इस्रायल-हमास संघर्ष : गाझापट्टीतलं जीवन नेमकं कसं आहे जाणून घ्या 10 मुद्द्यांमधून

इस्रायल-हमास संघर्ष

फोटो स्रोत, REUTERS

"आजपासून गाझामध्ये वीज, पाणी, अन्न आणि इंधन काहीही मिळणार नाही. आम्ही गाझापट्टीची संपूर्ण नाकेबंदी करणार आहोत."

हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी गाझा पट्टीची सगळ्या बाजूंनी नाकेबंदी करण्याची घोषणा केली.

आधी हमासने रॉकेट हल्ले चढवले आणि त्यानंतर इस्रायलने गाझाचं अन्न - पाणी आणि वीज पुरवठा तोडून बॉम्बहल्ले सुरु केले. मुंबईच्या निम्मा आकार गाझाचा आहे.

पण तिथे साधारण वीस लाख लोक राहतात आणि त्यामुळे सतत युद्ध आणि संघर्ष पाहणारा हा प्रदेश आहे तरी काय? गाझाच्या नियंत्रणावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये इतकं वैर का आहे?

समजून घेऊया दहा प्रश्नांच्या माध्यमातून

1. हिंसेची सुरुवात कशी झाली?

7 ऑक्टोबरला हमासने दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 1,200 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं.

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला आणि त्यातही सुमारे 1,000 पॅलेस्टाईनचे नागरिक मारले गेले.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासचा पराभव करून मध्यपूर्वेचं रुपडंबदलण्याची शपथ घेतलीय. त्यानंतर 9 ऑक्टोबरला इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी गाझा पट्टीला वेढा घातला आणि त्या भागात जाणारं पाणी, वीज, इंधन, अन्न सगळं काही रोखल्याची घोषणा केली.

2. अन्न, पाणी, वीज तोडल्यामुळे काय घडतंय?

गाझापट्टीत राहणाऱ्या 80% लोकांना आंतरराष्ट्रीय मदतीची गरज होती आणि आता इस्रायलने केलेल्या नाकेबंदीमुळे तेथील परिस्थिती अधिकच बिकट झालीय.

गाझामध्ये सुरु असलेला एकमेव वीजनिर्मिती प्रकल्प इंधन संपल्यामुळे बंद पडलाय आणि आता रोज दवाखान्यात दाखल केल्या जाणाऱ्या जखमींना जनरेटवर अवलंबून राहावं लागत आहे.

काही दवाखान्यांमध्ये असणाऱ्या इंधनाचा साठा थोडाच वेळ चालू शकेल आणि नंतर या दवाखान्यांमध्ये वीज नसेल.

इस्रायलने गाझाला होणारा पाणीपुरवठा बंद केल्यामुळं तिथे राहणाऱ्या सहा लाख लोकांना पिण्याचं पाणी मिळणार नाहीये. गाझापट्टीतल्या पाण्याच्या पंपांना आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना देखील इंधनाची गरज भासणार आहे.

हमास

फोटो स्रोत, REUTERS

इस्रायल-गाझा सीमेवर असणाऱ्या केरेम शालोम मार्गावरून या दोन्ही भागात मालवाहतूक केली जाते. इस्रायलने हा मार्ग आता बंद केला आहे आणि त्यामुळे गाझामध्ये राहणाऱ्या लोकांकडे असणाऱ्या अन्नाचा साठा आता कमी होतोय.

संयुक्त राष्ट्रांनी सांगितलंय की गाझातल्या तीनपैकी एका दुकानात पुरेसा माल आता पुरेशा वस्तू नाहीयेत. केवळ दोनच आठवडे पुरेल एवढं अन्न या सगळ्या दुकानांमध्ये उरलं आहे.

जिवाच्या भीतीने स्वतःच घर सोडून पळून जावं लागलेल्या विस्थापितांची संख्या आता दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे यापैकी अनेकांची घरं इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे उद्धवस्त झाली आहेत.

3. गाझामध्ये विजेचा पुरवठा का थांबवला आहे?

हमासने केलेल्या हल्ल्याच्या आधीच गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना वीज मिळत नव्हती. दिवसाला फक्त तेरा तास वीज असायची आणि त्यानंतर तिथे संपूर्ण काळोख असायचा असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात सांगितलं आहे.

गाझाला होणाऱ्या एकूण विजेच्या पुरवठयापैकी दोन तृतीयांश पुरवठा हा इस्रायलकडून होत होता. उर्वरित विजेसाठी गाझा पट्टीत असलेलं एकमेव वीजनिर्मिती केंद्र वापरलं जायचं.

