संतोष पोळ: 6 जणांना जिवंत गाडणाऱ्या 'देवमाणसा'चं पुढे काय झालं?

- Author, अरुंधती रानडे- जोशी
- Role, बीबीसी मराठीसाठी
ही क्रूरकथा तशी अलिकडच्या काळातली. अनेकांच्या स्मरणात असू शकेल अशी. टेलिफोन, मोबाईल फोन, गुगल मॅपच्या जमान्यातही गावातली माणसं एकाएकी गायब होतात आणि काही वर्षांनी लक्षात येतं या गायब होण्यामागे एक 'देवमाणूस' समजला जाणारा 'धडाडीचा' सामाजिक कार्यकर्ता आणि डॉक्टर आहे.
त्याने काही स्त्रियांना अक्षरशः जिवंत गाडून वर त्या जागी कलमी नारळाचं झाड लावलं. अगदी अलिकडे उजेडात आलेली ही सत्यकथा खरोखर डॉक्टरवरच नव्हे तर माणुसकीवर शंका यावी इतकी क्रूर.
महाराष्ट्रात घडलेल्या आणि उलगडलेल्या क्रूरकथांपैकी अगदी ताजी आणि तितकीच भयावह गोष्ट आहे साताऱ्यातल्या कथित डॉक्टर संतोष पोळ याची. 2003 ते 2016 या काळात या तथाकथित डॉक्टरने सहा खून केल्याचं कबूल केलं आहे. पण सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या धोम गावात गेल्या काही वर्षांपासून किमान 15 जण अचानक बेपत्ता किंवा गायब झाल्याची वार्ता आहे.
अर्थातच अजूनही या केसची सुनावणी सुरू असल्याने नेमकं प्रकरण सिद्ध व्हायचं बाकी आहे. पण एका मराठी मनोरंजन वाहिनीवर या तोतया डॉक्टरच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित एक मालिका येऊन गाजूनही गेली. पण देवमाणूस असल्याचं दाखवत माणुसकीलाही काळीमा फासणारा हा संतोष पोळ सध्या कुठे आहे? त्यानं खरंच काय काय केलं आहे?
वाई तालुक्यातलं महाबळेश्वरजवळचं धरणामुळे प्रसिद्ध असलेलं गाव - धोम. इथे डॉक्टर म्हणून ओळख असलेला संतोष पोळ नामक नराधम राहात होता. दहा-पंधरा वर्षांत त्याने सहा जणांना सक्सिनिलकोलीन नावाचं गुंगीचं इंजेक्शन देऊन नंतर जमिनीत पुरलं.
हे औषध अॅनेस्थेशिया देण्यासाठी वापरलं जातं. इंजेक्शनची मात्रा अधिक दिली की, माणसाच्या सगळ्या संवेदना लोप पावतात. पण हृदय आणि मेंदू सुरू असतो. याच अवस्थेत संतोष पोळने स्वतःच्या जागेतच खड्डा करून सहा जणांना पुरलं. मंगला जेधे, सलमा शेख, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया या डॉक्टरच्या बळी.
शिवाय नथमल भंडारी नावाच्या इसमालाही संतोष पोळने असंच संपवल्याचा आरोप आहे. या सहा जणांच्या खुनाची कबुली पोलीस तपासात पोळने दिली आहे. इतरही काही बेपत्ता माणसांचा संबंध पोळपाशी जाऊन थांबलेला आहे. पण केस उभी राहू शकली ती या सहा खुनांसाठीच.
पोलिसांना पोळच्या धोम परिसरातल्या फार्म हाउसवर 2016 मध्ये सांगाडे पुरलेले सापडले आणि या घटनेचं भयावह वास्तव जनतेपुढे आलं.
कोण आहे 'डॉक्टर डेथ'?
इंग्रजी वृत्तमाध्यमांनी 'डॉक्टर डेथ' असं नाव दिलेला सीरिअल किलर संतोष पोळ डॉक्टर म्हणून सातारा जिल्ह्यात वर्षानुवर्षं वावरत होता. त्याचा दवाखानाही होता. पण त्याची पदवी, सर्टिफिकेट खोटी असल्याचं नंतर त्याला पकडल्यावर उघड झालं.
