केवळ चैनीसाठी 10 जणांचे खून, नायलॉनच्या दोरीचा ‘पॅटर्न’ आणि स्वतःच पोलिसांपर्यंत गेलेली चौकडी

जोशी अभ्यंकर हत्याकांड

फोटो स्रोत, Chinha Magazine

    • Author, अरुंधती रानडे-जोशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

1976 सालच्या पुण्याचा तो हिवाळा केवळ थंडीने नव्हे भीतीनेही अंगावर शहारे आणणारा होता. एकीकडे देशात इंदिरा गांधींची राजकीय आणीबाणी लागू झाली असताना 'त्या' चौघांनी पुण्यात दहशतीची अघोषित आणीबाणी लागू केली होती.

सुमारे 50 वर्षांपूर्वीचं शांत, निवांत, सुशिक्षित, सुस्थापित पुणं. 1 डिसेंबर, वेळ संध्याकाळी 7 नंतरची. कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले होते. भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोडवर आजच्यासारखी गर्दी अजिबात नसे. बंगल्यांच्या वसाहती सूर्यास्तानंतर शांत, निवांत पहुडल्यासारख्या दिसत. विरळ लोकवस्तीचा परिसर होता तेव्हा तो.

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या जवळच संस्कृतपंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर राहायचे. या 88 वर्षांच्या विद्वानांना संस्कृतमधील काही शंका विचारायला म्हणून चार तरुण पोरांनी स्मृती बंगल्यावर थाप मारली. घरात नात, छोटा नातू, काशिनाथशास्त्री आणि त्यांची पत्नी इंदिरा एवढीच मंडळी होती. घरगुती कामं करणारी मदतनीस सखुबाई वाघही होती.

तिनेच दरवाजा उघडला. शास्त्रीबुवांना निरोप देण्यासाठी ती वर चाललेली असतानाच एकाने झडप घालून तिचं तोंड आवळलं. चाकूचा धाक दाखवत हात-पाय बांधले. तीच गत वयस्कर इंदिराबाईंची केली.

खाली गडबड ऐकून काशिनाथस्त्रींची नात बाहेर आली तर तिलाही दोरीने बांधली. तोंडात बोळा कोंबला. काशिनाथशास्त्री काय झालं बघायला येऊन आरडाओरडा करेपर्यंत चोर तिजोरीपाशी पोहोचले होते. घरातील किमती ऐवज भराभर बॅगेत भरला आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून सगळ्यांचे गळे नायलॉनच्या दोरीने घट्ट आवळले.

गाठ गळ्याशी आवळून पाच खून पाडले. वर तितक्याच थंडपणे स्वयंपाकघरातलं अन्न जेवणाच्या टेबलावर मांडून रीतसर जेवले आणि लूट घेऊन पसार होण्यापूर्वी घरभर उग्र दर्पाच्या अत्तराची फवारणी केली.

कुठलंही पूर्ववैमनस्य, राग, द्वेष नसताना केवळ चैनीसाठी म्हणून माणसांचे जीव घेत सुटणारे नराधम, पहिला खून सहज पचल्यानंतर निर्ढावलेल्या मनाने लहान-थोर, म्हातारा-तरुण, स्त्री-पुरुष, आप्त-स्वकीय असा कुठलाही विधीनिषेध न बाळगता आवळलेले गळे...

हे सगळं महाराष्ट्रात काय, देशातही पहिल्यांदा घडलं होतं. सुशिक्षित, कलासक्त तरुणांनी आणि त्यातही शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कॉलेजवयीन विद्यार्थ्यांनी एका पाठोपाठ एक 10 खून पाडावेत याचं आश्चर्य आजही कायम आहे.

