद्धाच्या विरोधात ब्र ही उच्चारणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. काही दिवसांपूर्वी मी वडिलांकडे या युद्धावरून माझं नैराश्य व्यक्त केलं होतं. मला आता भीती वाटत होती. ते बोलणं तर सद्दामच्या कानावर गेलं नसेल ना? पण कोण सांगणार? माझे सख्खे वडील कसा बरं मला धोका देतील. मला काहीच सुचत नव्हतं."
लतिफ याहिया यांना 72 तासांच्या आत ज्या रिपब्लिक पॅलेसमध्ये रिपोर्ट करायचं होतं, ते ठिकाण म्हणजे एक आलिशान राजवाडा होता जिथे सद्दाम हुसैन आणि त्यांचे कुटुंबीय राहायचे. या राजवाड्यात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी एकेक महाल होता.
दिवसरात्र प्रवास करून लतिफ राजवाड्यापाशी पोचले. त्यांनी गेटबाहेर त्यांना आलेलं पत्र दाखवलं. थोड्या वेळात एक मर्सिडीज गाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.

फोटो स्रोत, Getty Images
लतिफ लिहितात, "लोकांच्या गायब होण्याचे मी अनेक किस्से ऐकले होते. सरकारचे विरोधक, सरकारची डोकेदुखी बनलेले लोक एका रात्रीतून गायब व्हायचे आणि परत कधीच दिसायचे नाही. मला वाटलं तसं तर आपलं होत नाहीये ना? पण मी पुन्हा विचार केला, एखाद्या माणसाला गायब करायचं असेल तर कोणी मर्सिडीज गाडी कशाला आणेल?"
लतिफ गाडीत बसले आणि गाडी त्यांना घेऊन आत एका महालापाशी घेऊन गेली. त्यांनी आत प्रवेश केला. आत एक व्यक्ती उभी होती. लतिफकडे पाहून त्यांनी मोठं स्मित केलं आणि म्हणाली, 'ये माझ्या मित्रा.'
लतिफच्या मनात पहिलाच विचार आला, "आजही आम्ही दोघं जुळे भाऊ शोभू शकतो."
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसैन यांचा मुलगा उदय हुसैन होता.
नंतर काय झालं याचं वर्णन लतिफ यांनी बीबीसीच्या हार्डटॉक कार्यक्रमात केलं आहे.
"उदय आला, त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला, आणि विचारलं... तुला सद्दामचा मुलगा व्हायला आवडेल?"
अनेक वर्षांनी जेव्हा लतिफ याह्या यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, त्याचं नावही होतं, 'I was Saddam's son.'
जगातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांचे, राष्ट्रप्रमुखांचे तोतये असतात. असं म्हणतात की हिटलर आणि हिमलर (हिटलरचा उजवा हात) यांचेही बॉडी डबल होते (तोतये) होते.
या तोतयांचं मुख्य काम असतं खऱ्या व्यक्तीसारखं वागणं, बोलणं, लोकांना भेटणं आणि धोका असेल तेव्हा त्या व्यक्तीच्या वाटेची गोळी आपल्या छातीवर झेलणं. त्याच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणं.

फोटो स्रोत, Getty Images
सिनेमात शाहरूख खान किंवा अमिताभचे डुप्लीकेट असतात ना, जे मारामाराची सीन, जोखमीचे सीन करतात आणि इतर अभिनय मेन हिरो करतात तसंच काहीसं हे.
अर्थात बॉडी डबल असण्याच्या वंदता अनेकदा कानावर येतात पण लतिफ याह्या यांनी सर्वांसमोर येऊन दावा केला की, ते सद्दाम हुसैनचा मुलगा उदय हुसैन याचा बॉडी डबल (तोतया) होते.
लतिफ म्हणतात, " उदय हुसैनच्या नावाने तेव्हा इराकी लोकांचा थरकाप उडायचा."
