इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर कराचीत अमेरिकेच्या दुतावासाबाहेर हिंसक आंदोलन, 9 जणांचा मृत्यू; पाकिस्तानात नेमकं काय सुरू?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातील कराची येथे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसले. आंदोलकांनी इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये अमेरिकन दुतावासाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 मृतदेह आणि 32 जखमींना आणले गेल्याची माहिती एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने बीबीसीला दिली.
याचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल व्हीडिओमध्ये काही लोक अमेरिकेच्या दूतावासाचे गेट तोडताना आणि रिसेप्शनजवळील सुरक्षा कक्षाच्या खिडक्या फोडताना दिसत आहेत.
मजलिस-ए-वहदत मुस्लिमीनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, हे एक सार्वजनिक आंदोलन होते. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर लोक अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर जमले होते.
त्यांनी दावा केला की, वाणिज्य दूतावासाच्या आतून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला.
कराची व्यतिरिक्त, इस्लामाबादमध्येही निदर्शने झाली. पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले.
पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांनी कराचीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून या घटनेबाबतचा अहवाल मागितला आहे.
ते म्हणाले, "कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल."
संवेदनशील स्थळांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
वृत्तसंस्था एएफपीच्या पत्रकारानुसार, रविवारी (1 मार्च) शेकडो इराणसमर्थक आंदोलनकर्त्यांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर आंदोलन केलं.
तरुणांचा एक जमाव मुख्य गेटवर चढला आणि दूतावास इमारतीच्या ड्राइव्हवेपर्यंत पोहोचला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हीडिओ पाहायला मिळाले. शेअर होत असलेल्या या व्हीडिओंमध्ये काही युवक दूतावासाच्या मुख्य इमारतीच्या खिडक्या फोडताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काटेरी तारांनी वेढलेल्या या परिसरात अमेरिकन ध्वज फडकताना दिसत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयालाही लावली आग
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन झाले. इराणच्या समर्थनार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पत्रकार मुहम्मद झुबेर खान यांनी बीबीसी उर्दूसोबत बोलताना सांगितलं की, स्कार्दू भागात हिंसक निदर्शनं झाली असून संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाला आग लावण्यात आली आहे.
गिलगिट आणि स्कार्दूमध्ये आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले.
स्कार्दूमध्ये एसपी हाऊस, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आणि संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाची तोडफोड करून आग लावण्यात आली.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात आंदोलनं होत आहेत.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी लोकांना कायदा हातात न घेण्याचे आणि शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
त्यांनी म्हटलं, "इराणमधील लोक ज्याप्रमाणे दुःखात बुडाले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानचा प्रत्येक नागरिक अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर शोकाकुल आहे."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
तर, पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने "कराची आणि लाहोरमधील अमेरिकन दूतावासाबाहेरील आंदोलकांवर आपण लक्ष ठेवून आहोत" असं म्हटलं. पेशावर आणि इस्लामाबाद येथील परिस्थितीवरही लक्ष ठेवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांनी स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अमेरिकन वाणिज्य दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केली. त्यात म्हटलं, "सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अत्यंत सावधगिरीचा उपाय म्हणून कराचीतील अमेरिकन कॉन्सुलेट जनरलने अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर सोमवारी, (2 मार्च 2026) सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्बंध घातले आहेत."
"आम्ही अमेरिकन नागरिकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वाढीव सुरक्षा उपायांचा वापर करण्याची आठवण करून देतो."
इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही आंदोलनं
इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेड झोनकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
इस्लामाबादमधील बीबीसी उर्दू प्रतिनिधी शहजाद मलिक यांच्या माहितीनुसार, आंदोलनकर्ते आबपारा चौकात जमले आणि त्यांनी अमेरिकन दूतावासाकडे कूच सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान एका खासगी वृत्तवाहिनीच्या ओबी व्हॅनवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी त्या वाहिनीच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली.

एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी उर्दूला सांगितलं की, इस्लामाबादच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तीन-स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एफसी आणि रेंजर्सही पोलिसांना मदत करण्यासाठी उपस्थित आहेत.
काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याच्या बातम्याही आहेत.
या दगडफेकीत 4 पोलीस अधिकारी जखमी झाले, तर हिंसाचारात एका पत्रकारालाही दुखापत झाली आहे.
खामेनी यांचा मृत्यू
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूचा दावा केला होता. त्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीनंही याला दुजोरा दिला.
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे. त्यानंतर रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता.
खामेनी हे इतिहासातील सर्वात वाईट व्यक्ती होते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूनंतर म्हटलं आहे.
इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही ठिकाणी लोकांनी रस्त्यांवर आनंद साजरा केल्याचंही पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 200 लोक मारले गेल्याचं वृत्त आहे.
बीबीसीच्या सहयोगी सीबीएसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
इराणच्या शेवटच्या शाह (राजा) यांचे निर्वासित सुपुत्र रझा पहलवी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या दाव्याचं स्वागत केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"हजारो इराणी लोकांना मारणारे खामेनी आता इतिहासाचा एक भाग बनलेले आहेत," असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
1979 च्या क्रांतीनंतर रझा पहलवी आपल्या कुटुंबासह देश सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संलग्न असलेल्या फार्स न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू या हल्ल्यात ठार झाले आहेत.
फार्सनं असंही वृत्त दिलं आहे की, "या हल्ल्यांमध्ये खामेनी यांच्या एका सुनेचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे."
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे. रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.
इस्रायल-अमेरिका हल्ल्यात खामेनींशिवाय आणखी कोण मारले गेले?
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले आहेत. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातवाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले.
एका गुप्तचर सुत्राने आणि एका लष्करी सुत्राने सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसा या हल्ल्यांत इराणच्या सुमारे 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
खामेनीशिवाय इराणचे लष्करप्रमुख अब्दुल रहीम मौसावी आणि संरक्षण मंत्री मेजर जनरल अझीझ नासिरजादेह यांचाही हवाई हल्ल्यात मृत्यू झाला.
इराणमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दुलरहीम मौसावी हे हवाई हल्ल्यांत मारले गेले. तसेच, संरक्षणमंत्री मेजर जनरल अजीज नासिरजादेह, सुप्रीम डिफेन्स कौन्सिलचे अध्यक्ष अली शमखानी यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला.
इराणने या हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्ड्स कमांडर जनरल मोहम्मद पाकपो यांचासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
रशिया-चीननं दिली 'ही' प्रतिक्रिया
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर आणि अमेरिका-इस्रायलने चीनवर केलेल्या हल्ल्यांवर चीनने निवेदन प्रसिद्ध केले आहे. ही मोहीम चीनने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्दिष्टांविरोधात असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, 'इराणचे सर्वोच्च नेत्यावरील हल्ला आणि त्यांची हत्या, इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या मूल्यांचे गंभीर उल्लंघन आहे. हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरची उद्दिष्टे आणि मूल्यांविरोधात आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांविरोधात आहे. चीन या हल्ल्याचा तीव्र विरोध आणि निषेध करतो.'

फोटो स्रोत, Getty Images
चीनने शांतता प्रस्थापित करण्याची अपील केली आहे. चीनने म्हटले आहे की तत्काळ लष्करी कारवाई रोखण्यात यावी. तणावपूर्ण स्थितीला आणखी चिघळू न देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. त्याचवेळी पश्चिम आशिया आणि पूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.
याआधी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचा मृत्यू म्हणजे मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात एक हत्या असल्याचे म्हटले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