वर्षभराच्या काळात राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक या कला महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांनी मिळून दहा खून केले. हे सगळं घडलं होतं - त्या वेळी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या, शांत, शैक्षणिक वातावरण असलेल्या, पेन्शनरांचं शहर म्हणून ओळख मिळवलेल्या 1970 च्या दशकातील पुण्यात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सामाजिक जाणिवा, मानवी संवेदना आणि वैयक्तिक मानसिकता ढवळून काढत महाराष्ट्र हादरवणाऱ्या जोशी-अभ्यंकर प्रकरणाला पन्नास वर्षं व्हायला आली. आजही त्यातले काही धागे जुळू शकलेले नाहीत. नुसती क्रूरकथाच नव्हे तर मानवी भावभावनांचा अजब गुंता दाखवण्याचा प्रयत्न या घटनेवर आधारित काही कलाकृतींतून करण्यात आला.

पण आज ज्याच्या फाशीला चाळीस वर्षं होऊन गेल्यानंतरही कुणा नव्या पिढीच्या कलावंताला तो खुनशी 'जक्कल' उलगडावासा वाटतो. त्यावर वेबसीरिज करावीशी वाटते.

1976-77 या वर्षभरात जोशी-अभ्यंकर हत्याकांड नावाने गाजलेल्या त्या क्रूर सीरिअल किलिंगच्या प्रकरणात 10 निरपराध्यांचे बळी गेले आणि पहिला खून झाल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी चार गुन्हेगारांना फासावर लटकवलं गेलं.

चार जणांना एका वेळी फाशी देण्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ होती. महाविद्यालयीन तरुणांनी हा कट कसा रचला, दहा खून होईपर्यंत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते कसे सटकत राहिले, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी कशा एकाहून एक शक्कल लढवल्या आणि अखेर कसे सापडले याची ही सत्यकथा कुठल्याही क्राइम थ्रिलरला लाजवेल एवढी भीषण आहे.

जोशी अभ्यंकर हत्याकांड

फोटो स्रोत, Chinha Magazine

फोटो कॅप्शन, या फोटोत उजवीकडील कोपऱ्यात बसलेला जक्कल. तो कला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.

1976 सालच्या पुण्याचा हिवाळा अंगावर केवळ थंडीने नव्हे भीतीनेही शहारे आणत होता. संध्याकाळनंतर सामसूम झालेली असताना हे सुशिक्षित दिसणारं टोळकं घरात शिरायचं आणि हाताला लागेल तो माल घेऊन पसार व्हायचं.

कुणी ओळखू नये म्हणून घरात असलेल्या सगळ्यांचा गळा आवळून खून केला जायचा. या खून सत्राने त्या काळच्या छोटेखानी शहर असणाऱ्या पुण्यात एवढी दहशत पसरली होती की, साडेसहा-सातनंतरच शहरात सामसूम व्हायची. एरवी गजबजलेली तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या भागातही संध्याकाळी अंधार पडताच सामसूम व्हायची.

एकीकडे देशात आणीबाणी लागू होती. राजकीय वातावरण थंड होतं. आणि त्याच वेळी पुण्यात या खुन्यांनी दहशतीने अघोषित आणीबाणी लागू केली होती.

पहिला खून सख्ख्या मित्राचा

पुण्याच्या मध्यवर्ती टिळक रस्स्त्यावर असलेल्या अभिनव कला महाविद्यालय या नावाजलेल्या कॉलेजात शिकणारं एक टोळकं होतं. कुठल्याही तत्कालीन महाविद्यालयीन तरुणांचे असायचे तसे त्यांचे अड्डे अथवा कट्टे असायचे.

तसाच एक होता तिथून जवळच असणाऱ्या सारसबाग रस्त्यावरच्या 'हॉटेल विश्व'चा कट्टा. या हॉटेल मालकाचाच मुलगा 'अभिनव'चा विद्यार्थी.

त्यामुळे या टोळक्यात तो ही असायचा. त्याचं नाव प्रकाश हेगडे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काही जुगाड करायलाच हवा. हे सांगणारा टोळक्याचा म्होरक्या होता राजेंद्र जक्कल.

त्याने प्रकाश हेगडेलाच हाताशी धरत त्याचंच अपहरण करण्याचा कट रचला आणि त्याबदल्यात त्याच्या हॉटेल व्यावसायिक बापाकडून मजबूत खंडणी वसूल करायचा प्लॅन त्याच हॉटेलमध्ये शिजला.

