राजेशाहीचा अंत, धर्मगुरूंचा उदय : पहलवी वंशानंतर खोमेनी ते अली खामेनी काळात इराण कसा बदलला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
1977 साली नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तेहरानमध्ये झालेल्या एका सरकारी समारंभात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी इराणच्या शाहांना या भागातील 'स्थैर्याचे बेट' (आयलंड ऑफ स्टॅबिलिटी) असं म्हटलं होतं.
इतकंच नाही, तर जिमी कार्टर यांनी शाहांच्या बुद्धिमत्तेची, शहाणपणाची, संवेदनशीलतेची भरभरून प्रशंसा केली होती.
त्या काळात इराणमधील घटनांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांना शाहांची ही स्तुती केवळ अनावश्यकच वाटली नाही, तर ती त्यांना खटकणारीही होती.
कारण त्यांच्या मते शाह हे एक मोठे हुकूमशहा होते आणि राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी अमानवी डावपेच वापरण्यात त्यांना कोणताही संकोच वाटत नव्हता.

फोटो स्रोत, ATLANTIC BOOKS
इतिहासकार इरवांड अब्राहामियन यांनी 'बिटविन टू रिव्होल्यूशन्स' या आपल्या पुस्तकात लिहिलं, "तेहरानमध्ये सीआयएचे एजंट कर्मिट रूझवेल्ट यांच्या मदतीमुळे रझा शाह पहलवी इराणच्या गादीवर आले होते."
ते पुढे सांगतात, "पहलवी यांचे वडील 1925 साली एका बंडानंतर सत्तेत आले. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते उघडपणे नाझी जर्मनीकडे झुकू लागल्यामुळे ब्रिटन आणि सोव्हिएत संघानं त्यांना सत्तेतून बेदखल केलं होतं."
"दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांचे इराणवर नियंत्रण होते. त्यांनी इराणच्या तेलाचा उपयोग हिटलरविरुद्धच्या लढाईसाठी केला होता."
रझा पहलवी यांना वडिलांकडून मिळाली सत्ता
तरुण पहलवी यांना त्यांच्या वडिलांकडून सत्ता देण्यात आली, कारण इराण हा एक स्वतंत्र देश आहे, हे जगाला दाखवणं महत्त्वाचं होतं.
स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतलेले रझा शाह पहलवी आपला वेळ श्रीमंत आणि फॅशनेबल जीवन जगणाऱ्या प्लेबॉयसारखं घालवत असत.
त्यांना सत्ता देण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे पाश्चात्य देशांना इराणचं तेल हवं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारचे नाममात्र प्रमुख असूनही शाह यांनी आपल्या देशाच्या तेलातून होणारा अर्धा नफा स्वतःकडे ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. असं केल्यास देश समृद्ध होईल आणि संभाव्य राजकीय आंदोलनांसाठी पार्श्वभूमी तयार होणार नाही, असा त्यांचा हेतू होता.
परंतु, शक्तिशाली अँग्लो-इराणी तेल कंपनीने तो प्रस्ताव साफ फेटाळून लावला होता.
मोसादेग यांची इराणच्या पंतप्रधानपदी निवड
यानंतर संतप्त इराणी लोक करिष्माई इराणी नेते मोहम्मद मोसादेग यांच्या मागे उभा राहिले. मोसादेग हे पहलवी घराण्याच्या सत्तेच्या आधी सुमारे 200 वर्षे इराणवर राज्य करणाऱ्या कुटुंबातून आले होते.
मार्क बाउडेन त्यांचं पुस्तक 'गेस्ट ऑफ द अयातुल्ला' मध्ये लिहितात, "मोसादेग यांनी सत्ता हाती येताच असं काम केलं, जे शाह कधीही करू शकले नसते. त्यांनी संपूर्ण तेल उद्योगाचं राष्ट्रीयीकरण केलं. त्यांच्या या निर्णयाची देशात खूप प्रशंसा झाली."
टाइम मॅगझीनने मोसादेग यांना 'मॅन ऑफ द इअर' घोषित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
संयुक्त राष्ट्रात दिलेल्या भाषणात मोसादेग म्हणाले, 'इराणची माती, नद्या आणि पर्वतांसारखंच तेलही इराणी लोकांची मालमत्ता आहे.'