या दोन्ही स्रोतांकडून मिळालेली वीजही तिथे राहणाऱ्या लोकांसाठी अपुरीच होती. एकूण मागणीच्या सुमारे निम्मी वीज गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना दिली जात होती.

बॉम्बहल्ले

फोटो स्रोत, REUTERS

वारंवार विजेचा पुरवठा खंडित होत असल्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना जनरेटर वापरावे लागत असत. मात्र हे जनरेटरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हते कारण त्यासाठी लागणारं इंधन तर कमी होतंच पण जनरेटरच्या सुट्या भागांचा पुरवठाही व्यवस्थित होत नसायचा.

इस्रायलने काही वस्तूंचा लष्करी आणि नागरी कारणांसाठी 'दुहेरी वापर' होऊ शकतो असं सांगून त्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. याच यादीत जनरेटरचे सुटे भागही आहेत त्यामुळे गाझा पट्टीत हे भाग कमी प्रमाणात मिळतात.

4. गाझातून बाहेर पडण्याचा मार्ग शिल्लक आहे का?

या युद्धातून वाचण्यासाठी गाझा पट्टी सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसमोर फारसे मार्ग उपलब्ध नाहीयेत.

गाझा पट्टीच्या उत्तरेला असणारी इरेझ सीमा इस्रायलने अनिश्चित काळासाठी बंद केलीय आणि दक्षिणेकडे इजिप्तला लागून असणाऱ्या राफा सीमेवरही इस्रायलने बॉम्बहल्ला केल्याने सीमा ओलांडून इजिप्तमध्ये जाण्याचा हा मार्गदेखील 9 आणि 10 ऑक्टोबरला इजिप्तने बंद केला होता.

हमासने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या या तणावाच्या आधीच गाझामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सहजपणे तो प्रदेश सोडून जाता येत नव्हतं.

त्यासाठी त्यांना इस्रायलच्या प्रशासनाकडून देण्यात येणार परवाना मिळवणं आवश्यक होतं. हा परवाना देखील केवळ रोजंदारी करणारे मजूर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, व्यापारी आणि मदतकार्यात सहभागी असणाऱ्यांनाच दिला जायचा.

गाझा आणि इस्रायल सीमा

फोटो स्रोत, REUTERS

ऑगस्टमध्ये, 58,600 लोकांना इरेझमार्गे सीमा ओलांडण्याची परवानगी देण्यात आलेली होती. 2022 च्या मासिक सरासरीपेक्षा हे प्रमाण 65% जास्त असल्याचं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.

गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना जर इजिप्तच्या सीमेवर असणाऱ्या राफामार्गे त्यांचा देश सोडायचा असेल तर जाण्याच्या काही आठवडे आधी पॅलेस्टाईनच्या प्रशासनाकडे त्यासाठी अर्ज करावा लागतो.

त्यांची परवानगी मिळाल्यानंतर इजिप्त सरकारकडे त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि अत्यंत कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना तशी परवानगी दिली जाते.

इजिप्तने ऑगस्टमध्ये 19,600 लोकांना रफाह मार्गे गाझा सोडण्याची परवानगी दिली, जुलै 2012 नंतर इजिप्तने गाझा सोडायला परवानगी दिलेल्या नागरिकांची ही सगळ्यांत मोठी संख्या होती.

5. गाझामध्ये नेमके किती लोक राहतात आणि त्यांची घरं कशी उध्वस्त झाली आहेत?

जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या प्रदेशांमध्ये गाझाचा समावेश केला जातो.

गाझापट्टीतील प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये सुमारे 5,700 लोक राहतात. म्हणजेच काय तर लंडनमध्ये जेवढी लोकसंख्येची घनता आहे तेवढीच गाझामध्येसुद्धा आहे. पण गाझाच्या मुख्य शहरात प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये सुमारे 9,000 लोक राहतात.

गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 75% पेक्षा जास्त लोकांनी निर्वासित म्हणून त्यांची नोंद केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं आहे.

सुमारे 17 लाख निर्वासित या प्रदेशात राहतात आणि त्यापैकी तब्बल पाच लाख लोकांनी गाझा पट्टीच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या छावण्यांमध्ये आश्रय मिळवलेला आहे.

रात्रीच्या वेळी भारनियमन

फोटो स्रोत, REUTERS

इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या कट्टरतावाद्यांमध्ये सतत सुरु असलेलं युद्ध आणि बांधकामाच्या संथ वेगामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांना घरं उपलब्ध नाहीयेत.