रीतसर चिठ्ठ्या लिहून सुंदरअण्णा हेगडे म्हणजे प्रकाशचे वडील यांना धमकवण्यात आलं आणि 25 हजारांची मागणी करण्यात आली.

प्रकाशला गायब करून त्याच्याच कॉलेजमधली ही मुलं चहा प्यायला, नाश्ता करायला हॉटेलमध्येच येत राहिली. कसे आणि कुठे पैसे द्यायचे हे सांगणारी चिठ्ठी विश्व हॉटेलच्या एका टेबलाखालीच चिकटवली गेली.

हॉटेल

फोटो स्रोत, Getty Images

सारसबाग- पेशवे पार्क परिसरातल्या एका झाडावर पिशवी ठेवायला सांगितली. पण खंडणीखोरांनी धमकावूनदेखील हेगडे यांनी पोलिसांना कळवलं. जक्कल गँगला अर्थातच याचा सुगावा लागला. मग खंडणीचे पैसे उचलण्यात मोठा धोका होता.

कारण पोलिसांनी सापळा रचला होता. जक्कल गँगने आपल्या मित्रालाच - प्रकाशलाच संपवण्याचा डाव रचला. त्याला कोथरूडच्या एका टपरीवर नेऊन ठेवलं होतं. ही टपरीसुद्धा या गँगचा अड्डा होता. त्या काळी 'एसएनडीटी'चा हा परिसर अगदी कमी वर्दळीचा होता.

तिथून प्रकाश हेगडेला सारसबाग परिसरात आणलं गेलं. जक्कल, सुतार, जगताप आणि चांडक यांनी 15 जानेवारी 1976 च्या थंड रात्री दारूपार्टीच्या नावाने हेगडेला भरपूर दारू पाजली आणि तिथेच नायलॉनच्या दोरीने गाठ मारून त्याचा गळा आवळून खून केला.

पेशवे पार्कच्या तळ्यात फेकला मृतदेह

एरवी पेशवे पार्कमध्ये आलेल्या बच्चे कंपनीचा आवडता उद्योग म्हणजे तिथल्या नौकाविहारात केलेली मज्जा. पण याच तलावात जक्कल गँगने पूर्वनियोजित प्लॅननुसार एका लाकडी पिंपात हेगडेचा मृतदेह घालून सोडून दिला.

त्या काळात या तलावाची विशेष देखभाल होत नसे आणि गाळही काढला जात नसे, हे या गँगला चांगलं माहीत होतं. भोकं असलेल्या लाकडी पिंपातला मृतदेह तळ्यातले मासे खाऊन टाकतील आणि त्याची आपोआप विल्हेवाट लागेल, असा त्यांचा कयास होता. खरोखरच प्रकाश हेगडेचा मृतदेह पुढे जवळपास वर्षभर सापडलाच नाही.

एक साथीदार सोडून गेला आणि दुसरा मिळाला

आपल्या डोळ्यादेखत आपल्या मित्राचा जीव गुदमरून तो मरताना पाहून या चौकडीतला सुहास चांडक थोडा बिथरलाच. त्यातच आपण केलेला खून इतक्या सहज पचला हे पाहून इतरांचा आत्मविश्वास उंचावला होता.

झटपट पैसा मिळवण्याचा नवा मार्ग सापडल्याने ते खूश होते. पण यात चांडक या टोळक्यापासून दूर गेला आणि पुढे तोच या प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून समोर आला.

याच्याचमुळे इतर चौघांना फाशीच्या तख्तापर्यंत नेता आलं. चांडक दुरावला तरी जक्कलचा एक दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकणारा मुनव्वर शाह नावाचा मित्र या टोळीत सामील झाला. चौघांनी मिळून कोल्हापुरात अरविंद काशीद नावाच्या व्यापाऱ्याचं घर लुटायचं ठरवलं.

