ईशान्य भारतातील तरुणींसोबत वांशिक भेदभाव; तरुणींसोबत गैरवर्तनाच्या व्हायरल व्हीडिओची संपूर्ण कहाणी

फोटो स्रोत, X/Screengrab
- Author, शुभांगी मिश्रा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
दिल्लीतील मालवीय नगर भागात राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील 3 तरुणींनी आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध वांशिक भेदभावाची तक्रार दाखल केली आहे. या मुलींचे म्हणणे आहे की, दिल्लीत त्यांच्यासोबत असे प्रकार अनेकदा घडले होते.
तक्रार करणाऱ्या तरुणींपैकी एका तरुणीने सांगितले की, "त्यांनी एका छोट्याशा वादातून आमच्या संपूर्ण समुदायाला आणि जमातीला उद्देशून शिवीगाळ केली. आम्ही हा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून भविष्यात कोणत्याही ईशान्य भारतीय व्यक्तीसोबत असं वागण्यापूर्वी कोणीही 4 वेळा विचार करेल."
या तरुणीने पुढे म्हटले आहे की, "आम्हाला न्याय मिळेल अशी पूर्ण आशा आहे. हे प्रकरण पाहून लोक ईशान्य भारतातील नागरिकांशी वंशद्वेषी वागण्यापूर्वी विचार करतील."
या मुलींनी आपली ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे.
घटनेची नेमकी सुरुवात कशी झाली?
या तरुणी गेल्या 7 महिन्यांपासून दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये भाड्याने राहत होत्या. या तिघींपैकी एक तरुणी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, दुसरी OTT तंत्रज्ञ म्हणून काम करते आणि तिसरी मुलगी यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.
त्यांनी सांगितले की, रविवारी 22 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या घरात AC दुरुस्तीचे काम काढले होते. या कामासाठी भिंतीत ड्रिलिंग करावे लागले. ड्रिलिंग करत असताना त्यातून निघालेला कचरा पहिल्या मजल्यावरील गॅलरीत जाऊन पडला. नेमक्या याच ठिकाणी खाली राहणाऱ्या रहिवाशांचे AC कॉम्प्रेसर ठेवलेले होते.
यानंतर पहिल्या मजल्यावर राहणारे हर्ष सिंह आणि रूबी जैन इलेक्ट्रिशियनसोबत उद्धटपणा वागले आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली असा आरोप आहे.
काही वेळाने एक पोलीस कर्मचारीही तिथे पोहोचला. या वादानंतर, त्या महिला आणि पुरुषाच्या विरोधात जातीय भेदभाव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाई आणि व्हायरल व्हीडिओ
मालवीय नगर पोलीस ठाण्यात हर्ष सिंह आणि त्यांची पत्नी रूबी जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर वंशभेद करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, या आरोपांखाली भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 79, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फोटो स्रोत, X/Screengrab
या तरुणींनी संपूर्ण घटनेचा एक व्हीडिओ बनवला होता जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये आरोपी त्या मुलींना "मोमो" आणि "मसाज पार्लर वाली" असे अत्यंत अपमानजनक शब्द वापरताना दिसत आहेत.
त्या मुलीने या घटनेबद्दल सांगताना म्हटले, "आमच्या शेजाऱ्याने आम्हाला तोंडावरच टोमणा मारला की, 'तुमच्यासारखे ईशान्य भारतातील लोक इथे राहण्याच्या लायकीचे नाहीत' आणि 'तुम्ही मसाज पार्लर चालवणारे लोक आहात'."
दुसरीकडे, हर्ष आणि रूबी यांचे वकील गौरव यांनी मीडियाला सांगितले की, "रागाच्या भरात जे शब्द तोंडातून निघाले, त्याबद्दल माझे क्लायंट हर्ष यांना खंत आहे. पण दिल्लीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून असे वाद होतच असतात."
वंशभेदाच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या
ही घटना पुन्हा एकदा दिल्लीतील एका मोठ्या प्रश्नाकडे लक्ष वेधते तो म्हणजे ईशान्य भारतातील तरुण - तरुणींना दररोज सहन करावा लागणारा अपमान.
दिल्लीत ईशान्य भारतातील लोकांसोबत हिंसेच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. त्यातील काही प्रमुख घटनांपैकी 2014 मध्ये घडलेले निडो तानिया प्रकरण हे प्रकरण सर्वात जास्त चर्चेत आले. अरुणाचल प्रदेशच्या या विद्यार्थ्याने जेव्हा त्याच्यावर झालेल्या वांशिक टिप्पणीचा विरोध केला, तेव्हा त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की त्यातच त्याचा मृत्यू झाला.
याशिवाय 2012 मध्ये रिचर्ड लोइताम आणि 2014 मध्ये शालोनी यांसारख्या तरुणांचाही संशयास्पद परिस्थितीत किंवा हल्ल्यांमध्ये जीव गेला होता.
आता ईशान्य भारतीय नागरिक अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत
पण आता परिस्थिती बदलत आहे. ईशान्य भारतातील तरुण या भेदभावाविरुद्ध उघडपणे बोलू लागले आहेत.
मौका खोजा, रेबेल, आणि के4खेको यांसारखे कलाकार आपल्या गाण्यांमधून त्यांना दिल्या जाणाऱ्या शिवीगाळीचा निषेध करत आहेत. अलीकडेच 'चिंकी' नावाचे एक गाणेही खूप गाजले होते, ज्यात या भेदभावावर भाष्य केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मनोरंजन सृष्टीतही हे विषय मांडले जात आहेत.
