विज्ञान दिन : 'शनिची कडी, गुरूचे चंद्र पाहून मुलं थक्क होतात', पण खगोलशास्त्राच्या प्रत्यक्ष शिक्षणाचं काय?

फोटो स्रोत, jyotirvidya parisanstha
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"मला विज्ञान आवडतं, पण कळत नाही. त्यामुळे अनेकदा अवघड जातं."
पुणे महापालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या आर्या राऊत या विद्यार्थिनीची ही भावना कदाचित अनेक मुलांच्या मनात असेल.
विज्ञान कसं शिकवलं जातं? हे विचारल्यावर याच शाळेतली अदिती म्हणते, "आम्हांला बऱ्याच वेळा फळ्यावर चित्रं काढून दाखवतात. काही वेळा पुस्तकातली चित्रं असतात"
विज्ञानाचे इतर विषय तर झालेच पण भारतातल्या अनेक शाळांमधली मुलं खगोलशास्त्रसारखा विषयही वर्गात बसूनच शिकत आहेत.
इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( टिआयएफआर) यांनी इंटरनॅशनल अँस्ट्रॉनॉमिकल युनियन्स ऑफिस फॉर अॅस्ट्रॉनॉमी एज्युकेशनच्या माध्यमातून नुकतंच एक सर्वेक्षण केलं.
या सर्वेक्षणानुसार जवळपास 86 टक्के मुलांना खगोलशास्त्रात रस असतो. पण प्रत्यक्षात मात्र यापैकी फक्त 26 टक्के मुलांनाच त्यातल्या संकल्पना समजलेल्या होत्या.
फक्त या मुलांनाच त्याबद्दल सांगता आलं किंवा त्याच्याशी निगडीत दुर्बीण वापरून निरीक्षणं करता येत होती.
पण शिक्षण देण्याची पद्धत हा एक भाग असला तरी, त्यात सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या दरीमुळं पडणारा फरकही मोठा असल्याचं दिसतं.
सर्वेक्षणात काय होतं?
आयुका आणि टिआयएफआर यांच्या वतीने देशतील 10 राज्यांमधल्या शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. जवळपास दोन हजार शाळांतील विविध भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली.
या प्रश्नावलीमध्ये तुम्ही दुर्बीण पाहीली आहे का? तारांगणाला भेट दिली आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
याशिवाय मुलांना संकल्पना किती समजल्या आहेत? यासाठी चंद्राच्या कला नेमक्या कशा दिसतात? गुरू, पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा आकारमानाप्रमाणे क्रम लावा असे प्रश्न होते.
मुलं या सगळ्याकडे कसं पाहतात? हे समजून घेण्यासाठी 'रमेशने राशीभविष्य वाचून प्रवासाला न जाण्याचा निर्णय घेतला.' तुम्ही असं कराल का? अशा प्रकारचे काल्पनिक प्रश्नही विचारले गेले.
या सर्वेक्षणात असं दिसलं की बहुतांश मुलांना या विषयात रस असला तरी त्यांना पुढं जाण्याच्या दृष्टीने यंत्रणा उपलब्ध होत नाहीत.
मुलांमध्ये चंद्राच्या कला, ग्रह ताऱ्यांमधील अंतर या संकल्पनांची समज कमी होती. फक्त एक तृतीयांश मुलांना खगोलशास्त्राच्या दृष्टीकोनातून हे अंतर मांडता आलं.
फक्त 7 टक्के मुलांना चंद्राच्या कलांबाबत नीट सांगता आलं.
फक्त 26 टक्के मुलांनी दुर्बीण पाहिली होती आणि 27 टक्के विद्यार्थ्यांनीच तारांगणाला भेट दिली होती.
यात आर्थिक आणि सामाजिक दरीचा वाटा मोठा असल्याचं दिसून आलं.
ज्या शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध होत्या तिथल्या मुलांना संकल्पना अधिक नीट समजल्या. मात्र जिथं फक्त माहितीच्या आधारे शिकवलं गेलं त्या मुलांमध्ये गोंधळ दिसला.
मात्र जवळपास 86% विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्रात रस असल्याचं सांगितलं. तर 70 % विद्यार्थ्यांनी भविष्यात अभ्यासाचा विषय म्हणून खगोलशास्त्राची निवड करायला आवडेल असं मत नोंदवलं. यासाठीचे मार्ग मात्र त्यांना माहिती नव्हते.
