महात्मा गांधीजींचा मोठा मुलगा हरिलाल त्यांच्यापासून दुरावत का गेला? कसा झाला हरिलालचा शेवट?

महात्मा गांधीजींचा सर्वात मोठा मुलगा हरिलालचा जन्म झाला तेव्हा गांधीजी फक्त 19 वर्षांचे होते

फोटो स्रोत, Getty Image/Roli Books

फोटो कॅप्शन, महात्मा गांधीजींचा सर्वात मोठा मुलगा हरिलालचा जन्म झाला तेव्हा गांधीजी फक्त 19 वर्षांचे होते
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वत: कबूल केलं होतं की, ते त्यांच्या आयुष्यातील दोन जणांचे विचार कधीही बदलू शकले नाहीत, ही त्यांची सर्वात मोठी खंत होती.

यातील पहिली व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना आणि दुसरी व्यक्ती होती, महात्मा गांधीजींचाच मुलगा हरिलाल गांधी.

महात्मा गांधी 19 वर्षांचे असताना त्यांचा सर्वात मोठा मुलगा हरिलाल गांधी याचा जन्म झाला होता. लहानपणी हरिलालचा चेहरा बराचसा महात्मा गांधीजींसारखाच होता.

हरिलाल यांच्या जन्मानंतर काही महिन्यांच्या आतच महात्मा गांधी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते.

तीन वर्षांनी ते भारतात परतले. यादरम्यान महात्मा गांधींच्या कुटुंबाला आणि विशेषकरून त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांना त्यांची उणीव जाणवली.

लंडनमधून वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधी 1893 मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे तीन वर्षे राहिल्यानंतर जुलै, 1896 मध्ये भारतात परतले. भारतातून पुन्हा दक्षिण आफ्रिकेत जाताना ते संपूर्ण कुटुंबाला दक्षिण आफ्रिकेत सोबत घेऊन गेले.

भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत जाताना हरिलाल यांचं वय जवळपास आठ वर्षांचं होतं. तर गांधीजींचं वय 27 वर्षे होतं. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत जाताना कुटुंबासोबतच त्यांचा पुतण्या गोकुलदास यालादेखील घेऊन गेले होते.

मुलाला होती खंत

हरिलाल यांनादेखील वडिलांप्रमाणेच उच्च शिक्षण घ्यायचं होतं. मात्र, जे घडलं ते त्यांना अजिबात आवडलं नाही.

प्रमोद कपूर यांनी 'गांधी इन इलस्ट्रेटेड बायोग्राफी' हे महात्मा गांधीजींचं चरित्र लिहिलं आहे.

त्यात प्रमोद कपूर यांनी लिहिलं आहे, "गांधीजींना त्यांचा मुलगा आणि पुतण्या दोघेही समानच होते. या दोघांना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याचा निर्णय विचित्र पद्धतीनं घेण्यात आला. त्यांनी एक रुपयाचं नाणं घरात लपवलं. त्यानंतर हरिलाल आणि गोकुलदास यांना ते नाणं शोधण्यास सांगण्यात आलं. गांधीजींनी ठरवलं की, जो मुलगा ते नाणं शोधून काढेल, त्यालाच शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जाई. गोकुलदासनं ते नाणं शोधलं."

प्रमोद कपूर पुढे लिहितात, असं एकदा नाही तर दोनदा झालं. त्यामुळे हरिलाल खूप दु:खी झाले.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, ROLI BOOKS

नाण्याच्या घटनेनंतर काही वर्षांनी गांधीजींनी पुन्हा एकदा हरिलालकडे दुर्लक्ष करत, त्यांचा आणखी एक पुतण्या छगनलाल याला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला.

छगनलाल आजारी पडला आणि शिक्षण अर्धवट सोडून दक्षिण आफ्रिकेत परत आला.

तेव्हा गांधीजींनी छगनलालच्या जागी दुसऱ्या कोणाची निवड करण्यासाठी एक निबंध स्पर्धा घेतली.

या खेपेस सोराबजी अदाजानिया या पारशी तरुणानं निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याला लंडनला पाठवण्यात आलं.

प्रमोद कपूर यांनी लिहिलं आहे, "गांधीजींसाठी एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा खूप महत्त्वाची होती. त्यामध्ये नेपोटिझम किंवा आपल्या जवळच्या लोकांनाच संधी देणं या गोष्टीला स्थान नव्हतं. मात्र, या सर्व गोष्टींचा हरिलाल यांच्या मनावर खूप विपरित परिणाम झाला. त्यांच्या मनात वडिलांबद्दल कायमची अढी निर्माण झाली."