कोल्हापुरात फसला डाव

काशीद घरात नाहीसं पाहून ते 8 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या घरी काही सौद्याचं बोलायच्या निमित्ताने पोहोचले देखील. पण काशिदांच्या पत्नीने काही चौघांना घरात घेतलं नाही. दुसऱ्या रात्री ते पुन्हा काशिदांच्या घराशी पोहोचले. त्यावेळी समोरून काशीद घरीच येताना पाहिल्याने पत्नीने चौघांना घरात घेतलं.

ते घरात शिरले खरे, पण डाळ शिजली नाही. अरविंद काशीद तसे अंगापिंडाने मजबूत. तगडा गडी पाहून आणि भर वस्तीतलं त्यांचं घर पाहता चौकडीला धोका लक्षात आला. काहीतरी थातूर मातूर व्यावसायिक गप्पा मारून ते तिथून निसटले आणि थेट पुण्यात परतले.

जोशी-अभ्यंकरांचे निर्घृण खून

पुण्यात आल्यावर त्यांनी आधी अभ्यास केल्याशिवाय लुटीचा घाट घालायचा नाही असं ठरवलं. टिळक रस्त्याला लागूनच असलेल्या विजयानगर कॉलनी या तुलनेने शांत अशा वसाहतीतल्या जोश्यांचा बंगला त्यांनी हेरला.

घरात पन्नाशीतल्या दांपत्याखेरीज एक तरुण मुलगा एवढेच असल्याचं लक्षात येताच ते मुलगा घरात नसताना बरोबर सावज टिपायला 31 ऑक्टोबर 1976 च्या रात्री जोशी यांच्या दारात अवतरले. फक्त पती-पत्नीच घरात होते. त्यांना चाकूचा धाक दाखवत हात-पाय बांधले.

तोंडात बोळे घातले. घरात होतं नव्हतं ते सगळं लुटून बाहेर पडत असतानाच मुलगा आनंद दारात पोहोचला. बेल वाजल्यावरच हे सगळे बिथरले. त्यांनी बरोबर आणलेल्या नायलॉनच्या दोरीने जोशी दांपत्याचा गळा आवळला. आनंदलाही त्याच पद्धतीने संपवलं.

बाहेर पडताना सगळे पुरावे नष्ट केले. उग्र वासाचं अत्तर सगळीकडे फवारलं. फवारलं नव्हे ओतलं. त्यामुळे पोलिसांच्या श्वानाला कुठलाही माग काढणं अशक्य ठरलं.

फसलेली लूट

आतापर्यंतचे चार खून सहज पचले हे पाहून चौघे चांगलेच सरावले होते. दुसरीकडे पुण्याच्या मध्यवस्तीत एकाच घरातल्या तिघांचे निर्घृण खून झाल्याने पोलीस अधिक वेगाने कामाला लागले होते.

पण बेपत्ता प्रकाश हेगडेचा मृतदेहसुद्धा हाती न लागल्याने त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध लागणं शक्यच नव्हतं. विजयानगर कॉलनीच्या जोशी हत्याकांडासाठी पोलीस सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली.

दुसरीकडे कलेचा अभ्यास करणारे, सुशिक्षित तरुण नवा गुन्हा करायला मोकाट फिरत होते. त्यांनी महिन्याभराच्या आत पुढचं सावज हेरलं शंकरशेठ रस्त्यावर.

उद्योजक बाफना यांचा प्रशस्त त्रिशला बंगला त्या निवांत कॉलनीच्या एका टोकाला होता. त्या काळात शंकरशेठ रोडवर फारशी वस्ती नव्हतीच.

जक्कल, सुतार, जगताप आणि मुनव्वर या चौकडीने दार ठोठावलं त्या वेळी बाफना घरात नव्हतेच. पत्नी यशोमती घरात एकटीच होती. राजू जैन नावाचा त्यांचा एक नातेवाईक त्यांच्याकडे राहायचा. तो होता आणि फारुख हकीम नावाचा एक जुना वयस्कर नोकर एवढेच घरात होते.