यात असंही दिसलं की विद्यार्थी चंद्राच्या कलांचा भारतीय सांस्कृतिक सण आणि परंपरांशी संबंध जोडतात. मात्र त्यामागे असलेल्या विज्ञानाची त्यांना जाणीव नव्हती.

फोटो स्रोत, jyotirvidya parisanstha
याविषयी बोलताना सर्वेक्षणाच्या प्रमुख मोपिया माजी म्हणाल्या की, "आम्ही जेव्हा संकलित झालेली माहिती तपासली तेव्हा लक्षात आलं की मुलांना या विषयात रस आहे. मात्र त्यांना असलेल्या माहितीत मोठी दरी आहे.
काही विषय शाळेत समाविष्ट केले जातात. मात्र त्याची कल्पना करणं ते कसं दिसत असेल? याचा विचार करणं मुलांना अवघड जातं. मॉडेल असेल तर मुलांना सहज समजतं. प्रत्यक्षात पाहायला मिळालं तर आणखी सोपं होतं"
आर्थिक आणि सामाजिक दरीचा परिणाम नेमका कसा दिसतो? हे मांडताना इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन्स ऑफिस फॉर अॅस्ट्रॉनॉमी एज्युकेशनचे मॅनेजर आणि संशोधक अनिकेत सुळे म्हणाले की, "आम्ही शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग करू असा विचार केला होता. मात्र त्यात शहरीमध्ये श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही शाळा येऊ शकतात.
त्यामुळं आर्थिक दृष्ट्या सुस्थितीतली आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असे भाग केले. आर्थिक दुर्बल शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांचं प्रशिक्षण होत नाही. तसंच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, साहित्य मिळत नाही. घरातूनही तसं पाठबळ नसतं. आर्थिक सुस्थितीतल्या शाळांमध्ये तुलनेनी ही परिस्थिती बरी होती.
शासनाकडून शाळांना दुर्बीण देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये त्यांचा वापरच होत नाही. त्यासाठी मुळात शिक्षकांनाही खगोलशास्त्रात आवड असायला हवी."
का निर्माण होते दरी?
खगोलशास्त्र वर्गात कसं शिकवलं जातं? याबाबतही सर्वेक्षणात माहिती घेण्यात आली.
त्याबाबत बोलताना पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेचा विद्यार्थी प्रदीप मादल म्हणाला की, "आम्हाला व्हीडिओ दाखवतात. त्यावरून आम्ही समजून घेतो. महत्वाचे मुद्दे लिहून घेतो. दुसऱ्या दिवशी त्या मुद्द्यांबद्दल वर्गात विचारलं जातं".
दुर्बीण आहे, पण तिचा वापर कसा करायचा याचं ज्ञान शिक्षकांना नसल्याचं मुख्याध्यापिका एलिझाबेथ अवचिते म्हणाल्या. तरीही काही लोकांच्या मदतीने मुलांना आकाश दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.
नेमकी अडचण सांगताना त्या म्हणाल्या की, "शिक्षक टिचिंग एड वापरतात. तसंच शाळेत प्रोजेक्टरही लागले आहेत. त्यामुळं मुलांना ते पाहायला मिळतं. मात्र प्रत्यक्षात अनुभव घेणं आणि असं पाहणं यात फरक आहेच.
प्रत्यक्षात पहायला मिळालं तर चंद्र कुठे, सूर्य कुठे असा गोंधळ होणार नाही. तसंच ग्रहण पाहायला मिळालं तर तो अनुभवही त्यांना आयुष्यभर पुरेल.
शासनानं विज्ञानातल्या प्रयोगांसाठी प्रत्येक वर्गांनुसार प्रयोग पेट्याही तयार केल्या असल्याचं या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं.
साहित्य, सुविधांनी फरक पडतो का?
पुण्यातल्या मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये याचं उत्तर काही प्रमाणात मिळालं.
या शाळेतल्या मुलांसाठी शाळेतर्फे अॅस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करण्यात आला आहे. गेली दोन वर्ष या शाळेतील विद्यार्थी सातत्याने आकाशदर्शन करतात.
पुण्यातल्याच ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेकडून मुलांसाठी आकाशदर्शनाचे कार्यक्रम केले जातात. त्यात दुर्बिणीतून आकाश दाखवलं जातंच, पण त्याआधी मुलांना ऑडिओ व्हीज्युअल क्लिप्सच्या माध्यमातून संकल्पनाही समजावल्या जातात.

