इराणचे 'रिव्होल्युशनरी गार्ड' : दोन लाखांचं सैन्य आणि अण्वस्त्र, जाणून घ्या सर्वकाही

फोटो स्रोत, AFP
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC)ची स्थापना 40 वर्षांपूर्वी झाली होती.
इराणच्या इस्लामिक व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि नियमित सैन्यदलांना पर्यायी दल म्हणून या दलाची स्थापना करण्यात आली होती.
आता इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स इराणमधील प्रमुख लष्करी, राजकीय आणि आर्थिक शक्ती बनलं आहे.
रिव्होल्युशनरी गार्ड्स इराणचे सर्वोच्च नेते अयोतोल्लाह अली खोमेनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या अत्यंत जवळचे दल मानलं जातं.
रिव्होल्युशनरी गार्ड्समध्ये 1,90,000 पेक्षा अधिक सक्रिय सैनिक असल्याचा अंदाज आहे.
त्यांची विभागणी स्वतंत्रपणे भूदल, नौदल आणि हवाईदलात करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इराणची अण्वस्त्रे रिव्होल्युशनरी गार्ड्सच्याच कक्षेत येतात.
त्याचबरोबर बसिज रेसिडन्स फोर्स या निमलष्करी दलाचे नियंत्रणदेखील रिव्होल्युशनरी गार्ड्सकडे आहे.
बसिज रेझिस्टन्स फोर्सचा वापर इराणमधील अंतर्गत विरोधक किंवा आंदोलनं तसेच इराणमधील सेवाभावी संस्थांना दडपण्यासाठी करण्यात आला आहे. या सेवाभावी संस्था इराणच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहेत.
रिव्होल्युशनरी गार्ड्स फक्त इराणमध्येच नाही तर आखाती देशांमध्येही प्रभाव राखून आहेत. आखातातील मित्र देशांना आणि सशस्त्र गटांना पैसा, शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान, प्रशिक्षण देण्याचं काम रिव्होल्युशनरी गार्ड्स करतं.
अर्थात परदेशातील या कारवायांचं काम रिव्होल्युशनरी गार्ड्सचं कुड्स (जेरुसलेम) फोर्स करतं. एक प्रकारे कुड्स फोर्स ही परदेशातील कारवाया करण्यासाठीची रिव्होल्युशनरी गार्ड्सची शाखा आहे.
कुड्स फोर्स दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आणि इराकसह आखातात इतरत्र होणाऱ्या हल्ल्यांना जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
या हल्ल्यांमध्ये शेकडो अमेरिकन आणि मित्र राष्ट्रांच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
3 जानेवारी 2020ला कुड्स फोर्सचे शक्तिशाली कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार केलं होतं.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं म्हणणं आहे की सुलेमानी यांनीच इराकमधील रॉकेट हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात एका अमेरिकन कंत्राटदाराचा मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर इराक आणि आखातातील अमेरिकन दूतावासातील अधिकारी आणि सैनिकांवर हल्ला करण्याचे प्लॅन सुलेमानी आखत होते. कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वेसर्वा अयातोल्लाह अल खोमेनी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात.
त्यामुळं सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर अयोतोल्लाह खोमेनी यांनी सैनिकी बळाचा वापर करून बदला घेणार असल्याचं म्हटलं होतं.
इस्लामिक क्रांतीचे रखवाले
इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीच्या आधी शाह मुहम्मद रेझा पहलवी राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यांची सत्ता टिकवण्यासाठी लष्करी बळावर विसंबून होते.
मात्र नंतरच्या काळात अयोतोल्लाह रुहोल्लोह खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या इस्लामिक यंत्रणेला जाणीव झाली की त्यांची सत्ता टिकवण्यासाठी आणि ती मजबूत करण्यासाठी, त्यांच्या विचारसरणीला बळ देण्यासाठीच समर्पित असणाऱ्या एका शक्तिशाली सेनेची आवश्यकता आहे.
त्यानंतर इस्लामिक क्रांतीच्या प्रणेत्यांनी एक नवीन घटनात्मक व्यवस्था लागू केली.
