इराणवरचा हल्ला ट्रम्प यांची सर्वांत मोठी खेळी ठरणार, की डाव त्यांच्यावरच उलटणार?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प
    • Author, डॅनियल बुश
    • Role, वॉशिंग्टन, प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

इराणवरील हल्ला आणि त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू हा डोनाल्ड ट्रम्प यांनी खेळलेला मोठा डाव म्हणता येऊ शकतो.

अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य वापरुन पश्चिम आशियाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जे आधी साध्य करता आलं नाही ते ट्रम्प साध्य करतील का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

केवळ वायूसेनेचा वापर करत अमेरिकेनं इराणचा अणु-कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केला आणि तेहरानमधील सत्ता बदलली तर या विजयाचं श्रेय ट्रम्प हे पुढील अनेक वर्षांसाठी घेऊ शकतील.

इस्लामिक रिपब्लिकचे भवितव्य काय असेल? याबाबत अमेरिकेकडे एक निश्चित योजना नसली तरीदेखील त्या यशावर ट्रम्प त्यांचा दावा करू शकतात.

पण जर हा लष्करी हल्ला ज्याला पेंटागॉनने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' असं नाव दिलं आहे तो अपयशी ठरला किंवा यामुळे या प्रदेशात अमेरिकेच्या सहभागामुळे संघर्ष पेटला तर ट्रम्प यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

अमेरिकन काँग्रेसवर ( हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह - भारताच्या लोकसभेच्या समकक्ष) नियंत्रण राखायचे असेल तर नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत त्यात रिपब्लिकन पक्षाला चांगली कामगिरी करावी लागेल.

पण अमेरिकेनं सुरू केलेल्या पश्चिम आशियातील या मोहिमेमुळे ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाची संधी हुकण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

ट्रम्प यांना या समर्थकांचा पाठिंबा मिळेल का?

इराणविरोधात लष्करी मोहिमेची घोषणा केल्यानंतर हा निर्णय किती धोकादायक आहे याकडे देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

ट्रम्प म्हणाले, 'या मोहिमेत आपण अमेरिकन हिरो गमावू शकतो.'

'परंतु 1979 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून पश्चिम आशियात अस्थिरता पसरवणाऱ्या व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी ही किंमत मोजणे आवश्यक आहे.'

"गेल्या 47 वर्षात इराणच्या सत्तेनं अमेरिकाच्या ऱ्हासाच्या घोषणा दिल्या."

पुढे ट्रम्प म्हणाले, "ही गोष्ट यापुढे कधीही सहन केली जाणार नाही."

पण आता सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूनंतर इराणचे सरकार काय करेल याकडे जगाचे लक्ष आहे. हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल की, डोनाल्ड ट्रम्प प्रदीर्घ लष्करी मोहीम कशी टाळतील?

ट्रम्प हे त्यांच्या अमेरिकन जनतेला या मोहिमेबाबत पटवून देण्यात यशस्वी ठरतील का? हा देखील प्रश्न आहे.

विशेषतः ट्रम्प यांना मानणारा जो वर्ग आहे (MAGA base - मेक अमेरिका ग्रेट अगेनचा पुरस्कर्ता वर्ग) त्यांचा अमेरिकेच्या इतर राष्ट्रातील हस्तक्षेपांना विरोध असतो. त्या वर्गाचा पाठिंबा पश्चिम आशियातील मोहिमेला मिळेल का?

अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणच्या रस्त्यांवर लोक रडताना दिसले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणच्या रस्त्यांवर लोक रडताना दिसले.

ट्रम्प यांच्यासाठी ही महत्त्वाचा क्षण आहे. ते गेल्याच वर्षी राष्ट्राध्यक्ष म्हणून परतले. त्यांनी हे आश्वासन दिलं होतं की ज्या ठिकाणी तथाकथित 'निरंतर युद्ध' सुरू सुरू आहेत ती थांबवली जातील.

जसं की अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकन सैन्य लढलं. परंतु, ट्रम्प यांनी इराण, व्हेनेझुएला, सीरिया यासारख्या देशांविरोधात नवी लष्करी मोहीम उघडली.

परिस्थिती आटोक्यात राहील की नियंत्रणाबाहेर जाईल?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेनं इराणला अणु-कार्यक्रमाचा त्याग करण्याची सूचना केली होती, त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने हा हल्ला सुरू केला.