वडिलांना न सांगताच विवाह

हरिलाल यांनी अहमदाबादहून गांधीजींना पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं की, त्यांना मॅट्रिक परीक्षेत एक विषय म्हणून फ्रेंच भाषा शिकायची आहे. त्यावर गांधीजींनी हरिलालला सल्ला दिला की त्यानं फ्रेंचऐवजी संस्कृत शिकावी.

हरिलाल यांना हा सल्ला आवडला नाही. त्यानंतर ते मॅट्रिकमध्ये लागोपाठ तीन वर्षे नापास झाले.

त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची जागा जुगार आणि दारूनं घेतली. 2 मे 1906 ला हरिलालनं राजकोटच्या गुलाब बेन या तरुणीशी लग्न केलं. लग्न करताना त्यांनी गुलाब बेनच्या वडिलांनाही सांगितलं नाही. त्यावेळेस त्यांचं वय 18 वर्षे होतं.

1905 च्या सुमाराचा मोहनदास करमचंद गांधींचा फोटो

फोटो स्रोत, Hulton Archive/Getty Images

फोटो कॅप्शन, 1905 च्या सुमाराचा मोहनदास करमचंद गांधींचा फोटो

गांधीजींच्या दृष्टीकोनातून हरिलालचं वय लग्नासाठी योग्य नव्हतं. त्यांना वाटत होतं की हरिलालनं दक्षिण आफ्रिकेत येऊन त्यांच्या कामात मदत करावी.

गांधीजींना जेव्हा या लग्नाबद्दल माहित झालं, तेव्हा त्यांनी त्यांचे मोठे भाऊ लक्ष्मीदास यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

गांधीजींनी त्यात लिहिलं होतं, "हरिलालनं लग्न केलं तरी चांगलं आणि नाही केलं तरीदेखील चांगलं आहे. सध्यातरी माझ्या दृष्टीनं तो माझा मुलगा नाही."

बाप-बेट्याच्या विचारांमधील फरक

हरिलाल यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं.

रामचंद्र गुहा यांनी 'गांधी द ईयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "गांधीजींच्या नजरेत ही गोष्टदेखील चांगली नव्हती. कारण त्यांना वाटत होतं की लैंगिक संबंध फक्त वंशवृद्धीसाठी असतात. खऱ्या सत्याग्रहीनं ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Penguin Random House

"हरिलाल यांना मात्र हा मुद्दा मान्य नव्हता. त्यांनी वडिलांना स्पष्ट सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीनं योगी बनवलं जाऊ शकत नाही. जेव्हा व्यक्तीला स्वत:ला वाटतं, तेव्हाच तो योगी होऊ शकतो."

"गांधीजी त्यांच्या कुटुंबात एका परंपरागत कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागत होते. ते पत्नी आणि मुलांच्या इच्छांबद्दल संवदेनशील नव्हते. मुलं तरुण झाल्यानंतरदेखील त्यांची अपेक्षा होती की मुलांनी त्यांच्या सूचनांचं पालन करावं", असं पुस्तकात लिहिलं आहे.

गांधीजी आणि हरिलाल यांच्यातील प्रदीर्घ चर्चा

सुरुवातीला हरिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधीजींच्या संघर्षात पूर्ण साथ दिली. गांधीजी आणि हरिलाल या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांनाही तुरुंगात एकाच कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

सुरुवातीपासूनच हरिलाल यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगण्याची इच्छा होती. त्यांनी घरातून पळून जाऊन भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

महात्मा गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांनी 'मोहनदास' या नावानं महात्मा गांधीजींचं चरित्र लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "भारतात जाण्यापूर्वी हरिलाल यांनी गांधीजींना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की ते एक चांगले पिता नाहीत. त्यामुळे ते कुटुंबाबरोबरचे संबंध संपवत आहेत. मात्र जाताना हरिलाल त्यांच्यासोबत गांधीजींचा एक फोटो आवर्जून घेऊन गेले."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Viking/Penguin India

गांधीजींनी संपूर्ण जोहान्सबर्गमध्ये हरिलाल यांचा शोध घेतला. त्यांना माहिती मिळाली की, हरिलाल भारतात जात असून ते मोझांबिकपर्यंत पोहोचले आहेत.