"उदय मला म्हणाला की तुला माझं आयुष्य जगायचं आहे. जे जे काही माझ्याकडे आहे ते ते तुला मिळेल. पैसा, उंची कपडे, महागड्या गाड्या, राहायला आलिशान महाल. उदय सद्दाम हुसैन या नावाची इराकमधली काय ताकद आहे ते तुला माहिती आहेच. पण मला त्यातले धोके माहिती होते. मुळात उदय माझ्यावर नाराज झाला तर माझं काय होईल याची मला कल्पना होती. मी त्याला विचारलं, मला नकार देण्याचा पर्याय आहे का? तो हसत म्हणाला, अर्थात! इथे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे."
लतिफ यांनी उदयचा बॉडी डबल व्हायला नकार दिला.
"जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका टीचभर खोलीत होतो. तिथे ना खिडकी होती ना हवा यायला जागा. संपूर्ण खोली लाल प्रकाशाने भरली होती. भिंती लाल रंगाने रंगवल्या होत्या. मला दिवस कळत नव्हता की रात्र. जमिनीत एक खड्डा होता, तेच माझं शौचालय होतं. सात दिवस हेच चाललं. सातव्या दिवशी उदय आला आणि म्हणाला की ही ऑफर मान्य कर नाहीतर तुझ्या बहिणींना इथे ठेवीन मी. ही सरळ सरळ धमकी होती की मी जे सांगतोय ते बऱ्या बोलाने मान्य कर नाहीतर मी तुझ्या बहिणींना इथे आणून त्यांच्यावर बलात्कार करेन. मला हो म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता."
उदय हुसैनची ओळख तेव्हा जगभरात आणि इराकमध्येही बापापेक्षा क्रूर, वेडसरपणाची झाक असलेला बलात्कारी अशीच होती.
इराकमधल्या 'बलात्काराच्या खोल्या'
अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी म्हटलं होतं की आता 'इराकी जनतेला छळछावण्या आणि बलात्काराच्या खोल्यांची भीती बाळगायची गरज नाही."
अमेरिकेचा दावा होता की इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत सर्वसामान्य लोकांना रस्त्यावरून उचलून एकतर त्यांचा छळ केला जायचा किंवा त्यांच्यावर बलात्कार केला जायचा. असे बलात्कार करण्यासाठी खास खोल्या होत्या.
अशाच प्रकारची एक खोली उदय सद्दाम हुसैनच्या महालात होती असं लतिफ याह्या बीबीसीच्या हार्डटॉक कार्यक्रमात म्हणतात.
"तो एक क्रूर, हिंस्र माणूस होता. माझ्या डोळ्यांसमोर त्याने एकदा एका सुंदर मुलीला त्या खोलीत नेलं आणि तिला मरणाच्या दारात नेऊन ठेवलं. ती अक्षरशः श्वास घेणारा मांसाचा गोळा बनून पडली होती."
या मुलीला नंतर ठार केलं गेलं आणि तिचं प्रेत गालिच्यात गुंडाळून समुद्रात फेकून दिलं, असाही उल्लेख लतिफच्या पुस्तकात आहे.
उदय कोणत्याही बाईला, मुलीला उचलून घेऊन जायचा असंही म्हटलं जायचं.
इराकमधला सर्वाधिक तिरस्कार केला जाणारा माणूस
एक वेळ अशी होती की उदय सद्दाम हुसैन हा इराकमधला सर्वाधिक तिरस्कार केला जाणारा माणूस होता.
उदय मोठा मुलगा होता, त्यामुळे सद्दामनंतर इराकमधली सगळी सूत्रं त्याच्या हातात जातील अशी अपेक्षा होती. पण उदयचं वागणं सद्दाम हुसैनलाही जड जायला लागलं होतं.
तरीही सद्दाम हुसैननी उदयला अनेक मोठमोठ्या पदांवर नियुक्त केलं होतं. उदय इराकच्या ऑलिम्पिक कमिटीचा प्रमुख होता, वर्तमानपत्रं आणि टीव्ही माध्यमांचा प्रमुख होता, इराकी पत्रकारांच्या युनियनचा प्रमुख होता. सद्दामच्या आत्मघाती सैनिकांच्या तुकडीचाही तो प्रमुख होता.