संयुक्त राष्ट्रांनी जानेवारीमध्ये सांगितलं की 2014 पासून नष्ट झालेल्या 13,000 घरांपैकी सुमारे 2,200 घरांना पुन्हा बांधण्यासाठी लोकांना निधी मिळालेला नाहीये.

काही प्रमाणात नुकसान झालेल्या 72,000 घरांना दुरुस्तीसाठी कोणतीही मदत मिळालेली नाही. बांधकामासाठी लागणारी सामग्री मिळत नसल्यामुळं देखील बांधकाम करताना अडचणी येत आहेत.

'दुहेरी वापर' करता येऊ शकणाऱ्या वस्तूंवर इस्रायलने निर्बंध लादल्यामुळे बांधकामासाठी लागणारी यंत्र गाझापट्टीत सहज उपलब्ध होत नाहीयेत.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,000 घरं उध्वस्त झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुमारे 500 घरांचं कधीही न भरून काढता येणारं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलंय.

6. गाझातल्या आरोग्यव्यवस्थेवर किती ताण पडलाय?

गाझाच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर नेहमी ताण असतो. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईमुळे या आरोग्य सुविधांवर वाईट परिणाम होतो.

यासोबतच गाझापट्टीमध्ये अनेक आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नाहीयेत.

इस्रायल आणि इजिप्तने केलेली नाकाबंदी, वेस्टबँक मधून काम करणाऱ्या पॅलेस्टाईन सरकारकडून आरोग्य व्यवस्थेवर होणारा अत्यल्प खर्च, आणि पॅलेस्टाईनच्या प्रशासनामध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वाद या प्रमुख तीन कारणांमुळे गाझा पट्टीतली आरोग्यव्यवस्था मोडकळीस आल्याचं संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं आहे.

हमास आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेला वाद हेदेखील एक कारण आहे ज्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या सामान्य नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीयेत.

गाझातली आरोग्यव्यवस्था

फोटो स्रोत, REUTERS

गाझा पट्टीतील ज्या रुग्णांना वेस्ट बँक किंवा पूर्व जेरुसलेम मधल्या दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी जायचं असेल, त्यांना आधी पॅलेस्टाईनच्या प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो.

त्यांची परवानगी मिळाल्यानंतर या रुग्णांना गाझा पट्टीतून बाहेर पाडण्यासाठी इस्रायलच्या अधिकाऱ्यांची परवानगी मिळवावी लागते आणि त्यानंतर त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारे उपचार घ्यायला चांगल्या दवाखान्यात जाता येतं.

2008 ते 2022 पर्यंत, 70,000 पेक्षा जास्त रुग्णांनी केलेला अर्ज नाकारण्यात आलेला आहे किंवा प्रलंबित ठेवण्यात आला आहे. काही रुग्णांनी केलेल्या अर्जाच्या प्रतिसादाची वाट बघत असतानाच त्यांचा जीव गेलेला आहे.

7. गाझा पट्टीत शेती किंवा मासेमारी करता येते का?

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार गाझामध्ये राहणाऱ्या सुमारे 13 लाख लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही. अन्नाची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून असणाऱ्या या लोकसंख्येला मदतीची गरज आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये केरेम शालोम आणि रफाहमार्गे इजिप्त आणि इस्रायलने गाझामध्ये जाण्याची परवानगी दिलेल्या एकूण 12,000 ट्रकपैकी 22% ट्रकमधून अन्न पुरवठा केला गेला होता.

गाझा

फोटो स्रोत, REUTERS

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शेतजमीन आणि मासेमारीवर इस्रायलने वेगवेगळे निर्बंध लादल्यामुळे गाझामध्ये राहणारे नागरिक स्वतःच अन्न स्वतः पिकवू शकत नाहीत.

इस्रायल आणि गाझाच्या सीमेवर इस्रायलने सुमारे 60 किलोमीटर लांब एक भिंत बांधली आहे. त्या भिंतीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

या भागात असणारी जमीन एखाद्या शेतकऱ्याच्या नावे असली तरीही तिथे त्याला शेती करता येत नाही. एवढंच काय तर या भिंतीपासून सुमारे 300 मीटरपर्यंत शेतकरी सोडून इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

भूमध्य समुद्रात मासेमारी करण्यावरही इस्रायलने निर्बंध घातले आहेत. गाझामध्ये राहणारे मच्छीमार त्यांच्या किनाऱ्यापासून केवळ काही अंतरावरच जाऊन मासेमारी करू शकतात.

सध्या गाझावासियांना फक्त 6 ते 15 नॉटिकल मैल म्हणजेच 11 ते 28 किलोमीटर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याची परवानगी दिलेली आहे. सुमारे 5,000 मच्छिमार आणि संबंधित कामगारांच्या आयुष्यावर या निर्बंधांमुळे वाईट परिणाम होतो आहे.

