मानवत हत्याकांड : गुप्तधनाचा शोध, 11 जणींची निर्घृण हत्या; तरीही फाशीपासून बचावलेले आरोपी

प्रातिनिधीक फोटो
    • Author, अरुंधती रानडे-जोशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्रातील मानवत हत्याकांडावर आधारित सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 4 ऑक्टोबरला सीरिज प्रदर्शित झाली.

आशुतोष गोवारिकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम असे दिग्गज कलाकार या सीरीजमध्ये आहेत. आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरीज, महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची निर्मिती आहे.

महाराष्ट्रासह देशाला हादरवणारं हे मानवत हत्याकांड होतं नेमकं काय, ते आपण जाणून घेऊ :

काळी जादू, झाडाखालचा मुंजा, गुप्तधन आणि ते मिळवण्यासाठीची कर्मकांड, नरबळी... या गोष्टी आता जुन्या झाल्या असं वाटत असतानाच गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून नरबळीची बातमी आली.

गुप्तधनाच्या लालसेपायी अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाचा 'बळी' देण्यात आल्याचं उघड झालं.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात कायदा लागू होऊन या ऑगस्टमध्ये बरोबर 10 वर्षं झाली. पण अजूनही अशा घटना अनेकदा समोर येत राहतात.

याच पार्श्वभूमीवर पन्नास वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र हादरवणाऱ्या त्या क्रूर घटनेची आठवण ताजी झाली.

अगदी याच प्रकारच्या क्रौर्याच्या कहाणीने महाराष्ट्र त्या वेळी थरारला होता.

मराठवाड्यातल्या एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या. त्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले.

नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान हा प्रकार सुरू होता.

महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं 'सीरिअल किलिंग' प्रकरण कसं घडलं? गूढ कसं उकललं? कोण होता सूत्रधार? गुन्हेगारांना शिक्षा झाली का? हत्याकांडानंतर खून खटलाही गाजला, त्या सगळ्याचं हे इतिवृत्त.

लाल रेष

महत्त्वाची सूचना : या बातमीतले अनेक तपशील विचलित करू शकतात.

लाल रेष

या सगळ्यांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती. गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिमुरडीचं तर शिर छाटून टाकण्यात आलं होतं.

कुणाची बोटं छाटली होती तर कुणाच्या छातीचा भाग. हे अमानवी, क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य केलं गेलं होतं एका मांत्रिकाच्या सल्ल्याने.

एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं. पण मानवत म्हटलं तर 'हत्याकांड' हाच शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्या वेळी गाजलं.

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मानवत या निमशहरी म्हणावं अशा गावात नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान एका मागोमाग एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या.

त्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले. आणि या मागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिले सहा खून होईपर्यंत लागू शकला नव्हता.

नेमकं काय झालं होतं? या खुनाचा सूत्रधार कोण होता? शेवटी आरोपींना शिक्षा झाली की नाही? एवढ्याशा शहरात एका मागोमाग एक मुली गायब होत होत्या तरी कुणाला या प्रकरणाचा सुगावा कसा लागला नाही?

पोलीस तपासात 11 स्त्रियांचे खून हे गुप्तधनाच्या लालसेपायी आणि बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड झालं.

‘पैसा नसता तर मीसुद्धा फासावर लटकलो असतो’

"कोणाला भ्यायचं नाही, हा आपला गुण..."

"पैसा नसता तर मीसुद्धा फासावर लटकलो असतो. केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी चार माणसं फासावर चढवण्यात आली." ही वाक्यं आहेत मानवत खून खटल्यातील मुख्य आरोपी उत्तमराव बारहाते यांची.

या खटल्याच्या 20 नोव्हेंबर 1975 रोजी दिलेल्या निकालात बारहाते यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण उच्च न्यायालयाने ती रद्द करत त्यांची मुक्तता केली.

या खून खटल्यानंतर 15 वर्षांनी पत्रकार शरद देऊळगांवकर यांना दिलेल्या मुलाखतीत उत्तमराव बारहाते यांनी हे प्रकरण पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी मोठं केलं गेलं, असा दावा केला होता.

देऊळगावकर यांनी 'मानवत हत्याकांड' या नावाने या प्रकरणाची विस्तृत माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तक लिहिलं आहे. 12 खून पडल्याने आता पोलिसांवरचा दबाव वाढला होता.

हत्यांमागून हत्या, दहशत आणि गूढ

14 नोव्हेंबर 1972 या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही 10 वर्षांची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली.

घराच्या आसपासच ती जात असे. पण सूर्यास्तानंतरही ती घरी आली नाही तेव्हा तिच्या पालकांनी शोध सुरू केला. रात्र झाली. दुसरा दिवस उजाडला तरी पत्ता लागला नाही. पुढचे दोन दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा मागमूस नव्हता.

तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात पडलेला सापडला. तिच्या डोक्यावर मारल्याची खूण आढळली आणि गुप्तांगावर जखम झालेली होती.

या घटनेला जेमतेम पंधरवडा उलटला असेल तेवढ्यात शकीला अल्लाउद्दीन ही 9 वर्षांची पोर गायब झाली. तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती. ती परतलीच नाही. तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला. पुन्हा तशाच जखमा. शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच.

प्रातिनिधीक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या दोन गरीब घरच्या मुली. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेचा फार वेग नव्हताच.

त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून पडला. या वेळी 35 वर्षांची सुगंधा सुंदऱ्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली.

ती वेताच्या टोपल्या विणत असे. त्यासाठी बांबू तोडायच्या उद्देशाने ती शिंदीच्या बनात गेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला. बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्याने तिचा जीव घेतला.

पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा 10 वर्षांची नसीमा सय्यद करीम ही खाटकाची मुलगी दिसेनाशी झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला तोही भयानक स्थितीत. शिर कापलेल्या अवस्थेतल्या या मृतदेहाची पुरती विटंबना झालेली आढळली. गुप्तांगाला जखमा होत्या. छातीचा भाग काढलेला होता. उजव्या हाताची करंगळी तोडलेली. या अशा क्रूर पद्धतीने चिमुरडीचा कोणी प्राण घेतला हे कळत नव्हतं

आता मात्र तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. तीन अल्पवयीन मुलींचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे या दिशेने पोलीस तपास करू लागले.

अखेर 18 जून 1973 ला उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आरोपी अटकेत, पण गुन्ह्याची उकल नाही

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडं प्रस्थ. गावात शेती आणि मोठा व्यापार होता त्यांचा. ते नगराध्यक्षपदीही होते. मोठा वाडा होता.

रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील स्त्री. ती विवाहित होती. पण नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडे परत आलेली. पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायचे. रुक्मिणीसुद्धा याच व्यवसायात होती.

उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला. रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव नियमित येत. तिथेही हातभट्टीचा व्यवसाय तिने सुरू केला. पोलिसांना या धंद्याची आणि उत्तमराव- रुक्मिणीच्या नात्याचीही कल्पना होती.

संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती. हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये पाचव्या महिलेचा खून झाला.

कलावती बोंबले या 32 वर्षीय विवाहितेचा खून झाला. कलावतीला मूल-बाळ नव्हतं. खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरेसारखा प्रकार असण्याचा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला.

पण गूढ वाढलं कारण पाचवा खून झाला. पाठोपाठ पुन्हा एक 10 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्नविच्छिनन्न अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला.

6 खून झाले तरी गूढ उकललं नव्हतं. पोलिसांच्या हाती पुरावे, धागे-दोरे काहीच लागत नव्हते. प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत पडसाद उमटू लागले. मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले.

शरद पवारांनी घेतली दखल

दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आता - 30 जुलै 1973 ला उत्तमरावांसह चौघांची जामिनावर सुटका झाली होती. हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं.

विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले. तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालत मुंबईहून सीआयडी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले गेले.

दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रिळे नावाच्या इसमाचा खून झाला होता.

मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी, राज्याच्या गुन्हे अन्वेक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक एन एम वाघमारे तसंच क्राइम ब्रँचमधीलच अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली.

पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उपअधीक्षकांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली.

शेवटचा घाव पाहणारा प्रत्यक्षदर्शी

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले. एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. तो दिवस होता 4 जानेवारी 1974.

हरिबाई ज्ञानोबा बोरवणे ही पस्तिशीची महिला तिच्या नऊ वर्षांच्या लेकीसह शेतावर नवऱ्याला शिधा द्यायला निघाली होती. हरिबाईच्या कडेवर तिची जेमतेम वर्षाची लेक - कमलसुद्धा होती.

9 वर्षांची तारामती आईच्या पुढे बांधावरून निघाली होती आणि हरिबाई डोक्यावर शिध्याचं टोपलं घेऊन मागून चालत होती. त्याच वेळी कुऱ्हाडीचा घाव थेट हरिबाईच्या डोक्यात बसला. ती कोसळली. कडेवरच्या बाळाचं काय झालं असेल हे सांगायलाच नको. पुढे चालत असलेल्या तारामतीचीही तीच अवस्था केली गेली. आणि हे सगळं उमाजी पितळे नावाच्या एका इसमाने पाहिलं.

हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला.

"तिहेरी खून झाल्याचं कळताच संपूर्ण मानवत थरारलं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या शहराने कडकडीत बंद पाळला होता", असं या घटनेचं वार्तांकन करणारे पत्रकार शरद देऊळगावकर लिहितात.

तत्कालीन पोलीस महानिरीक्षक ए.जी. राजाध्यक्ष पुढच्याच आठवड्यात मानवतमध्ये दाखल झाले आणि वेगाने अटकसत्र सुरू झाल्याचं देऊळगावकर सांगतात.

माफीच्या साक्षीदाराने उलगडलं क्रूर नाट्य

प्रातिनिधीक फोटो

4 जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या दोनच दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक झाली. त्याने दिलेल्या कबुलीजबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळंच उकललं.

देऊळगावकरांनी त्यांच्या पुस्तकात गणपतची सगळी साक्ष नमूद केली आहे.

रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोतांड असल्याचं उघड झालं.

ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पूजलं जातं. अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात मृत्यू झाला तर त्याच्या नावाने मुंजा पूजला जातो.

60 वर्षांच्या गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितल्याचं कबुल केलं.

"मी मांत्रिक आहे. शकुन सांगतो. उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं होतं. वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावर उपाय सांगा, असं त्यांनी सांगितलं. त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल. तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल, असं मी सांगितलं.

सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरलं. त्यांनी आणलेल्या रक्ताने उत्तमराव-रुक्मिणी यांनी पूजासुद्धा केली." अंगावर शहारा येणारी साक्ष गणपतने दिली.

त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला. त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हादेखील माफीचा साक्षीदार ठरला.

या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला.

खरा सूत्रधार कोण?

दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुलीजबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळण्याच्या हेतून हे खून करवून घेतल्याचं स्पष्ट झालं.

या साक्षीदारांचं कथन ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने 20 नोव्हेंबर 1975 रोजी या बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला.

एकूण 18 आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्याच सांगण्यावरून हत्या झाल्या. म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

त्याबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली. दगडूसह इतर चार साथीदारांना जन्मठेप झाली. तर समिंदरी म्हणजे रुक्मिणीची बहीण आणि खुनाच्या कटात मदत करणारे इतर दहा जण पुराव्याअभावी मुक्त झाले.

फाशीची शिक्षा ऐकल्यावरही चेहरा होता निर्विकार

"उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावरही काहीच वाटलं नाही. उत्तमराव बारहाते तर हसत बाहेर पडले. रुक्मिणीसुद्धा निवांत होती.

उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे मळून बारही लावला", असं वर्णन या खटल्याचं वार्तांकन करणारे पत्रकार शरद देऊळगावकर यांनी लिहिलं आहे.

निर्दोष सुटका झाली अन् इकडे मुलगी झाली

फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं.

प्रसिद्ध वकील अॅड. बी.जी. कोळसे पाटील हे आरोपींचे वकील होते. त्यांनी बारहातेंची बाजू मांडली. हायकोर्टाने बारहाते आणि रुक्मिणी यांच्याविरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं.

सरकारतर्फे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

18 मार्च 1976 ला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले. त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं. मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं.

दोघांची फाशी रद्द, तर चौघांना जन्मठेपेऐवजी फाशी

उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले. दगडू काळे, देव्या चव्हाण, सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

सोपान थेटेची मूळ फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्या वेळी संशयाचा फायदा देत वामन अण्णाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं. बाकी चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि उत्तमराव-रुक्मिणीची सुटका झाली.

मानवत हत्याकांडावर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीररीत्या पडदा पडला.

'निर्दोषत्व सिद्ध करायला साडेचार लाख लागले'

26 ऑगस्ट 1989 रोजी म्हणजे या घटनेनंतर जवळपास पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमराव बारहाते यांची मुलाखत घेतली होती.

"त्यावेळी उत्तमराव आणि रुक्मिणी तिच्या 12 वर्षांच्या मुलीसह वाड्यात आनंदात नांदत होते", असं देऊळगावकर लिहितात.

ही सविस्तर मुलाखत त्यांच्या पुस्तकात छापलेली आहे.

"मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला चाडेचार लाख रुपये खर्च करावे लागले. पैसा नसता तर मीसुद्धा फासावर गेलो असतो", असं त्या वेळी वयाच्या सत्तरीत असणाऱ्या बारहातेंनी तेव्हा म्हटलं होतं.

उत्तमराव बारहाते 2011 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी मरण पावले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)