या व्यवस्थेनुसार इराणचं नियमित लष्कर ज्याला अर्तेश म्हणतात, ते इराणच्या सीमांचं संरक्षण आणि त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देखील सांभाळणार होतं. तर एक स्वतंत्र गार्ड कॉर्प्स ज्याला सिपेह-ए-पसदरन म्हणतात ते इस्लामिक व्यवस्थेचे संरक्षण करणार होतं.
थोडक्यात इस्लामी व्यवस्थेचे संरक्षण करणं यासाठीच रेव्होल्युशनरी गार्ड्सची स्थापना झाली होती.
सुरुवातीला हे एक छोटं पथक होतं आणि त्याचा प्रभाव मर्यादित होता. मात्र आज रिव्होल्यूशनरी गार्ड्स खूप मोठी संघटना बनली असून इराणमधील प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्रभाव असून इराणच्या सरकारमध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

फोटो स्रोत, EPA
प्रत्यक्षात काम करताना या भूमिका अनेकदा मिश्र स्वरूपाच्या देखील असतात. म्हणजेच रेव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC)अनेकदा अंतर्गत कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करतं.
त्याचबरोबर स्वत:च्या वेगळ्या भूदल, नौदल आणि हवाईदलाचा विकास करणं, यासारख्या भूमिकादेखील पार पाडत असतं.
इराणच्या नियमित सैन्यापेक्षा अंदाजे 2,30,000 सैनिक कमी असूनदेखील रेव्होल्युशनरी गार्ड्स हीच इराणमधील सर्वात प्रभावी, शक्शिशाली सेना असल्याचं मानलं जातं. इराणच्या महत्त्वाच्या लष्करी कारवायांमागेदेखील रिव्होल्यूशनरी गार्ड्सच असतात.
सध्या मेजर जनरल होसेन सलामी हे रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर आहेत. ते आणि इतर वरिष्ठ अधिकारी खोमेनींचे सल्लागार म्हणून काम करत असतात.
व्यूहरचनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर देखरेख करण्याची जबाबदारी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या नौदलावर आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या चिंचोळ्या सागरी पट्टीतून आखाती देश आणि हिंद महासागराला जोडले गेले आहेत.
इथूनच जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. साहजिकच इराणसह अमेरिका आणि मित्रराष्ट्रांसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदलाच्या छोट्या बोटींनी अनेकदा इराणच्या सागरी सीमांमध्ये येऊ पाहणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकांचा अनेकदा त्यांनी प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर अनेकदा मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना ताब्यात घेतलं आहे किंवा इतरत्र वळवलं आहे.
तर रिव्होल्युशनरी गार्ड्सचं हवाई दल जरी लढाऊ विमानं हाताळत नसलं तरी त्यांच्यावर सध्या इराणच्या क्षेपणास्त्रांची जबाबदारी आहे.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार इराणकडे आखाती देशांमधील सर्वात मोठा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. इराणकडे 10 पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र व्यवस्था असून शेकडो क्षेपणास्त्रांचा साठा आहे.
2018 मध्ये उत्तर इराकमध्ये असलेल्या इराणी कुर्दिश बंडखोर गटावर आणि सीरियातील इस्लामिक स्टेट ग्रुपच्या तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता.
रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परदेशातील कारवाया आणि कुड्स सेना
अलीकडच्या काही वर्षांमधील रिव्होल्युशनरी गार्ड्सचं सर्वात महत्त्वाचं पथक म्हणजे कुड्स फोर्स किंवा कुड्स सेना.
इराण सरकार परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टं साध्य करण्यासाठी या पथकाचा वापर करत असल्याचं म्हटलं जातं.
सीरियातील संघर्षात कुड्स फोर्सचा वापर केल्याचं इराणनं मान्य केलं होतं. कुड्स सेनेने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांना एकनिष्ठ असणाऱ्या पथकांना आणि त्यांच्याबरोबर लढणाऱ्या हजारो शिया मुसलमान लढवय्यांना मार्गदर्शनदेखील केलं होतं.