आताच्या वादात इस्रायलने केरेम शालोम मार्ग तर बंद केलाच आहे पण मासेमारीवरही कडक बंदी घातलेली आहे.

इस्रायलने घातलेल्या नाकेबंदीची कोंडी फोडण्यासाठी हमासने इजिप्त आणि गाझाला जोडणाऱ्या गुप्त बोगद्यांचं एक जाळं उभारलं आहे.

याच बोगद्यांमधून सामानाची नेआण करता येते. यासोबतच हमासने एक भूमिगत नियंत्रण केंद्रही उभं केलं आहे.

इस्रायलचं असं म्हणणं आहे की या बोगद्यांचा वापर करून हमासचे कट्टरपंथी हत्यारांची तस्करी करतात. त्यामुळे इस्रायल नेहमीच या बोगद्यांना लक्ष्य करत असतं.

8. गाझापट्टीतली पाण्याची परिस्थिती काय आहे?

गाझा पट्टीत राहणाऱ्या 95% लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही.

किनार्‍यावर असणाऱ्या पाण्याच्या साठ्यांमधून अतिरिक्त उत्खनन तसंच समुद्राचं पाणी स्वच्छ पाण्याच्या साठ्यात मिसळल्यामुळे आणि सांडपाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे, गाझामध्ये नळातून येणारं पाणी खारट आणि प्रदूषित झालं आहे.

हे पाणी अजिबात पिण्यास योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक व्यक्तीसाठी दिवसाला 100 लीटर पाणी वापरण्याची मर्यादा आखून दिलेली आहे.

पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि आंघोळीसाठी माणसाला एवढ्या पाण्याची गरज असते. गाझामध्ये प्रत्येक व्यक्ती दिवसाला सुमारे 84 लिटर पाणी वापरतो. त्यापैकी फक्त 27 लिटर पाणी हे माणसाच्या वापरासाठी योग्य आहे.

गाझापट्टीतली पाण्याची परिस्थिती

फोटो स्रोत, REUTERS

इस्रायलने हमासला होणारा पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा थांबवल्यामुळे गाझामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी 10 ऑक्टोबरला दिलेला होता.

स्थानिक प्रशासनाने गाझामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणीबाणीच्या परिस्थितीसाठी पाणी वाचवण्याच्या सूचना केल्या आहेत आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्पही इंधन नसल्यामुळे बंद पडले आहेत परिणामी लाखो लिटर सांडपाणी रोज समुद्रात सोडलं जातंय.

9. शाळांचा छावणी म्हणून उपयोग केला जातोय

संयुक्त राष्ट्रांकडून गाझा पट्टीत राहणाऱ्या लहान मुलांसाठी ज्या शाळा चालवल्या जातात त्या शाळांच्या इमारतींचा उपयोग नागरिक आता आश्रय घेण्यासाठी करत आहेत.

गाझाच्या वेगवेगळ्या भागातून निर्वासित झालेल्या लोकांसाठी या शाळा हक्काचा निवारा बनल्या आहेत.

शाळांचा छावणी म्हणून उपयोग केला जातोय

फोटो स्रोत, REUTERS

निर्वासित झालेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या UNRWA च्या मते, गाझा मधील 278 शाळांपैकी 71% शाळा या दोन सत्रात चालवल्या जातात.

2022 मध्ये एका वर्गात सरासरी 41 विद्यार्थी शिकत होते. गाझामध्ये 2021 ला 15-19 वयोगटातील मुलांचा साक्षरता दर 98% एवढा होता.

10. बेरोजगारीचा उच्चांक

सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकनुसार, गाझामध्ये जगातील सर्वांत तरुण लोकसंख्या आहे, ज्यात जवळपास 65% लोकसंख्येचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे.

लंडनमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांचं प्रमाण फक्त 20% आहे तर सुमारे 65% लोक हे 25 ते 64 वयाचे आहेत. त्या तुलनेत गाझामध्ये जास्त संख्येने तरुण राहतात.

गाझामध्ये 80% पेक्षा जास्त लोक गरीब आहेत, तेथील बेरोजगारीची पातळी जगातील सर्वोच्च आहे. 2022 मध्ये बेरोजगारीचं प्रमाण 45% पर्यंत पोहोचलं होतं.

तरुणांमध्ये असणाऱ्या बेरोजगारी देखील खूपच जास्त आहे. 19 ते 29 वयोगटातील 73.9% लोक बेरोजगार आहेत. त्यांनी पदविका किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे हे विशेष.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)