इराण विरुद्ध इस्रायल : सैन्य, ड्रोन, क्षेपणास्त्रं, अण्वस्त्र; कुणाची किती ताकद?

इराण आणि इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आरीफ शमिम
    • Role, बीबीसी न्यूज ऊर्दू

इराणने आपल्यावर मिसाईल हल्ला केला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणने त्यांच्यावर जवळपास 180 मिसाईल्स डागले आहेत. यातील बहुतांश मिसाईल्सना चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहितीही इस्रायलने दिली आहे.

मिसाईल्सच्या या अखंड भडीमारामध्ये वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे; तर मध्य इस्रायलमधील एका शाळेचं आणि तेल अव्हीव्हमधल्या एका रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, "इराणने आजच्या रात्री फार मोठी चूक केली आहे. त्याला याची भरपाई करावी लागेल."

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलच्या लष्कराने प्रत्यक्ष जमिनीवरुनही लेबनॉनवर आक्रमण केलं. आपलं हिजबुल्लाह विरोधातील हे मैदानी आक्रमण 'लिमीटेड, लोकलाईझ्ड आणि टार्गेटेड' असेल, असेही इस्रायलने स्पष्ट केले होते.

दुसऱ्या बाजूला संयुक्त राष्ट्रांनी तसेच युरोपियन संघाने युद्धविरामसाठीचे आवाहन केलं आहे.

या निमित्तानं इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या संरक्षणविषयक ताकदीचा घेतलेला हा आढावा :

इराण, इस्रायल

दोघांपैकी कुणाचा वरचष्मा?

प्रत्येक देशाची स्वतंत्र अशी क्षमता असते पण ती गोपनीय ठेवली जाते. तसं असलं तरीही बीबीसीनं या प्रश्नाच्या अनुषंगानं खालील स्त्रोतांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याचं मूल्यांकन आणि तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे.

द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज (IISS)नं दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेची तुलना केली आहे. त्यासाठी विविध अधिकारी आणि उपलब्ध असलेल्या इतर स्त्रोतांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे.

इराण, इस्रायल

त्याशिवाय स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्स इन्स्टिट्यूटसारख्या इतर काही संस्थांही याचं मूल्यांकन करतात. पण दोन्ही देशांकडून आकडेवारी जाहीर केली जात नसल्यानं त्यात भिन्नता आढळू शकते.

IISS या संस्थेद्वारे जगभरातील देशांच्या लष्करी क्षमतेचं अधिकाधिक अचूक मूल्यांकन केलं जातं, असं मत पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लो (PRIO) चे निकोलस मार्श यांनी व्यक्त केलं.

इराण, इस्रायल

इस्रायल इराणच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रावर अधिक खर्च करतं असं मत IISS नं व्यक्त केलं आहे. त्यामुळं संघर्षाच्या स्थितीत त्यांना अधिक शक्तीचं प्रदर्शन करता येतं.

IISS च्या मते 2022 आणि 2023 मध्ये इराणचं संरक्षण क्षेत्राचं बजेट जवळपास 7.4 अब्ज डॉलर एवढं होतं. तर इस्रायलचं बजेट हे जवळपास 19 अब्ज डॉलर म्हणजे दुपटीपेक्षा जास्त होतं. इस्रायलचं जीडीपीच्या तुलनेत लष्करावर खर्च करण्याचं प्रमाणही इराणपेक्षा दुप्पट आहे.

तांत्रिकदृष्ट्या वरचढ

IISS च्या आकड्यांनुसार इस्रायलकडं युद्धात लढण्यासाठी सज्ज असलेली 340 लढाऊ विमानं आहेत. त्यामुळं त्यांना अचूक हवाई हल्ला करण्यात मदत मिळते.

इराण विरुद्ध इस्रायलः कोणाकडे किती ताकद आहे? वाचा दोन्ही बाजूच्या क्षेपणास्त्रांची माहिती

त्यांच्या ताफ्यात असलेल्या लढाऊ विमानांमध्ये लांब पल्ल्यांच्या हल्ल्याची क्षमता असलेल्या F-15 विमानांचा समावेश आहे. तसंच रडारवर न दिसणारे F-35s ही उच्च तंत्रज्ञान असलेली स्टिल्थ विमानं आणि वेगानं हल्ला करणारे हेलिकॉप्टरही आहेत.

तर IISS च्या अंदाजानुसार इराणकडं जवळपास 320 लढाऊ विमानं आहेत. जवळपास 1960 च्या ही दशकातील विमानं असून त्यात F-4s, F-5s आणि F-14s (नंतर उल्लेख केलेलं विमान 1986 मधील टॉप गन चित्रपटातून प्रसिद्ध झालेलं आहे.

