इराणने इस्रायलवर हल्ला का केला? 'ही' आहेत या दोन देशांमधील संघर्षाची कारणं

इराण इस्रायल संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

इस्रायलचं तर हमाससोबत गाझामध्ये युद्ध सुरू होतं. मग इराणनं अचानक त्यांच्यावर हल्ला का केला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

काहींना आश्चर्यही वाटेल, पण एकेकाळी हे दोन देश एकमेकांचे सहयोगी होते. मात्र तीन दशकांपासूनन इराण आणि इस्रायलमध्ये वर्चस्वाची चढाओढ किंवा छुपी लढाई सुरू आहे.

आता गेल्या सहा महिन्यांत मात्र हे दोघांमधल्या संघर्षाचा कडेलोट होत गेला. रविवारी इराणनं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तर या प्रदेशातली स्थिती आणखी स्फोटक झाली आहे.

पश्चिम आशियातल्या या दोन स्थानिक महासत्तांच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर लक्षणीय गोष्टी दिसतात.

1948 साली इस्रायलच्या निर्मितीच्या वेळी या दोन्ही देशांमधले संबंध तुलनेनं बरे होते. याचं कारण म्हणजे दोघांच्या आसपास अरब देश आहेत.

इराणला आपली पर्शियन शिया बहुल देश म्हणून ओळख जपायची आहे आणि इस्रायलला त्यांची ज्यूईश ओळख टिकवायची होती आणि दोघांना अरब वर्चस्व मान्य नाही, असं हे चित्र होतं.

त्याशिवाय इराणचे तेव्हाचे राज्यकर्ते शाह मोहम्मद रझा पहलवींचे पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध होते, आणि या देशांचा इस्रायलला पाठिंबा होता.

त्यामुळेच तुर्कीनंतर इस्रायलला मान्यता देणारा इराण हा दुसरा मुस्लीम देश बनला. पण इराणच्या राज्यकर्त्यांचा इस्रायलला पाठिंबा असला, तरी तेव्हा देशात मोठ्‌या प्रमाणात इस्रायलचे विरोधकही होते. त्यांनी इस्रायलच्या स्थापनेला विरोध दर्शवत निदर्शनंही केली होती.

1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, त्यानंतर मात्र चित्र बदललं. इराणनं इस्रायलविरोधाची भूमिका घेतली. तिथून दोन्ही देशांमधले संबंध बिघडत गेले.

इराणला आता इस्रायलचं अस्तित्वच मान्य नाही. इराणचेे राष्ट्रप्रमुख आयातुल्ला अअलीी खामेनी यांनी इस्रायलची कॅन्सरशी तुलना केली होती आणि इस्रायलचं समूळ उच्चाटन व्हायला हवं, असं विधानही केलं होतं.

तरीही 1980 च्या दशकात इराण-इराक युद्धात आणि नंतरही सद्दामविरोधात इस्रायलनं इराणला सामरिक मदतही पुरवली होती असा दावा माजी ब्रिटिश परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांनी केला होता.

त्याशिवाय या दरम्यान इराणकडून इस्रायलला तेलपुरवठाही सुरू होता.

पण हळूहळू दोघांमधली स्पर्धा आणि मतभेेद विकोपाला गेेले. गेल्या तीस वर्षांत वेगवेगळ्‌या परिस्थितींमध्ये इस्रायल आणि इराणनं एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांत अशा काही घटना घडल्या ज्यांत त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं.

दोघांमध्ये कधीही थेट युद्ध झालेलं नाही. पण छुप्या लढाया सुरू राहिल्या आणि अलीकडे त्या वाढल्या आहेत.

जेट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संग्रहित

7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार म्हणून इस्रायलनं गाझामध्ये हमासविरोधात कारवाई सुरू केली आणि गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बाँबवर्षाव केला.

त्यानंतर येमेनमध्ये हूथी बंडखोरांनी इस्रायलविरोधात पावलं उचलली आणि तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या इस्रायलशी निगडीत जहाजांवर कारवाई सुरू केली. या हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.

नकाशा

त्याशिवाय इस्रायलला विरोध करणाऱ्या हिज्बुल्ला या लेबननमल्या संघटनेचंही इराणशी घनिष्ठ नातं आहे.

याची परिणती म्हणून डिसेंबर 2023 मध्ये इस्रायल आणि इराणमध्येही तणाव वाढला आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले.

23 डिसेंबरला इस्रायलशी संबंधीत एका केमीकल टॅँकरवर भारताच्या वेरावळजवळ हल्ला झाला, ते मिसाईल इराणकडून डागण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला. जहाजावर भारतीय खलाशी होते, पण कुठली जीवितहानी झाली नाही.

दोनच दिवसांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससचे म्हणजे IRGCचे एक मोठे अधिकारी सय्यद राझी मुसावी यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. तर 29 डिसेंबरला इराणनं इस्रायलच्या मोसादसाठी गुप्तहेरी केल्याच्या आरोपाप्रकरणी चौघांन मृत्यूदंड ठोठावला.

हल्ले

फोटो स्रोत, Reuters

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

20 जानेवारीला IRGCच्या पाच अधिकाऱ्यांवर सीरियाची राजधानी दमासस्कसमध्ये हल्ला झाला, तेव्हा इराणनं इस्रायलकडे बोट दाखवलं. 14 फेब्रुवारीला इराणच्या एका गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट झाला, तेव्हा एका अधिकाऱ्यानं इस्रायलला दोष दिला.

1 एप्रिलला सीरियाच्या दमास्कस शहरात इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला झाला, तेव्हा त्यामागे इस्रायल इसल्याचा दावा इराणनं केला.

या हल्ल्यात इराणच्या कड्स फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनररल मोहम्मद रझा झाहेदीही होतेे, ज्यांचा लेबननच्या हिज्बुल्ला संघटनेवरही प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

इस्रायलनं या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यांना इथे एकाचवेळी दोन गोष्टी साधायच्या आहेत - इराणकडून हिज्बुल्लाला होणारा शस्त्रपुरवठा थांबवणं आणि सीरियात इराणचं प्राबल्य कमी करणं.

एक एप्रिलच्या त्याच हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनं दिला होता. त्यानंतर शनिवारी 13 एप्रिलला 'इस्रायलशी निगडीत' एक मालवाहू व्यापारी जहाज होरमुझ सामुद्रधुनीतून जात असताना इराणनं ताब्यात घेतलं.

यादरम्यानच इराण इस्रायलवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याया चर्चेला वेग आला. अमेेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडननी त्याविरोधात इराणला इशाराही दिला.

मग 14 एप्रिलला इराणनं इस्रायलवर तीनशे क्षेपणास्त्रं आणि ड्रोन डागली, ज्यातली बहुतांश अस्त्रं पाडण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.

या पूर्ण घटनाक्रमात केवळ इराण आणि इस्रायलच नाही तर इतर देशही गुंतले आहेत. 14 एप्रिलच्या हल्ल्यादरम्यान दागली गेलेली काही क्षेपणास्त्र इराक, सीरिया, येमेनमधल्या इराणसमर्थकांनीही दागली होती. ती पाडण्यात इस्रायलला अमेरिका, युके, फ्रान्सनं मदत केली तर जॉर्डननंही त्यांच्या हवाई हद्दीत आलेली काही प्रोजेेक्टाईल्स पाडल्याचं म्हटलं आहे.