'गॅस' सोडल्यावर दुर्गंध का येतो? तुमच्या पोटात नेमकं काय चाललंय ते जाणून घ्या?

फोटो स्रोत, Getty Images
आपल्याला निरोगी राहायचं असेल, तर आधी आपली पचनसंस्था निरोगी असणं गरजेचं आहे.
आपल्या पोटाचे आरोग्य आणि त्यावर परिणाम करणारे विविध घटक समजून घेणे खूप गरजेचं आहे. जेवणापासून गॅसपर्यंत, झोप, ताण-तणाव, जंतू आणि आहारापर्यंत सर्व जाणून घेतल्यास पोटाचे आरोग्य टिकवता येतं आणि दुर्गंधीचीही समस्या टाळता येते.
लहान मुलं आणि मोठ्या माणसांमध्ये पोटाशी संबंधित होणाऱ्या त्रासांबद्दल आम्ही गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट बसुमणी यांच्याशी चर्चा केली. आमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुढीलप्रमाणे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न: पोटदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
उत्तर: माणसाचं पोट पँडोरा बॉक्ससारखं असतं. पोटात नेमकं काय चाललंय, हे आपल्याला पूर्णपणे समजत नाही. आदल्या रात्री जास्त खाल्लं, बाहेरचं अन्न नीट पचलं नाही किंवा अपचन झालं, तर पोटदुखी होऊ शकते. भूक लागत नाही. हे सर्व सामान्य आहे.
आराम मिळावा म्हणून सोडा, लिंबूपाणी, ताक, जिरे, आलं यांसारख्या गोष्टी घेतल्या, तर त्यात काही गैर नाही. पण पोटदुखी होण्यामागे 100 पेक्षा जास्त कारणं असू शकतात.
डॉक्टरांकडे कधी जावं?
उत्तर:
- झोप मोडेल इतकी तीव्र वेदना
- काहीही वेगळं खाल्लं नसतानाही अचानक होणारी पोटदुखी
- 4 ते 5 तास सतत राहणारी वेदना
- 4 ते 5 आठवडे टिकून राहणारी वेदना
- दिवसेंदिवस पोटदुखी वाढत जाणं
- पाठीकडे पसरत जाणारी वेदना
- खूप अशक्तपणा येणं, चक्कर येणं
- हिमोग्लोबिन कमी असणं
- लोहाची कमतरता.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्नः जेवण केल्यानंतर लगेच धुम्रपान केल्यास कोणत्या समस्या उद्भवतात?
उत्तरः तंबाखू शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करते. पायापासून डोक्यापर्यंत तिचा प्रभाव असतो. तंबाखूमुळे पोट हलकं वाटू शकतं, त्यामुळे भूक कमी होऊ शकते. पण स्फिंक्टर स्नायू (शरीरातील गोलाकार किंवा अंगठीच्या आकाराचे स्नायू) सैल झाले, तर पोटातील आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाण्याची समस्या वाढते. म्हणूनच जेवणानंतर धूम्रपान करणं चांगलं नाही.
प्रश्नः सकाळी झोपेतून उठताच तोंडातील लाळ गिळू शकतो का?
उत्तरः लाळेत जंतुनाशक गुणधर्म असतात. ती वेदना कमी करण्याचं कामही करते. मुलांना दुखापत झाली असेल तर तिथे थोडी लाळ लावणं काही अंशी फायदेशीर ठरतं. कारण लाळेमध्ये वेदनाशामक आणि जंतुसंसर्ग रोखण्याचा (अँटिबायोटिकसारखा) परिणाम असतो.
लाळेमध्ये चांगल्या प्रकारचे जंतू (बॅक्टेरिया) जास्त असतात. ते वाईट जंतूंना वाढू देत नाहीत. यालाच 'कम्पिटिटिव्ह इनहिबिशन' (स्पर्धात्मक प्रतिबंध) असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्नः पोटातील अल्सर आणि तोंडातील अल्सर यांच्यात काही संबंध आहे का?
