इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू, ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीचा दुजोरा

फोटो स्रोत, EPA/Shutterstock
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणमधील सरकारी वाहिनीनं केला आहे. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचा दावा केला होता.
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे.
रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.
त्यावेळी इराणची वृत्तसंस्था असलेल्या 'फार्स'नं म्हटलं होतं की, अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे आणि तो अमेरिकेच्या 'सायकॉलॉजिकल वॉर'चा भाग आहे, असं जाणकार सूत्रांनी सांगितलेलं आहे.
रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या फार्स न्यूज एजन्सीने तत्काळ या वृत्ताचं खंडन केलं होतं.
मात्र काही वेळानं इराणच्या सरकारी वाहिनीनं या वृत्ताला दुजोरा दिला. तसंच खामेनी यांच्या मृत्यूनंतर 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला.
"इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक असलेले खामेनी आता मरण पावलेले आहेत," असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संलग्न असलेल्या फार्स न्यूज एजन्सीनं वृत्त दिलं आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू या हल्ल्यात ठार झाले आहेत.
या सगळ्या घडामोडींवर चीननं चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत चीनचे राजदूत फू काँग म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचा देश खूप चिंतेत आहे.
दुसऱ्या बाजूला, वॉशिंग्टनमधील नॅशनल सॉलिडॅरिटी ग्रुप ऑफ इराण मृतांच्या स्मरणार्थ वॉशिंग्टनमध्ये रॅलीचे आयोजन बऱ्याच काळापासून करत होता.
मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर रॅलीचे वातावरण उत्सवमय झालेलं आहे.
रॅलीतील बरेच लोक आनंदाने नाचत होते. काही जण मिठाई वाटत होते, काही जण फुले देत होते आणि बरेच जण एकमेकांना मिठी मारत होते.
रॅलीतील सहभागींनी "अमेरिका!" असे जयघोष करून सरकारचे आभार मानले.
इराणचा 'विनाशकारी आक्रमणाचा' इशारा
दरम्यान इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून नुकतंच एक निवेदन मिळालं आहे. त्यात त्यांनी अमेरिकेच्या तळांवर आणि इस्रायलवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.
"अमेरिकेची दहशतवादी तळं आणि आमच्या व्यापलेल्या प्रदेशांवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आक्रमक कारवाई काही क्षणांतच सुरू होईल," असं निवेदनात म्हटलं आहे.
खामेनींचा उत्तराधिकारी कसा निवडला जाऊ शकतो?
यासंदर्भात बीबीसी पर्शियनचे प्रतिनिधी बेहरंग ताजदिन यांनी विश्लेषण केलेलं आहे. ते पुढीलप्रमाणे -
इराणच्या संविधानानुसार, खामेनी यांची निवड ज्या धर्मगुरुंच्या मंडळानं केली त्याच मंडळानं त्यांचा उत्तराधिकारी निवडला पाहिजे, असं अपेक्षित आहे.
हे मंडळ म्हणजे थोडक्यात 'लीडरशीप एक्स्पर्ट'चं मंडळ होय.
'लीडरशीप एक्स्पर्ट' हे 88 धर्मगुरूंचं एक मंडळ आहे. ते कागदोपत्री दर आठ वर्षांनी एकदा लोकांकडून निवडलं जातं. परंतु, प्रत्यक्षात फक्त इस्लामिक रिपब्लिकशी सर्वात निष्ठावान असणाऱ्या धर्मगुरूंनाच या निवडणुकीसाठी उभं राहण्याची परवानगी आहे. म्हणूनच सध्याच्या असेंब्ली सदस्यांपैकी बहुतांश सदस्य हे अयातुल्ला खामेनी यांच्यासारखेच कट्टर धर्मगुरू आहेत.
इराणच्या संविधानात म्हटलं आहे की, या धर्मगुरूंनी शक्य तितक्या लवकर नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करावी. परंतु, सध्या इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला सुरू असताना, सर्वांना लवकरात लवकर एकत्र करणं सुरक्षेच्या कारणास्तव कठीण ठरू शकतं.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिकेचे प्रमुख आणि 'पॉवरफुल गार्डीयन कौन्सिल'चे धर्मगुरू सदस्यचं नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारतील, असं दिसतंय.
ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेले खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.
फक्त इराणसाठीच नव्हे तर खामेनी आणि त्यांच्या क्रूप मारेकरी टोळीनं हत्या केलेल्या किंवा जखमी केलेल्या महान अमेरिकन आणि जगभरातील इतर लोकांसाठीही हा न्याय आहे."
"ते आमच्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमपासून वाचू शकले नाही. इस्रायलच्या साथीनं केलेल्या या कारवाईत त्यांना किंवा त्याच्यासोबत मारल्या गेलेल्या इतर नेत्यांनाही काहीही करता आलं नाही."

