सिंधू संस्कृतीचा अंत कसा झाला, नवीन संशोधनात जाणून घ्या यामागचे कारण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अवतार सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सिंधू संस्कृतीचा अंत कसा आणि केव्हा झाला, हे आजही एक गूढच आहे. यावर वेळोवेळी अभ्यास आणि संशोधन होत आलं आहे.
अलीकडील एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, "सिंधू संस्कृतीतील हडप्पा शहराचा ऱ्हास एकाच मोठ्या आपत्तीमुळे झालेला नाही, तर शेकडो वर्षे वारंवार आणि दीर्घकाळ नद्या कोरड्या पडल्यामुळे तो घडून आला होता."
पूर्वी सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाबाबत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. काहींच्या मते ही सभ्यता किंवा संस्कृती युद्धामुळे नष्ट झाली, तर काही अभ्यासकांच्या मते नैसर्गिक आपत्तीमुळे शहरं उद्ध्वस्त झाली असावीत. सिंधू नदीला पूर येऊन तिने आपला मार्ग बदलला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जाते.
आणखी एका सिद्धांतानुसार, त्या काळात घग्गर ही दुसरी नदी कोरडी पडली होती. त्यामुळे तिच्या काठावर राहणारे लोक आपली वस्ती सोडून दुसरीकडे स्थलांतर करू लागले.
हा नवीन शोध आयआयटी गांधीनगरच्या संशोधकांसह आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका पथकाने केला असून, तो 'कम्युनिकेशन्स: अर्थ अँड इनव्हॉर्नमेंट' (नेचर प्रकाशन) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासाचं शीर्षक आहे- 'नदी कोरडी पडल्याच्या दबावामुळे हडप्पा संस्कृतीचं स्वरूप बदललं'.
या संशोधनासानुसार प्राचीन सिंधू संस्कृतीच्या विकासात सिंधू नदी ही मुख्य आधार होती. शेती, व्यापार आणि दळणवळणासाठी तिने पाण्याचा स्थिर स्रोत दिला. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी ही सभ्यता सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर बहरली आणि काळानुसार विकसित होत गेली.
हडप्पा काळात (आजपासून साधारण 4500 ते 3900 वर्षांपूर्वी) सिंधू संस्कृती सुनियोजित शहर रचना, उत्तम जलव्यवस्थापन आणि लेखन कलेसाठी ओळखली जात होती. परंतु, सुमारे 3900 वर्षांपूर्वी या सभ्यतेचा ऱ्हास सुरू झाला आणि कालांतराने ती कोसळली.
ही संस्कृती आजच्या पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या भागात आढळून आली होती.
'दुष्काळावरील संशोधनातून काय समोर आलं?'
हडप्पाच्या सुरुवातीच्या कालखंडावर आधारित या 11 पानांच्या अभ्यासानुसार, सिंधू संस्कृतीला चार मोठ्या दुष्काळांचा सामना करावा लागला होता.
संशोधनानुसार, "हडप्पा संस्कृतीच्या उत्कर्ष आणि अखेरच्या टप्प्यात आलेले चार तीव्र दुष्काळ ओळखले गेले आहेत."
"सुमारे 4445-4358 वर्षांपूर्वी, 4122-4021 वर्षांपूर्वी आणि 3826-3663 वर्षांपूर्वी तीन मोठे दुष्काळ पडले. चौथा दुष्काळ 3531 ते 3418 वर्षांपूर्वी पडला. या तीन दुष्काळांनी संस्कृतीच्या सुमारे 85 टक्के भागावर परिणाम झाला."
"दुसरा आणि तिसरा दुष्काळ अनुक्रमे साधारण 102 आणि 164 वर्षांपर्यंत टिकला."
संशोधन पत्रानुसार, "तिसऱ्या दुष्काळादरम्यान दरवर्षी होणाऱ्या पावसात सुमारे 13 टक्क्यांची घट झाली होती."

फोटो स्रोत, Getty Images
या अभ्यासाचे प्रमुख लेखक हिरेन सोलंकी म्हणाले, "यापूर्वीही अनेक अभ्यास झाले आहेत. ते साइटवर जाऊन तिथून डेटा गोळा करतात, जसं की माती आणि जुन्या झाडांचे नमुने. यामुळे पाऊस कमी होता की जास्त, याची माहिती मिळते आणि गुणवत्ता समजते. पण आम्हाला हेही समजलं की, त्या वेळी पाऊस किती टक्के कमी झाला किंवा दुष्काळ कधी पडला, म्हणजे नेमकं ते कोणतं वर्ष किंवा काळ होता."
पीएचडीचे विद्यार्थी हिरेन सोलंकी यांच्या मते, "सुरुवातीला हडप्पा संस्कृती पश्चिम भागात होती, परंतु दुष्काळ सुरू झाल्यावर ही संस्कृती सिंधू नदीच्या जवळ स्थलांतरित झाली. त्यानंतर मध्य भाग, म्हणजे सिंधू नदीच्या काठावरील प्रदेशातही दुष्काळ पडला. त्यानंतर लोक सौराष्ट्र (गुजरात) आणि हिमालयाच्या इतर खालच्या भागात गेले, जिथे नद्या खाली वाहतात."
शोधनिबंधाचे सह-लेखक प्राध्यापक विमल मिश्रा म्हणाले, "सिंधू संस्कृतीचा नाश किंवा ऱ्हास अचानक झाला, असं पूर्वी अनेक सिद्धांतात मांडण्यात आलं होतं. पण या संशोधनात तसं नव्हतं हे आम्ही दाखवलं आहे. प्रत्यक्षात, दुष्काळांची एक सलग मालिका होती, जी शेकडो वर्षांपर्यंत चालली."
"हा दुष्काळ खूप काळ टिकला. सरासरी एका दुष्काळाचा काळ 85 वर्षांहून अधिक होता. मात्र काही दुष्काळ सरासरी 100 ते 120 वर्षेही चालले."
प्रा. विमल मिश्रा म्हणाले, "पूर्वीचे बहुतेक अभ्यास हे कमी तपशील असलेल्या डेटा (लो रिझोल्यूशन डेटा) आणि गुहा, लेणी इत्यादींच्या अभ्यासावर आधारित होते. आम्ही पहिल्यांदाच नद्यांच्या प्रवाहाचा अभ्यास केला आहे. यामध्ये पाणी मिळण्याच्या ठिकाणांमध्ये कसे बदल झाले आणि त्यानुसार लोकांचे स्थलांतर कसे झाले होते, हे पाहिलं गेलं."
'वाढत्या तापमानामुळे पाण्याची कमतरता'
सिंधू संस्कृतीवरील हे संशोधन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केले गेले आहे. या अभ्यासात वेळेनुसार बदलणाऱ्या हवामानाच्या मॉडेलला जलशास्त्रीय मॉडेलिंगसोबत जोडले (सिम्युलेशन मॉडेल हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग) गेले आहे.
शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की प्रदीर्घ दुष्काळात या भागातील तापमान सुमारे 0.5 डिग्री सेल्सियसने वाढले, ज्यामुळे पाणी टंचाई आणखी गंभीर झाली.