गांधीजींनी त्यांचे जवळचे मित्र हरमॅन कालेनबॅक यांना हरिलाल यांना परत आणण्यासाठी पाठवलं. कालेनबॅक हरिलालना परत घेऊन आले.

राजमोहन गांधी यांनी लिहिलं आहे, "बाप-बेटे रात्रभर बोलत राहिले. हरिलाल यांनी त्यांच्या वडिलांवर आरोप केला की, त्यांनी कधीही त्यांच्या मुलांचं कौतुक केलं नाही. नेहमीच त्यांचे चुलत भाऊ मगनलाल आणि छगनलाल यांची बाजू घेतली."

दारू आणि जुगाराचं व्यसन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'मोहनदास' या चरित्रानुसार, दुसऱ्या दिवशी गांधीजींनी जाहीर केलं की हरिलाल भारतात परत जात आहेत. दु:खी झालेल्या गांधीजींनी त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाची गळाभेट घेतली.

ते म्हणाले, "जर तुला वाटत असेल की तुझ्या वडिलांनी तुझ्याबरोबर काही चुकीचं केलं आहे, तर मला माफ कर."

गांधीजी आणि हरिलाल यांची जानेवारी, 1915 पर्यंत भेट झाली नाही. भारतात परतल्यावर वर्षभरानं गांधीजींना माहित झालं की त्यांचा धाकटा मुलगा मणिलाल यानं हरिलालला व्यापार करण्यासाठी आश्रमातील काही पैसे उसनवार दिले आहेत. हे ऐकताच गांधीजी इतके रागावले की त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

कस्तुरबा आणि त्यांचा धाकटा मुलगा देवदास यांनी मोठ्या प्रयत्नांनी गांधीजींना असं न करण्यास राजी केलं. दोन वर्षांनी हरिलाल यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं.

गांधीजी हरिलालना पुन्हा विवाह करण्याची परवानगी दिली नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर हरिलाल यांचं आयुष्य खूपच बदललं. ते दारू पिऊ लागले आणि जुगार खेळू लागले.

व्यापार करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अनेकांनी गांधीजींना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या कर्ज घेण्याच्या सवयीची तक्रार केली. गांधीजींनी मुलाचं कर्ज फेडावं अशी मागणी त्यांनी केली.

पुढे गोदरेज साबणाचा सेल्समन म्हणून हरिलाल यांना यश मिळालं.

एबी गोदरेज त्यांच्या कामावर इतके खूश झाले की, हरिलाल यांनी कंपनी सोडल्यानंतर देखील ते हरिलाल यांच्या उदरनिर्वाहासाठी काही पैसे पाठवत राहिले.

गांधीजींनी लिहिलं खुलं पत्र

1925 मध्ये गांधीजींनी एक खुलं पत्र लिहून त्यांच्या मुलांबरोबरच्या त्यांच्या संबंधाबद्दल पहिल्यांदा मत मांडलं. त्यांनी लिहिलं, "हरिलालच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाहीत. मात्र त्याच्यात अवगुण असूनदेखील माझं त्याच्यावर प्रेम आहे."

1935 मध्ये पत्नीच्या मृत्यूच्या 17 वर्षांनी हरिलाल एका जर्मन ज्यू महिलेच्या प्रेमात पडले. त्या महिलेचं नाव होतं, मारग्रेट स्पीगल. त्या महात्मा गांधीजींच्या जवळच्या सहकारी होत्या. त्या दोघांनाही लग्न करायचं होतं. मात्र गांधीजींना ते मान्य नव्हतं.

गांधीजींनी हरिलालला एक पत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं, "मी नेहमीच लैंगिक सुखाचा त्याग करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी मी तुला कसं काय प्रोत्साहन देऊ शकतो?"

या विषयावर गांधीजी, हरिलाल आणि मारग्रेट स्पीगल यांच्यात झालेला पत्रव्यवहाराचं रेकॉर्ड उपलब्ध नाही. मात्र यात कोणतीही शंका नाही की हा विवाह होऊ शकला नाही.

गांधीजींना त्यांच्या मुलाच्या मद्यपानाच्या आणि इतर सवयींबद्दल माहित होतं. त्यांनी हरिलालला सावध करत लिहिलं होतं, "तू भुकेनं उपाशी मरत असशील, तरीदेखील भीक मागू नको. जर तू प्रचंड तहानलेला असशील, तरीदेखील दारू पिऊ नकोस."