हत्याकांड

फोटो स्रोत, Getty Images

नोकराने दार उघडताच त्यांचं तोंड दाबून हात-पाय बांधून टाकले. यशोमती बाफना तेवढ्यात खाली आल्या. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांना चाकूचा धाक दाखवून तिजोरी कुठंय म्हणून विचारलं. त्या दोघांना एकाच खोलीत डांबलं आणि घरातला किमती ऐवज ते बॅगमध्ये भरू लागले.

तेवढ्यात राजू दिसला. त्यालाही खोलीत डांबलं. पण तो अटॅच्ड बाथरूममध्ये पोहोचला आतून दरवाजा लावून घेतला. तिथल्या खिडकीतून चोर-चोर म्हणून ओरडू लागला.

हे ऐकून वर गेलेला चोर खाली आला. यशोमतीबेननी तेवढ्यात हाताला येईल ती काचेची बरणी त्याच्या दिशेने भिरकावली. त्याचाही आवाज झाला. लोक जमले तर आपण अडकू याची जाणीव झाल्याने चौघे तसेच निसटले. केवळ प्रसंगावधान दाखवल्याने बाफना कुटुंबीय थोडक्यात वाचलं. पण शहरात दहशतीने मात्र आणखी पाश आवळले.

रूप पालटून पुण्यात परतले

आपल्याला पाहिलेले तीन जण जिवंत आहेत हे लक्षात येताच जक्कल गँगने काही दिवस पुण्याबाहेर जायचं ठरवलं. परत आले त्यावेळी ते थोडं-फार रूप पालटून ज्याला आजच्या भाषेत मेकओव्हर म्हणता येईल ते करून पुण्यात परतले.

अभ्यंकरांच्या घरात 5 खून

पुढे या टोळक्याने भांडारकर रोड-लॉ कॉलेज रोडवरच्या सुस्थित परिसरात मोर्चा वळवला. पेईंग गेस्ट म्हणून राहायला जागा शोधतोय असं सांगून हे बिनधास्त बंगल्यांची दारं ठोठावायचे. अंदाज घ्यायचे.

अशीच रेकी करत असताना भांडारकर इन्स्टिट्यूटजवळच्या स्मृती बंगल्यातून गाडी बाहेर पडताना त्यांनी पाहिली. गजाननराव अभ्यंकर आणि त्यांची पत्नी 'उशीर होईल, जेऊन घ्या' असं मोठ्याने सांगून बाहेर पडलेले या टोळक्याने पाहिले आणि 1 डिसेंबरच्या रात्रीचं सावज निश्चित झालं. अभ्यंकरांच्या घरात 5 खून पडले.

शेवटचा फास आणि अतिआत्मविश्वास

जोशांपाठोपाठ अभ्यंकरांच्या बंगल्यातही सारख्याच पद्धतीने चोरी होऊन खून झाले. पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस खातं सीरिअल किलरच्या मागावर होतं. आतापर्यंत कुठलाच सुगावा न लागल्याने माध्यमांतूनही दबाव वाढत होता.

गुन्हेगार मिळाला नाही तर अगदी आयुक्तांनी रजेवर जायची तयारी केली होती, असं तत्कालीन पत्रकार सांगतात. अखेर हे गुन्हेगारच स्वतःहून चालत पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि शेवटचा फास त्यांच्याच गळ्याशी आला.

पुन्हा मित्राचा खून

जयंत गोखले हा जक्कलचा मित्र. त्याच अभिनव कॉलेजचा विद्यार्थी आणि या जक्कल गँगला सीनिअर. जक्कलला गोखलेनी बरीच मदत केली होती. गोखलेचे वडील अलका टॉकीजशी सिनेमांच्या वितरणासंदर्भात संबंधित असल्याची जक्कलला माहिती होती.

त्यांनी गोखले कुटुंबीयांकडे पुढचं सावज हेरण्यासाठी मोर्चा वळवला. ते गोखलेंच्या घरी गेले त्यावेली जयंत घरी नव्हता. नंतर येतो म्हणून जक्कल निघाला. तेव्हा धाकटा भाऊ अनिल गोखले घरी होता. तोही या चौघांच्या ओळखीचा. अलका टॉकीजपर्यंत सोडतोस का असं अनिलने विचारलं आणि तो जक्कल टोळीबरोबर घरातून निघाला.