फोटो स्रोत, Getty Images
हिरेन सोलंकी यांच्या मते,"आम्ही पाहिलं की त्या काळात तापमान वाढलं होतं. त्यामुळे हिमनद्या वितळल्या आणि नद्यांना पाणी मिळालं. पाण्याच्या उपलब्धतेमुळे लोकांनी हिमालयाच्या दिशेने स्थलांतर करायला सुरुवात केली. दुसरीकडे, सौराष्ट्रकडे जाण्याचे कारण म्हणजे इतर भागांच्या तुलनेत तिथे थोडा चांगला पाऊस झाला होता. शिवाय, सौराष्ट्रात व्यापाराचं जाळं देखील होतं."
ते म्हणतात, "आम्ही असंही म्हणत नाही की साइट पूर्णपणे नष्ट किंवा गायब झाली, पण लोक हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू लागले."
या अभ्यासानुसार, मान्सूनचा अभाव आणि नद्यांचा प्रवाह कमी झाल्यामुळे शेतीवर वाईट परिणाम झाला. 'लोक गहू आणि बार्लीच्या पिकांऐवजी इतर पिके उगवू लागले.' म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे हडप्पातील लोकांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळावं लागलं.
प्रा. मिश्रा म्हणतात की, हिवाळ्यातील पावसाने हडप्पापूर्व काळ आणि हडप्पा काळाच्या उत्कर्षापर्यंत दुष्काळाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी केला होता. परंतु, हडप्पाच्या उत्तरार्धात हिवाळी पावसाळ्याच्या कमतरतेमुळे मध्य भागात शेतीसाठीचा शेवटचा उपायही संपुष्टात आला होता.
सोलंकी सांगतात, "लोकांनी त्यांची शेती पद्धती बदलण्यास सुरुवात केली आणि बाजरीची शेती करण्याकडे ते वळले. म्हणजेच दुष्काळाला तोंड देऊ शकतील अशा पिकांकडे ते गेले."
ते म्हणतात, "सुरुवातीच्या दुष्काळात लोकांनी अशाच प्रकारची रणनीती वापरली होती. पण जसजसा दुष्काळ वाढला आणि पाणी कमी झालं, तसतसे मोठ्या साइट्स लहान-लहान गावांमध्ये बदलू लागले. म्हणजे लोक छोट्या ठिकाणी स्थायिक झाले."
'प्रशासनाची भूमिका काय होती?'
सिंधू संस्कृती त्या काळातील उत्तम नियोजनासाठी ओळखली जाते.
पण दुष्काळादरम्यान प्रशासनाची काय भूमिका होती?
सोलंकी सांगतात, "सर्वत्र दुष्काळ पडला होता, पण जिथे व्यवस्था चांगली होती, लोक तिथे राहू शकत होते. पण तिसरा आणि चौथा दुष्काळ पडल्यावर लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू लागले."

फोटो स्रोत, Getty Images
हिरेन सोलंकी यांच्या मते, "हडप्पा संस्कृती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी स्थलांतरित झाली, तिचा ऱ्हास किंवा नष्ट होण्याची कारणं काय होती, हे आपण पाहिलं. परंतु, पर्यावरण हे या संस्कृतीच्या ऱ्हासाचं एकमेव कारण नव्हतं. अजूनही अनेक कारणं होती, कारण मधल्या काळातही दुष्काळ पडला होता."
साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपलचे समन्वयक हिमांशू ठक्कर म्हणतात, "हे संशोधन त्या नैसर्गिक घटनेबद्दल भाष्य करतं, ज्यात अनेक दशकांमध्ये चार दुष्काळ पडले होते."
ते म्हणतात, "आज आपलं भूजल, नद्या आणि जंगलं वेगाने नष्ट होत आहेत. त्या काळी जे झालं ते नैसर्गिक होतं, पण आज जे होत आहे ते मानवनिर्मित आहे आणि ते अधिक धोकादायक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











