मानेची जाडी वाढतेय? शरीर काय सांगतंय, ऐकायला तयार आहात का?

जाड मान आरोग्याच्या अनेक गोष्टींचे संकेत देते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जाड मान आरोग्याच्या अनेक गोष्टींचे संकेत देते
    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

साधारणपणे जाड असणं म्हणजे पोटावरची चरबी वाढणं किंवा लठ्ठ दिसणं याच्याशी जोडलं जातं. अशा प्रकारच्या लठ्ठपणामुळे लोक घाबरतात आणि वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.

पण आपल्या शरीरामध्ये मान हा असा अवयव आहे जो आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींचे संकेत देतो आणि बहुतेक वेळा लोकांचं लक्ष या बाबीकडे जात नाही.

मानेवर जर डाग पडले, त्वचेचा रंग बदलू लागला तर लोक त्वरित त्यावर उपचार करतात. कारण चेहऱ्याच्या अगदी खाली असल्यामुळे हे डाग लगेच दिसून येतात.

पण मान जर नेहमीपेक्षा जास्त जाड किंवा बारीक दिसू लागली, तर हा बदल नेमका काय संकेत देतो ? आणि अशा वेळी तुम्ही सावध होणं का गरजेचं आहे?

फक्त सौंदर्याशी नव्हे तर आरोग्याशीही संबंध

जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये, विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये महिलांचा गळा लांब व सडपातळ दिसावा यासाठी खास उपाय केले जातात.

काही ठिकाणी गळ्यात धातूच्या गोल कड्या (रिंग्ज) घालण्याची प्रथा आहे ज्यामुळे मान हळूहळू लांब व बारीक दिसू लागते.

मानेचा संबंध फक्त सौंदर्यापुरता मर्यादित नाही. आफ्रिकेत स्त्रिया मान बारीक व लांब दिसावी यासाठी विविध उपाय करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मानेचा संबंध फक्त सौंदर्यापुरता मर्यादित नाही. आफ्रिकेत स्त्रिया मान बारीक व लांब दिसावी यासाठी विविध उपाय करतात.

मान जर बारीक असली, तर तिला नेहमी शारीरिक आकर्षणाचा भाग मानलं जातं. त्यामुळे लोक गळ्याला उठावदार दाखवण्यासाठी दागिने घालतात, तर पुरुषांमध्येही गळा सुबक दिसावा अशी इच्छा दिसून येते.

आजकाल लोक मान आकर्षक दिसण्यासाठी जिम व विशेष व्यायामप्रकारांचा आधार घेतात. खरं तर, व्यायामामुळे येणारा बदल हा नैसर्गिक बदल असतो.

पण शरीराच्या तुलनेत मान जर अधिकच जाड किंवा बारीक दिसत असेल तर ते आजारांचंही लक्षण असू शकतं.

जाड मान कोणत्या गोष्टींचे संकेत देते?

दिल्लीतील आयएलबीएसचे संचालक आणि नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सरीन यांनी आपल्या 'Own Your Body' या पुस्तकात मानेबाबत सविस्तर उहापोह केला आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "महिलांच्या मानेचा परिघ साधारणपणे 33 ते 35 से.मी. असावा. पुरुषांच्या मानेचा परिघ 37 ते 40 से.मी.असावा. यापेक्षा जास्त परिघ अनेक आजारांची चाहूल असू शकते"

नवीन वैद्यकीय संशोधनानुसार, मानेच्या जाडीवरुन विविध आजार ओळखता येतात. दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शालीमार सांगतात की, "मानेला चरबी जास्त झाली किंवा मान लहान व जाड दिसू लागली, तर अशा लोकांमध्ये फॅटी लिव्हर, स्थूलता यांसारख्या समस्या दिसतात. अनेकदा हे लोक जास्त प्रमाणात घोरतात."

ग्राफिक्स

तसेच, मान जर प्रमाणापेक्षा जाड असेल तर ते मेटाबॉलिक सिंड्रोमचे लक्षण असू शकते.

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील सीनियर कन्सल्टंट डॉ. मोहसिन वली म्हणतात की, "जाड मान असलेल्या व्यक्तींमध्ये हाय कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, डायबिटीज आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विशेष तपासण्या करणं गरजेचं असतं."

याशिवाय, मान जाड असणं हे लठ्ठपणाचं लक्षण मानलं जातं. डॉ. मोहसिन वली सांगतात की, "महिलांमध्ये कधी कधी जाड मान ही पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) असण्याकडे इशारा करते. अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात, त्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. तसेच गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात."

