इराणवरील हल्ल्यात इस्रायलसह अमेरिकाही सहभागी; काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलने इराणवर 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' अर्थात 'प्रतिबंधात्मक हल्ला' केला आहे, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.
'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' म्हणजे असा हल्ला ज्यामध्ये हल्ला करणाऱ्या देशाला असं वाटतं की, दुसरा देश त्याच्यावर हल्ला करणार आहे.
त्यासाठी आधीच समोरच्या देशावर हल्ला केला जातो.
इस्रायलने इराणविरुद्ध असाच 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' सुरू केला आहे.
आज सकाळी एका निवेदनात, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी संपूर्ण इस्रायलमध्ये "विशेष आणि कायमस्वरूपी आणीबाणीची परिस्थिती" जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे, या हल्ल्यासाठी आपण इस्रायलला सहकार्य केलं असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे.
नुकतंच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ट्रुथ सोशलवर आठ मिनिटांचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी इराणवरील हल्ल्यात अमेरिका सहभागी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
इस्रायली लष्कराने देशभरातील अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले आहेत, जेणेकरून लोक इराणकडून प्रतिहल्ला म्हणून होणाऱ्या कारवाईसाठी तयार राहतील.
भारतीय राजदूतांनी जारी केल्या गाईडलाईन्स
इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्रायल अशा दोन्ही देशातील दूतावासांनी भारतीय नागरिकांसाठी सुरक्षेसाठीच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत.

फोटो स्रोत, X/India in Iran & India in Israel
त्यांनी सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि नेहमीच सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे.
तसेच, मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्सही प्रसिद्ध केलेले आहेत.
इस्रायलवरील हल्ल्यात अमेरिकाही सहभागी
'ट्रुथ सोशल'वर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेने इराणमध्ये 'मोठ्या लष्करी कारवाया' सुरू केल्या आहेत.
इराणवर हल्ला करायचा की नाही याबद्दल अमेरिकेनं अद्याप 'अंतिम निर्णय' घेतलेला नाही, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. परंतु, आण्विक चर्चेदरम्यान त्यांच्या वाटाघाटींच्या भूमिकेवर ते 'खूश नाहीत' असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"आम्ही डील करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. आम्ही बरेच प्रयत्न केले."
पुढे ते म्हणाले की, "आम्ही त्यांचे मिसाईल्स नष्ट करणार आहोत आणि त्यांची मिसाईल इंडस्ट्री जमिनीवर कोसळणार आहे. ती पूर्णपणे नष्ट केली जाईल."
ट्रम्प म्हणाले की, इराण 'आपल्याकडे जे आहे ते देण्यास तयार नाही.'
इराण 'अण्वस्त्रे बाळगू शकत नाही' असंही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डच्या सदस्यांना, सशस्त्र दलांना आणि सर्व पोलिसांना, मी आज रात्री सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची शस्त्रं खाली ठेवावीत आणि पूर्ण प्रतिकारशक्ती एकवटावी. अन्यथा, तुम्हाला निश्चितपणे मृत्यूला सामोरं जावं लागेल. म्हणून, तुमची शस्त्रं खाली ठेवा. तुमच्याशी पूर्ण प्रतिकारशक्तीने योग्य वागणूक केली जाईल, अन्यथा तुम्हाला निश्चितपणे मृत्यूला सामोरं जावं लागेल."
"शेवटी, इराणच्या महान, अभिमानी लोकांना, मी आज या रात्री सांगू इच्छितो की, तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. आश्रय घ्या. तुमचे घर सोडू नका. बाहेर खूप धोकादायक परिस्थिती आहे. सर्वत्र बॉम्ब पडतील. जेव्हा आपण हे संपवू तेव्हा तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुम्हाला घ्यायचे असेल. कदाचित, कित्येक पिढ्यांपासूनची ही तुमची एकमेव संधी असेल."
"अनेक वर्षांपासून, तुम्ही अमेरिकेची मदत मागत आहात, परंतु तुम्हाला ती कधीच मिळाली नाही. मी आज रात्री जे करण्यास तयार आहे ते करण्यास कोणताही राष्ट्राध्यक्ष तयार नव्हता. आता तुमच्याकडे एक राष्ट्राध्यक्ष आहे जो तुम्हाला जे हवं आहे ते देत आहे. तर तुम्ही कसा प्रतिसाद देता ते पाहूया. अमेरिका तुम्हाला प्रचंड ताकदीने आणि विस्मयकारी शक्तीने पाठिंबा देत आहे..."
तेहरानमध्ये तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले - इराणी मीडिया
इराणच्या मीडियानुसार, तेहरानच्या मध्यभागी तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
फार्स न्यूज एजन्सीने वृत्त दिलं आहे की, तेहरानच्या मध्यभागी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
एजन्सीने तेहरानच्या मध्यभागी झालेल्या तीन स्फोटांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

फार्स न्यूज एजन्सीने म्हटलं आहे की, इराणच्या राजधानीतील रिपब्लिक क्षेत्रात अनेक क्षेपणास्त्रे पडल्याचं वृत्त त्यांना मिळालं आहे.
तेहरानच्या उत्तर आणि पूर्वेला स्फोट झाला असल्याचं इराणी माध्यमांनी सांगितलं आहे.
'आयडीएफ'ने केली महत्त्वाची घोषणा
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) नुकतंच केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर बंदी घातली जाईल.
"परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आज (शनिवार) सकाळी 8 वाजल्यापासून होम फ्रंट कमांडच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तात्काळ बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असंही निवेदनात म्हटलेलं आहे.

फोटो स्रोत, Fars
"या बदलांअंतर्गत, देशातील सर्व भागात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शिक्षण, लोकांच्या एकत्र जमण्यावर आणि व्यावसायिक ठिकाणांवर जाऊन काम करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे."
त्यात पुढे म्हटलं आहे की, "सर्वसामान्य लोकांनी अधिकृत होम फ्रंट कमांड चॅनेलवर जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं पाहिजे. संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय आपत्कालीन पोर्टल आणि होम फ्रंट कमांड अॅपवर अपडेट केली जातील."
बीबीसीचे जेरूसलेममधील प्रतिनिधी ह्युगो बाचेगा यांचे विश्लेषण
स्थानिक वेळेनुसार, सकाळी 08.15 वाजता (06:15 GMT) इस्रायलमध्ये सायरन वाजले. त्याद्वारे लोकांना संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धोक्याची सूचना देण्यात आली.
इराणच्या अणुकार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. तसंच पुढील आठवड्यात वाटाघाटी सुरू राहण्याची अपेक्षा असताना इस्रायलचे हे हल्ले झाले आहेत.
इराणने चर्चेत काही सवलतीही दिल्या होत्या. पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, त्याबद्दल फार उत्साही नसल्याचं म्हटलं होतं. याच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून त्यांच्या नेत्यांवर करार स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याची धमकी दिली होती.

फोटो स्रोत, Fars/BBC Persian
2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मध्य पूर्व भागात मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं लष्करी तैनात करण्याचे आदेश दिले. पण या लष्करी कारवाईची गरज का आहे, ते त्यांनी स्पष्ट केलं नाही. दरम्यान, इराणनं हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशावरील धोके दूर करण्यासाठी हा पूर्व प्रतिबंधात्मक हल्ला असल्याचं म्हटलं आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये, इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. तेव्हा 12 दिवस युद्ध चाललं. अखेर अमेरिका इस्रायलबरोबर या संघर्षात सहभागी झाली आणि इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य केलं होतं.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमुळं त्यांच्या देशाला निर्माण झालेल्या धोक्याबद्दल इशारा दिला होता. तसंच फक्त इराणच्या अणुकार्यक्रमावर केंद्रित कराराला विरोधही केला होता.
इराणनं त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा घालण्याबाबत तसेच गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह, इराकमधील मिलिशिया आणि येमेनमधील हुतींसह या प्रदेशातील गटांना पाठिंबा देणे बंद करण्याबाबत चर्चा करण्यास नकार दिला होता. हा प्रकार त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं इराणनं म्हटलं होतं.
याआधीही झालेला संघर्ष
7 ऑक्टोबर 2023 ला झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार म्हणून इस्रायलनं गाझामध्ये हमासविरोधात कारवाई सुरू केली आणि गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला होता.
त्यानंतर येमेनमध्ये हूथी बंडखोरांनी इस्रायलविरोधात पावलं उचलली आणि तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या इस्रायलशी निगडीत जहाजांवर कारवाई सुरू केली.
या हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
त्याशिवाय इस्रायलला विरोध करणाऱ्या हिज्बुल्ला या लेबननमल्या संघटनेचंही इराणशी घनिष्ठ नातं आहे.
याची परिणती म्हणून डिसेंबर 2023 मध्ये इस्रायल आणि इराणमध्येही तणाव वाढला आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले.
23 डिसेंबरला इस्रायलशी संबंधित एका केमीकल टँकरवर भारताच्या वेरावळजवळ हल्ला झाला, ते मिसाईल इराणकडून डागण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला.
जहाजावर भारतीय खलाशी होते, पण कुठली जीवितहानी झाली नाही.
दोनच दिवसांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससचे म्हणजे IRGCचे एक मोठे अधिकारी सय्यद राझी मुसावी यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला
तर 29 डिसेंबरला इराणनं इस्रायलच्या मोसादसाठी गुप्तहेरी केल्याच्या आरोपाप्रकरणी चौघांन मृत्यूदंड ठोठावला.

इराण-इस्रायलचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप
20 जानेवारी 2024 ला IRGCच्या पाच अधिकाऱ्यांवर सीरियाची राजधानी दमासस्कसमध्ये हल्ला झाला, तेव्हा इराणनं इस्रायलकडे बोट दाखवलं होतं.
त्यानंतर 14 फेब्रुवारी 2024 ला इराणच्या एका गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट झाला, तेव्हा एका अधिकाऱ्यानं इस्रायलला दोष दिला होता.
1 एप्रिल 2024 रोजी सीरियाच्या दमास्कस शहरात इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला झाला, तेव्हा त्यामागे इस्रायल इसल्याचा दावा इराणनं केला.
या हल्ल्यात इराणच्या कड्स फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनररल मोहम्मद रझा झाहेदीही होते, ज्यांचा लेबननच्या हिज्बुल्ला संघटनेवरही प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलनं या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यांना इथे एकाचवेळी दोन गोष्टी साधायच्या आहेत - इराणकडून हिज्बुल्लाला होणारा शस्त्रपुरवठा थांबवणं आणि सीरियात इराणचं प्राबल्य कमी करणं.
एक एप्रिलच्या त्याच हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनं दिला होता. त्यानंतर शनिवारी 13 एप्रिलला 'इस्रायलशी निगडीत' एक मालवाहू व्यापारी जहाज होरमुझ सामुद्रधुनीतून जात असताना इराणनं ताब्यात घेतलं.
यादरम्यानच इराण इस्रायलवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याया चर्चेला वेग आला. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडननी त्याविरोधात इराणला इशाराही दिला.
मग 14 एप्रिलला इराणनं इस्रायलवर तीनशे क्षेपणास्त्रं आणि ड्रोन डागली, ज्यातली बहुतांश अस्त्रं पाडण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.
या पूर्ण घटनाक्रमात केवळ इराण आणि इस्रायलच नाही तर इतर देशही गुंतले आहेत. 14 एप्रिलच्या हल्ल्यादरम्यान दागली गेलेली काही क्षेपणास्त्र इराक, सीरिया, येमेनमधल्या इराणसमर्थकांनीही दागली होती. ती पाडण्यात इस्रायलला अमेरिका, युके, फ्रान्सनं मदत केली तर जॉर्डननंही त्यांच्या हवाई हद्दीत आलेली काही प्रोजेक्टाईल्स पाडल्याचं म्हटलं आहे.
दोन्ही देशांतील संघर्षाचा इतिहास
काहींना आश्चर्यही वाटेल, पण एकेकाळी हे दोन देश एकमेकांचे सहयोगी होते. मात्र तीन दशकांपासूनन इराण आणि इस्रायलमध्ये वर्चस्वाची चढाओढ किंवा छुपी लढाई सुरू आहे.
पश्चिम आशियातल्या या दोन स्थानिक महासत्तांच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर लक्षणीय गोष्टी दिसतात.
1948 साली इस्रायलच्या निर्मितीच्या वेळी या दोन्ही देशांमधले संबंध तुलनेनं बरे होते. याचं कारण म्हणजे दोघांच्या आसपास अरब देश आहेत.
इराणला आपली पर्शियन शिया बहुल देश म्हणून ओळख जपायची आहे आणि इस्रायलला त्यांची ज्यूईश ओळख टिकवायची होती आणि दोघांना अरब वर्चस्व मान्य नाही, असं हे चित्र होतं.
त्याशिवाय इराणचे तेव्हाचे राज्यकर्ते शाह मोहम्मद रझा पहलवींचे पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध होते, आणि या देशांचा इस्रायलला पाठिंबा होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळेच तुर्कीनंतर इस्रायलला मान्यता देणारा इराण हा दुसरा मुस्लीम देश बनला. पण इराणच्या राज्यकर्त्यांचा इस्रायलला पाठिंबा असला, तरी तेव्हा देशात मोठ्या प्रमाणात इस्रायलचे विरोधकही होते. त्यांनी इस्रायलच्या स्थापनेला विरोध दर्शवत निदर्शनंही केली होती.
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, त्यानंतर मात्र चित्र बदललं. इराणनं इस्रायलविरोधाची भूमिका घेतली. तिथून दोन्ही देशांमधले संबंध बिघडत गेले.
इराणला आता इस्रायलचं अस्तित्वच मान्य नाही. इराणचे राष्ट्रप्रमुख आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलची कॅन्सरशी तुलना केली होती आणि इस्रायलचं समूळ उच्चाटन व्हायला हवं, असं विधानही केलं होतं.
तरीही 1980 च्या दशकात इराण-इराक युद्धात आणि नंतरही सद्दामविरोधात इस्रायलनं इराणला सामरिक मदतही पुरवली होती असा दावा माजी ब्रिटिश परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांनी केला होता.
त्याशिवाय या दरम्यान इराणकडून इस्रायलला तेलपुरवठाही सुरू होता.
पण हळूहळू दोघांमधली स्पर्धा आणि मतभेद विकोपाला गेले. गेल्या तीस वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये इस्रायल आणि इराणनं एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांत अशा काही घटना घडल्या ज्यांत त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं.
दोघांमध्ये कधीही थेट युद्ध झालेलं नाही. पण छुप्या लढाया सुरू राहिल्या आणि अलीकडे त्या वाढल्या आहेत.गेल्यावर्षी दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यानंतर शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली होती.
ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