त्याचवेळी बॅलिस्टिक मिसाइल्सची निर्मिती थांबवण्यात यावी, हमास आणि हिजबुल्लाह सारख्या गटांना पाठिंबा देण्याचे थांबवावे अशी सूचना देखील अमेरिकेनी देखील केली होती, या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला.

प्रदेशात प्रचंड लष्करी बळ गोळा केल्यानंतर ट्रम्प शुक्रवारी रात्री त्यांच्या फ्लोरिडातील मार-ए-लागो इस्टेटमधून निकटच्या सल्लागारांसह परिस्थितीचा आढावा घेत होते.

उप-राष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गबार्ड आणि इतर उच्च प्रशासकीय अधिकारी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशनरूमधून आढावा घेत होते.

यासंबंधीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील उच्चपदस्थांसोबत कॉन्फरन्स लाइनद्वारे संपर्क ठेवला होता आणि हल्ल्याबाबतची ते माहिती घेत होते.

खामेनींच्या मृत्यूमुळे परिस्थितीचे गांभीर्य फार वाढले आहे पण विश्लेषकांनी इशारा दिलाय की परिस्थिती ट्रम्प यांच्या नियंत्रणाबाहेर देखील जाऊ शकते.

"आता घटना घडून गेली आहे आणि आता इराणमध्ये सत्तेत बदल घडवून आणण्यासाठी अमेरिकेला प्रयत्न करावे लागतील. पण समस्या ही आहे की तुम्ही प्रत्यक्षात फिल्डवर असल्याशिवाय हा बदल घडवून आणू शकत नाही," असं कॅलिफोर्नियातील नेव्हल प्रोस्ट ग्रॅज्युएट स्कूलचे प्राध्यापक मोहम्मद हाफेज यांनी म्हटले.

इराणचे प्रत्युत्तर आणि रणनीती काय असू शकते?

इराणने प्रत्युतर देताना अमेरिकेच्या प्रदेशातील सहकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्यात बहरिन, युनायटेड अरब अमिरात, कतार यांचा समावेश आहे.

यावरून हे लक्षात येतं की, गेल्यावर्षी अमेरिकेनं केलेल्या हल्लाच्या तुलनेत यावेळी इराणने आक्रमक प्रत्तुत्तर दिल्याचे दिसते.

पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर आणि इराकमधील कुर्दिस्तान भागातील अमेरिकन तळांवर इराणच्या जेट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची माहिती इराणची सरकारी माध्यमसंस्था IRNA ने दिली.

फोटो स्रोत, Press TV

फोटो कॅप्शन, पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर आणि इराकमधील कुर्दिस्तान भागातील अमेरिकन तळांवर इराणच्या जेट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची माहिती इराणची सरकारी माध्यमसंस्था IRNA ने दिली.

हाफेज हे इस्लामिस्ट पॉलिटिकल व्हॉयलन्स आणि पश्चिम आशियाच्या राजकारणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

ते सांगतात, इराणची रणनीती अशी असेल की प्रदेशात संघर्षमय स्थिती निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला प्रभावित करावे. ही गोष्ट ट्रम्प यांच्यासाठी चांगली नसेल. ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होऊ शकते, असं हाफेज यांना वाटतं.

जर ही परिस्थिती चिघळली आणि पश्चिम आशियात बराच काळासाठी जर संघर्ष राहिला तर ही याचा परिणाम ट्रम्प यांच्या या प्रदेशासाठी असलेल्या इतर योजनांवर होऊ शकतो.

जसं की इस्रायल-हमास युद्धानंतरची गाझाचा पुनर्निर्माण करणे आणि सौदी अरेबियासोबतचे संबंध बळकट करणे. या गोष्टींवर हा परिणाम होऊ शकतो.

ट्रम्प यांचे काय नुकसान होऊ शकते?

या गोष्टीमुळे ट्रम्प यांचे अमेरिकन समर्थकही त्यांच्यापासून दुरावू शकतात. वाढत्या महागाईमुळे जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि देशातील समस्यांमुळे त्रस्त असलेल्या मतदारांमुळे प्रेसिंडेशिएल अप्रूव्हल रेटिंग प्रभावित झाल्याचे दिसत असताना हे होत आहे. (प्रेसिडेंशिएल अप्रूव्ह रेटिंग हा अमेरिकेत होणारा सर्व्हे आहे ज्यात राष्ट्राध्यक्षाच्या कार्याबद्दल मतदारांकडून प्रातिनिधिक स्वरूपात मूल्यांकन केले जाते.)