हरिलालकडून इस्लामचा स्वीकार

सी. बी. दलाल यांनी 'हरिलाल गांधी: अ लाईफ' या नावानं हरिलाल यांचं चरित्र लिहिलं आहे.

त्यात ते हरिलाल यांची सून सरस्वती गांधी यांचा संदर्भ देत लिहितात, "माझे सासरे खूपच मजेशीर, उदार मनाचे आणि आदरातिथ्य करणारे व्यक्ती होते. ते आमच्याबरोबर सहा महिने होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांसाठीचं शेवटचं पत्र बोलून लिहून घेतलं होतं."

"त्या पत्राचा मथळा होता, 'माझ्या वडिलांबाबतच्या माझ्या तक्रारी.' हे पत्र त्यांना पूर्ण करता आलं नव्हतं."

कस्तुरबा गांधी यांनी त्यांचा मोठा मुलगा हरिलालला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती

फोटो स्रोत, Dinodia Photos/Getty Images

फोटो कॅप्शन, कस्तुरबा गांधी यांनी त्यांचा मोठा मुलगा हरिलालला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती

एप्रिल 1936 मध्ये हरिलाल त्यांच्या वडिलांना आणि आई, कस्तुरबा यांना नागपूरमध्ये भेटले होते. त्यावेळेस त्यांनी व्यापार करण्यासाठी गांधीजींकडे काही पैशांची मागणी केली होती.

गांधीजींनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. यामुळे हरिलाल इतके नाराज झाले की बहुधा याच कारणामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

29 मे, 1936 ला त्यांनी मुंबईतील जामा मशिदीत इस्लाम स्वीकारल्याचं आणि अब्दुल्लाह हे नवीन नाव घेतल्याचं जाहीर केलं. या गोष्टीमुळे गांधीजींना मोठा धक्का बसला. मात्र सर्वाधिक धक्का हरिलाल यांच्या आई कस्तूरबा यांना बसला.

हरिलाल यांनी पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

कस्तुरबांनी हरिलाल यांची मुलगी रामी यांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं, "मी खूप नाराज आहे. मात्र मी काय करू शकते? खरं तर मला खूप लाज वाटते आहे. आम्ही आमचं एक रत्न गमावलं आहे. ते रत्न आता मुस्लिमांच्या हातात गेलं आहे." (नीलम पारीख, महात्मा गांधीज लास्ट ज्वेल हरिलाल गांधी).

मग गांधीजींनी एक सार्वजनिक वक्तव्यं देत हरिजनच्या 6 जून, 1936 च्या अंकात लिहिलं की, "जर हे धर्मांतर मनापासून झालं असेल आणि कोणत्याही संसारी विचाराशिवाय झालं असेल, तर माझी कोणतीही तक्रार नाही."

"तो अब्दुल्लाह या नावानं ओळखला जातो की हरिलाल या नावानं, यामुळे मला काहीही फरक पडत नाही. सर्व अर्थांनी तो ईश्वराचा भक्त आहे. कारण दोन्ही नावांचा अर्थ ईश्वर आहे."

मात्र, कस्तुरबांनी त्यांची निराशा लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यांनी त्यांच्या मुलाला खुलं पत्र लिहिलं. त्यात म्हटलं आहे की, "मला आता जिवंत राहणं खूप कठीण झालं आहे. याबद्दल विचार कर की, तू तुझ्या आई-वडिलांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात किती दु:ख देतो आहेस."

"तुझे वडील यासंदर्भात कोणाशी काहीच बोलत नाहीत. मात्र, या धक्क्यामुळे त्यांचं मन विदीर्ण झालं आहे. देवानं त्यांना प्रबळ इच्छाशक्ती दिली आहे. मात्र मी तर एक कमकुवत वृद्ध महिला आहे."

"मी ही मानसिक वेदना सहन करण्याच्या परिस्थिती नाही. तुझ्या वडिलांनी तर तुला माफ केलं आहे. मात्र तुझ्या या कृत्यासाठी देव तुला कधीही माफ करणार नाही."

मात्र हरिलाल यांचं धर्मांतर फार काळ टिकलं नाही. कारण वर्ष संपता संपता त्यांनी आर्य समाजाच्या चालीरितींनी पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:चं नवीन नाव ठेवलं, ते होतं हीरालाल.

'कस्तुरबा माता की जय'

एकदा हरिलाल यांना माहित झालं की, महात्मा गांधीजी आणि कस्तुरबा गांधी ट्रेननं कटनी स्टेशनहून पुढे जात आहेत. तेव्हा आपल्या आई-वडिलांना बघण्यापासून ते स्वत:ला रोखू शकले नाहीत.