उत्तरः हे अर्ध सत्य आहे. पोट म्हणजे फक्त बाहेरच्या पोटाचा भाग नाही. पचनसंस्था सुमारे 8 मीटर लांब असते. लहान आतड्याच्या शेवटच्या भागातील अगदी छोटीशी जखमसुद्धा तोंडातील बॅक्टेरियाच्या प्रभावाखाली येऊ शकते.
तोंडात अल्सरची (जखम) अनेक कारणं असू शकतात. पोटाशी संबंध नसतानाही सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसससारखे ऑटोइम्युन आजार किंवा लायकेन प्लॅनससारख्या स्थितीमुळेही तोंडात जखमा होऊ शकतात. अशा वेळी पोटातील त्रासामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या येऊ शकते.
प्रश्नः पचनसंस्था (पोटातील आतडी) निरोगी ठेवण्यासाठी काय करावं?
उत्तरः पोटातील आतड्यांचं आरोग्य आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीवर अवलंबून असतं. या गोष्टी योग्य असतील, तर आतडे आपोआप स्वतःची काळजी घेतात.
रात्रीच्या वेळी आतडे जणू स्वच्छता कर्मचाऱ्यासारखं काम करतात. आपण झोपलेलो असताना ते स्वतःला स्वच्छ करतात. तीन तास काहीही खाल्लं नाही, तर लहान आतड्यात काहीच राहत नाही. या अवस्थेला 'जेजुनम' असं म्हणतात. जेजुनम म्हणजे आतडी रिकामी असणं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न: आतड्यांच्या आरोग्यासाठी काय करावं?
उत्तरः
- ताणतणाव न घेता पुरेशी झोप घ्यावी.
- प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ खाणे टाळावेत.
- समतोल आहार घ्या. त्यात पुरेसं प्रोटीन, व्हिटॅमिन डी, लोह (आयर्न) आणि भाज्या-फळांतून मिळणारं फायबर असावं.
- बर्गर, पिझ्झा यांत भाज्या फारच कमी असतात. त्यामुळं फायबर मिळत नाही आणि असे पदार्थ पोटातील आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.
हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर:
- इरिटेबल बोवेल सिंड्रोम (आतड्यांचा त्रास)
- जेवताना उलटी आल्यासारखं वाटणं
- दाहक आतड्यांचा रोग
- आतड्यांचा कॅन्सर
- पार्किन्सन्स रोग
- नैराश्य
- त्वचेची ॲलर्जी
- सांधेदुखीची शक्यता वाढते

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्नः दुर्गंधी असलेला गॅस (वायू) कशामुळे होतो? हे पोटातील समस्येचे संकेत आहे का?
उत्तरः फायबर पचवताना गॅस तयार होतो. हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर निघतात. मिथेन आणि सल्फाइड दाबाने बाहेर येत असल्यामुळे दुर्गंधी येते.
काही बॅक्टेरिया आपल्या खाण्याच्या सवयींमुळे वाढतात. काही पदार्थांचा वास दुर्गंधी निर्माण करतात. तसेच पोटाचे आरोग्य, झोप, ताणतणाव, बॅक्टेरिया- ही सर्व दुर्गंधीची कारणं आहेत. सकाळी उठल्यावर गॅस होणे नैसर्गिक आहे.
दररोज 20 ते 30 पेक्षा जास्त वेळा आवाजासह गॅस येत असेल, तर पोटातील जंतू का बदललेत हे तपासावं लागेल. हे अन्नामुळे आहे की इतर कारणांमुळे, ते समजून घेऊन उपाय शोधावा लागेल.
प्रश्नः पोटाच्या आरोग्यासाठी ताकात भिजवलेल्या शिळ्या भाताबद्दल तुमचं काय मत आहे?
उत्तरः यात काहीच शंका नाही. चडन्नमला (ताकात भिजवून ठेवलेला शिळा भात) 10 पैकी 10 गुण देता येतील. हे आरोग्यदायी अन्न आहे. यात प्रोबायोटिक्स असतात पण जे जास्त खाल्ल्यास पचायला जड जाऊ शकतं. चडन्नममध्ये कॅलरीज आणि शुद्ध कार्बोहायड्रेट्स (कर्बोदके) असतात. पण ते योग्य प्रमाणातच घेतलं पाहिजे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