काही आठवड्यांपूर्वीच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या लष्करी मोहीमेबाबत चिंता व्यक्त केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील एका उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्याने ही माहिती दिली. संबंधित अधिकारी हे ट्रम्प यांच्या टीमचे निकटवर्तीय आहेत आणि अंतर्गत धोरणांविषयी त्यांना माहिती असते.

ट्रम्प यांनी इराणविरोधात लष्करी कारवाई करण्याचा थेट इशारा दिला आणि 2003 नंतर इराकमध्ये करण्यात आलेल्या आक्रमणानंतर पश्चिम आशियातील सर्वांत मोठ्या अमेरिकन लष्करी बांधणीचे आदेश दिले. त्यानंतर ट्रम्प यांच्या टीममध्ये खासगी स्तरावर मतभेद दिसून आले.

खामेनी यांच्या निवासाची घेण्यात आलेली सॅटेलाईट इमेज

फोटो स्रोत, AIRBUS DS 2026

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या तेहरानमधील घराचं नुकसान दाखवणारा सॅटेलाईट फोटो

अनेक आठवड्यांपासून ज्या मोहिमेबाबत अंदाज व्यक्त करण्यात होता अखेर त्या मोहिमेला ट्रम्प यांनी सुरुवात केली आणि इराणवर हल्ला केला.

शनिवारी ट्रम्प यांनी या मोहिमेबाबत आत्मविश्वास प्रकट केला. पण त्याचवेळी त्यांनी संमिश्र संकेतही दिले. त्यामुळं अमेरिकेचा युद्धाबाबतचा उद्देश काय आहे? यासंबंधी नवे प्रश्न देखील निर्माण झाले.

"हे संपवण्यासाठी मला दीर्घकाळ लागू शकतो किंवा हे दोन तीन दिवसांत देखील संपू शकतं," आणि हल्ल्याचे सावट त्यांच्यावर राहील अशी देखील शक्यता राहू देऊ शकतो, असं ट्रम्प यांनी Axios या वेबसाईटला सांगितले होते.

ट्रम्प यांनी नंतर सोशल मीडियावर म्हटले की "भरपूर आणि अचूक बॉम्ब वर्षाव...सातत्याने, आठवडाभर न थांबता सुरू राहील आणि आवश्यकता असल्यास आणखी देखील."

ट्रम्प यांचं वक्तव्य हे त्यांचा परराष्ट्र धोरणाबाबत असलेली बेफिकिरी दर्शवतं, असं त्यांच्या टीकाकारांना वाटतं. त्याचबरोबर संसदेतील सदस्यांना तसेच जनतेला विश्वासात घेऊन लष्करी मोहीम सुरू करण्याबाबतचा निरुत्साह देखील त्यांच्या या वक्तव्यातून दिसतो.

इराण

फोटो स्रोत, Getty Images

ट्रम्प यांची ही अपारंपरिक शैलीच त्यांच्या यशाचे गमक आहे असं त्यांच्या सहकाऱ्यांना आणि समर्थकांना वाटतं. याचं उदाहरण म्हणजे गाझातील युद्धबंदी आणि नाटोमध्ये त्यांनी युरोपला आर्थिक सहकार्याच्या वृद्धीबाबत दिलेली वचनबद्धता असो.

इराणविरोधात हल्ला करणं हे अमेरिकेच्या जनतेच्या कसं फायद्याचं आहे हे अमेरिकेतील लोकांना विश्वासात घेऊन सांगण्याचं ट्रम्प यांनी अत्यल्प प्रयत्न केले.

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनिअन अ‍ॅड्रेस हे महत्त्वपूर्ण संबोधन केले पण त्यात देखील त्यांनी याबाबत सांगितलं नाही.

काँग्रेसकडून मान्यता घेतल्याशिवाय त्यांनी लष्करी मोहीम सुरू केली. परंतु रिपब्लिकन पक्षाचे नेते या कृतीच्या समर्थनार्थ शनिवारी समोर आले.

