साखर नक्की किती खावी? शरीराला रोज किती साखरेची गरज असते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, व्ही. रामकृष्णा
- Role, बीबीसी न्यूज
फुड फार्मर हे युट्यूब चॅनेल चालवणारे रेवंत हिमसिंगका आणि बोर्नव्हिटाची उत्पादक कंपनी मँडालेज यांच्यात काही दिवसांपूर्वी मोठा वाद उद्भवला होता.
रेवंत यांनी एका व्हीडिओमध्ये बोर्नव्हिटा या उत्पादनावर टीका करताना त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात साखर असते, असं वक्तव्य केलं होतं.
या वक्तव्यानंतर मँडालेज कंपनीने ही बाब फेटाळून लावताना हा एक चुकीचा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी यासंदर्भात रेवंत यांना एक नोटीसही पाठवली.
मँडालेजकडून नोटीस मिळाल्यानंतर रेवंत यांनी यासंदर्भात माफी मागून संबंधित व्हीडिओ डिलीटही केला.
पण या प्रकरणामुळे एका विषयाला फोडणी मिळाल्याचं दिसून आलं. ते म्हणजे साखर खाण्याची मर्यादा नेमकी किती?
साखरेत काय असतं?
साखर म्हटलं की पांढऱ्या रंगाचा स्फटिकसदृश रव्यापेक्षा काहीसा जाडसर पदार्थ म्हणून लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण शास्त्रीय भाषेत साखर एक संयुग आहे. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंच्या मिश्रणातून हे बनतं. म्हणजेच साखर हे कार्बोहायड्रेट आहे.
फळं, भाज्या, मध, दूध, तांदूळ, कडधान्ये किंवा बीट यांच्यात नैसर्गिकरित्याही साखर किंवा शर्करा आढळून येते.
याव्यतिरिक्त चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, ज्यूस, चॉकलेट, मिठाई, बिस्कीटं किंवा चिप्स यांच्यातही शर्करा चवीसाठी टाकली जाते. मात्र, या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण प्रचंड जास्त असतं.
रोज किती साखरेचं सेवन करावं?
आपण दिवसभरात विविध प्रकारचं अन्न ग्रहण करतो. वेगवेगळे पेय पितो. ते आपल्याला उर्जा देण्याचं कार्य करतात. ही उर्जा कॅलरीच्या माध्यमातून मोजली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, साखर ही दैनंदिन कॅलरींच्या तुलनेत केवळ 10 टक्के इतकी असावी.

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्याच्या समस्या असतील तर हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली आलं तरी हरकत नाही.
पण हे फक्त ‘फ्रि शुगर’ ला लागू होतं.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दैनंदिन 30 ग्रॅम इतकी साखर सेवन करण्याबाबत म्हटलेलं आहे.
WHO नुसार, 19 ते 30 वयोगटातील महिलांना रोज 2 हजार कॅलरींची गरज असते. तर पुरुषांना रोज 2400 कॅलरी आवश्यक असतात.
वय आणि व्यवसायानुसार यामध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो.
पुरुषांसाठीच्या 2400 कॅलरींच्या तुलनेत 240 कॅलरी इतकीच ‘फ्रि शुगर’ त्यांनी घ्यावी, असं म्हटलेलं आहे.
240 कॅलरी म्हणजे जवळपास 31 ग्रॅम साखर असं त्याचं प्रमाण होईल.
म्हणजेच पुरुषांनी दैनंदिन सुमारे 31 ग्रॅम तर महिलांनी 25 ग्रॅम साखरेचं सेवन करावं. असं त्यांनी सांगितलं आहे.
‘फ्री शुगर आणि अॅडेड शुगर म्हणजे काय?
फळे, भाज्या आणि दूधात नैसर्गिकरित्या साखर आढळून येते. याला नैसर्गिक साखर म्हणतात.
ही साखर फळांच्या तंतूंमध्ये असते. तिच्यामुळे आपल्या शरिराला नुकसान होत नाही. तसंच त्यामध्ये फायबरही असतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण, जेव्हा ही फळ, भाज्यांचा रस करून आपण त्याचं सेवन करता तेव्हा ते तंतू मोकळे होऊन ही साखर बाहेर येते. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या मते, ही ‘फ्री शुगर’ होय.
दुसरीकडे, वरून टाकली जाणारी अतिरिक्त साखर म्हणजेच अॅडेड शुगर होय.
चॉकलेट, मिठाई, आइस्क्रीम, बिस्कीट अशा पदार्थांमध्ये अॅडेड शुगर वापरली जाते.
फ्री शुगरने होणाऱ्या समस्या..
फ्री शुगरमध्ये फायबर नसतं. त्यामुळे त्यांचं पचन तत्काळ होतं.
फ्री शुगरबाबत बोलायचं झाल्यास आवळ्याच्या उदारहणाकडे आपल्याला पाहता येईल. तसं तर आपण एका वेळी एक-दोन पेक्षा जास्त आवळे खाणार नाही. पण तेच ज्यूस करून प्यायलो तर किमान चार-पाच आवळ्यांचा ज्यूस आपण सहज पिऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजेच तुम्ही फळं खाणार असाल तर जास्त फ्री शुगर तुमच्या शरीरात जाणार नाही. मात्र, ज्यूस करून प्यायल्याने जास्त प्रमाणात फ्री शुगर शरीरात जातं. त्यामुळे कॅलरींचं प्रमाणही वाढतं.
जर तुम्ही प्रमाणाबाहेर कॅलरी ग्रहण केल्या तर तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. शिवाय, यामुळे हृदयविकाराचा धोकाही असतो.
दैनंदिन साखरेचं प्रमाण कसं मोजावं?
डॉक्टरांच्या मते, आपल्या पोटात रोज किती प्रमाणात साखर प्रवेश करत आहे, याची आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे.
बहुतांश हवाबंद अन्नपदार्थांच्या पाकिटांवर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात किती प्रमाणात साखर आणि इतर पोषणतत्वे आहेत, याचा उल्लेख केलेला असतो.

