सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्यात जातीच्या मुद्द्यावरून मतभेद होते का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्वाचा टप्पा म्हणजे महाडचा सत्याग्रह.
20 मार्च 1927 रोजी डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्राच्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन सत्याग्रह केला होता. त्यांचा हा लढा अस्पृश्यतेच्या विरोधात होता.
डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो अस्पृश्य चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले.
सर्वप्रथम डॉ. आंबेडकर ओंजळ भरून तळ्यातील पाणी प्यायले आणि त्यानंतर सोबत आलेल्या अनुयायांनी त्यांचं अनुकरण केलं.
त्यावेळी उपस्थितांना उद्देशून आंबेडकर म्हणाले, "आपल्याला प्यायला पाणी मिळत नाही म्हणून आपण इथं आलोय का? चवदार अशी ख्याती असलेल्या पाण्यासाठी आपण तहानलोय का? अजिबात नाही. तर आपण इथं आलोय कारण आपल्याला देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे."
या प्रतिकात्मक निषेधाच्या माध्यमातून हजारो वर्ष जुन्या उच्चवर्णीय आणि सरंजामशाही सत्तेला आव्हान देण्यात आलं होतं. जे हक्क प्राण्यांना होते, तेही हक्क समाजातील खालच्या स्तरातील लोकांना नाकारण्यात आले होते.
इतर जातींमध्ये या घटनेचे पडसाद उमटले. सवर्ण लोकांनी याचा बदला घेतला, त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन तांडव केलं.
अशोक गोपाळ यांचं 'अ पार्ट अपार्ट द लाइफ अँड थॉट्स ऑफ बीआर आंबेडकर' हे डॉ. आंबेडकरांवर आधारित पुस्तक नुकतेच प्रकाशित झालं आहे. यात अशोक गोपाळ लिहितात, "सवर्ण हिंदूंनी लहान मुले, वृद्ध पुरुष आणि महिलांना बेदम मारहाण केली."
"चवदार तळ्याच्या सत्याग्रहाप्रमाणे आता अस्पृश्य लोक शहरातील वीरेश्वर मंदिरातही जाण्याचा विचार करत असल्याची अफवा पसरली होती. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मार्च 1927 रोजी सनातनी हिंदूंनी चवदार तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं.

फोटो स्रोत, VIJAY SURWADE'S ARCHIVAL COLLECTION NAVAYANA
डॉ. आंबेडकर सुद्धा अगदी लहान वयातच अस्पृश्यतेसारख्या प्रथेचे बळी ठरले होते.
डॉ. आंबेडकरांचे वडील सैन्यात होते. त्यांची पोस्टिंग कोरेगावमध्ये होती. त्यांनी भीमराव आणि त्यांच्या भावंडांना कोरेगावला भेटायला बोलवलं होतं. भीमरावांसोबत त्यांच्या बहिणीची मुलं देखील होती. हे सगळे कोरेगावला ट्रेनने येत आहेत याची बातमी रामजी आंबेडकर यांना समजली नाही, त्यामुळे या सगळ्यांना स्टेशनवर आणायला ते जाऊ शकले नाहीत.
स्टेशनवर उतरल्यावर स्टेशन मास्तरने भीमरावांना विचारलं की, तुम्ही कोण आहात? तुम्हाला कुठं जायचं आहे? स्टेशन मास्तरला जेव्हा ते महार असल्याचं समजलं तेव्हा तो बीचकला आणि दोन पावलं मागे जाऊन थांबला. भीमरावांनी मोठ्या कष्टाने एक बैलगाडी बोलवली. रस्त्याने जाता जाता त्या गाडीवानाला ही समजलं की ते महार आहेत.
डॉ. सविता आंबेडकर त्यांच्या 'माय लाइफ विथ डॉ. आंबेडकर' या पुस्तकात लिहितात, "त्या गाडीवानाने सर्वांना ताबडतोब गाडीतून खाली उतरवलं. तोपर्यंत अंधार पडला होता. पण मुलांनी दुप्पट पैसे देण्याचं आमिष दिल्यावर तो गाडी घेऊन जायला तयार झाला."
"त्याने अट ठेवली होती की, मुलं गाडी हाकतील आणि तो गाडीवान त्यांच्या मागे पायी चालत येईल. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वच मुलांना खूप तहान लागली होती, पण रस्त्यात कोणीच त्यांना पाणी दिलं नाही. शेवटी सर्व मुलं अर्धमेल्या अवस्थेत वडिलांच्या घरी पोहोचले."
भाड्याचं घर द्यायला नकार
बडोद्यात असताना बाबासाहेब आंबेडकरांसोबत दूसरी घटना घडली, ज्यामुळे ते पुरते हादरून गेले. परदेशात शिकून आल्यानंतर जानेवारी 1913 मध्ये त्यांना बडोदा सचिवालयात नोकरी मिळाली. त्यांना हात लागू नये म्हणून शिपाई दुरूनच फाईल त्यांच्याकडे फेकायचे. कोणताही व्यक्ती त्यांना भाड्याने घर द्यायला तयार नव्हता.