फोटो स्रोत, Reuters
"इराणच्या नागरिकांसाठी ही त्यांचा देश परत मिळवण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी संधी आहे. त्यांचे अनेक IRGC, लष्करी अधिकारी आणि इतर सुरक्षा तसंच पोलीस दलही आता लढण्यास इच्छुक नसल्याचं आमच्या कानावर येत आहे. ते आमच्याकडे संरक्षण (इम्युनिटी) मागत आहेत. मी काल रात्री म्हटल्याप्रमाणं, 'त्यांना आता संरक्षण मिळू शकतं, परंतु नंतर त्यांना फक्त मृत्यूच मिळेल."
"आयआरजीसी आणि पोलीस इराणच्या देशभक्तांबरोबर एकत्र येतील आणि एकसंघपणे देशाला पात्र असलेल्या महानतेकडं नेतील, अशी आम्हाला आशा आहे.
ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण केवळ खामेनी मरण पावले नसून, देश एका दिवसात मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे, किंबहुना जवळजवळ पूर्णच नष्ट होत आला आहे."
"तरीही, मध्य पूर्व आणि जगात शांतता राखण्यासाठीचं ध्येय साध्य करण्यासाठी आणखी आठवडाभर किंवा गरजेनुसार जोरदार आणि अचूक बॉम्बहल्ले सुरूच राहतील."

फोटो स्रोत, Mamlekate / X
इराणमध्ये आनंद साजरा?
दरम्यान, इराणच्या काही नागरिकांनी कारजमधील रस्त्यांवर उतरत सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचं वृत्त आल्यानंतर आनंद व्यक्त केल्याचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेला आणि बीबीसी पर्शियननं सत्यापित केलेल्या एका व्हीडिओमध्ये कारजमधील काही इराणी लोक सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताचा आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्यापूर्वीच हा आनंद साजरा केल्याचं समोर आलं.
'लवकरच महान राष्ट्रीय उत्सव'
इराणचे शेवटचे शाह (राजा) यांचे निर्वासित पुत्र रझा पहलवी यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचं स्वागत केलं आहे.
"आपल्या काळातील रक्तपिपासू झहक (इराणी पौराणिक कथांमधील एक दुष्ट राजा) असलेले अली खामेनी हे इराणच्या हजारो धाडसी मुला-मुलींचे मारेकरी होते. इतिहासाच्या पानांमधून त्यांचं अस्तित्व पुसून टाकण्यात आलं आहे," असं पहलवी यांनी सोशल मीडियावर लिहिलं.
"त्यांच्या मृत्यूनं इस्लामिक रिपब्लिक संपुष्टात आलं आहे आणि लवकरच ते इतिहासाच्या कचऱ्यात टाकले जाईल."

फोटो स्रोत, EPA
पहलवी यांनी इराणी अधिकाऱ्यांना उत्तराधिकारी नियुक्त न करण्याचा इशारा दिला आहे. सैन्य, सुरक्षा आणि पोलिस दलांनी लोकांच्या साथीनं एकत्र येण्याची ही अखेरची संधी असल्याचं ते म्हणाले.
"ही आपल्या महान राष्ट्रीय उत्सवाची सुरुवात आहे, पण हा शेवट नाही," असंही ते म्हणाले.
1979 च्या क्रांतीनंतर पहलवी त्यांच्या पालकांसोबत आणि भावंडांसोबत निर्वासित झाले आणि तेव्हापासून ते अमेरिकेतच राहत आहेच.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