फोटो स्रोत, Getty Images
उदय हुसैन इराकच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमचाही प्रमुख होता. तो चालू मॅच दरम्यान खेळांडूना फोन करायचा आणि जिंकला नाहीत तर तुमच्या तंगड्या तोडेन अशी धमकी द्यायचा.
त्याच्याकडे छळाचं एक रिपोर्ट कार्ड असायचं ज्यात तो मॅचनंतर कोणत्या खेळाडूला काय शिक्षा द्यायची ते लिहायचा.
इराककडून खेळणं म्हणजे सतत हुसैनच्या धास्तीत जगण्यासारखं होतं. एखाद्या खेळाडूने मनासारखा खेळ केला नाही तर उदय त्यांना शॉक द्यायचा, किंवा विष्ठेच्या पाण्यात त्यांना आंघोळ करायला लावायचा. कधी कधी काही खेळाडूंना फाशीही द्यायचा.
उदय काय करेल याचा काहीच भरोसा नव्हता. त्याची दोन लग्नं झाली. दोन्ही लग्नं सद्दामचे विश्वासू सहकारी आणि त्याच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या असणाऱ्या जनरल्सच्या मुलींशी झाली पण दोन्ही वेळेस त्याच्या बायकांना त्याने मारहाण केल्याने त्या घर सोडून गेल्या.
आपल्या सुना घर सोडून गेल्यामुळे सद्दामला नामुष्की सहन करावी लागली. पण एका गोष्टीमुळे उदय सद्दामच्या नजरेतून पूर्णपणे उतरला आणि सद्दामने त्याला हळुहळू महत्त्वाच्या पदांवरून बाजूला करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
सद्दाम हुसैनचे अनेक वर्षं एका महिलेशी संबंध होते. ही महिला नंतर त्याची दुसरी पत्नीही बनली. या महिलेचं नाव समीरा शाहबंदर.
सद्दामने दुसरं लग्न करणं हा उदयला त्याच्या आईचा, साजिदाचा, अपमान वाटला. काही जण म्हणतात की, समीराला मुलगा झाला तर तो त्याच्या सत्तेच्या दाव्यात वाटेकरी होईल असंही त्याला वाटलं.
याचा राग येऊन उदयने सद्दामचा विश्वासू सहायक केमाल हाना याची एका पार्टीत कित्येक लोकांसमोर लाकडी सोट्याने ठेचून हत्या केली.
केमालनेच समीरा आणि सद्दामची भेट घालून दिली, तसंच सद्दामचं लग्न इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवलं असा संशय उदयला होता.
या प्रकरणानंतर सद्दामने उदयला काहीकाळ तुरुंगातही टाकलं होतं. यानंतर त्याला देश सोडून स्वित्झर्लंडला पाठवलं.
खरा उदय हुसैन स्वित्झर्लंडला असताना आपण अनेकदा उदय बनून सैन्याला भेटी दिल्यात, सभा घेतल्यात असं लतिफ यांचं म्हणणं आहे.
पहिलं आखाती युद्ध सुरू असताना सैन्याचे जे उदय हुसैनबरोबरचे जे फोटो आहेत त्यात उदय नसून आपण आहोत असं लतिफ म्हणतात. कारण खरा उदय तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये होता.
एकाच शाळेत
लतिफ आणि उदय एकाच शाळेत होते. त्यामुळे उदयला माहिती होतं की लतिफ याह्या आपल्यासारखाच दिसतो. लतिफ यांनी त्याचा बॉडी डबल बनायला हो म्हटल्यावर त्यांच्यावर काही प्लास्टिक सर्जरी झाल्या. लतिफच्या दातांची ठेवण बदलली, हनुवटी बदलली.
आपल्या मुलाखतीत लतिफ म्हणतात की त्याच्या विक्षिप्त स्वभावाची झलक लहानपणापासूनच दिसत होती.

फोटो स्रोत, Getty Images
"तो एका भडक पिवळ्या रंगाच्या आलिशान गाडीने शाळेत यायचा. येताना त्याच्यासोबत वेगवेगळ्या मुली असायच्या. हे लक्षात घ्या, मध्यपूर्वेतली संस्कृती वेगळी होती. मुली फिरवणं हे विचारांपलीकडचं असायचं. शाळेत त्याच्या हातात मी कधी मी पेन पाहिला नाही. एकदा एक शिक्षक त्याला शाळेत मुली आणतो म्हणून रागवला. तो शिक्षक आम्हाला नंतर कधीच दिसला नाही."
