इस्रायल गाझा आणि लेबनॉनच्या सीमेवर व्हाईट फॉस्फरसचे हल्ले का करतंय?

व्हाईट फॉस्फरस

फोटो स्रोत, REUTERS/EVELYN HOCKSTEIN

फोटो कॅप्शन, व्हाईट फॉस्फरस

गेल्या सहा महिन्यांपासून इस्रायल दक्षिण लेबनॉनच्या सीमावर्ती भागात व्हाईट फॉस्फरसचे बॉम्बहल्ले करत आहे. व्हाईट फॉस्फरस हा एक विषारी वायू असून याच्या वापरामुळे डोळे आणि फुफ्फुसांना इजा होते आणि तीव्र जळजळ होऊ शकतो.

व्हाईट फॉस्फरसच्या वापराबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात अतिशय कठोर नियम आहेत. मात्र, इस्रायली लष्कराने गाझा आणि लेबनॉनमधील अतिरेक्यांविरुद्ध या शस्त्राचा वापर करणे कायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

इस्रायलच्या लष्कराकडून केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांबाबत मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली असून, हे युद्धाच्या नियमांचं उल्लंघन आहे आणि युद्धकाळात केलेला गुन्हा म्हणून याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे, अमेरिकेने म्हटलंय की अमेरिका गाझा आणि लेबनॉनमध्ये इस्रायलकडून व्हाईट फॉस्फरसच्या वापराची चौकशी करणार आहे.

त्यामुळे इस्रायलकडून केला जाणारा व्हाईट फॉस्फरसचा वापर का कायदेशीर आहे का? नागरी वस्तीजवळ अशा पद्धतीचे हल्ले करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे का? की युद्धकाळात असे हल्ले होणं ही सामान्य गोष्ट आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

याआधीदेखील इस्रायलवर व्हाईट फॉस्फरसचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले होते. 2013 मध्ये इस्रायली सैन्याने सांगितलं होतं की ते युद्धभूमीवर स्मोकस्क्रीन तयार करण्यासाठी व्हाईट फॉस्फरसचा दारूगोळा वापरणं थांबवणार आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात असे आरोप झाल्यानंतर, जेव्हा इस्रायली लष्कराला या आरोपांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, सध्या गाझामध्ये व्हाईट फॉस्फरस शस्त्रे वापरल्याबद्दल कोणतीही माहिती नाही. इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर कोणतंही भाष्य त्यावेळी केलं नव्हतं.

आता मात्र हा वापर कायदेशीर असल्याचं इस्रायली लष्कराने स्पष्ट केलंय.

'आम्हाला पांढऱ्या धुक्याने चहूबाजूंनी वेढलं होतं'

दक्षिण लेबनॉनमध्ये शेती करणारे 48 वर्षीय अली अहमद अबू समरा हे म्हणतात की, "हा पदार्थ हवेत पांढऱ्या धुक्याप्रमाणे दिसतो, पण जमिनीच्या संपर्कात येताच त्याची भुकटी बनते."

अली यांनी सांगितलं की, 19 ऑक्टोबर 2023ला त्यांचा संपूर्ण परिसर पांढऱ्या धुक्याने वेढलेला होता.

अली अहमद अबू समरा
फोटो कॅप्शन, अली अहमद अबू समरा

व्हाईट फॉस्फरसच्या हल्ल्याबाबत ते म्हणाले की, "लोक म्हणतात की त्याचा वास लसणासारखा आहे, पण तो त्याहून वाईट आहे. तो वास सहन करणे कठीण आहे. कुजलेल्या गटारांच्या वासापेक्षाही त्याचा घाणेरडा वास येतो."

व्हाईट फॉस्फरसचे गोळे अत्यंत ज्वलनशील आणि विषारी असतात.

लेबनॉनमधल्या धाहिरा गावात राहणारे अली म्हणतात की, "आमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जर आम्ही आमचे तोंड आणि नाक ओल्या कपड्यांनी झाकले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो."