यापैकी नेमकी किती जुनी विमान प्रत्यक्षात उड्डाण करू शकतात याची खात्री नसल्याचं मत, PRIO चे निकोलस मार्श यांनी व्यक्त केलं. त्याचं कारण म्हणजे या विमानांचे सुटे भाग मिळणं अत्यंत कठीण आहे.

आयर्न डोम आणि अॅरो

इस्रायलचं आयर्न डोम आणि अॅरो यंत्रणा हा त्यांच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा आहे.

क्षेपणास्त्र इंजिनीअर असलेले उझी रुबिन हे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या क्षेपणास्त्र संरक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. सध्या ते येरूसलेम इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजी अँड सेक्युरिटी संस्थेत वरिष्ठ संशोधक आहेत.

इराण इस्रायल

इस्रायलवर शनिवारी जेव्हा क्षेपणास्त्रांचा प्रचंड हल्ला करण्यात आला तेव्हा आयर्न डोम आणि इस्रायलच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी ती क्षेपणास्त्र निकामी केली. ते पाहून प्रचंड सुरक्षित असल्याचं जाणवलं, असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

आयर्न डोम
फोटो कॅप्शन, आयर्न डोम

"मला खूप समाधान आणि आनंदही वाटला. लक्ष्याचा विचार करता हे फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रापासून संरक्षण करणारी ही यंत्रणा आहे. अशा प्रकारची दुसरी कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नाही.", असं त्यांनी सांगितलं.

इस्रायल-इराणमधील अंतर

इस्रायल आणि इराण यांच्यात 2100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळं दोघांमधील हल्ला करण्याचं मुख्य माध्यम हे क्षेपणास्त्रच असल्याचं, डिफेन्स आयचे संपादक टीम रिप्ले यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा संपूर्ण मध्य पूर्वभागातील सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण समजला जातो.

इस्रायल-इराणमधील अंतर

2022 मध्ये यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेंझी यांनी इराणकडं सुमारे 3000 पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असल्याचं म्हटलं होतं.

CSIS मिसाईल डिफेन्स प्रोजेक्टच्या माहितीनुसार इस्रायल काही देशांना क्षेपणास्त्रांची निर्यातही करतं.

इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन

इराणनं 1980 ते 1988 दरम्यान शेजारी देश असलेल्या इराकबरोबर झालेल्या युद्धानंतर त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर जोर दिला.

त्यांनी अनेक आखूड आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनची निर्मिती केली आहे. त्यापैकी अनेक नुकतीच इस्रायलवरही डागण्यात आली होती.

सौदी अरेबियावर हुती बंडखोरांनी हल्ला केलेली क्षेपणास्त्रंही इराणमध्ये तयार केलेली होती, असं त्यांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासकांनी सांगितलं.

लांब पल्ल्याच्या हल्ल्याद्वारे 'शिक्षा'

डिफेन्स आयचे टीम रिप्ले यांनी इराणबरोबर युद्ध पुकारण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं म्हटलं. "इस्रायलची सर्वात मोठी शक्ती म्हणजे हवाई हल्ल्याची क्षमता आणि त्यांचे गाईडेड वेपन्स आहेत. त्यामुळं इराणमधील महत्त्वाच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे," असंही ते म्हणाले.

इस्रायलकडून प्रामुख्यानं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची आणि तेलाचे साठे नष्ट करण्याची शक्यता आहे.

इस्रायल

"या सर्वाचा मूळ उद्देश 'शिक्षा देणं' हा आहे. इस्रायली लष्कर आणि राजकीय नेते कायम हा शब्द वापरत असतात. इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा अशा वेदना विरोधकांना देणं, हा त्यांच्या विचारसरणीचाच भाग आहे."

इराणच्या सीरियातील दूतावासावर इस्रायलने हल्ला केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1 एप्रिल 2024 रोजी इराणच्या सीरियातील दूतावासावर इस्रायलने हल्ला केला होता.

यापूर्वीही हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या लष्कराचे मोठे अधिकारी आणि सामान्य नागरिक मारले गेले आहेत. त्यात 1 एप्रिलला सिरियाच्या राजधानीत इराणच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे. त्यामुळंच इराणणं हल्ला करण्याची भूमिका घेतली.

इस्रायलनं दुतावासावरील हल्ल्याची किंवा इराणच्या मुख्य अधिकाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही आणि झटकलेलीही नाही.

सागरी क्षमता

IISS च्या माहितीनुसार इराणच्या नौदलामध्ये जवळपास 220 जहाजं आहेत. पण त्यातील अनेक फारच जुनी आहेत.