मार्क बाउडेन लिहितात, "अँग्लो-इराणी तेल कंपनीला आर्थिक नुकसान होत होते, तसेच अमेरिकेला भीती होती की मोसादेग समाजवादी विचारांमुळे सोव्हिएतच्या प्रभावाखाली येतील."
"त्यामुळे मोसादेग यांच्याविरोधात बंडखोरीला प्रोत्साहन दिलं गेलं. यामागे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल होते."
शाह तेहरानला परतले
सीआयए एजंट रूझवेल्टने मोसादेग यांच्याविरुद्ध इराणमधील वृत्तपत्रांमध्ये खोट्या बातम्या प्रकाशित केल्या आणि रस्त्यांवर आंदोलनांचं आयोजन केलं.
त्यावरून लष्करी अधिकाऱ्यांनी मोसादेग यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक केली.
तीन वर्षे तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यातच 1967 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
लष्करी बंडाच्या काळात शाह आपल्या पत्नीबरोबर रोमला पळून गेले. परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांनी परत येऊन पुन्हा सत्ता हाती घेतली.
अमेरिकेने शाहांना पूर्ण पाठिंबा दिला. कम्युनिस्टांना रोखण्यासाठी आणि तेलाचा पुरवठा निश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता.
शाह यांनी आपल्या देशवासीयांना आपल्या हयातीत इराणला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पाश्चात्य देशांच्या बरोबरीने उभा करू, असं आश्वासन दिलं.
'अमेरिकेचं बाहुलं'
शाह यांनी आपलं आश्वासन बऱ्याच अंशी पूर्ण केलं.
स्टीफन किंझर हे त्यांचं पुस्तक 'ऑल द शाहज मेन' मध्ये लिहितात, "शाहच्या सत्ताकाळात इराणमध्ये समृद्धी आली, महिलांचं सशक्तीकरण झालं आणि त्यांनी देशाला कुराणच्या शिकवणीपासून दूर नेलं."
"अमेरिकेच्या मदतीमुळे ते अहंकारी सम्राट बनले. त्यांना विरोधकांना दडपण्यात, चिरडण्यात अभिमान वाटू लागला. त्यांनी असं सैन्यदल तयार केलं जे संख्येनं आणि आधुनिकतेने इस्रायलला टक्कर देऊ शकत होतं."

फोटो स्रोत, ECHO
किंझर लिहितात, "परंतु, दुसरीकडे शाह यांनी अब्जावधी डॉलर अशा आर्थिक योजनेत वाया घालवले ज्यांचा काही उपयोग नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की, इराणची बहुतांश जनता गरीब राहिली. 1970 च्या दशकात इराणचे 40 टक्के लोक कुपोषणाचे बळी ठरले."
तेलातून मिळालेली संपत्ती शहरांमध्ये राहणाऱ्या शिक्षित आणि पाश्चात्य जीवनशैली स्वीकारणाऱ्या लोकांना आवडली, परंतु श्रीमंत आणि गरीब इराणींमधील आर्थिक दरी वाढत गेली.
शाहांच्या राजवटीचं 20 वं वर्ष येईपर्यंत त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली आणि त्यांना 'अमेरिकेचं बाहुलं' म्हटलं जाऊ लागलं.
इराणी लोक शाहंविरोधात
1970 च्या दशकाच्या मधल्या काळात शाहंविरुद्ध रस्त्यावर सुरू झालेली आंदोलनाची मालिका थांबलीच नाही.
1978 पर्यंत शाहांची सत्ता डगमगू लागली होती. तरीही बाहेरील जगाला असं वाटत होतं की, शाह हे संकट पार करतील, पण 1979 ची इस्लामिक क्रांती झाली आणि धार्मिकदृष्ट्या संघटित शक्ती सत्तेवर आली.

फोटो स्रोत, Getty Images
मार्क बाउडेन लिहितात, "बाहेरील जगाला लक्षात आलं नाही की, इराणमध्ये पारंपरिक इस्लाम पुन्हा उदयास येतो आहे आणि तो आधुनिक व धर्मनिरपेक्ष मूल्यांविरुद्ध बंड करण्याच्या तयारीत आहे."
