पाण्यात सुरकुतणाऱ्या बोटांचे आश्चर्यकारक फायदे

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Neil Juggins/Alamy

    • Author, रिचर्ड ग्रे
    • Role, बीबीसी फ्युचर

हात आणि पायांची बोट काही वेळ पाण्यात ठेवली की सुक्या मेव्यासारखी सुरकुतात. हे कशामुळे होत असावं? मानवी उत्क्रांतीच्या काळात हे घडलं असावं का? माणसाला याचा काही फायदा असेल का? याचबद्दल जाणून घेऊया, या लेखामध्ये…

आंघोळ करताना जास्त वेळ बोटं पाण्यात राहिली किंवा स्विमिंग करताना जास्त वेळ पाण्यात राहिलो, तर हात आणि पायांच्या बोटांची त्वचा सुरकुतते. ज्या बोटांवर हलक्या एपिडर्मिसचे तलम वलय असलेली नाजूक त्वचा दिसायची ती कुरूप वळ्यावळ्यांची होऊन जाते.

आपल्या सर्वांनाच हा अनुभव असला, तरी त्याचं आश्चर्य मात्र अजून शमलेलं नाही. विशेष म्हणजे पाण्याने हाता-पायाची बोटं सुरकुतात. पण चेहरा, हात, पाय, धड इथल्या त्वचेवर पाण्याचा काहीच परिणाम होत नाही.

गेली अनेक दशकं शास्त्रज्ञांना याचं कुतूहल आहे. असं कशामुळे होत असावं, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकं झाला आणि सुरू आहे. पण, आता शास्त्रज्ञांना निराळाच प्रश्न पडला आहे. सुरकुत्यांचं प्रयोजन काय, हा तो प्रश्न. सुरकुतलेली बोटं आरोग्याविषयक भविष्यवाणी करू शकतं का, हा सुद्धा तेवढाच जिज्ञासा चाळवणारा प्रश्न आहे.

कोमट पाण्यात म्हणजे साधारणतः 40 अंश सेल्सियस तापमानाच्या पाण्यात जवळपास साडेतीन मिनिटात बोटांना सुरकुत्या पडतात. तर थंड पाण्यात बोटांवर सुरकुत्या यायल्या जवळपास 10 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, जास्तीत जास्त सुरकुत्या पडायला साधारण 30 मिनिटांचा वेळ लागत असल्याचं अनेक संशोधनातून दिसून आलं आहे.

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Getty Images

हाताची किंवा पायाची बोटं जेव्हा जास्त वेळ पाण्यात राहतात. तेव्हा ऑस्मोसिस ही प्रक्रिया घडते. यात त्वचेच्या वरच्या थरातल्या पेशींमध्ये पाणी जमा होतं आणि त्यामुळे तो थर फुलतो. मात्र, 1935 साली शास्त्रज्ञांना असा संशय आला की या प्रक्रियेत यापेक्षाही जास्त काहीतरी दडलं आहे.

दंडातून हाताच्या पंज्यापर्यंत जाणाऱ्या मिडियन नर्व्हला दुखापत झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की, या रुग्णांच्या हाताच्या आणि पायांच्या बोटांना सुरकुत्या पडतच नाहीत. या मिडियन नर्व्हची अनेक कामं आहे. घाम येणं, रक्तवाहिन्यांचं आकुंचन यासारख्या क्रियाही ही नर्व्ह नियंत्रित करत असते. या नर्व्हला दुखापत झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की बोटांवर सुरकुत्या पडणं, हीसुद्धा याच मिडियन नर्व्हने नियंत्रित होणारी क्रिया आहे.

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Andrii Biletskyi/Alamy

1970 च्या दशकात डॉक्टरांना याचे आणखी पुरावे मिळाले. मिडियन नर्व्हला दुखापत झाल्यास रक्तपुरवठ्यात अडथळे येऊ शकतात. रक्तपुरवठ्याची ही प्रक्रिया सुप्त असते. त्यामुळे नर्व्ह डॅमेजच्या निदानासाठी काहीवेळ हात पाण्यात बुडवून ठेवणे, ही साधी-सोपी चाचणी घेतली जावी, असा प्रस्तावही या डॉक्टरांनी दिला होता.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुढे 2003 साली सिंगापूरमधल्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधले न्युरोलॉजिस्ट आयनार वाईल्डर-स्मिथ आणि ॲडेलिन चाऊ यांनी एक प्रयोग केला. त्यांनी प्रयोगात सहभागी सुदृढ व्यक्तींचे हात पाण्यात ठेवले आणि त्यांच्या ब्लड सर्क्युलेशनची नोंद केली. या व्यक्तींच्या बोटांना सुरकुत्या पडू लागताच बोटांमधला रक्तप्रवाह खूप कमी झाल्याचं त्यांना आढळलं.

मग त्यांनी या लोकांच्या बोटांमधल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यासाठी लोकल ॲनास्थेटिक क्रिम लावलं. त्यावेळीसुद्धा बोटांच्या त्वचेला सुरकुत्या पडल्याचं त्यांना दिसलं.