हिजबुल्लाह विरुद्ध इस्रायल

इस्त्रायली सैन्याने ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान लेबनॉनमधील चार ठिकाणी व्हाईट फॉस्फरसचा एकापेक्षा जास्त वेळा वापर करून हल्ला चढवल्याची बीबीसीने स्वतंत्रपणे खात्री केली आहे.

गेल्या वर्षी गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायल-लेबनॉन सीमेवरही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जीवित व वित्तहानी झाली असून मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाले आहेत.

लष्कर

फोटो स्रोत, MOSTAFA ALKHAROUF/ANADOLU VIA GETTY IMAGES

इराण आणि हमासशी जवळचे संबंध असलेल्या हिजबुल्लाची गणना जगातील त्या 'नॉन स्टेट मिलिटरी फोर्सेस'मध्ये होते, ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील लढाईत हिजबुल्लाहच्या सैनिकांनी रॉकेट आणि ड्रोनने हल्लेही केले आहेत. इस्रायलने हिजबुल्लाहच्या हल्ल्यांना उत्तर देताना व्हाईट फॉस्फरसच्या वापरासह जोरदार गोळीबार आणि हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रक्षेपकातून बाहेर पडल्यानंतर व्हाईट फॉस्फरसचे गोळे ऑक्सिजनच्या संपर्कात येतात आणि दाट पांढरा धूर हवेत पसरतो. या धुरामुळे जमिनीवरून हल्ला करणाऱ्या सैनिकांना लपण्याची आणि शत्रूच्या नजरेपासून काहीकाळ दूर राहण्याची संधी मिळते.

व्हाइट फॉस्फरस म्हणजे काय?

व्हाइट फॉस्फरस त्याच्या ज्वलनशील गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हा एक रासायनिक पदार्थ आहे जो ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर जळतो. तोफांचे गोळे, बॉम्ब आणि रॉकेटमध्ये याचा वापर केला जातो.

व्हाइट फॉस्फरस ऑक्सिजनच्या संपर्कात आला की, रासायनिक अभिक्रियेतून 815 अंश सेल्सिअस पर्यंत तीव्र उष्णता निर्माण होते.

 गाझा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बुधवारी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यानंतर पांढरा धूर बाहेर पडताना दिसतोय.

व्हाईट फॉस्फरस जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा ज्वलनामुळे प्रकाश आणि दाट धूर तयार होतो ज्याचा वापर लष्करी कारवायंमध्ये केला जातो. परंतु माणसे व्हॉइट फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास शरीराला भयंकर जखमा होतात.

यामुळे भयंकर आग लागू शकते आणि इमारती, पायाभूत सुविधा नष्ट होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं.

व्हॉइट फॉस्फरस कसा वापरला जातो?

व्हाइट फॉस्फरसचा वापर जमिनीवरील लष्करी कारवायांमध्ये सैनिकांना लपविण्याच्या उद्देशाने केला जातो. व्हॉइट फॉस्फरसचा वापर करून लष्करी सैनिक एक स्मोकस्क्रीन तयार करतात आणि आपल्या हालचाली लपविण्याचा प्रयत्न करतात.

व्हाइट फॉस्फरस इन्फ्रारेड ऑप्टिक्स आणि शस्त्र ट्रॅकिंग प्रणालीमध्ये हस्तक्षेप करतं आणि लष्करी दलांना टँकविरोधी क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांपासून संरक्षण देतं.

यूएन कार्यालयाला लागलेली आग.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलने वापरलेल्या पांढऱ्या फॉस्फरसमुळे जानेवारी 2009 मध्ये गाझा येथील यूएन कार्यालयाला लागलेली आग.

व्हाइट फॉस्फरस जमिनीवरील स्फोटापेक्षा हवेतील स्फोटादरम्यान मोठ्या क्षेत्राला व्यापतो आणि मोठ्या लष्करी कारवायांना लपवण्यात मदत करतो.

गाझासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हवेत पांढर्‍या फॉस्फरसचा स्फोट घडवणं हे तिथल्या लोकांच्या जीवासाठी धोकादायक आहे.

व्हाइट फॉस्फरसचा वापर आग लावणारे शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. 2004 मध्ये इराकमधील फालुजाच्या दुसऱ्या लढाईदरम्यान लपलेल्या हल्लेखोरांचा पर्दाफाश करण्यासाठी व्हाइट फॉस्फरसचा वापर करण्यात आला होता.

व्हाइट फॉस्फरसमुळे किती नुकसान होते?

व्हाइट फॉस्फरसच्या संपर्कात आल्यावर माणसांच्या त्वचेला तीव्र जळजळ जाणवते, ही जळजळ हाडांपर्यंत पोहोचू शकते. या जळजळीमुळे झालेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो आणि संसर्ग होण्याची शक्यता असते.

व्हाइट फॉस्फरसच्या जळजळीमुळे मानवी शरीराच्या केवळ 10 टक्के भागावर जखमा झाल्या तरी ते प्राणघातक ठरू शकतं.

त्याच्या संपर्कात आल्यावर माणसाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ शकतात.

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅलेस्टिनी सरकारने इस्रायलवर 10 ऑक्टोबर रोजी व्हाइट फॉस्फरसने गाझावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

व्हाइट फॉस्फरसमुळे झालेल्या दुखापतींमधून वाचलेल्यांना आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागतात, त्यांची हालचालीवर परिणाम होतो आणि त्यांच्या शरीरावर उरलेल्या जखमांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

व्हाइट फॉस्फरसमुळे लागलेल्या आगीमुळे घरं आणि इमारतींचेही नुकसान होऊ शकतं, पिके नष्ट होतात आणि पशुधनही मारलं जातं.

व्हाईट फॉस्फरसच्या वापराबाबत आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो?

लष्करी रणनीतीच्या दृष्टीने ही अत्यंत प्रभावी पद्धत मानली जाते. काही परिस्थितींमध्ये त्याचा वापर कायदेशीर देखील आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, नागरिकांचे संरक्षण करणे ही सर्वच देशांची जबाबदारी आहे.

गेल्या शंभर वर्षांत जगातील वेगवेगळ्या सैन्याने व्हाईट फॉस्फरसचा वापर केला आहे. सीआयएच्या म्हणण्यानुसार सोव्हिएत युनियनने दुसऱ्या महायुद्धात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.

2004 मध्ये इराकमध्ये इस्लामिक स्टेट आणि नंतर 2017 मध्ये सीरिया-इराकमध्ये त्याचा वापर केल्याचेही अमेरिकेने मान्य केले आहे. 2008-2009 मध्ये गाझामध्ये हे रसायन वापरल्याचे इस्रायलने कबूल केले होते.

परंतु संयुक्त राष्ट्राने जेव्हा इस्रायली सैन्यावर या प्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप केला तेव्हा इस्रायलने 2013 मध्ये सांगितले की ते लवकरच रासायनिक शस्त्रे वापरणे थांबवेल.

हिजबुल्लाचे सैनिक दोन किंवा चार जणांच्या गटात हल्ले करतात. ते लपण्यासाठी झुडुपांचा वापर करतात. हे सैनिक सीमेपलीकडून इस्रायली सैन्यावर रॉकेट डागतात.

इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यानंतर पांढरा धूर निघताना दिसत आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बुधवारी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यानंतर पांढरा धूर निघताना दिसत आहे.

सशस्त्र संघर्षांमध्ये व्हाइट फॉस्फरसच्या वापरावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीअंतर्गत अनेक बंधनं आहेत.

पारंपरिक शस्त्रास्त्रे वापराच्या (सीसीडब्ल्यू) प्रोटोकॉल III अंतर्गत नागरिक किंवा नागरी क्षेत्रांमध्ये आग लावणारे शस्त्र म्हणून व्हाइट फॉस्फरसचा वापर करण्यास मनाई आहे.