"कॉलेज परिसरात आणि शाहांच्या लष्करी नोकरशाहीतही बदलाला पाठिंबा वाढत होता, पण पुढे काय करावं यावर मौलवी आणि समाजातील इतर लोक सहमत होऊ शकले नाहीत."
16 जानेवारीला शाह यांनी इजिप्तला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्याबद्दल कोणालाही वाईट वाटलं नाही.
अयातुल्ला खोमेनी पॅरिसहून तेहरानला आले
शाह यांनी इराण सोडताच, फ्रान्समध्ये निर्वासित जीवन जगणारे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी आपल्या देशात परतण्याचा निर्णय घेतला.
1 फेब्रुवारी 1979 रोजी रात्री 1 वाजता खास चार्टर केलेल्या बोइंग 747 विमानाने तेहरानसाठी उड्डाण केले. त्यात होते शाहांचे कट्टर विरोधक आणि 16 वर्षे निर्वासित असलेले अयातुल्ला रोहिल्ला खोमेनी.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सिम्पसन हे विमानात बसलेल्या 168 प्रवाशांपैकी एक होते. त्यांनी आपलं आत्मचरित्र 'न्यूज फ्रॉम नो मॅन्स लँड'मध्ये लिहिलं, "खोमेनींसोबत तेहरानला जाणं हा एक भयानक अनुभव होता. इराणचं हवाई दल आमचं विमान पाडेल, अशी खात्री आमच्यासोबत असलेल्या प्रवाशांना होती."
"फ्लाइटमध्ये आम्ही काही मिनिटांसाठी खोमेनींशी बोललो. ते फारसं बोलणारे नव्हते. जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारायचो, तेव्हा ते विमानाच्या खिडकी बाहेर पाहायचे."
अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व
खोमेनी जेव्हा तेहरानला पोहोचले, तेव्हा लाखो लोक त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर आले होते. इराणच्या राजेशाही ऐवजी आता इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन झाले होते.
खोमेनी यांना सर्वोच्च नेता (सुप्रीम लीडर) बनवण्यात आलं आणि त्यांनी इस्लामिक नियमांनुसार इराणवर राज्य करण्यास सुरुवात केली.
खोमेनी यांनी अमेरिकेला 'मोठा सैतान' म्हणत त्यांच्यावर टीका केली आणि इस्रायलला पॅलेस्टिनी भूमीवर अवैध ताबा घेणारे म्हटलं.
खोमेनी यांनी सर्वोच्च नेतेपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या विद्यार्थी समर्थकांनी तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर कब्जा करून 66 अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या शाह यांना 'त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा' मिळावी यासाठी त्यांना इराणला परत पाठवण्याची त्यांनी मागणी केली होती.
अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व हा इराणच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला.
1979 ची इस्लामिक क्रांती होऊन जास्त दिवस झाले नव्हते, तोपर्यंत सद्दाम हुसेनच्या नेतृत्वाखालील इराकने इराणवर हल्ला केला.
हे युद्ध सुमारे 9 वर्षे चालले. काही काळातच लोकांचा खोमेनींवर असलेला विश्वास कमी होऊ लागला.
कॉन कॉपलिन यांनी त्यांचं पुस्तक 'खोमेनीज घोस्ट'मध्ये एका लोकशाही समर्थक कार्यकर्त्याचा हवाला देत म्हटलं, "मला वाटत होतं की, खोमेनी इराणमध्ये लोकशाही आणतील. पण आता आम्हाला समजलं की, आम्ही एका हुकूमशहाच्या जागी दुसरा हुकूमशहा आणला आहे."
सलमान रश्दीविरोधात फतवा
भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांनी 1989 मध्ये 'सॅटनिक व्हर्सेस' हे पुस्तक लिहिले, तेव्हा जगभरातील मुसलमानांनी त्याला जोरदार विरोध केला.