तर इराकमध्ये त्यांनी शियाबहुल निमलष्करी दलाला इस्लामिक स्टेटला हरवण्यास मदत केली होती.
या सर्व कारवायांमुळे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल सुलेमानी यांना इराणमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली होती.
2003 मध्ये अमेरिकेने सद्दाम हुसैन यांना संपवून इराक ताब्यात घेतला होता. त्यानंतर आखाती देशांमध्ये कुड्स सेनेच्या कारवायांमध्ये वाढ झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प प्रशासनानं आरोप केला होता की आखातात अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या गटांना मदत करणं आणि दहशतवादी गट तयार करणं यासाठी हेच इराणच्या कुड्स सेनेचं मुख्य काम आहे.
लेबेनॉनमधील हिजबुल्लाह चळवळ आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांनादेखील कुड्स सेना मदत करत असल्याचा आरोप इराणवर करण्यात आला होता.
कुड्स फोर्स या संघटना किंवा गटांना पैसा पुरवणं, प्रशिक्षण देणं, शस्त्रास्त्रं पुरवणं आणि यंत्रसामुग्री पुरवणं या प्रकारची मदत करत असल्याचा ट्रम्प प्रशासनाचा आरोप होता.

फोटो स्रोत, AFP
जगातील सातपैकी पाच खंडांमध्ये कुड्स सेना प्रत्यक्षरित्या किंवा समर्थक दहशतवादी संघटना द्वारे दहशतवादी हल्ले घडवून आणत असल्याचा आरोप देखील अमेरिकेने केला होता.
2011मध्ये अमेरिकेतील सौदी अरेबियाच्या राजदूतांना जॉर्जटाऊन येथे बॉम्बस्फोटात मारण्याचा कट आखल्याचा आरोपदेखील कुड्स सेनेवर करण्यात आला होता.
मागील वर्षी जर्मनीतील न्यायालयानं जर्मन-इस्रायली गटाचा माजी प्रमुख आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हेरगिरी केल्याचा ठपका कुड्स सेनेवर ठेवला होता.
सातत्यानं होत असलेल्या या प्रकारच्या आरोपांमुळं एप्रिल 2019मध्ये अमेरिकेने रिव्होल्युशनरी गार्ड्सला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषीत केलं होतं.
एखाद्या देशाच्या अधिकृत लष्करी पथकाला या प्रकारे घोषित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचवेळी अमेरिकेने इराणवरील निर्बंध आणखी कठोर केले होते. तेल निर्यातीवरील अधिकच्या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत झाली होती.
याला उत्तर देण्यासाठी इराणनं दबावतंत्राचा वापर करण्याचा धोरण अवलंबलं होतं. रिव्होल्युशनरी गार्ड्सने जून महिन्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन लष्कराचं टेहळणी ड्रोन पाडलं होतं. तर त्याच्या पुढील महिन्यात त्याच भागातून इंग्लंडची मालकी असणारं एक तेलवाहू जहाज ताब्यात घेतलं होतं.
याशिवाय ओमानच्या आखातात सहा तेलवाहू जहाजांवर झालेल्या स्फोटांमागे इराणचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
सप्टेंबर महिन्यात सौदी अरेबियात झालेला ड्रोन आणि क्रुझ क्षेपणास्त्रांचा हल्ला, अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर झालेला रॉकेट हल्ला ज्यात एका अमेरिकन कंत्राटदाराचा मृत्यू झाला, हे सर्व हल्ले इराणनेच केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र या सर्व घटनांमधील सहभाग इराणने नाकारला होता.
रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात अमेरिकेने इराक आणि सीरियामधील इराम समर्थक गटांच्या पाच तळांवर हवाई हल्ला केला होता.
त्यानंतर पाचच दिवसांनी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणाऱ्या एका ताफ्यावर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. त्यात मेजर जनरल सुलेमानी ठार झाले होते. त्यांच्याबरोबर इतरही अधिकारी ठार झाले होते.
2001 ते 2006 या कालावधीत ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ यांनी इराणचा अनेकदा दौरा केला होता.