फोटो स्रोत, NAVAYANA
डॉ. सविता आंबेडकर लिहितात, "बाबासाहेब पारशी आडनाव धारण करून दिवसाला दीड रुपये भाडं देऊन पारशी हॉटेलमध्ये राहू लागले. 11 व्या दिवशी दहा ते बारा गुंड काठ्या घेऊन ते राहत असलेल्या खोलीबाहेर येऊन थांबले."
"हॉटेल दूषित केल्याबद्दल आंबेडकरांना शिवीगाळ करण्यात आली. शेवटी आंबेडकरांनी हॉटेल सोडलं आणि आपल्या ख्रिश्चन मित्राकडे आसरा घेतला. पण तिथेही लोकांना त्यांच्या जातीविषयी समजलं आणि त्यांना तेही घर सोडावं लागलं. शेवटी एका रात्रीत त्यांना बडोद्याची नोकरी सोडली आणि मुंबई गाठलं."
सावरकरांनी दिला होता महाडच्या आंदोलनाला पाठिंबा
अशा कित्येक घटनांमुळे बाबासाहेबांची जातीबद्दलची विचारसरणी बदलली. विनायक दामोदर सावरकरांनी आंबेडकरांच्या महाड सत्याग्रहाला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

फोटो स्रोत, RUPA
सावरकरांचं चरित्र 'सावरकर अँड हिज टाईम्स'मध्ये धनंजय कीर लिहितात की, "त्यावेळी सावरकर म्हणाले होते की, अस्पृश्यतेचा केवळ निषेध करून भागणार नाही तर धर्माचा आदेश म्हणून ही प्रथा मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली आहे. यात केवळ नीति किंवा औचित्याचा प्रश्न नाहीये, तर न्याय आणि मानवतेच्या सेवेचे मुद्दे देखील संबंधित आहेत."
"त्यामुळे सावरकरांनी घोषणा केली होती की, जे लोक हिंदू धर्म मानतात त्यांच्या मानवी अधिकारांचं रक्षण करणं प्रत्येक हिंदूचं पवित्र कर्तव्य आहे. एखाद्या प्राण्याच्या मूत्राने स्वतःला शुद्ध करणं आणि त्याचवेळी एखाद्या मानवी स्पर्शाने अपवित्र होणं या संकल्पना अत्यंत हास्यास्पद आणि निंदनीय आहेत."
आंबेडकर आणि सावरकरांच्या विचारात असलेली भिन्नता
पण एवढं असून देखील सावरकरांच्या समाजसुधारणेच्या मोहिमेवर डॉ. आंबेडकर निराश झाले होते.
'अ पार्ट अपार्ट द लाइफ अँड थॉट ऑफ बी आर आंबेडकर' या पुस्तकाचे लेखक अशोक गोपाळ सांगतात, "आंबेडकरांचं मत होतं की, जर सावरकरांना हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर त्यांना अस्पृश्य आणि हिंदू धर्मात असलेली भिंत तोडली पाहिजे."