तर इस्रायलच्या नौदलाकडं अंदाजे 60 जहाजं असल्याचं IISS चं म्हणणं आहे.

सायबर हल्ले

सायबर हल्ल्याचा विचार करता इराणच्या तुलनेत इस्रायलकडं गमावण्यासारखं खूप काही आहे.

इराणची संरक्षण यंत्रणा ही इस्रायलच्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या कमी विकसित आहे. त्यामुळं इस्रायलच्या लष्करावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हल्ला केल्यास त्यांची जास्त हानी करता येऊ शकते.

"सायबर हल्ल्याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त आहे. किमान तीनपटीने शक्यता वाढली आहे. इस्रायलच्या प्रत्येक्ष क्षेत्रात हल्ले होत आहेत. इराण आणि हिजबुल्ला (लेबनानमधील बंडखोर आणि राजकीय संस्था) यांच्यातील सहकार्यही युद्धादरम्यान वाढलं आहे," अशी माहिती इस्रायलच्या सरकारमधील राष्ट्रीय सायबर संचालकांनी दिली.

7 ऑक्टोबरपासून 2023 च्या अखेरीपर्यंत जवळपास 3380 सायबर हल्ले झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सायबर हल्ले

फोटो स्रोत, Getty Images

इराणने नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या नंतरच्या महिन्यात जवळपास 200 सायबर हल्ले हाणून पाडल्याची माहिती, इराणच्या सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल गोलामरेझा जलाली यांनी दिली.

डिसेंबर महिन्यात झालेल्या सायबर हल्ल्यामुळं देशातील प्रेट्रोल पंपांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागल्याची माहिती, इराणचे तेल मंत्री जावेद ओवजी यांनी दिली.

आण्विक धोका

इस्रायलकडे त्यांची स्वतःची अण्वस्त्रं आहेत असं म्हटलं जातं. पण त्यांनी नेहमीच याबाबत संभ्रम ठेवण्याचं अधिकृत धोरण कायम राखलं आहे.

इराणवर असे आरोप केले जात असले तरी, त्यांच्याकडं अण्वस्त्र नसल्याचं म्हटलं जातं. इराणनंही नागरी अणू कार्यक्रमाचा वापर अण्वस्त्र निर्मितीसाठी केल्याचा आरोप वारंवार फेटाळला आहे.

भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या

इस्रायलच्या तुलनेत इराण हा खूप मोठा देश आहे. त्यांची लोकसंख्या (जवळपास 8.9 कोटी) ही इस्रायलच्या लोकसंख्येच्या (अंदाजे 1 कोटी) जवळपास दहा पटीनं जास्त आहे.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल

इस्रायलच्या तुलनेत इराणमध्ये जवळपास सहापट अधिक सैनिक असल्याचंही म्हटलं जातं. इराणमध्ये 6 लाख सक्रिय सैनिक आहेत तर इस्रायलमध्ये हा आकडा 1 लाख 70 हजार असल्याचं IISS चं म्हणणं आहे.

इस्रायल प्रत्युत्तर कसे देणार?

तेल अवीव युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेले संशोधक डॉ. एरिक राँडस्की यांच्या मते, इराणनं हल्ला केल्यानंतर इस्रायलनं अलर्ट जारी केला आणि अपयशाची जबाबदारीही स्वीकारली.

इराणचा पाठिंबा असलेले शेजारच्या देशांमधले बंडखोर गट सातत्यानं इस्रायलवर हल्ला करत असतात, त्यामुळं ते लक्ष्य ठरू शकतात.

इस्रायल प्रत्युत्तर कसे देणार?

फोटो स्रोत, Getty Images

पण इस्रायल यावर लगेचच प्रतिक्रिया देण्याची शक्यता कमी असल्याचं मत, मध्य पूर्व भागातील संरक्षण तज्त्र जेरेमी बिन्नी यांनी व्यक्त केलं. "लगेच प्रतिहल्ला करायचा असेल तर त्यांच्याकडं खूप पर्याय आहेत. त्यात लेबनान आणि सिरियातील तळांवर हल्ल्याचा पर्याय आहे," असं ते म्हणाले.

पण एकमेकांच्या विरोधात पूर्णपणे युद्ध सुरू होण्याबाबत बिन्नी यांनी साशंकता व्यक्त केली. "लष्कर किंवा नौदल थेट लढाईत उतरणार नाही. ते (इराण आणि इस्रायल) एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत.

इस्रायल प्रत्युत्तर कसे देणार?