त्यांच्या मते इराणमध्ये नियमित सेनाप्रमुखापेक्षा रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखाचं (त्यावेळेस मेजर जनरल कासिम सुलेमानी रेव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर होते) महत्त्व अधिक आहे. इराणच्या परराष्ट्र धोरणात सुलेमानी यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचंही स्ट्रॉ यांचं म्हणणं होतं.
रिव्होल्युशनरी गार्ड्सची आर्थिक ताकद
रिव्होल्युशनरी गार्ड्सचा इराणमध्ये फक्त लष्करी प्रभावच नाही. तर इराणमधील नागरी संस्थांमध्ये देखील त्यांचा प्रचंड प्रभाव आहे.
बसिज रेझिस्टन्स फोर्स या इस्लामिक स्वयंसेवी सशस्त्र गटात जवळपास 1,00,000 पुरुष आणि महिला आहेत. या सेनेचं नियंत्रण देखील रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडेच आहे.
बसिज फोर्स इस्लामिक क्रांतीचे कट्टर समर्थक आहेत. इराणमध्ये निदर्शनं, आंदोलन किंवा सरकारच्या धोरणाला विरोध झाल्यास या सेनेला रस्त्यावर उतरवलं जातं.
2009 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमुद अहमदीनेजाद यांच्या वादग्रस्त पुनर्निवडीनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती. या निदर्शनांना नियंत्रित करण्यामागे आणि थांबवण्यामागे रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि बसिज यांची प्रमुख भूमिका होती. यात डझनभर निदर्शक मारले गेले होते तर हजारोंना अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, AFP
इराणमध्ये असलेली लोकप्रियता आणि अयोतोल्लाह खोमेनींचा भक्कम पाठिंबा यामुळं रिव्होल्युशनरी गार्ड्स इराणच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक बनले आहेत.
रिव्होल्युशनरी गार्ड्सचे माजी अधिकारी सरकारमध्ये, संसदेत आणि इतर संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत. यात संसदेचे अध्यक्ष अली लारिजानी आणि एक्सपेडिएन्सी कौन्सिलचे सचिव मोहसन रिझाई यांचा समावेश आहे.
अनेकदा रिव्होल्युशनरी गार्ड्सचे अधिकारी सरकारच्या धोरणांवर टीकादेखील करत असतात.
मवाळ राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक अणुकराराच्या वेळेस जागतिक शक्तींशी वाटाघाटी करताना ज्या सवलती दिल्या होत्या त्याला रिव्होल्युशनरी गार्ड्सचे माजी कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी उघडपणे विरोध केला होता.
इराणच्या एक तृतियांश अर्थव्यवस्थेवर रिव्होल्युशनरी गार्ड्सचे नियंत्रण असल्याचं म्हटलं जातं. असंख्य ट्रस्ट, संस्था यांच्या माध्यमातून रिव्होल्युशनरी गार्ड्स इराणच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असतात.
लष्करी उद्योगांव्यतिरिक्त रिव्होल्युशनरी गार्ड्स इराणमधील घरबांधणी, रस्ते आणि धरणांचं बांधकाम, तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रकल्प, अन्नधान्य, वाहतूक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय सक्रिय आहे.
रिव्होल्युशनरी गार्ड्सची इंजिनीअरिंग शाखा असलेल्या खातम-ओल-अनबिया उर्फ घोर्ब कडे हजारो कर्मचारी असून त्यांना बांधकाम आणि इंजिनीअरिंगशी निगडीत अब्जावधी डॉलर्सची कंत्राटं देण्यात आलेली आहेत.
इराणच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल राष्ट्राध्यक्ष रुहानी यांना अनेकदा निदर्शनांना तोंड द्यावं लागलं आहे. रुहानी यांनी अनेकदा रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या वाढत्या व्यापारी साम्राज्यावर टीका केली आहे.
रुहानी यांनी एकदा रिव्होल्युशनरी गार्ड्सचा उल्लेख 'सार्वजनिक क्षेत्रामध्ये भीती निर्माण करणारं बंदूकधारी सरकार' असा केला होता.