"इराण त्यांच्या वाईट कृत्यांचा परिणाम भोगत आहे", असं हाऊस स्पिकर माइक जॉन्सन यांनी निवेदनात म्हटलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने शांतिपूर्ण आणि राजनयिक समाधान मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पण इराणच्या सत्तेनं अण्वस्त्र कार्यक्रमाची महत्त्वकांक्षा आणि त्याचा विकास, दहशतवाद, अमेरिकन लोकांचा बळी घेणे आणि आपल्याही लोकांचा बळी घेणे, हे सारं काही थांबवण्यास नकार दिला.

पण काँग्रेसमधील समन्वयाच्या अभावामुळं डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांचा पारा चढला आणि ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षातील सदस्यांनी देखील इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याला विरोध केला.

ट्रम्प यांना राजकीय आव्हानाचा सामना करावा लागेल का?

'अमेरिकेच्या लोकांना ज्या युद्धात पडण्याची इच्छा नाही त्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन लोकांना खेचत आहेत,' अशा भावना अमेरिकेच्या माजी उप-राष्ट्राध्यक्ष आणि 2024 मधील डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी व्यक्त केल्या.

एक निवेदनातून त्यांनी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की 'ट्रम्प यांच्या युद्धाच्या निवडीमुळे आपल्या सैनिकांना धोकादायक मार्गावर ढकललं जातंय.'

सिनेट मायनॉरिटी लीडर चक शुमर म्हणाले की, 'नेमका काय धोका होता आणि त्याबाबत इतका लवकर निर्णय का घेण्यात आला? याबाबतची महत्त्वाची माहिती काँग्रेस आणि अमेरिकन नागरिकांना ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आली नाही.

'डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानीपणाने घेतलेला आक्रमकपणाचा निर्णय आणि मोठ्या संघर्षाबाबतचा धोका पत्करणे ही योग्य रणनीती नाही,' असं ते म्हणाले.

डेमोक्रेटिक पक्षाकडून ट्रम्प यांच्या निर्णयावर जी तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे त्यावरुन असं दिसतं की ट्रम्प यांना आपल्या देशात कडवट राजकीय आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

एका बाजूला पश्चिम आशियात नवं युद्ध सुरू झालंय तर त्याच वेळी काँग्रेससाठीच्या नोव्हेंबरमध्ये असलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या प्राथमिक फेऱ्यांना देखील सुरुवात झालीये.

काँग्रेस किंवा हाऊस मधील (अमेरिकेच्या कनिष्ट सभागृहातील सदस्य - भारतातील लोकसभेच्या समकक्ष) डेमोक्रॅट्सनी रविवारी सायंकाळी एक बैठक घेतली.

लष्करी कारवाईबाबत आपला प्रतिसाद काय असावा याबाबत ही बैठक होती असे दोन सुत्रांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प

हाऊस मायनॉरिटी लीडर हकीम जेफ्रीज म्हणाले की, ट्रम्प यांच्याकडे असलेल्या इराण युद्धाबाबतच्या अधिकारांवर नियंत्रण यावे यासाठी ठरावावर मतदान घेण्याचा मुद्दा डेमोक्रॅट्स पुन्हा पुढील आठवड्यात उपस्थित करतील.

"एखाद्या देशाच्या नेत्याला अटक करणे सोपे आहे, जसे तुम्ही व्हेनेझुएलाच्या नेत्याबाबत केले. पण त्यानंतर पुढे काय?" एका वरिष्ठ हाऊस डेमोक्रॅटच्या सहायकाने हा प्रश्न उपस्थित केला. "प्रशासनाने आपले धोरण किंवा उद्दिष्ट स्पष्ट केलेले नाही."

दरम्यान, शनिवारी इराणवर हल्ला करण्यापूर्वी ट्रम्प यांनी NBC ला म्हणले होते की "एक वेळ अशी येईल की ते मला विचारतील की देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला कोणता नेता पाहिजे. अर्थात, हे मी थोडं गमतीनं म्हणतोय."

ट्रम्प आपल्या उर्वरित कार्यकाळात काय साध्य करू शकतात हे ठरवण्याच्या दृष्टीने नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुका महत्त्वाच्या ठरतील.

पण पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांच्या अनुभवावरून पाहता, पश्चिम आशियात मोठी लष्करी कारवाई करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या राजकीय वारशावर अधिक प्रभाव टाकणारा ठरू शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)