1996 साली उदयवर जीवघेणा हल्ला झाला. मारेकऱ्यांनी त्यांच्या गाडीवर गोळ्यांचा वर्षाव केला. उदय यातून वाचला खरा पण एक गोळी त्याच्या मणक्याला लागली. नंतर तो कधीच नीट चालू शकला नाही. त्याला आधारासाठी काठी लागायची.
उदयच्या विक्षिप्त वागण्याने सद्दामने त्याला आधीच सत्तेतून बाजूला करायला सुरुवात केली होती. या हल्ल्यानंतर त्याच्या धाकटा भाऊ सद्दाम नंतर इराकमधली सगळ्यांत शक्तीशाली व्यक्ती बनला. त्याचं नाव कोसाय हुसैन.
शांत, धोरणी, चलाख
एकीकडे बॉम्ब फुटावे तसे फुटणारा उदय होता, तर दुसरीकडे सद्दामचा उजवा हात बनलेला सद्दामचा जावई, त्याची मोठी मुलगी रगदचा नवरा, हुसैन केमाल होता.
बराच काळ सत्ता, अधिकार उदय आणि केमालच्या हातात एकत्रित होते. एक वेळ तर अशी होती की जावई हुसैन केमालला विचारल्याशिवाय सद्दाम काहीच करत नसे.
उदय हुसैन आणि हुसैन केमालमध्ये सत्तासंघर्ष वाढायला लागला. दोघांनाही सद्दामचा उत्तराधिकारी व्हायचं होतं. यात कोसाय नेहमीच बाजूला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पण अचानक हुसैन केमाल, आपला धाकटा भाऊ सद्दाम केमाल याच्यासह इराकसोडून शेजारच्या जॉर्डनमध्ये पळून गेला.
सद्दाम केमालची बायको होती सद्दाम हुसैनचीच दुसरी मुलगी राणा. हे दोघं भाऊ अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या संपर्कात आले.
पण सद्दामने त्यांचं मन वळवून त्यांना पुन्हा इराकमध्ये बोलावलं आणि या दोन्ही भावांची, आपल्या मुलींच्या नवऱ्यांची हत्या केली.
हुसैन केमालचं अस्तित्व संपलं. दुसरीकडे उदय हुसैनचा विक्षिप्तपणा वाढत होता, अशावेळेस जबाबदारी आली ती कोसाय हुसैनवर.
सद्दामचा हा दुसरा मुलगा, शांत, थंड डोक्याचा आणि धोरणी होता असं अनेक जण वर्णन करतात. कोसाय क्रूर होताच. हुकूमशाहाच्या राजवटीत जुलूम करतात तसे तो करायचाच. सद्दामने केलेल्या शिया आणि कुर्द लोकांच्या नरसंहारात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला कोसायकडे रिपब्लिक गार्ड आणि सद्दामच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी होती. अंतर्गत गुप्तचर खातंही तो सांभाळायचा.
तुरुंगातली वाढती गर्दी कमी करण्यासाठी कधीही कोणालाही गोळ्या घालणं असा हा कार्यक्रम होता. 2001 आणि 2002 साली त्याच्यावरही जीवघेणा हल्ला झाला पण तो फारशी इजा न होता वाचला.
2001 च्या अखेरीपर्यंत संपूर्ण इराकची सत्ता कोसायच्याच हातात आली होती.
2003 साली जेव्हा अमेरिकेने बगदादवर आक्रमण केलं तेव्हा बगदाद आणि सद्दामचं जन्मगाव तिक्रितचं संरक्षण करणं याची जबाबदारी कोसायकडे होती.
हल्ल्याच्या एक दिवस आधी कोसायने इराकच्या राष्ट्रीय बँकेतून जवळपास 1 अब्ज डॉलर्स, रोख रक्कम आणि सोन्याच्या स्वरुपात काढली.
