गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमऐवजी महिलांमध्ये 'या' अॅपचा ट्रेंड वाढतोय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ संपादक, बीबीसी न्यूज
जेव्हा गर्भपात करू इच्छिणाऱ्या काही महिला गर्भनिरोधक गोळ्यांसारख्या 'हार्मोनल' उत्पादनांच्याऐवजी 'नैसर्गिक' फर्टिलिटी ट्रॅकिंग करणाऱ्या अॅपचा (Fertility Tracking App) वापर करत असल्याचं बीबीसीनं वृत्त दिलं, तेव्हा इतर अनेकांनी यासंदर्भातील त्यांचे अनुभव सांगण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला.
या महिलांनी सांगितलेल्या कथनावरुन असं लक्षात येतं की, जीवनशैलीला अनुकूल असलेले आणि मर्यादित किंवा कमी दुष्परिणाम असलेले गर्भनिरोधक उपाय शोधणं किती कठीण असू शकतं.
गर्भनिरोधक पर्यायांचा विचार करता, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, सर्व प्रकारच्या गर्भनिरोधकांचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात.
पॉला बॅरेट्सर नॅशनल हेल्थ सिस्टमशी (NHS) संलग्न असलेल्या 'SH:24' या मोफत लैंगिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या क्लिनिकच्या वैद्यकीय संचालक आहेत.
त्या म्हणतात की, "तुम्ही जेव्हा 18 वर्षांच्या असता तेव्हा जो गर्भनिरोधक पर्याय तुमच्यासाठी योग्य असेल तो पर्याय तुम्ही 28, 38 किंवा 48 वर्षांच्या असताना कदाचित योग्य असणार नाही."
अलीकडे काही महिला वापरत असलेले 'फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅप्स' हा तसा तुलनेनं नवीन पर्याय आहे.


हे अॅप्स ओव्युलेशनचा (ovulation) अंदाज वर्तवण्यासाठी शरीराच्या तापमानासारख्या काही घटकांची नोंद घेतात, जेणेकरून त्या महिलेला हे कळावं की दर महिन्याला ती गर्भवती होण्याची सर्वाधिक शक्यता कधी असेल किंवा मासिक पाळी कधी येईल.
त्यानुसार ती महिला सेक्स टाळू शकते किंवा त्या दिवसांमध्ये जोडीदाराला कंडोमचा वापर करण्यास सांगू शकते.
वेगवेगळ्या पद्धतींची चाचपणी करणं आणि महिलांसमोरील समस्या
डॉ. बरेट्सर म्हणतात की गरोदरपणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांसारखे हार्मोनल उपचारांचा वापर केल्यानंतर काही महिला या अॅप्सचा वापर करू लागल्या आहेत.
"हार्मोन्स घेतल्याचा शरीरावर परिणाम होतो आणि प्रत्येकाच्या शरीरावर त्याचा वेगवेगळा म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो," असं त्या म्हणतात.
"उदाहरणार्थ, इस्ट्रोजेनमुळे अनेकदा मुरुम कमी होतात आणि गर्भनिरोधक गोळी, पॅच किंवा रिंग सारख्या एकत्रित हार्मोनल उपचारांमुळे रक्तस्राव नियंत्रित करण्यास मदत होते."
"तर दुसऱ्या बाजूला काहीजणांना त्यांच्या मूडमध्ये बदल जाणवू शकतो किंवा त्यांच्या सेक्स करण्याच्या इच्छेत (लिबिडो) बदल जाणून शकतात," असं त्या पुढे म्हणाल्या.
ही सर्व प्रक्रिया वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी करत करावी लागू शकते. त्यासाठी तुमच्यासाठी योग्य पद्धत किंवा पर्याय सापडेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो.
कंडोम हा एकमेव गर्भनिरोधक प्रकार आहे ज्यामुळे एकाचवेळी गर्भधारणा रोखली जाऊ शकते आणि लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या बहुतांश संसर्गापासून संरक्षण देखील होतं.
बीबीसीनं महिलांकडून त्यांचे यासंदर्भातील विविध अनुभव ऐकले. त्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी त्यापैकी कोणाचंही नाव किंवा फोटो या लेखात दिलेले नाहीत.
25 वर्षांच्या जॉर्जिया ब्रिस्टॉलच्या आहेत. त्या फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅपचा वापर गेल्या सात महिन्यांपासून करत आहेत.
त्या म्हणतात की त्यांनी गर्भनिरोधक गोळी घेणं बंद केल्यापासून त्यांच्या मानसिक आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. जवळपास एक दशकापासून त्या या गोळ्या घेत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्जिया यांना या गोष्टीची कल्पना आहे की जर त्याचा वापर काळजीपूर्वक करण्यात आला नाही, तर त्यात अनेच्छिक गर्भधारणा होण्याचा धोका आहे.