2019 चा 'एक्सोन' हा चित्रपट दिल्लीत राहणाऱ्या ईशान्य भारतीय लोकांच्या जगण्यावर आधारित आहे. विशेषतः त्यांचे पारंपरिक जेवण बनवताना त्यांना कोणत्या अडचणी येतात, हे यात प्रभावीपणे दाखवले आहे.
कोरोना काळात तर या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागला होता. त्यांना 'कोरोना' म्हणून चिडवणे आणि त्यांच्या अंगावर थुंकणे अशा अत्यंत संतापजनक घटना त्यावेळी समोर आल्या होत्या.
अन्यायाविरुद्ध आवाज होतोय बुलंद
या वाढत्या घटनांमुळेच सरकारला 'बेजबरुआ समिती' स्थापन करावी लागली, जेणेकरून ईशान्य भारतातील लोकांच्या सुरक्षिततेची खात्री देता येईल.
जेएनयूमध्ये शिकणारी आणि अरुणाचल प्रदेशची असलेली विद्यार्थिनी यारी नयम हिने बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितले की, "ही घटना खूप गंभीर आहे. याला फक्त एक साधी किंवा छोटीशी घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. यावरून हेच सिद्ध होते की, ईशान्य भारतीय लोकांबद्दलचा द्वेष आजही समाजात जिवंत आहे. अशा वागणुकीला आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची गरज आहे."
यारीचे असेही म्हणणे आहे की, फक्त कायदे करून चालणार नाही, तर आपल्या शिक्षण पद्धतीत आणि सरकारी धोरणांत बदल व्हायला हवा, जेणेकरून लहानपणापासूनच मुलांमध्ये जागरूकता निर्माण होईल.
शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत, लोकांना हे शिकवले पाहिजे की ईशान्य भारत हा भारताचाच एक अविभाज्य भाग आहे.
ती शेवटी कळकळीने म्हणते की, "आता बस झाले..अशा घटना थांबवण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई होणे आणि समाजात कायमस्वरूपी जागरूकता निर्माण करणे, या दोन्ही गोष्टींची आज नितांत गरज आहे."
वंशवादाचे मोठे आव्हान
OTT क्षेत्रात तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीने 'बीबीसी न्यूज हिंदी'ला सांगितले की, दिल्लीत त्यांना वारंवार भेदभावाचा सामना करावा लागतो.
ती म्हणाली, "अशा अपमानास्पद गोष्टी मी दिल्लीत पहिल्यांदाच ऐकलेल्या नाहीत. मेट्रोने प्रवास करताना लोक अनेकदा आम्हाला 'चायनीज' म्हणून चिडवतात आणि इतरही अनेक वाईट शब्द वापरतात."
ईशान्य भारतातून आलेल्या लोकांना दिल्लीत घर शोधतानाही खूप त्रास होतो. जर घर मिळालेच, तर त्यांच्याकडून जास्त भाडे आणि जास्तीचे वीज बिल उकळले जाते.
ती पुढे सांगते, "नॉर्थ-ईस्टच्या विद्यार्थ्यांकडून किंवा नोकरी करणाऱ्यांकडून जास्त भाडे वसूल करणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. इतर गोष्टींसाठीही आमच्याकडून जास्त पैसे घेतले जातात. या मुलींकडून तर विजेचे बिल प्रति युनिट 8 ते 12 रुपये या दराने घेतले जात होते, तर प्रत्यक्षात त्याचा दर फक्त 3 रुपये आहे."
त्या मुलींच्या वकील लियी मार्ले नोशी यांनी हतबल होऊन सांगितले की, "ईशान्य भारतातील मुलांचा इथे सतत छळ केला जातो आणि बिचाऱ्या मुलांकडे हे सगळं सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो."
लियी यांनी स्वतःचा एक धक्कादायक अनुभवही सांगितला. त्या म्हणाल्या की, त्या स्वतः वकील असूनही केवळ ईशान्य भारतातील असल्यामुळे दिल्लीच्या कोर्टात त्यांच्यासोबत भेदभाव झाला आणि त्यांना तिथे धक्काबुक्कीलाही सामोरे जावे लागले.
अजूनही कोणालाही अटक नाही
दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या त्या विद्यार्थिनीने सांगितले की, रस्त्यावरून चालताना लोक मुद्दामहून वाईट शब्द वापरतात. ती म्हणते, "लोकांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या शिव्या ऐकाव्या आणि आम्हाला त्याचं वाईट वाटावं. जेव्हा शिकली-सवरलेली माणसं असं वागतात, तेव्हा खूप जास्त त्रास होतो."
ओळख उघड झाल्यामुळे भीतीचं वातावरण
पोलीस तक्रार केल्यानंतर या मुलींची नावं आणि ओळख मीडियामध्ये पसरली. ती विद्यार्थिनी म्हणाली, "आमचे घरचे लोक आता खूप घाबरले आहेत. ते आम्हाला परत गावी बोलवत आहेत. कदाचित आम्हाला आमचं शिक्षण अर्धवट सोडून परत जावं लागेल."
आपली ओळख लपवण्यासाठी या मुली रात्रभर सोशल मीडियावर पेज शोधत होत्या जिथे त्यांची माहिती दिली गेली होती. त्या विनंती करून ते व्हीडिओ डिलीट करून घेत होत्या.
या प्रकरणात पोलिसांनी अजूनही कोणालाही अटक केलेली नाही. 'बीबीसी न्यूज हिंदी'ने या संदर्भात दक्षिण दिल्लीचे DCP अंकित त्यागी यांना फोन केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन











