इराण-इस्रायलचे एकमेकांवर हवाई हल्ले; आतापर्यंत कुणाचं किती नुकसान?

फोटो स्रोत, ABIR SULTAN/EPA-EFE/Shutterstock
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशांकडून 13 जून आणि 14 जूनच्या मध्यरात्री एकमेकांवर हवाई हल्ले होत राहिले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं (आयडीएफ) म्हटलं आहे की, ते इराणवर सतत हवाई हल्ले करत आहेत.
आयडीएफने टेलिग्रामवर एक निवेदन पोस्ट केलं आहे. या निवेदनात असं म्हटलं, "इराणकडून निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी इस्रायली हवाई दल सतत हल्ले करत आहे."
त्यांनी जारी केलेल्या निवेदनासोबत एक व्हीडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये हवाई हल्ल्याची दृश्ये पाहता येतात.
इस्रायलवर इराणकडून करण्यात आलेले हे हल्ले म्हणजे आधीच्या हल्ल्यांना दिलेलं प्रत्युत्तर असल्याचं आयडीएफनं म्हटलं.
इस्रायलने इराणी लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आता इराणकडूनही हल्ले करण्यात येत आहेत.
आयडीएफच्या मते, त्या हल्ल्यात तीन इराणी लष्करी कमांडर मारले गेले आहेत.
इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 3 मृत्युमुखी, 21 जण जखमी
इराणच्या हल्ल्यात तीन नागरिकांचे प्राण गेल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलं आहे. याआधी दोन जणांचे प्राण गेल्याचं सांगण्यात येत होतं. इस्रायलच्या विरोधी पक्षाचे नेते येर लॅपिड यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
इस्रायलच्या इमर्जन्सी सर्व्हिसच्या प्रमुख मेगन डेव्हिड अॅडोम (एमडीए) यांनी सांगितलं की, इराणी हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या 21 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे हल्ले इस्रायलच्या मध्यवर्ती किनारी भागात करण्यात आले आहेत.
एमडीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली आहे की, जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. काही लोक गंभीर जखमी आहेत, तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
इराणकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, त्यांनी इस्रायलमधील "लष्करी केंद्र आणि हवाई तळांसह डझनभर ठिकाणांवर" हल्ला केला आहे.
या निवेदनानुसार, इराणने या ऑपरेशनला "ट्रू प्रॉमिस 3" असं नाव दिलं आहे. या ऑपरेशनची अधिक माहिती नंतर दिली जाईल, असंही निवेदनात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANADOLU VIA GETTY IMAGES
दरम्यान, इस्रायली राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेनं म्हटलं आहे की, तेल अवीव महानगर क्षेत्रात किमान पाच लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
याआधी, शुक्रवारी (13 जून) इस्रायलनं इराणवर हल्ला केला होता.
आधी इस्रायलचा प्रतिबंधात्मक हल्ला
शुक्रवारी (13 जून) इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (pre-emptive) हल्ला केला. तसेच इस्रायलमध्ये आपात्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली, अशी माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिली.
त्यांनी या हल्ल्यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध केलं.
त्यांनी या निवेदनात म्हटलं की, इराणवर केलेल्या प्रतिबंधात्मक हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता तात्काळ निर्माण झाली.
नागरी संरक्षण कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी एक विशेष आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्याअंतर्गत संपूर्ण इस्रायलमध्ये गृहरक्षक दलाच्या कार्यक्षेत्रात विशेष आणीबाणीची स्थिती लागू केली जाईल.
इराणची राजधानी तेहरानच्या ईशान्य भागात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती इराणची सरकारी न्यूज एजन्सी नूर न्यूजचा हवाला देत रॉयटर्सने दिली.
स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचंही या वृत्तात म्हटलं.
तेहरानमधील नागरिकांनी स्फोटाचे आवाज ऐकल्याचं बीबीसीच्या पत्रकारानेही म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या हल्ल्यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केले.
त्यांनी म्हटलं, "इस्रायलने 'ऑपरेशन रायझिंग लायन' सुरू केले आहे. इराणकडून इस्रायलच्या अस्तित्त्वाला निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याला थोपवणे हा या कारवाईचा भाग आहे. हा धोका पूर्णपणे दूर करण्यासाठी आवश्यक तेवढे दिवस ही मोहीम सुरू राहील."
"गेल्या काही महिन्यांत इराणने समृद्ध युरेनियमचे शस्त्रीकरण करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. हे रोखलं गेलं नाही, तर इराण लवकरच अण्वस्त्र निर्माण करू शकतो. कदाचित एका वर्षात, कदाचित काही महिन्यांत. हा इस्रायलच्या अस्तित्वावर एक स्पष्ट आणि तात्काळ निर्माण झालेला धोका आहे," असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटलं.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या आयआरजीसीच्या प्रमुखाचा मृत्यू
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे (आयआरजीसी) प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी हुसेन यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेल्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी यांचाही मृत्यू झाला आहे
या हल्ल्यांमध्ये इस्रायलनं इराणच्या अणु कार्यक्रमांशी संबंधित ठिकाणे आणि इतर लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं आहे, असं इराणनं म्हटलं आहे.
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने केल्या सूचना जारी
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे.
दूतावासाने त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर लिहिलं आहे की, "इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिकांना आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे."
दूतावासाने म्हटलं आहे की, "सर्व नागरिकांना अनावश्यक कृती टाळण्याचा आणि दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लक्ष ठेवण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे."
इस्रायली हल्ल्यात इराण रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख हुसेन सलामी, माजी अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख फेरेदून अब्बासी आणि इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष मोहम्मद मेहदी तेहरानची यांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने म्हटलं आहे की त्यांनी इराणच्या अणु आणि लष्करी स्थळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