मात्र त्या म्हणतात, "माझं शरीर जसं आहे तसंच राहू देण्यासाठी हा धोका पत्करण्याची माझी तयारी आहे."
"गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे माझ्या मन:स्थिती किंवा मूडसंदर्भात मला खूप संघर्ष करावा लागला. माझं स्वत:वरील नियंत्रण सुटल्यासारखं वाटायचं. मात्र गर्भनिरोधक गोळ्या घेणं बंद केल्यावर, माझ्या भावना नियंत्रित करण्याची माझी क्षमता, आयुष्याबद्दल आणि स्वत:बद्दल मला काय वाटतं, या गोष्टींबद्दल प्रचंड मला स्वत:मध्ये प्रचंड फरक जाणवला," असं जॉर्जिया म्हणाल्या.
"मी कॉपर आययूडी (Copper IUD) किंवा तांबीचा वापर करून पाहिला. मात्र त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावाला तोंड द्यावं लागत होतं. आधीच मासिक पाळीमध्ये मला अंगावरून जास्त जातं, त्यामुळे त्यात अधिक वाढ होईल अशी पद्धत वापरणं मला चुकीचं वाटलं," असं त्या पुढे म्हणाल्या.
जॉर्जिया म्हणाल्या, "मी प्रदीर्घ काळापासून माझ्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल करते आहे, याची मला जाणीव होती. त्याची मला खूप चिंता वाटत होती आणि मला ते पुढे सुरू ठेवायचं नव्हतं."
"मी एक पर्सनल ट्रेनर आहे. त्यामुळे मी महिलांबरोबर खूप काम करते. यासंदर्भातील संशोधन इथकं जुनं आहे, ही खूप निराशाजनक बाब आहे."
"जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तर ते तुम्हाला कदाचित म्हणतील की 'हे करून पाहा.' मात्र एखादा गर्भनिरोधक उपाय तुमच्या शरीरासाठी योग्य आहे की नाही, हे कळण्यासाठी कधीकधी तुम्हाला काही महिने वाट पाहावी लागू शकते," जॉर्जिया म्हणाल्या.
"आता मी अशा टप्प्यावर आले आहे की माझं शरीर जसं आहे तसंच राहू देण्यासाठी, फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅपचा वापर करण्याचा धोका पत्करण्याची माझी तयारी आहे."
'या परिस्थितीत संभाव्य धोके खूप जास्त आहेत'
39 वर्षांच्या एमिली ग्लासगोच्या आहेत. त्यांनी 2021 मध्ये गर्भपात केला होता. गर्भनिरोधक उपाय म्हणून प्रजनन ट्रॅकिंग अॅपचा वापर करत असताना त्या गर्भवती झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी हा गर्भपात केला होता.
2018 मध्ये त्यांनी गर्भनिरोधक गोळी घेणं बंद केलं. वयाच्या 17 वर्षापासून त्या ती गोळी घेत होत्या. सुरुवातीला मुरुमावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ही गोळी घेत होत्या.
"माझी मन:स्थिती चांगली नव्हती. निराश वाटत होतं. माझं वजन वाढत होतं आणि ते कमी होत नव्हतं. सेक्सच्या इच्छेत घट झाल्यासारखी लक्षणं मला जाणवत होती. त्यामुळे मी काही काळ गोळ्या घेणं थांबवलं. मी त्या गोळ्या सोडताच मला खूपचं बरं वाटलं," असं एमिली म्हणाल्या.
बिगर हॉर्मोनल गर्भनिरोधक पर्याय शोधत असताना आणि तांबी किंवा कॉईल बसवण्याचा अनुभव टाळण्यासाठी, एमिली यांनी त्यांच्या आयफोनवरील हेल्थ अॅपवर मासिक पाळीचं ट्रॅकिंग करणारी सुविधा वापरण्याचं ठरवलं.
2021 मध्ये त्यांना आढळलं की त्या दोन महिन्यांच्या गर्भवती आहेत. चार महिन्यांच्या जोडीदारापासून त्यांना दिवस गेले होते. तो जोडीदारच आता त्यांचा पती आहे.
एमिली म्हणाल्या, "मला युरीन इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे माझं मासिक पाळीचं चक्र थोडंसं बिघडलं होतं. ते मला कळण्यापूर्वी काही महिने निघून गेले होते आणि मला मासिक पाळी आली नाही."
"एकेदिवशी मला बरं वाटत नव्हतं. मला वाटलं की हा कोरोना आहे किंवा मी गरोदर आहे. मी घरी गेले आणि दोन्ही गोष्टींची चाचणी केली. त्यात प्रेग्नन्सी टेस्टमधून हे कळलं की मी गरोदर आहे."