या नराधमांनी अनिल गोखलेचाही तसाच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बंडगार्डनला घेऊन गेले. तिथे एका शिडीला बांधून अनिलचा मृतदेह रात्री नदीत सोडून देण्यात आला. तो प्रवाहाबरोबर वाहत जाईल, असा त्यांचा अंदाज. पण तो सपशेल चुकला.

23 मार्च 1977 रोजी अनिल गोखलेचा मृतदेह बंडगार्डनजवळच सापडला. जोशी-अभ्यंकरांप्रमाणेच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून झाल्याच्या खुणा त्याच्यावर होत्या. आदल्या रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना चौघांचा हा उद्योग नेमका एका मद्यपीने पाहिला.

चौघे पसार झाल्यावर त्याने पाण्यात सोडलेली वस्तू काय ते पाहण्यासाठी त्याने पोतं उचकलं. आत मृतदेह पाहून त्याची पाचावर धारण बसली. तो जवळल्या बंडगार्डन पोलीस चौकीत गेला. तिथे पोलिसांना काय घडलं ते सांगू लागला.

पण आधीच गणंग माणूस मध्यरात्री बडबडत पोलीस ठाण्यात आलेला. त्यात दारू प्यायल्याने त्याला धड बोलताही येत नव्हतं अशी अवस्था. ते पाहून पोलिसांनी त्यालाच लॉकअपमध्ये बंद केलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

दुसऱ्या दिवशी अनिल गोखले परतला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मदत करण्याच्या बहाण्याने आणि कालचा प्लॅन किती यशस्वी झाला याची चाचपणी करायला जक्कल मित्रांसह थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात गेला.

आमचा मित्र गायब झालाय, तुम्ही काहीच कसा शोध घेत नाही म्हणून पोलिसांशीच हुज्जत घालू लागले. असं केल्याने आपल्यावर अजिबातच संशय येणार नाही, याची त्ला खात्री होती. पण त्या लॉकअपमधल्या मद्यपीने जक्कल गँगला ओळखळं.

तो पोलिसांना तसं सांगू लागताच पोलिसांनीही थोडं गांभीर्याने प्रकरण घेतलं. अनिलचा मृतदेह बंडगार्डनलाच सापडला. तेव्हा संशय बळावला आणि जक्कलच्या टोळक्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

त्यांच्या मित्रापैकीच एक सतीश गोरे. त्याचा गुन्ह्यात समावेश नसला तरी त्याला हे चौघं काय करतात याची कल्पना होती. तो कच्चा गडी हेरून पोलिसांनी पाच-सहा जणांची वेगवेगळी चौकशी केली. पोलिसी खाक्यापुढे गोरेने त्याला माहीत असलेलं सगळं सांगून टाकलं आणि जक्कल गँगभोवती फास आवळला गेला.

सहायक पुलिस आयुक्त मधुसूदन हुल्याळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास यंत्रणेने सगळे साक्षी-पुरावे गोळा करून केस मजबूत केली.

माफीचा साक्षीदार

15 मे 1978 रोजी पहिल्या खुनानंतर अडीच वर्षांनी जक्कल, चांडक, जगताप, सुतार आणि मुनव्वर या पाच जणांवर एकूण 10 खून केल्याचं आरोपपत्र दाखल झालं. सतीश गोरे साक्षीदार असला तरी प्रत्यक्षदर्शी नव्हता. मग पहिल्या खुनात सामील असलेल्या सुहास चांडकला माफीचा साक्षीदार करण्यात आलं.

केसरी

फोटो स्रोत, KESARI

त्या काळचे निष्णात आणि नावाजलेले वकील बी.जी. कोळसे पाटील, विजयराव मोहिते, विजय नहार यांनी आरोपींचं वकीलपत्र घेतलं होतं. प्रत्यक्षदर्शी म्हणून बाफना कुटुंबीयातील व्यक्ती होत्या. पण चांडकची साक्ष ग्राह्य धरून जक्कल, सुतार, जगताप आणि मुनव्वरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

एवढी विकृती आणि निर्ढावलेपण आलं कुठून?

