अजित पवार विमान अपघात का झाला? प्राथमिक अहवालात आली 'ही' माहिती समोर

अजित पवार अपघात
वाचन वेळ: 6 मिनिटे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर 1 महिन्यानंतर आता डीजीसीएचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

डीजीसीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महिनाभराच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल सादर केला. त्यात अपघाताशी संबंधित प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले.

त्यानुसार, सॅटेलाईट चित्रांमध्ये या परिसरात धुक्याचे विरळ पट्टे दिसून आले. तसेच, विमान झाडाला धडकून नंतर जमिनीवर कोसळले. यात कॉकपिट आणि केबिनचा भाग आगीत जळून खाक झाला. तर, शेपटीचा भाग हा विमानाच्या मुख्य सांगाड्यातील प्रमुख अवशेष म्हणून राहिला.

या अपघातातील दोन्ही फ्लाइट रेकॉर्ड्स (SSFDR आणि SSCVR) सापडले मात्र, उष्णतेमुळे त्याचे नुकसान झाले होते. यातील काही डेटा प्राप्त करण्यात यश आलंय, तर काही डेटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अहवालात सांगण्यात आलेली काही संभाव्य कारणं जाणून घेऊयात -

27 जानेवारीला रात्री 07.30 वाजता कंपनीकडे विमानाची मागणी करण्यात आली. त्यानंतर बारामती विमानतळाकडे या विमानाच्या लॅण्डींगसाठी परवानगी मागितली गेली. रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी ही परवानगी मिळाली.

यासाठी तांत्रिक तपासणी करणारा तंत्रज्ज्ञ मुंबई विमानतळावर सकाळी 5 वाजता तपास करायला आला. त्यावेळी 5000 एलबीएस इंधन भरलं गेलं. आधी ते 2900 इतकं होतं.

अहवालातील महत्वाचे मुद्दे

आतापर्यंतच्या प्राथमिक निष्कर्षांतून समोर आलेली माहिती पुढीलप्रमाणे –

  • हे विमान मुंबई ते बारामती या मार्गावर नॉन-शेड्युल्ड उड्डाण करत असताना अपघातग्रस्त (क्रॅश लँडिंग) झाले. सकाळी सुमारे 8 वाजून 46 मिनिटांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (AAI) ऑपरेशनल कंट्रोल रूमकडून एएआयबीला (AAIB) या घटनेची सूचना प्राप्त झाली.
  • घटनेच्या दिवशी 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि तपास अधिकारी घटनास्थळी रवाना करण्यात आले.
  • घटनास्थळी पाहणी करून पुराव्यांचे संकलन आणि प्राथमिक तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
अजित पवार अपघात

फोटो स्रोत, ANI

  • या घटनेची प्राथमिक माहिती अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाला (NTSB) अधिकृतपणे कळवण्यात आली. हे विमान 16 सप्टेंबर 2021 पर्यंत 'ट्रॅव्हियन फ्लाईट सर्व्हिसेस' या पूर्वीच्या मालकाकडे होते.
  • मुख्य वैमानिकाने उड्डाणापूर्वी 34 तासांची विश्रांती घेतली होती आणि या काळात कोणतेही उड्डाण केले नव्हते.
  • दुसऱ्या वैमानिकाने मागील 7 दिवसांत उड्डाण केले नव्हते. त्यांना एकूण 9 दिवस 15 तासांची विश्रांती मिळाली होती.
  • दोन्ही वैमानिकांना बारामती परिसरातील भौगोलिक परिस्थितीची (Topography) पूर्वकल्पना होती आणि त्यांनी यापूर्वी तिथे उड्डाणे केली होती.

अहवालातून आणखी कोणत्या बाबी समोर आल्या?