त्या म्हणतात ही गोष्ट माझ्या बॉयफ्रेंडने अतिशय समजूतदारपणे घेतली. त्यांच्या गरोदरापणावेळी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. काही काळानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि आता आनंदात राहत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एमिली म्हणतात, "आम्ही दोघे याबाबत बोललो, यासंदर्भात ऑनलाईन बरंच वाचलं. त्यावेळेस आम्ही एकमेकांना फारसं ओळखत नव्हतो आणि एकत्र राहत नव्हतो. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपलं नातं असंच पुढे जाऊ शकत नाही आणि आपण मूल होऊ देऊ शकत नाही."
मग त्यांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. गर्भपात झाल्यावर एमिली यांनी वेगवेगळे गर्भनिरोधक पर्याय वापरून पाहण्याचं ठरवलं.
" फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅपचा वापर करण्यासाठी मला माहीत आहे की मासिक पाळी नियमितपणे आणि सातत्यानं आली पाहिजे. आता मला पुन्हा तोच धोका पत्करायचा नव्हता," असं त्या म्हणाल्या.
त्यामुळे त्यांनी तांबी म्हणजे कॉपर-टी हा बिगर हार्मोनल पर्याय निवडला.
"मला नेहमीच कंबरदुखीचा त्रास होत होता. मात्र जेव्हापासून तांबीचा पर्याय निवडला तेव्हापासून मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तो त्रास अधिकच वाढला आहे. ओव्युलेशनच्या वेळेस मला वेदना होतात. हे असं व्हायला नको, मात्र ते तसंच आहे," असं त्या म्हणतात.
"मला या गोष्टीचा प्रचंड राग येतो की सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील इतर क्षेत्रात इतकं संशोधन होतं आहे. मात्र अजूनही आपण 50 वर्षांहून जुनी गर्भनिरोधक गोळी वापरतो आणि तांबी लावण्याची ही क्रूर पद्धत वापरतो," असं एमिली म्हणतात.
'महिलांसाठी अधिक चांगले पर्याय'
फ्रेया 26 वर्षांच्या आहेत. मानसिक आरोग्य चांगलं राहतं का हे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी हार्मोनल गर्भनिरोधक पद्धत म्हणजे गोळी बंद केली.
फ्रेया म्हणाल्या, "मी 15 वर्षांची असल्यापासून ही गोळी घेत होते. त्यामुळे मला खरोखरंच त्याशिवाय स्वत:बद्दल माहीत नव्हतं."
"फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅपनं जेव्हा मला गर्भधारणेचा धोका असल्याचं सांगितलं तेव्हा मी कंडोमचा वापर केला."
फ्रेया म्हणाल्या, "तीन महिन्यातंच मी गर्भवती राहिले आणि मग मी गर्भपाताचा निर्णय घेतला. गर्भपात करणं मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय त्रासदायक वाटलं."
"माझ्या नेहमीच्या गर्भनिरोधक पर्यायांऐवजी मी प्रजनन ट्रॅकिंग अॅप वापरत असल्यानं मला असं काही वाटलं की मी कोणालाही सांगू शकत नाही."
त्या पुढे म्हणाल्या की, या अनुभवामुळे पुन्हा नैसर्गिक गर्भनिरोधक पर्याय वापरणं त्या टाळत आहेत कारण "गर्भधारणेचा धोका खूप जास्त आहे."

फोटो स्रोत, Getty Images
41 वर्षांच्या अॅलिस फार्नबोरोच्या आहेत. गर्भनिरोधक गोळ्या वापरल्यामुळे त्यांना दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं. त्यात सेक्सची इच्छा कमी होणं, वजन वाढणं, मूड बदलणं किंवा मन:स्थिती बिघडणं आणि रक्तस्राव या समस्यांचा समावेश आहे.
अॅलिस म्हणतात, "मला एक मुलगी आहे आणि मला तिच्या भविष्याबद्दल वाईट वाटतं."
"गर्भवती न होण्याची जबाबदारी फक्त महिला आणि मुलींनाच काय घ्यावी लागते?"
"बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच तुम्हाला विचारलं जातं की कोणता गर्भनिरोधक पर्याय तुम्हाला हवा आहे."
"सुदैवानं माझ्या पतीला कंडोम वापरण्यात अडचण नाही...आणि आता मी फक्त माझ्या मासिक पाळीचा ट्रॅक ठेवण्यासाठी फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅप वापरते. पण मी त्यावर अवलंबून राहत नाही," असं अॅलिस पुढे सांगतात.
फर्टिलिटी ट्रॅंकिंग अॅपच्या वापराचे फायदे आणि घ्यावी लागणारी काळजी
फर्टिलिटी अॅपबद्दल या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहेत
- युकेमध्ये अनेक फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅप उपलब्ध असतात, मात्र त्यातील फक्त एकच अॅप परवानाधारक आहे.