डॉक्टर असण्याबरोबर तो सामाजिक कार्यकर्ताही असल्याचं दाखवत असे. भ्रष्टाचार निर्मूलनाची मोहीम हाती घेतलेला कार्यकर्ता असल्याचं त्याच्याविषयी बोललं जायचं. त्याने काही भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्याचंही लोक सांगतात. गावात त्याची अनेकांशी भांडणं, वाद झाले ते याच कारणावरून.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या नावाच्या पोलिसांत तक्रारी झाल्या आणि त्यानेही अनेकदा पोलिसांत तक्रार दाखल करायला चकरा मारल्या. फारसा लोकांमध्ये न मिसळणारा तरीही चांगला डॉक्टर म्हणूनच त्याची ओळख होती.
13 वर्षं सुरू होतं हत्यासत्र?
एवढंच नव्हे तर गावातली जी लोक अचानक बेपत्ता झाली त्यांच्या तपासाच्या चौकशीसाठीही पोलिसांनी काही वेळेला या डॉक्टराला बोलावून घेतलं होतं. पण त्याच्याविरोधात संशय बळावेल असं काहीच पोलिसांच्या हाती एवढ्या वर्षांत लागलं नाही. डॉ.संतोष पोळ हे नाव गावात चांगल्या-वाईट कारणाने परिचित होतं. पोलीस दफ्तरीही नोंदलं गेलेलं होतं.
तो एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीलाही उभा होता. पण त्याचा पराभव झाला. एवढी चर्चा असूनही 13 वर्षांत कुणालाच या हत्याकांडाचा सुगावा लागला नाही हे विशेष. 2003 पासून त्याला अटक होईपर्यंत म्हणजे ऑगस्ट 2016 पर्यंत त्याचे हे भयानक उद्योग बिनदिक्कत सुरू होते, असं पुढे पोलीस तपासात स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला संपत्तीच्या अपेक्षेने आणि नंतर आपले काळे धंदे बाहेर येऊ नयेत म्हणून त्याने अशा प्रकारे माणसं मारली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
किडनी रॅकेटपासून ते औषधांच्या गैरव्यवहारांपर्यंत आणि औषधांच्या अवैध वापरासाठीच्या साठ्यापासून ते पोलीस आणि इतर खात्यातील भ्रष्टाचारापर्यंत अनेक गोष्टी डॉ.संतोष पोळ प्रकरणाशी जोडल्या गेल्या.
अद्याप त्यातल्या काहीच थेटपणे स्पष्ट होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठीच पोळने हे निर्घृण खून केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
कसा लागला छडा?
वाई इथल्या एक अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे 2016 मध्ये अचानक गायब झाल्या. कुटुंबीयांनी खूप शोधूनही पत्ता लागला नाही, तेव्हा पोलिसांत खबर केली.
मंगला जेधेंच्या शोधात असताना पोलीस डॉक्टर संतोष पोळपर्यंत पोहोचले आणि अशा काही गोष्टी घडल्या की सुरुवातीला संबंध नाही असं वाटत असताना पोलिसांच्या तपासाची सूत्र संतोष पोळभोवती फिरू लागली.
पोळबरोबर काम करणाऱ्या नर्सला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा धडाधड गुपितं बाहेर आली आणि साताराच नव्हे तर अवघं राज्य या नराधमाने केलेल्या कृत्याबद्दल वाचून आणि ऐकून हादरलं.
एकामागोमाग एक 6 सापळे सापडले तेव्हा...
मंगला जेधे या अंगणवाडी सेविका होत्या आणि महाराष्ट्र पूर्वप्राथमिक शिक्षण सेविका संघाच्या अध्यक्षही होत्या. त्या बेपत्ता झाल्या तेव्हा त्यांना कुणी पळवून नेलं असल्याचा संशय पोलिसांना आला. त्या दृष्टीने तपास सुरू असताना जेधेंकडच्या मोबाईलवरचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. तेव्हा शेवटचे काही दिवस त्या डॉ. संतोष पोळच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं.
मोबाईलचं शेवटचं लोकेशन पोळबरोबर काम करणारी नर्स ज्योती मांढरेकडे घेऊन गेलं. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घ्यायचं ठरवलं. पोळने मात्र मंगला जेधेविरोधात आधीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपली 200 ग्रॅमची सोन्याची चेन मंगलने मोठी करण्याच्या निमित्ताने गायब केली. पैशाची फसवणूक केल्याची पोळने तक्रार केली होती.
या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोळचाच संशय आला. कारण यापूर्वीही गावातून गायब होणाऱ्या व्यक्तींबाबत तपास करताना त्याचं नाव समोर आलेलं होतं. त्यातल्या काही वेळेला पोळने त्या गायब झालेल्या व्यक्तीविरोधात तक्रारीही दिल्या होत्या.
त्याच्याविरोधातही काही तक्रारी होत्या. पण भ्रष्टाचार प्रकरणी विरोध करत असलेल्या कामामुळे लोक दबाव टाकण्यासाठी खोट्या तक्रारी करत असल्याचा पोळचा दावा असायचा. त्याने काही आंदोलनही केली होती. पण मंगल जेधे प्रकरणात मात्र कॉल रेकॉर्ड वेगळं काही सुचवत होते. जेधे आपल्या मुलीकडे पुण्याला निघालेल्या असताना एसटी स्टँडवरून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं लक्षात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
साताऱ्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील सांगतात, "पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने जावा म्हणून संतोष पोळने आपलं सोनं मंगला जेधेने दुप्पट करून द्यायच्या आमिषाने पळवल्याची तक्रार केली. आपल्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची तक्रारही त्याने स्थानिक पोलिसांकडे दाखल केली होती."
पण पोलीसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मांढरे ही नर्स आणि पोळ यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. त्यानंतर ज्योतीने तोंड उघडलं आणि आपणच डॉक्टरच्या साथीने मंगल जेधेला पळवल्याचं तिने कबूल केलं. 15 जून 2016 रोजी 49 वर्षांच्या मंगला जेधेंना वाई बसस्टॉपवरून पळवून धोम गावानजिक फार्म हाऊसवर आणण्यात आलं आणि त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं. नंतर फार्महाउसच्या मागेच खड्डा करून त्यांना दुसऱ्या दिवशी पुरण्यात आल्याचं ज्योतीने सांगितलं. 11 ऑगस्टला संतोष पोळला अटक झाली.
पोलिसांनी आपला खाक्या दाखवत चौकशी केली तेव्हा या तथाकथिक डॉक्टराने जेधेंचाच नव्हे तर इतर चार महिलांचा आणि एका पुरुषाचाही खून केल्याचं ज्योतीने सांगितलं. पाटील सांगतात, "पोलिसांना पोळच्या फार्महाउसवर एका रात्रीतच जेधेंच्या मृतदेहाबरोबर इतर चार मानवी सांगाडेही सापडले." यातला एक पुरुषाचा होता आणि बाकी स्त्रियांचे. मंगला जेधेसह सलमा शेख, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड अशा महिलाही गावातून गायब झाल्या होत्या. त्यांचेच मृतदेह असल्याचे पुढच्या तपासात पुढे आलं.
हे प्रकरण किती मोठं आहे याचा अंदाज त्याच वेळी आला. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. पहिल्या पंधरा दिवसातच 2700 हून अधिक पंचनामे झाले. अखेर जिल्हा न्यायालयात केस उभी राहिली.
ज्योतीसाठीचा खड्डा तयारच होता
संतोष पोळ खुनाचा कट रीतसर शिजवत असे. परिचारिका होण्याचं शिक्षण घेतलेल्या आणि अर्धवट सोडलेल्या ज्योती मांढरेची त्याला साथ होती. बऱ्याचदा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो जवळ करत असे आणि मग त्यांचा काटा काढत असे. तर काही जणांना एड्स झाल्याची भीती घालूनही त्यानं ब्लॅकमेल केल्याचं काही माध्यमांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या मते, ज्योती आणि संतोषचे अनैतिक संबंध होते. आपण देवळात लग्न केल्याचं ज्योतीने पोलिसांना सांगितलं होतं.
मंगल जेधेप्रकरणी पोलीस ज्योतीच्या मागावर आहेत, हे कळताच संतोष सावध झाला होता. ती तोंड उघडणार अशी शंका येताच त्याने त्याच्या फार्मवर तिच्यासाठी खड्डा तयार करून ठेवलाच होता. ज्योतीला पोलिसांनी ताब्यात घेताच तो वाईतून सटकला. अखेर 11 ऑगस्ट 2016 ला त्याला मुंबईतून अटक करण्यात आली.
पोळने खुनांची कबुली दिली असली तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या प्रकरणात नव्हते. शिवाय पोळ पोलिसांना सहकार्य करत नव्हताच. या खुनांमध्ये संतोष पोळला साथ देणारी परिचारिका आणि मैत्रीण ज्योती मांढरे ही माफीचा साक्षीदार व्हायला तयार झाली. तेही कशामुळे? तर पोळच्या फार्मवर एक रिकामा खड्डा तयार असलेला तिला पोलिसांनीच दाखवला. तो तिच्यासाठीच असल्याची जाणीव तिला झाली तेव्हा ज्योती पोलिसांसमोर आणि न्यायालयात घडाघडा बोलायला तयार झाली.
स्वतःच पत्र लिहून केलं पोलिसांचं अभिनंदन
संतोष पोळला अटक झाल्यानंतर पुढचे काही दिवस ही केस देशभर गाजत होती. घराच्या अंगणात जिवंतपणीच लोकांना पुरणाऱ्या या नराधमाची दिल्लीतल्या निठारी प्रकरणाशी याची तुलना होऊ लागली होती. त्याच वेळी संतोष पोळने मात्र त्याला पकडणाऱ्या पोलिसांच्या टीमचं अभिनंदन करणारं पत्र चक्क पोलीस अधीक्षकांनाच दिलं.
तुमच्या टीमला सॅल्युट असं म्हणत त्याने मराठीतून स्वहस्ताक्षरात पत्र लिहिलं असल्याच्या वृत्ताला तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही दुजोरा दिला. 2003 पासून आतापर्यंत एकाही गुन्ह्यासाठी पोलीस मला पकडू शकले नाहीत याचं कारण तुमच्या खात्यातील भ्रष्टाचार आहे, असं म्हणत त्याने सातारा आणि वाईच्या पोलीस टीमचं अभिनंदन करणारं पत्र लिहिल्याच्या बातम्या तेव्हा सगळ्याच माध्यमातून आल्या होत्या.
बायकोपुढेही दिली कबुली
संतोष पोळने 2003 मध्ये लग्न केलं होतं. त्याला दोन मुलं होती. एक पाचगणीत शिकायला होता आणि दुसरा आईजवळ साताऱ्यात. 2016 मध्ये पोळला अटक झाली तोपर्यंत त्याच्या बायकोला त्याच्या कुकर्मांचा पत्ताच नव्हता, असं पोलीस तपासात स्पष्ट झालं. 'मिड डे'शी बोलताना तिने सांगितलं की, आपला नवरा डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचंच मला वाटत होतं.
हे भयंकर कृत्य करेल याची कल्पनाच नव्हती. डॉक्टर गावातल्या घरातच राहायचा आणि वर्षातून एकदाच आपल्याला देवदर्शनाला घेऊन जायचा, असं तिने 'मिड डे'च्या बातमीदाराशी बोलताना सांगितलं. पोलीस कोठडीत ती पोळला भेटायला गेली, तेव्हा हे सगळं आपण केल्याचं त्यानं तिच्यापुढे कबूल केलं. खुनांमागचा उद्देश या संभाषणातून पुढे येईल, असं पोलिसांना वाटलं होतं. पण पोळने बायकोलाही अधिक काहीच सांगितलं नाही.
सध्या पोळ कुठे आहे?
49 वर्षांच्या संतोष पोळविरोधातला खटला अजूनही साताऱ्यात सुरू आहे. ज्योती मांढरे माफीची साक्षीदार आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्योतीची गेल्याच महिन्यात खुद्द आरोपी पोळनेच न्यायालयात उलट तपासणी घेतली.
ती खोटं बोलत असल्याचं आणि केवळ तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलीस मला अडकवत असल्याचं त्यांचं आता म्हणणं आहे. दरम्याने गेल्या वर्षी ज्योतीला एक वर्षासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. अटींचं पालन करत ती पुन्हा न्यायालयात हजर झाली.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