प्रोटोकॉल अंतर्गत, ते केवळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या तत्त्वांनुसार सिग्नलिंग, स्क्रीनिंग आणि चिन्हांकित करण्यासाठी वापरले जायला हवे.

सशस्त्र संघर्षांमध्ये पांढऱ्या फॉस्फरसच्या वापरावरून महत्त्वपूर्ण चर्चेला वाचा फोडली आहे, काहींनी नागरिक आणि पर्यावरणाला कमी हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने कडक नियम आणि अधिक देखरेखीची मागणी केली आहे.

सशस्त्र संघर्षांदरम्यान नागरिक आणि पर्यावरण या दोघांवर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी व्हाइट फॉस्फरसची शस्त्रे वापरताना सशस्त्र दलांनी सावधगिरी बाळगणे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे आणि अधिवेशनांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर अनेकदा चर्चा होताना दिसते.

इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे का?

रासायनिक शास्त्रांमध्ये व्हाईट फॉस्फरसचा समावेश केला जात नाही. संयुक्त राष्ट्रांच्यामते, प्रामुख्याने आग लावण्यासाठी किंवा लोकांना दुखापत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शस्त्रांवर बंदी आहे.

पण इस्रायलसह अनेक देश असं मानतात की व्हाईट फॉस्फरसचा वापर करून जर आग लावली गेली नाही आणि केवळ धूर तयार करण्यासाठी याचा वापर केला गेला तर तो संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचं उल्लंघन करत नाही.

पण ह्युमन राइट्स वॉच ही मानवाधिकार संस्था त्यांच्या मताशी सहमत नाही.

 व्हाईट फॉस्फरस

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, व्हाईट फॉस्फरस
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ह्युमन राइट्स वॉचचे रामजी कैस म्हणतात की, "संयुक्त राष्ट्रांच्या नियमांमध्ये अनेक उणीवा आहेत, विशेषत: आग लावणाऱ्या शस्त्रांबाबत. परंतु आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यात असं नमूद केलेलं आहे की युद्धातील सर्व पक्षांनी नागरिकांना इजा पोहोचवण्यापासून परावृत्त झालं पाहिजे. आणि त्यात व्हाईट फॉस्फरसचा विशेष उल्लेख आहे."

त्यामुळे इस्रायलने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन केले आहे का? याबाबत बोलताना वकील आणि लष्करी तज्ज्ञ असणारे प्राध्यापक बिल बूथबी म्हणतात की, "इस्रायलचा दावा आहे की ते धूर पसरवण्यासाठी व्हाईट फॉस्फरसचा वापर करतात. पण गावकरी म्हणत आहेत की जिथे हल्ला झाला तिथे धूर पसरवण्याची गरजच नव्हती कारण तिथे बंदूकधारी सैनिक नव्हते.

व्हाईट फॉस्फरसचा वापर करून नेमकं कुणाला लक्ष्य केलं गेलं? या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालं तरच कळू शकेल की हे हल्ले करण्यास ज्यांनी मान्यता दिली त्यांच्या मनात नेमकं काय सुरु होतं."

प्राध्यापक बूथवी म्हणतात की 'प्रमाण' हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच लष्करी फायद्यांच्या तुलनेत किती नुकसान झालं याचं प्रमाणही शोधलं पाहिजे.

बीबीसीने इस्रायली लष्कराला विचारलं की, "व्हाईट फॉस्फरसचा वापर करण्यामागे नेमकं लक्ष्य काय होतं? कोणतं उद्दिष्ट त्यांना साध्य करायचं होतं?" तर यावर बोलताना इस्रायली लष्कराने सांगितलं की, "ही माहिती गुप्त आहे आणि ती सार्वजनिक केली जाऊ शकत नाही."

हेही नक्की वाचा