"दोन्ही देशांकडे लांब पल्ल्याचा हवाई मारा करण्याची क्षमता आहे, त्यामुळं आम्ही त्या परिस्थितीबाबत विचार करत आहोत. इराणच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्याची क्षमता आणि इस्रायलची संरक्षण यंत्रणा अशी याची एक बाजू आपण शनिवारी आणि रविवारी अनुभवली आहे."

इस्रायलला हल्ल्यासाठी सिरिया, जॉर्डन आणि इराक अशा स्वायत्त देशांच्या हवाईक्षेत्राचं उल्लंघन करावं लागेल, असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर इस्रायलकडं अनुभवी गुप्तचर यंत्रणा आहे. त्याच्या माध्यमातूनही ते इराणमध्ये गोपनीय पद्धतीनं कारवाई करू शकतात.

'इराण कार्ड'

मध्य पूर्व भागांचे तज्ज्ञ तारीक सुलेमान यांनी हे युद्ध आणखी वाढण्याची शक्यता नसल्याचं बीबीसी उर्दूशी बोलताना म्हटलं.

पण त्याचवेळी इस्रायलच्या संसदेत आणि मंत्रिमंडळात असलेल्या काही सदस्यांना युद्ध हवं आहे. तसंच त्यासाठी ते इस्रायलच्या पंतप्रधानावर कारवाईसाठी दबाव आणत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. "नेतन्याहू यांना ज्यावेळी ते राजकीयदृष्ट्या चांगल्या स्थितीत नाहीत किंवा अडचणीत आहेत असं वाटेल त्यावेळी लगेचच ते इराण कार्ड वापरतील," असं ते म्हणाले.

इराणनं इस्रायलच्या या भागावर हल्ला केला.
फोटो कॅप्शन, इराणनं इस्रायलच्या या भागावर हल्ला केला.

इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठाद्वारे यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात इराणवर प्रत्युत्तराची कारवाई केल्यामुळं इस्रायलचे सहकाऱ्यांबरोबरचे संबंध खराब होणार असतील आणि त्याचा सुरक्षेवर परिणाम होणार असेल तर ही कावाई करू नये असं मत, इस्रायलच्या तीन चतुर्थांश नागरिकांनी व्यक्त केलं.

हे सर्वेक्षण 14 आणि 15 एप्रिलला इंटरनेट आणि फोनद्वारे करण्यात आलं असल्याचं विद्यापीठानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1466 पुरुष आणि महिलांची मतं त्यासाठी जाणून घेण्यात आली. त्यात इस्रायलच्या ज्यू आणि अरब नागरिकांचा समावेश होता.

'छुपे युद्ध' नेमके काय?

इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अद्याप अधिकृत युद्ध झालेलं नसलं तरी त्यांच्या अनधिकृतपणे संघर्ष पाहायला मिळाला आहे. इराण आणि इतर देशांमध्ये झालेल्या हल्ल्यात महत्त्वाच्या इराणी व्यक्तिमत्त्वांचे मृत्यू झाले आहेत. त्या हल्ल्यांचे आरोप इस्रायलवर केले जातात. तर इराण त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून इस्रायलला लक्ष्य करतं.

इराण

फोटो स्रोत, Getty Images

बंडखोर आणि राजकीय समूह असलेला हिजबुल्लाच्या माध्यमातून इस्रायच्या विरोधात लेबनानमधून प्रामुख्यानं छुपं युद्ध केलं जातं. इराण हिजबुल्लाला सहकार्य करत असल्याचं मान्यही करतो.

त्याचप्रकारे गाझामध्येही त्यांचा हमासला पाठिंबा आहे. हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला होता. त्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते.

इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांच्या मते, इराण हमासला शस्त्र, दारुगोळा पुरवण्याबरोबरच हमासच्या सदस्यांना प्रशिक्षणही देतं.

इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांच्या मते, इराण हमासला शस्त्र, दारुगोळा पुरवण्याबरोबरच हमासच्या सदस्यांना प्रशिक्षणही देतं.

फोटो स्रोत, Getty Images

येमेनमधील हुती हेदेखिल इराणचे सहकारी समजले जातात. सौदी अरेबियानं त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेली क्षेपणास्त्रं इराणमध्ये निर्मित असल्याचं म्हटलं होतं.

इराणचा पाठिंबा असलेल्या गटांची इराक आणि सिरियामध्येही शक्ती आहे. तसंच इराणचा सिरियाचा सरकारला पाठिंबा आहे. शिवाय ते इस्रायलवर हल्ल्यासाठी सिरियाच्या भूमीचा वापर करतात, असंही म्हटलं जातं.

(अतिरिक्त वार्तांकन अहमद ख्वाजा, कार्ला रोश, रेझा साबेती आणि क्रिस पार्ट्रिज)