फोटो स्रोत, NATURALS
त्यामध्ये एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, शुगर, फॅट आणि फायबर आदींचं प्रमाण प्रति 100 ग्रॅममध्ये किती आहे, याची माहिती दिलेली असते.
उदा. पेप्सिको कंपनीच्या ‘लेज’ चिप्समध्ये प्रति 20 ग्रॅम 4.5 ग्रॅम इतकं अडेड शुगर असल्याचं सांगितलेलं आहे. शिवाय, नैसर्गिक साखर मिळून एकूण 5.6 ग्रॅम साखर यामध्ये आढळते.
हे पाकीट एकूण 90 ग्रॅमचं आहे. म्हणजे तुम्ही हे पूर्ण पाकिट खाऊन संपवलं तर तुमच्या पोटात 24.65 ग्रॅम साखर जाते.
अशाच प्रकारे काही उदाहरणे -
गुड डे बटर कुकीज – 22 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम
5 स्टार चॉकलेट - 61 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम
थम्स अप – 10.4 ग्रॅम प्रति 100 मिली
माझा – 14.9 ग्रॅम प्रति 100 मिली
नॅचरल्स आइस्क्रीम (पनासा) – 19 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम
या पाकिटांवर लिहिलेल्या माहितीनुसार आपण किती साखरेचं सेवन करतो, हे मोजता येऊ शकेल.
याव्यतिरिक्त, इतर काही पदार्थांमधूनही आपल्या शरीरात साखर जाते.
सरकारी नियमानुसार कॉर्पोरेट कंपन्या आपल्या उत्पादनांवर घटकांची माहिती देत असतात.
पण असंघटित क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, स्ट्रीटफूड विक्रेते याठिकाणी ही माहिती उपलब्ध नसते.
जास्त साखरेचं सेवन केल्यास काय होतं?
हैदराबाद येथे कार्यरत असलेले डॉ. एस. त्रिविक्रम म्हणतात, “मर्यादेपेक्षा जास्त साखरेचं सेवन केल्यानंतर लठ्ठपणा, थायरॉईड, मधुमेह यांसह हृदयविकाराचा धोका असतो.”
“पण पुरेशा प्रमाणात साखरेचं सेवन केलं नाही तर त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकणारे इतर संभाव्य विकारही बळावू शकतात.”
शर्करा कशामधून तयार होतं?
शर्करा किंवा ग्लुकोज हे केवळ साखरेतूनच मिळतं असं नाही. तर गोड, आंबट, तिखट अशा कोणत्याही पदार्थामधून शर्करा शरीरात जाऊ शकतं. शरीरात गेल्यानंतर या पदार्थांचं रुपांतर शर्कऱेत होतं.

फोटो स्रोत, Alamy
त्यामुळेच अति खाणं अर्थात अधिक प्रमाणात कॅलरी घेणं कधीही टाळलं पाहिज. कारण, यामुळे मधुमेहाचा धोका असतो, असं डॉ. त्रिविक्रम यांनी सांगितलं.
बालकांसाठी किती प्रमाण योग्य?
बालकांसाठी कॅलरींचं प्रमाण त्यांच्या वयावर अवलंबून आहे.
उदा. 5 ते 8 वयोगटातील बालकासाठी दैनंदिन 1200 ते 1800 कॅलरी पुरेशा असतात.
त्याच्या दहा टक्के म्हणजे 15 ते 23 ग्रॅम शर्करा त्यांच्यासाठी पुरेसं असतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