असं म्हणतात की कुटुंबातल्या महिलांना, म्हणजे त्या सद्दामची पहिली बायको साजिदा, त्याच्या तिन्ही मुली, सद्दामच्या इतर बायका, कोसायची बायको लामा यांच्याकडे हे पैसे देऊन त्यांना शेजारच्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं.
'उदयच्या वागण्याचा परिणाम माझ्यावरही'
लतिफ जवळपास 4 वर्ष उदय सद्दाम हुसैनचा तोतया म्हणून वावरत होते. 1991 साली त्यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या मदतीने पळ काढला असं त्यांचं म्हणणं आहे.
उदयबरोबर राहून मीही तसाच झालं होतो. चिडायचो, कधी कधी लोकांना मारहाण करायचो असं ते बीबीसीच्या कार्यक्रमात म्हणतात.
"त्या वेळेस मी इतकी क्रूरता पाहिली की नंतर ते सगळं मागे टाकून एक सर्वसामान्य जीवन जगायला मला अनेक मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. मी अनेकदा स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. बघा मी किती वेळा माझ्या हाताची नस कापली आहे," लतिफ शर्टच्या बाह्या वर करून दाखवतात.
'बॉडी डबल' असण्याचा हाच फायदा असतो की एका व्यक्तीला आपण दोन ठिकाणी आहोत असं दाखवता येतं मग तुम्ही उदयचं क्रूर वागणं पाहायला त्याच्यासोबत कधी होता? असा प्रश्न विचारल्यानंतर लतिफ म्हणतात, "उदयला कधीच आवडलं नाही की आपला कोणी बॉडी डबल आहे. त्याला सद्दाम आणि गुप्तचर यंत्रणांनी जबरदस्ती केली होती. आणि त्याला आपण जे करतोय ते लोकांना दाखवायला आवडायचं. तो अनेक मला सोबत घेऊन जायचा. त्याला कधीच बॉडीगार्ड नव्हते, तो फक्त आपल्या जवळच्या मित्रांना मशीनगन द्यायचा आणि म्हणायचा वापरा."
हेही सांगायला हवं की लतिफ याह्या यांचे सगळेच दावे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की इराकमधून बाहेर पडल्यानंतर सीआयएने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी असं का केलं विचारल्यावर लतिफ यांना समाधानकारक उत्तर देता येत नाही. लतिफ म्हणतात की सीआयएची इच्छा होती की मी सद्दामचा पराभव झाल्यानंतर जे सरकार तिथे आलं तिथे त्यांच्या हातातलं बाहुलं बनून राहावं.

फोटो स्रोत, Getty Images
याला कुठलाही ठोस पुरावा नाही.
उदय हुसैनविषयी त्यांच्या काहीही भावना असल्या तरी त्यांना सद्दाम हुसैनबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. उदयचं वागणं सद्दामला माहिती नव्हतं असं ते म्हणतात.
उदय हुसैनचा मृत्यू
उदय हुसैन, त्याचा भाऊ कोसाय आणि त्याचा पुतण्या, कोसायचा चौदा वर्षांचा मुलगा मुस्तफा या तिघांचा मृत्यू अमेरिकेने इराकवर आक्रमण केल्यानंतर झाला.
2003 साली जुलै महिन्यात उदय आणि कोसाय मोसुलमधल्या एका घरात लपले आहेत अशी बातमी अमेरिकन फोजांना मिळाली. अनेक तास चाललेल्या गोळीबारात अखेर या तिघांचाही मृत्यू झाला.
अमेरिकन इंटेलिजन्स कमिटीने इराकी सरकारातले 52 महत्त्वाच्या व्यक्तींची एक लिस्ट तयार केली होती. ही लिस्ट म्हणजे पत्त्यांचा कॅट होता आणि प्रत्येक पत्ता एकेका माणसाचं प्रतिनिधित्व करत होता.
सद्दाम इस्पिकचा एक्का होता, कोसाय किलवरचा एक्का, तर उदय हुसैन... बदामचा एक्का नाव ठेवलं होतं त्याला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