फोटो स्रोत, VIJAY SURWADE'S ARCHIVAL COLLECTION NAVAYANA
सावरकर जानेवारी 1924 मध्ये तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी या दिशेने काही काम केलं. कारण त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात राहूनच बिगर राजकीय काम करण्याची परवानगी मिळाली होती.
त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याची आणि सर्व जातीच्या लोकांच्या एकत्र जेवणावळी घालण्याची मोहीम सुरू केली.
सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी अशा पद्धतीची उदाहरणं देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की, आंबेडकर आणि सावरकर दोघेही हिंदू समाज सुधारण्याचं काम करत होते.
अशोक गोपाळ पुढे लिहितात, "धनंजय कीर यांनी 18 फेब्रुवारी 1933 रोजी आंबेडकरांनी सावरकरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेखही केलाय. सावरकरांच्या पुढाकाराने रत्नागिरीत एका श्रीमंत उद्योगपतीने पतित पावन मंदिर बांधलं होतं. यानंतर आंबेडकरांनी सावरकरांना पत्र लिहिलं होतं. या मंदिरात अस्पृश्यांना पूजा करण्याची परवानगी होती. सावरकरांनी आंबेडकरांना अशाच एका मंदिराच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं."

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
आपण कामात व्यस्त असल्याचा बहाणा करत आंबेडकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. पण त्यांनी सावरकरांना म्हटलं होतं की, "पण तुम्ही सामाजिक सुधारणांसाठी मोहीम सुरू केल्याबद्दल मी तुमचं कौतुक करू इच्छितो."
चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर सावरकरांशी मतभेद
पण हे पूर्ण सत्य म्हणता येणार नाही. 12 एप्रिल 1929 च्या 'बहिष्कृत भारत'च्या संपादकीय वाचलं तर समजतं की, पतित पावन मंदिराच्या उभारणीच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी याला विरोध केला होता. हे मंदिर पुढे जाऊन अस्पृश्यांसाठीचं मंदिर म्हणून ओळखलं जाईल असं त्यांना वाटत होतं.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
नोव्हेंबर 1930 ते मार्च 1931 या कालावधीत 'केसरी'मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या लेखांमध्ये सावरकर स्पष्ट करतात की, त्यांचा जातिवादाला विरोध आहे, परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेला त्यांचा विरोध नाही. सावरकरांच्या या विचारांविषयी आंबेडकरांना कल्पना होती.
त्यांनी 18 फेब्रुवारी 1933 रोजी सावरकरांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं की, "आपण अजूनही 'चातुर्वर्ण्य' पद्धत योग्यतेवर आधारित असल्याचं म्हणणं दुर्दैवी आहे. पण मला आशा आहे की, भविष्यात तुम्ही या खोडसाळ शब्दांतून सुटका करून घेण्याची हिंमत दाखवाल."
अशोक गोपाळ लिहितात की, सावरकरांनी असं वागण्याचा आपला हेतू स्पष्ट केला नाही. आणि तेव्हापासून आंबेडकरांनी देखील त्यांच्या सुधारणांच्या प्रयत्नांमध्ये रस घेतला नाही.
भाई परमानंद यांचं समर्थन आणि पुढे आलेलं अंतर
याच दरम्यान आंबेडकर, पंजाबचे हिंदूत्ववादी आर्यसमाजी नेते भाई परमानंद यांच्या प्रयत्नांकडे आशेने पाहू लागले. परमानंद यांनी सावरकरांप्रमाणेच हिंसक पद्धतीने ब्रिटिश सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप होता. म्हणून भारतातील ब्रिटिश सरकारने परमानंद यांना अंदमान तुरुंगात ठेवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
1920 मध्ये अंदमानमधून सुटका झाल्यानंतर परमानंद 'जात-पात तोडक मंडळ'चे अध्यक्ष झाले. 1927 मध्ये त्यांनी या मंडळाचं नाव बदलून 'हिंदू साम्यवाद मंडळ' असं ठेवलं.
16 सप्टेंबर 1927 च्या बहिष्कृत भारतच्या अंकात आंबेडकरांनी हिंदू महासभेला चांगला पर्याय म्हणून हिंदू साम्यवाद मंडळ असल्याचं म्हटलं होतं.
अशोक गोपाळ यांच्या मते, "भाई परमानंद यांनी जात-पात तोडक मंडळाचं नाव बदलून हिंदू साम्यवाद मंडळ यासाठी ठेवलं होतं की, लाहोरचे आर्यसमाजी जात-पात तोडक नावाविषयी तितकेसे खुश नव्हते. आणि आंबेडकरांना कदाचित हे माहीत नव्हतं."
भाई परमानंद यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था योग्य ठरवेल असं एक नाव हवं होतं. पुढे जाऊन आंबेडकरांची या जात-पात तोडक मंडळाकडून देखील निराशा झाली.