  • बारामतीचं 'विमानतळ हे अनकंट्रोल्ड एयरफील्ड' म्हणजे कंट्रोल टॅावर नसलेला विमानतळ आहे. अशा विमानतळावर वैमानिकाला अत्याधुनिक यंत्रणांची मदत उपलब्ध नसते आणि स्वतःच्या भरवशावर विमान उतरवावे लागते.
  • येथे केवळ VFR (दृश्य उड्डाण नियम) अंतर्गत उड्डाणे करण्यास परवानगी आहे. मात्र, येथे नियमितपणे उड्डाण प्रशिक्षण आणि खासगी चार्टर विमानांची वाहतूक सुरू असते.
धावपट्टीचे शेवटचे डांबरीकरण मार्च 2016 मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे धावपट्टीची मार्किंग अस्पष्ट झालेली होती.

फोटो स्रोत, AAIB

फोटो कॅप्शन, धावपट्टीचे शेवटचे डांबरीकरण मार्च 2016 मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे धावपट्टीची मार्किंग अस्पष्ट झालेली होती.
  • बारामती विमानतळावर एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग (ARFF) सुविधांचा अभाव आहे.
  • धावपट्टीचे शेवटचे डांबरीकरण (Re-carpeting) मार्च 2016 मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे धावपट्टीची मार्किंग अस्पष्ट झालेली होती.
  • विमानतळावर कोणतीही हवामान केंद्र (MET) सुविधा उपलब्ध नाही.
  • अपघाताच्या वेळी दृश्यमानता (Visibility) 3000 मीटर असल्याचं सांगण्यात आलं होतं, जे VFR उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या किमान 5000 मीटर मर्यादेपेक्षा खूपच कमी होते.

तपास कुठपर्यंत आला?

  • SSFDR मधील डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण केले जात आहे.
  • ICAO Annex 13 मधील मानकं आणि शिफारसींनुसार नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डच्या (NTSB) मदतीने SSCVR मधील डेटा डाऊनलोड करण्यात येणार आहे.
  • संबंधित कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींचे प्राथमिक जबाब नोंदवण्यात आले असून उपलब्ध पुराव्यांसह त्यांची तपासणी केली जात आहे.
  • पुढील कार्यवाहीसाठी गोळा केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.
  • सखोल तपासणीसाठी विमानाचे अवशेष सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
कॉकपीटचे अवशेष

फोटो स्रोत, AAIB

  • अपघातस्थळी अवशेषांची तपासणी करण्यात आली असून पुढील विश्लेषणासाठी त्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत.
  • विमानाची उड्डाणयोग्यता (Airworthiness), ऑपरेशन्स, उड्डाण सुरक्षा आणि विमानाशी संबंधित सर्व कागदपत्रं पुढील तपासणी आणि विश्लेषणासाठी जप्त करण्यात आली आहेत.
  • ICAO Annex 13 च्या आवश्यकतेनुसार, अमेरिकेच्या NTSB ने या तपासात सहभागी होण्यासाठी आणि मदत करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रतिनिधीसह तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे.
  • इतर संबंधित घटकांकडून (Stakeholders) प्राप्त नोंदी आणि माहितीची सध्या छाननी केली जात आहे.
  • अपघाताशी संबंधित सर्व बाबींची तपासणी करून अपघाताची वस्तुस्थिती, मूळ कारणे आणि अपघातास कारणीभूत ठरलेले घटक स्पष्ट केले जातील.

अहवालात कोणत्या शिफारसी करण्यात आल्या?

आतापर्यंतच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे, विमान सुरक्षेत तातडीने सुधारणा करण्यासाठी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ राबवण्यासाठी अहवालात अंतरिम सुरक्षा शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे -

  • VFR उड्डाणे 'अनकंट्रोल्ड एयरफील्ड' चालवणाऱ्या सर्व ऑपरेटरांना ठरवून दिलेल्या मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याबाबत DGCA ने आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच 'अनकंट्रोल्ड एयरफील्ड' विमानतळ सेवा हाताळणाऱ्या सर्व विमानतळ ऑपरेटर आणि संबंधित संस्थांना, लागू DGCA नियमांमध्ये नमूद केलेल्या निकषांनुसार विद्यमान हवामान स्थिती योग्य असल्यासच उड्डाण संचालनास, त्यात नॉन-शेड्युल्ड, खासगी आणि चार्टर उड्डाणांचा समावेश आहे, परवानगी देण्याबाबत निर्देश द्यावेत.
  • 'अनकंट्रोल्ड एयरफील्ड'चे व्यवस्थापन आणि देखभाल करणाऱ्या सर्व संबंधित घटकांना सुरक्षित विमान संचालनासाठी आवश्यक सुरक्षा मानके विमानतळावर कायम ठेवण्याबाबत DGCA ने स्पष्ट निर्देश द्यावेत. याचे पालन लेखापरीक्षण किंवा देखरेखीच्या वेळी तपासले जावे.
  • या विमानतळांवर प्रशिक्षण उड्डाणांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात नॉन-शेड्युल्ड, चार्टर आणि VIP उड्डाणे होत असल्याने, DGCA ने येथे लँडिंग सहाय्य सुविधा आणि मूलभूत हवामान सेवा सुविधा मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
  • या विमानतळांना सुरक्षित आणि नियमनबद्ध उड्डाण संचालनासाठी परवाना देण्याच्या शक्यतेची DGCA ने तपासणी करावी.

प्राथमिक अहवालावर मंत्री योगेश कदम काय म्हणाले?

अजित पवार यांच्या अपघाताबाबत एअर इंटेलिजन्सच्या प्राथमिक अहवालावर प्रतिक्रिया देताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, "एअर इंटेलिजन्स संदर्भातील जो प्राथमिक अहवाल माध्यमांसमोर आला आहे, तो मी अद्याप अधिकृतरीत्या पाहिलेला नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार, कमी व्हिजिबिलिटी असतानाही लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रक्रियेत नियंत्रण सुटल्याची नोंद प्राथमिक अहवालात असल्याचं समजतं.

तथापि, हा केवळ प्राथमिक अहवाल आहे. संपूर्ण आणि सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. विमान उड्डाण सुरक्षेचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि संबंधित यंत्रणा निश्चितपणे निष्पक्ष तपास करतील, असा माझा विश्वास आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल."

रोहित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध प्रश्न उपस्थित केले होते.

सदर अहवालवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे?

या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील "Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra" हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे." परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल, असंही रोहित पवार म्हणाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, रोहित पवार यांनी, दादांना मुद्दाम खराब विमान दिलं की चुकून दिलं? हा अपघात की घातपात? यामागील सत्य समोर यायला हवं, असं म्हणत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

27 फेब्रुवारी रोडी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "जी माहिती मीडियासमोर, लोकांसमोर मांडली ती सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आज भेट घेण्याचं कारण मी माझा लढा कसा लढतोय हे आहे. हा लढा मी एकटा लढतोय असं नाही. त्यांनी माझ्याकडे सगळे रिसर्च पेपर, जी काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती आणि माझ्याकडून आणखी काही कागदपत्रं मागितली आहेत. ते देशाच्या गृहमंत्र्यांशी चर्चा करतील, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे."

"गुन्हा दाखल होण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी मला सविस्तर उत्तर दिलं. टेक्निकल बाबी समजून घेऊन त्यावर उत्तर देईन, असा शब्द त्यांनी दिला आहे. DGCA बद्द्ल मला शंका आहे. VSR आणि त्यांचं नातं. अपेक्षा करूया काही ना काही मार्ग निघेल. आम्ही आमचा लढा सामाजिकदृष्ट्या लढत आहोत," असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

घटनाक्रम

अजित पवार यांच्यासह पाच जणांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान लियरजेट-45 XR प्रकारचं विमान होतं.

बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला.

या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर पाहणी करताना अधिकारी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर पाहणी करताना अधिकारी

दरम्यान, लियरजेट 45 कुटुंबातली विमानं कॅनेडियन कंपनी बॅाम्बार्डिएरनं तयार केली आहेत. जगभरातील अनेक कंपन्या चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी ही विमानं वापरतात.

मध्यम आकाराचे लियरजेट-45 XR विमान बिझनेस जेट म्हणूनही ओळखले जाते. त्यात दोन हनीवेल TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. या विमानातून एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात.

हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण 2,235 नॉटिकल मैलांपर्यंत, म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)