14 फेब्रुवारी 1989 रोजी अयातुल्ला खोमेनी यांनी एक फतवा काढला, 'हे पुस्तक इस्लाम, पैगंबर मोहम्मद आणि कुराणच्या विरोधात आहे. या पुस्तकाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीस मी मृत्यूची शिक्षा देतो. मी जगभरातील मुसलमानांना आवाहन करतो की, हे लोक जिथे सापडतील तिथे त्यांना ठार करा.'

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या एका संस्थेनं सलमान रश्दींच्या डोक्यावर 2 कोटी 60 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. संतप्त जमावाने ब्रिटन, इटली आणि अमेरिकेतील 'सॅटनिक व्हर्सेस' विकत असलेल्या सर्व पुस्तकांच्या दुकानांवर हल्ले केले. यानंतर अनेक युरोपियन देशांनी तेहरानमधून आपले राजदूत परत बोलावले.
खोमेनींनंतर खामेनी झाले सर्वोच्च नेते
जसजसं खोमेनींचं वय होऊ लागलं तसतसं त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नावाचा विचार होऊ लागला. यासाठी खोमेनी यांनी इस्लामिक क्रांतीचे मोठे समर्थक आणि त्यांचे अनुयायी अयातुल्ला मोहम्मद मोंतझारी यांची निवड केली.
खोमेनी मोंतझारी त्यांच्या धार्मिक ज्ञानाबद्दल त्यांचा आदर करत असले, तरी देशाचं नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांना शंका वाटू लागली.
कॉन कॉफलिन लिहितात, "मार्च 1989 मध्ये खोमेनी यांनी मोंतझारींना एक मोठं पत्र लिहिले आणि आरोप केले की, ते इराणच्या लोकांना उदारमतवाद्यांच्या ताब्यात देत आहेत."
"मोंतझारींनी या पत्राला अवघ्या 5 ओळींमध्ये उत्तर दिलं आणि जाहीर केलं की, ते खोमेनींचा उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेतून माघार घेत आहेत. ते पूर्वीपासूनच हे पद मिळवण्यास इच्छुक नव्हते. यानंतर खोमेनी यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्या काळचे राष्ट्राध्यक्ष अली खामेनी यांची निवड केली."

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या धार्मिक अधिकारांबाबतीत खामेनी हे खूप कनिष्ठ होते आणि त्यांना सर्वोच्च धार्मिक पदासाठी योग्य समजलं जावं, इतका त्यांचा अनुभवही नव्हता.
आपली ढासळणारी प्रकृती पाहून खोमेनी यांनी संसदची विशेष बैठक बोलावली. या बैठकीत घटना दुरुस्ती करून खामेनी यांना आपला उत्तराधिकारी बनवण्याचा मार्ग मोकळा केला.
पण यापूर्वी खोमेनी यांनी खात्री केली की, त्यांच्या मृत्यूनंतरही इराणचा अणू कार्यक्रम सुरू राहील आणि पाश्चात्य देशांना टक्कर देण्याचं धोरणही कायम राहील.
9/11 नंतर अमेरिकेकडून सहानुभूती
खोमेनींच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी त्यांची जागा घेतली आणि रफसंजानी इराणचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले. खामेनी यांनी प्रामुख्याने अमेरिकाविरोधी धोरण अवलंबलं होतं. पण काही काळासाठी त्यांनी अमेरिकेलाही पाठिंबा दिला.
11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला, तेव्हा इराणने राष्ट्राध्यक्ष बुश आणि अमेरिकन जनतेला शोक संदेश पाठवला.

फोटो स्रोत, Getty Images
केनेथ पोलॉक यांनी त्यांचं पुस्तक 'द पर्शियन पझल: द कॉन्फ्लिक्ट बिटवीन अमेरिका अँड इराण'मध्ये लिहिलं, "असा देश ज्याला 90 च्या दशकात संपूर्ण जगापासून अलिप्त ठेवलं होतं, त्याने आपला सर्वात मोठा शत्रू ज्याला तो नेहमी 'सैतान' म्हणत असे, त्याच्याप्रती सहानुभूती दाखवली."
"तेहरानमध्ये हजारो लोकांनी मृत व्यक्तींकरिता मेणबत्ती पेटवून निषेध मोर्चा काढला. असा प्रयोग करणारा इराण हा मध्यपूर्वेतील एकमेव देश होता."