फोटो स्रोत, INDIAN POST
डिसेंबर 1935 मध्ये या संघटनेने लाहोर येथील वार्षिक संमेलनात अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आंबेडकरांना निमंत्रण दिलं होतं. आंबेडकरांनी त्यांच्या भाषणाची प्रत या संघटनेला पाठवून दिली. त्यांनी आंबेडकरांना त्यात काही सुधारणा करण्यास सांगितलं, जे आंबेडकरांनी नाकारलं.
शेवटी एका दीर्घ पत्रव्यवहारानंतर त्यांनी ही संमेलन रद्द केलं. पुढे आंबेडकरांनीच हे भाषण त्यांच्या 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात प्रसिद्ध केलं.
जाती विरहित व्यवस्था स्वराज्यापेक्षा जास्त महत्वाची
आंबेडकरांचं मत होतं की, स्वराज्य मिळण्यापूर्वी हिंदू समाजात जातीविरहित व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांनी एकेठिकाणी लिहिलं होतं की, "असं स्वराज्य काहीच कामाचं नाही, ज्याचं रक्षण तुम्हाला करता येणार नाही. माझ्या मते, जेव्हा जाती विरहित हिंदू समाज अस्तित्वात येईल तेव्हाच स्वतःचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यात येईल."

फोटो स्रोत, VIJAY SURWADE'S ARCHIVAL COLLECTION NAVAYANA
त्यावेळी हिंदू महासभेसारख्या संघटनाही हिंदू समाजाला सशक्त करण्याविषयी आग्रही होत्या. हिंदूंची संख्या वाढवून मुस्लिमांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडे एक फॉर्म्युला होता. त्याप्रमाणे, ज्यांच्या पूर्वजांनी इस्लाम स्वीकारला होता त्या लोकांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात घ्यावं.
आंबेडकरांनी 'तेलुगु समाचार'च्या एका अंकात लिहिलं होतं की, "जर हिंदू समाजाला टिकून राहायचं असेल तर त्यांनी आपल्या संख्या वाढवण्याऐवजी आपली एकता वाढविण्यावर भर दिला पाहिजे. याचा सरळ अर्थ आहे तो म्हणजे जातीचे उच्चाटन. जर हिंदू धर्मातील जातींचं समूळ उच्चाटन केलं तर त्यांना कोणत्याही शुद्धीकरणाची गरज भासणार नाही."
आंबेडकर आणि सावरकर यांच्या हिंदुत्वातील फरक
बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वीच म्हटलं होतं की, "आम्हाला समाजात समानतेचा अधिकार हवाय आणि शक्यतोवर हिंदू समाजात राहूनच आम्ही हा अधिकार मिळवायचा प्रयत्न करू. आणि गरज पडलीच तर आम्ही हिंदू धर्म सोडून देण्यासही मागेपुढे पाहणार नाही. आम्ही हिंदुत्व सोडलं तर आम्हाला मंदिरात जाण्यातही रस राहणार नाही."
सावरकर आणि आंबेडकर यांच्यात हिंदू धर्माशी संबंधित मुद्द्यांवर मतभिन्नता होती. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचं सांगितलं होतं, मात्र आपण बौद्ध धर्म स्वीकारणार आहे याविषयीही काही स्पष्ट सांगितलं नव्हतं.