सामान्यतः जर गळ्याच्या आत हाडांची रचना स्पष्ट दिसत असेल, तर त्याला खूप जाड मान मानलं जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सामान्यतः जर गळ्याच्या आत हाडांची रचना स्पष्ट दिसत असेल, तर त्याला खूप जाड मान मानलं जात नाही.

जर मान एखाद्या आजारामुळे जाड होत असेल, तर अनेकदा तिच्या मागील बाजूची त्वचा काळी पडते. मान काळी दिसत असेल, तर ती केवळ त्वचेची समस्या नसून गंभीर आजाराचं लक्षण असू शकते.

पुण्याच्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक अमिताभ बॅनर्जी सांगतात की, "मान प्रमाणापेक्षा जाड दिसत असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या शरीरात काहीतरी आरोग्याची समस्या आहे असं दिसून येतं. विशेषतः ती लठ्ठपणाकडे झुकत आहे आणि लठ्ठपणासोबत अनेक आजार आपोआप येतात."

त्यांच्या मते, दोन व्यक्ती बाहेरून सारख्याच दिसत असल्या, वजनातही साधारण सारख्याच असल्या, तरी जर त्यापैकी एका व्यक्तीची मान जास्त जाड असेल, तर याचा अर्थ त्याच्या शरीरात चरबी अधिक आहे आणि ती स्थूलतेकडे (Obesity) सरकत आहे.

बारीक मान – सौंदर्याची खूण की आरोग्यासाठी इशारा?

बारीक मान अनेकदा थायरॉईडशी संबंधित आजारांशी संबंधित असल्याचं मानलं जाते. काही लोकांमध्ये मानेला जास्तीची हाडं (Vertebra) देखील असू शकतात. सर्वसाधारणपणे सर्व्हायकल स्पाईनमध्ये 7 वर्टिब्रा असतात, पण काही व्यक्तींमध्ये त्यांची संख्या 8 असते.

हे जणू काही एखाद्याच्या हाताला पाचऐवजी सहा बोटं असण्यासारखं आहे. वर्टिब्रा म्हणजे पाठीचा कणा तयार करणारी हाडं जी शरीराला आधार देतात आणि स्पाईनल कॉर्ड व नर्व्ह्जचे संरक्षण करतात.

हे बहुतेक वेळा जन्मजात असतं आणि एक्स-रेमध्ये अचानक लक्षात येतं. साधारणपणे यात त्रास होत नाही, पण डॉ. वली सांगतात की, "जर वर्टिब्राची संख्या 8 असेल, तर काही लोकांना हात सुन्न पडण्यासारख्या समस्या दिसतात."

प्रमाणापेक्षा जास्त बारीक मान ही फक्त सौंदर्याचे लक्षण नसून, गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. (सांकेतिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रमाणापेक्षा जास्त बारीक मान ही फक्त सौंदर्याचे लक्षण नसून, गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. (सांकेतिक छायाचित्र)

बंगळुरूच्या डॉ. आत्रेय निहारचंद्रा म्हणतात की, "कधी कधी ॲनिमियामुळे लोकांची मान बारीक दिसते. अशा लोकांना आयर्न, व्हिटॅमिन्स व इतर पोषण घटक द्यावे लागतात. काही वेळा तर रक्तही चढवावं लागतं."

ही समस्या अनेकदा आनुवंशिकही असू शकते. उदाहरणार्थ, वडिलांची मान लांब किंवा बारीक असेल, तर मुलांचीही मान तशीच दिसू शकते आणि ते ॲनिमियाचं लक्षण असू शकतं.

अशा लोकांना पोषकतत्वांचा समतोल राखण्यासाठी औषधं दिली जातात आणि फिजिओथेरपीची मदत घेतली जाते, जेणेकरून मानेच्या स्नायूंना बळकटी मिळेल आणि मान निरोगी राहील.

त्याचबरोबर, डॉक्टरांच्या मते मान प्रमाणापेक्षा जाड वाटत असेल तर सगळ्यात आधी वजन नियंत्रणात आणण्यावर भर द्यायला हवा. विशेषतः प्रसूतीनंतर महिलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो, त्यामुळे त्यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.

म्हणजेच, तुमचं आरोग्य एखाद्या धोकादायक वळणावर तर नाहीये ना, हे जाणून घेण्यासाठी दरवेळी आरशासमोर उभं राहिल्यावर चेहऱ्याखालील मानेकडेही एकदा जरूर लक्ष द्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)