मुलाने वडिलांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये लपवल्याचा आरोप, NEETच्या तयारीतून झाला होता वाद

आरोपांनुसार, मानवेंद्र सिंह यांच्या मुलाने त्यांच्याच परवाना असलेल्या रायफलमधून गोळ्या झाडून हत्या केली

फोटो स्रोत, Sarfuddin/BBC

फोटो कॅप्शन, आरोपांनुसार, मानवेंद्र सिंह यांच्या मुलाने त्यांच्याच परवाना असलेल्या रायफलमधून गोळ्या झाडून हत्या केली
    • Author, सय्यद मोझिज इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

(सूचना: या बातमीतील माहिती अस्वस्थ करणारी असू शकते.)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील एका उच्चभ्रू वस्तीतून 20 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिकाच्या मृतदेहाचे तुकडे त्यांच्या घरातच एका ड्रममध्ये सापडले आहेत. मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते आणि काही तुकडे शहराच्या एका भागात फेकण्यातही आले होते.

ज्यांची हत्या झाली ते मानवेंद्र प्रताप सिंह 49 वर्षांचे होते ते जालौनचे रहिवासी होते आणि लखनौमध्ये व्यवसाय करत होते.

पोलिसांनी त्यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचा 21 वर्षांचा मुलगा, अक्षत प्रताप सिंह याला अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त विक्रांत वीर म्हणाले, "अक्षत प्रताप सिंहने आपला गुन्हा कबूल केला आहे. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, 20 फेब्रुवारी रोजी त्याचे आणि त्याच्या वडिलांचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने वडिलांवर गोळी झाडली."

पोलिसांनी या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरचा तपशील जाहीर केला नाही, परंतु एका निवेदनात असे म्हटले आहे की, "आरोपीला पोलीस कोठडीत घेऊन आवश्यक चौकशी आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे."

गोळी झाडली, मृतदेहाचे तुकडे केले

मानवेंद्र प्रताप सिंह यांची हत्या लखनौमधील आशियाना परिसरातील त्यांच्या तीन मजली घरात झाली. हे ठिकाण लखनौ विमानतळाजवळ आहे. आशियाना पोलीस ठाण्याचे अधिकारी छत्रपाल सिंह यांनी सांगितले, "आरोपीने आपल्या वडिलांच्या परवानाधारक रायफलने त्यांच्यावर गोळी झाडली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे."

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मानवेंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या मुलामध्ये शिक्षणावरून वाद सुरू होता. अक्षत हा बी.कॉमचा विद्यार्थी आहे.

उपायुक्त विक्रांत वीर म्हणाले, "आरोपीच्या चौकशीतून असे समोर आले आहे की, मानवेंद्र सिंह आपल्या मुलावर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी दबाव टाकत होते. या कारणावरून पिता-पुत्रात तणाव होता आणि त्यांच्यात वारंवार वाद होत असे."

मानवेंद्र सिंह यांच्या बंद घरातून उग्र वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, तिथे छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला

फोटो स्रोत, Sarfuddin/BBC

फोटो कॅप्शन, मानवेंद्र सिंह यांच्या बंद घरातून उग्र वास येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, तिथे छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला

आशियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली. "वादादरम्यान अक्षतने रायफलने आपल्या वडिलांवर गोळी झाडली असा आरोप आहे. त्यानंतर तो मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर घेऊन आला आणि एका रिकाम्या खोलीत ठेवून त्याचे अनेक तुकडे केले."

पोलिसांच्या माहितीनुसार, "आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. शरीराचे काही भाग त्याने सदरौना परिसराजवळ फेकून दिले, तर इतर अवशेष घराच्या आत एका निळ्या ड्रममध्ये ठेवले होते."

पोलीस निरीक्षक छत्रपाल सिंह यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले की, "आम्ही मृतदेहाचे सर्व तुकडे हस्तगत केले आहेत."

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, "तपासातून असे दिसून येते की, शिक्षणावरून आरोपीचा त्याच्या वडिलांशी नेहमीच वाद व्हायचा."

आरोपीने बारावीपर्यंतचे शिक्षण लखनौमधील एका नामांकित शाळेतून पूर्ण केले होते. तो सध्या बी.कॉमचे शिक्षण घेत होता.

असा लागला छडा...

लखनौ मध्य विभागाचे डीसीपी विक्रांत वीर यांच्या माहितीनुसार, अक्षतने 20 फेब्रुवारी रोजी आपले वडील मानवेंद्र प्रताप सिंह बेपत्ता असल्याची तक्रार आशियाना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस मानवेंद्र यांचा शोध घेत होते. याच दरम्यान, स्थानिक लोकांनी त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.

माहिती मिळताच 23 फेब्रुवारी रोजी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान तळमजल्यावरील एका खोलीत ठेवलेल्या ड्रममध्ये मृतदेह सापडला.

मृत मानवेंद्र सिंह यांना दोन मुलं आहेत. मुलगा अक्षत आणि एक मुलगी, जी सध्या एका स्थानिक शाळेत शिक्षण घेत आहे.

मूळचे जालौनचे रहिवासी असलेले मानवेंद्र प्रताप सिंह लखनौमध्ये आपला व्यवसाय करत होते

फोटो स्रोत, Sarfuddin/BBC

फोटो कॅप्शन, मूळचे जालौनचे रहिवासी असलेले मानवेंद्र प्रताप सिंह लखनौमध्ये आपला व्यवसाय करत होते

मानवेंद्र प्रताप सिंह यांच्या नातेवाईकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अक्षत आधी NEET परीक्षेचे कोचिंग करत होता, परंतु दोनदा परीक्षा देऊनही तो उत्तीर्ण होऊ शकला नव्हता.

लखनौमधील 'युनिटी कॉलेज'मध्ये मानसशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका शम्सी अकबर म्हणतात, "घरातील सततची भांडणे, कौटुंबिक दबाव, राग किंवा दीर्घकाळ टिकून असलेला मानसिक ताण कधीकधी हिंसक वर्तनाला जन्म देऊ शकतो."

त्यांचे असे म्हणणे आहे की, "शिक्षणाबाबतचा दबाव किंवा जबरदस्ती देखील एका 'ट्रिगर'सारखे काम करू शकते, परंतु हे स्वतःहून एखाद्या गंभीर मानसिक आजाराचे लक्षण किंवा पुरावा नाही."

त्या पुढे सांगतात की, मानसशास्त्रामध्ये अशा प्रकरणांना अनेक संभाव्य कारणांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञच्या सविस्तर मूल्यमापनानंतरच अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता येते.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.