फोटो स्रोत, RUPA PUBLICATIONS INDIA
या विषयावर सावरकरांनी 'निर्भीड'च्या 3 नोव्हेंबर 1935 च्या अंकात सविस्तर लेख लिहिला होता. आंबेडकरांच्या हिंदू धर्म सोडण्याच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सावरकरांनी लिहिलं होतं की, "इतर संघटित धर्माप्रमाणेच हिंदू धर्मातही काही ना काही तर्कहीनतेचे घटक आहेत. इतर धर्मातही तर्कहीनता आढळते."
त्यांनी आंबेडकरांना आवाहन करताना म्हटलं की, "त्यांनी आपल्या बौद्धिक ज्ञानाचा आणि प्रभावाचा वापर करून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा."
'तुम्हाला जर अस्पृश्यतेविषयी अडचण असेल तर तुम्ही 10 वर्ष धीर धरा. कारण येणाऱ्या काळात ही समस्या सुध्दा मुळापासून नष्ट होईल."

फोटो स्रोत, Getty Images
आंबेडकरांनी यावर उत्तर देताना म्हटलं होतं की, पुढच्या 100 वर्षांनंतरही हिंदू धर्मात अस्पृश्यता कायम राहील.
सप्टेंबर 1929 मध्ये आंबेडकरांनी एका खटल्याच्या निमित्ताने सावरकरांच्या जन्मगावी, रत्नागिरीला जाण्याची योजना आखली होती.
सावरकरांनी त्यांना शहरातील नागरिकांच्या वतीने विठ्ठल मंदिरात भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं.
आंबेडकरांनीही ते मान्य केलं. पण शेवटच्या क्षणी त्यांना एक तार आली आणि त्यांना तात्काळ मुंबईला जावं लागलं.
त्यामुळे त्यांना रत्नागिरीचा दौरा रद्द करावा लागला आणि आंबेडकर आणि सावरकर एकाच मंचावर येण्याची संधी हुकली.
हिंदू धर्म सोडण्याची घोषणा
आपला हिंदू धर्मात राहण्याचा कोणताही हेतू नसल्याचं आंबेडकरांनी एका भाषणात स्पष्ट केलं होतं.
ते म्हणाले होते की, "माझं हे दुर्दैव आहे की, अस्पृश्य हिंदूचा कलंक घेऊन मी जन्माला आलो, जे कधीच माझ्या हाती नव्हतं. पण तरीही ही अपमानास्पद स्थिती बदलून मी माझी स्थिती सुधारू शकतो. मी यासाठी सक्षम आहे यात मला तिळमात्र शंका नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे मी आज स्पष्ट करतोय."

फोटो स्रोत, VIJAY SURWADE'S ARCHIVAL COLLECTION NAVAYANA
आंबेडकरांच्या या वक्तव्यावर महात्मा गांधींनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "डॉ. आंबेडकरांनी केलेलं हे वक्तव्य विश्वासार्ह नाही."
हिंदू महासभेचे नेते बाळकृष्ण मुंजे आणि काँग्रेस नेते डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, धर्मांतराचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
यावर सावरकर म्हणाले होते की, "येत्या दहा वर्षात अस्पृश्यता संपून जाईल. आणि एक लाख अस्पृश्य आणि एक हजार महारांपैकी 10 हून अधिक लोकही आंबेडकरांच्या मागून जाणार नाहीत."
सावरकरांचा युक्तिवाद असा होता की, "कोणताही धर्म तर्कावर टिकत नाही. आंबेडकरांना जर तर्कवादाचा पुरस्कार करायचा असेल तर त्यांनी एखादी तार्किक संघटना उघडायला हवी."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