फोटो स्रोत, jyotirvidya parisanstha
मुलांच्या प्रतिक्रियांबद्दल सांगताना ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, "आम्हांला अनेक शाळांकडून बोलावलं जातं. मुलांनी आकाश प्रत्यक्षात कधीच पाहिलेलं नसतं. चंद्रावरची विवरं बघितलेली नसतात.
फोटो पाहिलेले असतात. पण प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यांना शनिची कडी दिसतात, गुरूचे चंद्र दिसतात तेव्हा ते पाहून मुलं अक्षरश: वेडे होतात.
पहिल्यांदाच पाहणारी मुलं म्हणतात, "अरे हा चंद्रच दिसतोय. मग त्यांना सांगावं लागतं की नाही तो शुक्र आहे. शाळेत वाचलेलं असतं पण ते प्रत्यक्ष दृश्यरुपात दिसतं, तेव्हा मुलांना आवडतं.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा बाली बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, अनेक शिक्षकांनीही याच उपक्रमात पहिल्यांदा आकाशदर्शन केलं.
त्या म्हणाल्या, " मुलं प्रत्यक्षात बघतात आणि शिक्षकांनी शिकवलेलं त्याच्याशी जोडतात तेव्हा त्यांना आणखी रस निर्माण होतो. त्यांची उत्सुकता वाढते."
अभ्यासक्रमात बदलांची गरज
या संशोधनाच्या आधारावर आता अभ्यासक्रमातही बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नेमकं काय केलं पाहीजे हे सांगताना एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती समितीचे सदस्य असणारे प्रा. सुबोध मोरे म्हणाले की, "मुलांचा अनेकदा पाठांतरावर भर असतो. त्यामुळे पाठ्यपुस्तकात लिहिलं आहे ते जसंच्या तसं लक्षात ठेवलं जातं.
उदाहरणार्थ आम्ही प्रश्न विचारला होता की, आपल्यापासून तारे जास्त जवळ आहेत की नेपच्युन. पाठ्यपुस्तकात लिहिलेलं असतं की, नेप्युन हा सर्वात लांबचा ग्रह आहे. मुलं ही संकल्पना विचार करताना लक्षात घेतात तेव्हा त्यांना असं वाटतं की नेपच्युन ताऱ्यांपेक्षाही लांब आहे.
त्यामुळं पाठ्यपुस्तक बनवताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळं आता आम्ही पाठ्यपुस्तकांमध्ये प्रयोगातून उपक्रमातून शिक्षणावर भर देत आहोत.

फोटो स्रोत, jyotirvidya parisanstha
पूर्वीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या पुस्तकांमध्ये अधिक मुद्दे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं अनिकेत सुळेंनी नोंदवलं. मात्र त्याचा उलटा परिणाम दिसत असल्याचंही ते म्हणाले.
सुळेंच्या मते, "मुळात कोणतेही दोन वर्ग एकसारखे नसतात. त्या मुलांना समोर ठेवत विचार व्हायला हवा. मात्र आपण पुस्तक लिहताना किंवा कोर्स डिझाईन करताना काही लसावी घेऊन ते करावं लागतं.
अमेरिकेत खासगी प्रकाशकांना पुस्तकं छापण्याची परवानगी असते. अर्थातच त्याला बोर्डाची मंजुरी घ्यावी लागते. मात्र तरी शाळा गरजांप्रमाणे पुस्तकं घेऊ शकते.
राज्य बोर्डाच्या पुस्तकांमध्ये तुलना केली तर एनसीईआरटी पेक्षा जास्त खगोलशास्त्राच्या गोष्टी होत्या. मात्र त्यात मुलांना शिकवण्याचे तास तेवढेच राहत असल्याने वेळ कमी आणि संकल्पना जास्त अशी परिस्थिती दिसल्याचा माझा अनुभव आहे."
आयुकाची स्थापना करताना डॉ. जयंत नारळीकरांनी मुलं विज्ञानाकडे, खगोलशास्त्राकडे वळावीत आणि त्यांना यात गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने इमारतीची रचना केली होती.
त्यानंतर सुनिताबाई देशपांडेंच्या मदतीने आयुकातच मुक्तांगणही उभारण्यात आलं. तिथे अरविंद गुप्ता अनेक वर्ष खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना विज्ञान सोपं करून सांगत होते.
असेच अनेक उपक्रम राबवले जात आहेत. पण ते तुरळक विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचतात. गरज आहे ती याचा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्याची.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