प्रमोद कपूर लिहितात, हरिलाल कटनी स्टेशनवर पोहोचले. तिथे सर्वजण महात्मा गांधींचा जय-जयकार करत होते. तिथे ते एकमेव व्यक्ती होते, जे 'कस्तुरबा माता की जय' अशा घोषणा देत होते.

सेवाग्राममध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी

फोटो स्रोत, Universal History Archive/Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, सेवाग्राममध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी

स्वत:चं नाव ऐकून कस्तुरबा यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. जेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे त्यांचा मुलगाच उभा आहे, तेव्हा त्यांना आश्चर्यचकित झाल्या.

मग हरिलाल यांनी खिशातून एक संत्र बाहेर काढलं आणि म्हणाले की, 'बा, मी हे तुझ्यासाठी आणलं आहे.'

हे ऐकून गांधीजी म्हणाले, 'माझ्यासाठी देखील काही आणलं आहेस का?'

त्यावर हरिलाल म्हणाले, 'नाही, हे बा साठी आहे.' ट्रेन सुरू होताच कस्तूरबांना त्यांच्या मुलाचे शब्द ऐकू आले, 'बा, हे संत्र तुच खा.'

कस्तुरबांची शेवटची भेट

1944 साल येईपर्यंत कस्तुरबांची तब्येत खूपच खालावली होती. त्यांनी त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यांच्या मृत्यूच्या पाच दिवस आधीच हरिलाल त्यांना भेटण्यासाठी पुण्यातील आगा खाँ पॅलेसमध्ये आले. कस्तुरबांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी हरिलाल त्यांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा गेले.

त्यावेळेस ते दारू प्यायलेले होते. त्यांची ही परिस्थिती पाहून कस्तुरबा खूपच दु:खी झाल्या. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा हरिलाल तिथेच उपस्थित होते.

हरिलाल यांचं निधन

31 जानेवारी, 1948 ला नथूराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केली. हिंदू चालीरितींप्रमाणे सर्वात मोठा मुलगा वडिलांच्या चितेला अग्नी देतो. मात्र हरिलाल उपस्थित नसल्यामुळे गांधीजींचा दुसरा मुलगा रामदास यांनी त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले.

याबाबत इतिहासकारांनी वेगवेगळी माहिती दिली आहे. एका माहितीनुसार, गांधीजींच्या मृत्यूच्या चार दिवसांनी हरिलाल त्यांचं सामान घेऊन त्यांचे भाऊ देवदास गांधी यांच्या घरी गेले होते.

मात्र काहीजणांना ही माहिती योग्य वाटत नाही. त्यांच्या मते गांधीजींच्या हत्येची बातमी संपूर्ण देशभरात वणव्यासारखी पसरली होती. त्यामुळे हरिलाल यांना हे माहित नसेल याची खूपच कमी शक्यता आहे.

गांधी कुटुंबातील सदस्य हरिलालवर नाराज नक्की होते. मात्र ते सातत्यानं त्यांच्या संपर्कात होते. आता प्रश्न उपस्थित होतो की हरिलाल इतके आजारी होते का की गांधीजींच्या अत्यंसंस्कारासाठी प्रवासदेखील करू शकत नव्हते?

की त्यांनी वडिलांबद्दलच्या नाराजीमुळे असं केलं होतं? दोन्हीही गोष्टींची शक्यता कमी दिसते.

हरिलाल गांधी

फोटो स्रोत, ROLI BOOKS

फोटो कॅप्शन, हरिलाल गांधी

रॉबर्ट पेन हे महात्मा गांधीजींचे चरित्रकार होते. त्यांनी 'द लाईफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात रॉबर्ट यांनी लिहिलं आहे की, "गांधीजींच्या अंत्यसंस्कारासाठी जे लोक आले होते, त्यात त्यांचा मोठा मुलगा हरिलालदेखील होता. त्या संध्याकाळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये दुबळा आणि क्षयरोगानं पीडित असलेले हरिलालदेखील होते."

"त्यांना तिथे कोणीही ओळखलं नव्हतं. त्या रात्री ते त्यांचे छोटे भाऊ देवदास गांधी यांच्या घरी मुक्कामी होते."

महात्मा गांधीजींच्या मृत्यूच्या पाच महिन्यांच्या आत म्हणजे, 18 जून 1948 ला हरिलाल गांधी यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)