- भारतात देखील अनेक फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅप उपलब्ध आहेत.
- हे अॅप मासिक पाळीचा ट्रॅक ठेवणाऱ्या अॅप सारखे नसतात आणि तुम्हाला ओव्युलेशन कधी होणार आहे किंवा तुम्ही प्रजजनक्षम कधी असता याचा अंदाज वर्तवण्यासाठी या अॅपचं डिझाइन केलेलं नसतं.
- जर दर महिन्याला तुमची मासिक पाळी सारखी नसेल तर जेव्हा तुम्ही प्रजननक्षम असता तेव्हा तुमच्या मासिक पाळीचे दिवस बदलू शकतात.
- जर तुमची मासिक पाळी खूपच अनियमित असेल तर तुमच्या प्रजननक्षम दिवसांचा अंदाज वर्तवणं अॅपसाठी कठीण ठरू शकतं.
- अॅपची माहिती अधिक विश्वासार्ह होण्यासाठी तुम्ही अॅपनं दिलेल्या सूचनांचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे.
- जर तुम्ही अॅप वापरताना शरीराच्या तापमानाचं निरीक्षण करत असाल तर ते तुम्ही कसं करता हे महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. बॅरेट्सर यांनी याबाबत सांगितलं की, ओव्युलेशननंतर तुमच्या शरीराचं तापमान वाढतं- मात्र ते खूपच कमी प्रमाणात वाढतं.
"तापमानातील हा छोटा फरक लक्षात येण्यासाठी, जेव्हा अॅप तुम्हाला सांगतं तेव्हा तुम्ही शरीराचं तापमान मोजलं पाहिजे. अनेकदा ते दररोज पाहावं लागतं. सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी ते करावं लागतं."
"तसंच तुम्ही काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तापमान मोजावं लागतं. जर तुमची दीनचर्या व्यस्त असेल, जर तुम्ही रात्रीचं काम करत असाल, जर तुमची मुलं लहान असतील तर हे करणं कठीण होऊ शकतं," असं डॉ. बॅरेट्सर म्हणतात.
सतत तापमानाचं निरीक्षण करण्यासाठी नवं तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकतं. स्मार्ट वॉच मनगटाचं तापमान मोजतात. त्यांची यात मदत होऊ शकते, असं त्या म्हणाल्या.
अॅप तुम्हाला सेक्स कधी करायचा आणि कधी करायचा नाही, इतकंच सांगू शकतं. मात्र ते लक्षात ठेवणं आणि त्यावर कृती करणं, तुमच्यावर अवलंबून असतं.
अॅनाटोले मेनन-जोहान्सन, ब्रूकमध्ये क्लिनिकल संचालक आहेत. ब्रूकचे संपूर्ण युकेमध्ये लैंगिक आरोग्य क्लिनिक आहेत. ते म्हणाले, इच्छा नसताना गर्भधारणा होण्याची शक्यता मोजणं खूपच महत्त्वाचं आहे.
त्यांनी सल्ला दिला की, "अशी सेवा किंवा सुविधा शोधा, जे तुमचं ऐकेल आणि तुम्हाला गर्भनिरोधक पद्धती शोधण्यास आणि त्यांचे प्रयोग करण्याची परवानगी देईल."
ते म्हणाले, "कोणती गर्भनिरोधक पद्धती तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, हे समजण्यासाठी काहीवेळा काही प्रयत्न करावे लागतात."
कंपन्या सांगतात की फर्टिलिटी ट्रॅकिंग अॅप योग्यप्रकारे वापरल्यास ते 93 टक्क्यांपर्यंत विश्वासार्ह असू शकतात. याचा अर्थ जर महिलांनी अॅपचा वापर करून वर्षभर त्यांच्या प्रजननचा मागोवा घेतला तर दर 100 महिलांपैकी 7 महिला गर्भवती होतील.
गर्भनिरोधक गोळी आणि मिनी गोळीचा अचूकतेपेक्षा कमी किंवा सामान्य वापर केल्यास जी 91 टक्के विश्वासार्हता आढळून येते, त्यापेक्षा अॅपची विश्वासार्हता थोडाशी चांगली आहे.
गर्भनिरोधक गोळीचा अचूकतेनं वापर केल्यास यशाचा दर 99 टक्क्यांपर्यंत वाढतो. हार्मोन स्त्रवणारी तांबी किंवा शरीरात ठेवण्यात आलेली अशीच एखादी वस्तूप्रमाणेच हे आहे. हे पर्याय वापरणाऱ्या महिलांवर गोळ्या किंवा अॅपप्रमाणे त्याचा वापर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