राजेंद्र यल्लप्पा जक्कल (वय 25), दिलीप ज्ञानोबा सुतार (वय 21), शांताराम कान्होजी जगताप (वय 23)आणि मुनव्वर हारून शाह (वय 21)अशा चौघांना 27 नोव्हेंबर 1983 रोजी येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

जोशी-अभ्यंकर खून खटल्याचं वार्तांकन करणाऱ्या तेव्हाच्या पत्रकारांनी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, "खटला चालू होता तेव्हा हळूहळू सगळ्या खुनांमागचं रहस्य उलगडत गेलं. प्रकाश हेगडेचा मृतदेह खून झाल्यापासून जवळपास वर्षभराने हाती लागला. चौघांमधला जक्कल हाच कटाचा सूत्रधार असल्याचं समोर आलं. बाकी सगळे त्याच्या प्रभावाखाली असायचे. कोर्टात साक्ष देतानासुद्धा जक्कल खुनशी नजरेने पाहायचा. पोलिसांशी भांडायचा. अरेरावी करायचा. त्याचं निर्ढावलेपण शेवटपर्यंत कमी झालेलं नव्हतं."

स्वास्तिक फोटो स्टुडिओ
फोटो कॅप्शन, जक्कलच्या वडिलांचा फोटो स्टुडिओ

जक्कलच्या वडिलांचं लक्ष्मी रस्त्यावर फोटो स्टुडिओ होता. कुटुंब सुस्थितीत असलं तरी जक्कल त्याच्या घरच्यांपासून दुरावलेला होता. त्यातूनच विकृती आली असावी, असं काही पत्रकार सांगतात.

फासावर जाण्यापूर्वी आत्मचरित्र

तुरुंगात असताना मुनव्वर शाहने त्याचं आत्मचरित्र लिहिलं. ते 'येस आय अॅम गिल्टी' नावाने प्रसिद्ध झालं. यातूनही जक्कलच्या विकृत प्रभावाखाली कशी कृत्य करत गेलो, याचं वर्णन मुनव्वरने लिहिलं आहे. पकडलं गेल्यापासून मुनव्वर देवा-धर्माचं करायला लागला होता.

त्याला कुराणाचं भाषांतर करायचं होतं. निष्पाप लोकांचे खून करण्याची कशी आली हे थोडंफार त्याच्या पुस्तकातून उलगडतं. त्याने केलेलं जक्कलचं वर्णन त्याच्यातल्या विकृत मानसिकतेची झलक दाखवतं.

कोंबडीला जखमी करून तिला तडफडत ठेवायचा. मरू द्यायचा नाही. तिचा आकांत, तडफड तो 'एंजॉय' करायचा.

एकदा त्याने त्यांच्या कट्ट्यावर घोरपड आणली आणि तिच्या डोक्याजवळ वार केला. तिचं तडफडणं बघत बसला. हे सगळे किस्से त्याच्या मित्रांनीच नोंदवले आहेत.

एवढ्या निर्दयपणे केवळ चैनीसाठी खून करणाऱ्या पंचविशीच्या आतल्या तरुणांनी नेमकं कशासाठी एका विकृतीचा पाठपुरावा केला हे अजूनही उमजलेलं नाही.

(सतीश नाईक संपादित 'चिन्ह' या कलावार्षिकाच्या 2011- 12 मध्ये प्रसिद्ध झालेल्या शेवटच्या अंकात 'श्यामची गोष्ट' हा पुण्याचे चित्रकार आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेते कलादिग्दर्शक श्याम भुतकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. जोशी-अभ्यंकर हत्याकांडाच्या काळात भुतकर या सर्व आरोपींसोबत अभिनव कला महाविद्यालयात शिकत होते. त्या लेखातील फोटो या लेखात वापरले आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)