खतामी बदलाचं प्रतीक बनले
इराणचे पाचवे राष्ट्राध्यक्ष म्हणून मोहम्मद खतामी यांच्या निवडीमुळे हे शक्य झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
या निवडणुकीत खामेनी यांनी कट्टरतावादी नेते अली अकबर नूरी यांना पाठिंबा दिला होता, तरीही खतामी यांचा विजय झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
कॉन कॉफलिन लिहितात, "याचं कारण म्हणजे 1997 पर्यंत इराणच्या लोकांचा इस्लामी सरकारवरील विश्वास कमी झाला होता. लोक इराणची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि बाहेरील जगापासून अलिप्त राहण्यासाठी सरकारला जबाबदार मानू लागले. महागाई 40 टक्क्यांपर्यंत वाढली होती."
"इराणी चलन रियालचं मूल्य निम्म्यावर आलं होतं. बेरोजगारीचा दर 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी खतामी यांचं नाव इराणच्या राजकारणात फार मोठं नव्हतं, पण निवडणूक प्रचार जसजसा जोर पकडू लागला, त्यांचं नाव बदलाचं प्रतीक बनलं."
खतामी यांनी निवडणुकीत विजयी होताच सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांशी संबंध सुधारण्यासाठी मोठा पुढाकार घेतला.
इतकंच नाही, तर त्यांनी सप्टेंबर 1998 मध्ये सलमान रश्दींविरोधात काढलेला फतवा देखील मागे घेतला.
खामेनींविरोधात विरोधकांमध्ये एकीचा अभाव
पण 2005 मध्ये मोहम्मद अहमदीनेझाद सत्तेत आल्यानंतर इराण पुन्हा आपल्या जुन्या धोरणांकडे परतला. खामेनी यांनी आत्मनिर्भरता, मजबूत संरक्षण क्षमता आणि चीन-रशियाच्या बाजूने कल हे त्यांचे मुख्य धोरण केले.
अमेरिका आणि इस्रायलविरोध त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग राहिला. परंतु, इराणवर जेव्हा जेव्हा गंभीर धोका निर्माण झाला, तेव्हा त्यांनी लवचिकता दाखवण्यास मागेपुढे पाहिलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अमीन सैकाल त्यांचं पुस्तक 'इराण रायझिंग: द सर्व्हायव्हल अँड फ्यूचर ऑफ द इस्लामिक रिपब्लिक' मध्ये लिहितात, "खामेनींकडे प्रचंड घटनात्मक आणि धार्मिक अधिकार आहेत. त्यांनी इराणमधील राज्याची शक्ती वाढवणाऱ्या साधनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जसं की इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि त्याची अर्धसैनिक शाखा 'बसीज'."
"अजूनही अनेक इराणी नागरिक सरकारबद्दल असंतुष्ट आहेत, पण सरकारविरुद्ध राष्ट्राला एकत्र करणारा संघटित विरोधी नेता उभा राहिलेला नाही."
शाहच्या मुलाच्या आव्हानावर प्रश्न
इराणच्या माजी शाहचा मुलगा रझा पहलवी अलीकडे काही प्रमाणात लोकप्रिय होत आहे.
काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एक्सवर केलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं, "46 वर्षांपासून चालत आलेल्या युद्धाचा शेवट करा. इराणच्या राज्यकर्त्यांचे आपल्याच लोकांना चिरडण्याचे धोरण संपुष्टात येत आहे. हे दुःस्वप्न कायमचं संपवण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे."

फोटो स्रोत, Getty Images
वडिलांच्या पदावरून हटवल्यानंतर ते अमेरिकेत निर्वासित जीवन जगले. परंतु, अमेरिका आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी त्यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे इराणमध्ये त्यांना किती गांभीर्याने घेतलं जाईल, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमेरिकेच्या मदतीने जरी ते सत्तेत परतले तरी त्यांना त्यांच्या वडिलांना ज्या राजकीय वैधतेच्या समस्येचा सामना करावा लागला होता त्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