"बोटांना सुरकुत्या पडल्यावर त्यांचा रंग फिकट होतो. याचं कारण रक्तपुरवठा कमी झालेला असतो", असं बोटांच्या सुरकुतण्याचा अभ्यास करणारे न्युरोसायंटिस्ट आणि मॅन्चेस्टर मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीत मानसोपचारतज्ज्ञ असणारे निक डेव्हिस म्हणतात.

वाईल्डर-स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा निष्कर्ष मांडला की, पाण्यात हात बुडवल्यावर बोटांमध्ये असलेल्या घामाच्या नलिका उघडतात आणि त्यात पाणी जमा होतं. या प्रक्रियेमुळे त्वचेतील क्षारांचं प्रमाण बिघडतं. क्षारांच्या असंतुलनामुळे मज्जातंतूतील तंतूंना चालना मिळते ज्यामुळे घामाच्या नलिकांभोवती असलेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

यामुळे बोटांच्या पेराजवळच्या मांसल भागातली घनता म्हणजेच व्हॉल्युम कमी होतो. त्वचा खालच्या बाजूला खेचली जाते आणि ती सुरकुत्या पडल्यासारखी दिसते. त्वचेचा सर्वात वरचा थर ज्याला एपिडर्मिस म्हणतात ती खालच्या थराला कशी बांधून आहे, यावर सुरकुत्यांचा आकार अवलंबून असतो.

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Alamy

त्वचेचे बाह्य थर थोडे फुगल्यामुळे सुरकुत्या ठळक दिसतात, असंही काहींचं म्हणणं आहे. तथापि, ऑस्मोसिस प्रक्रियेत असं दिसून येतं की, त्वचेवर सुरकुत्या पडण्यासाठी ती 20 टक्के फुगणं गरजेचं आहे. मात्र, त्वचेचे वरचे थर थोडे फुगणे आणि खालची पातळी आकुंचन पावणे, ही प्रक्रिया एकाचवेळी झाल्यास सुरकुत्या लवकर उमटतात, असं या प्रक्रियेचं कॉम्प्युटर मॉडेलिंगद्वारे अभ्यास करणारे कॅटालोनियाच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीतील बायोमेकॅनिकल इंजिनीअर पाब्लो सेझ विनास यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "या दोन्ही गोष्टी होत असतील, तरच सुरकुत्या पडतात. हा न्युरोलॉजिकल रिस्पॉन्स नसेल, तर सुरकुत्या पडत नाही. काही व्यक्तींमध्ये असं होतं."

पण, आपल्या नर्व्ह म्हणजेच मज्जातंतू सुरकुत्या नियंत्रित करत असतील, तर याचा अर्थ पाण्यात गेल्यावर मानवी शरीर पाण्याला प्रतिसाद देतं. डेव्हिस म्हणतात, "याचाच अर्थ कुठल्यातरी कारणासाठी हे घडतं. म्हणजेच याचा आपल्याला काहीतरी फायदा नक्कीच होत असावा."

डेव्हिस सांगतात की, त्यांच्या मुलाने एकदा आंघोळीवेळी सुरकुतलेला हात दाखवत पाण्यात हाताला सुरकुत्या का पडतात, असा प्रश्न विचारला. तिथूनच त्यांनी सुरकुत्यांचा मानवी शरीराला काही उपयोग आहे का, याचा शोध घेण्याची सुरुवात केली.

डेव्हिस यांनी 2020 साली लंडनमधल्या विज्ञान संग्रहालयाला भेट दिलेल्या 50 व्यक्तींवर एक छोटासा प्रयोग केला. एक प्लॅस्टिकची वस्तू पकडण्यासाठी किती शक्ती लागते, याचा त्यांनी अभ्यास केला. यात त्यांना आढळून आलं की, ओल्या हातांपेक्षा कोरडे न सुरकुतलेले हात असलेल्या लोकांना प्लॅस्टिकची वस्तू धरण्यासाठी कमी शक्ती लागली.

त्यानंतर कोरडे हात असलेल्यांनी काही वेळ हात पाण्यात बुडवून ठेवला आणि मग सुरकुतलेल्या हातांनी तीच वस्तू धरली. यावेळी मात्र दोन्ही गटातल्या लोकांचे हात ओले असले तरी सुरकुतलेल्या हातांनी वस्तू पकडण्यासाठी बऱ्यापैकी कमी शक्ती लागत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Benjamin Torode/Getty Images

या प्रयोगानंतर डेव्हिड म्हणतात, "या प्रयोगाचे परिणाम खूप स्पष्ट होते. सुरकुत्यांमुळे बोटं आणि वस्तू यांच्यातल्या घर्षणाचं (फ्रिक्शन) प्रमाण वाढलं. यातली विशेष बाब अशी की, पृष्ठभागाच्या घर्षणातल्या बदलाप्रती आपली बोटं संवेदनशील असतात. त्यामुळे एखादी वस्तू घट्ट पकडण्यासाठी कमी शक्ती लागते."

डेव्हिस यांनी आपल्या प्रयोगात वापरलेली वस्तू काही नाण्यांच्या वजनाची म्हणजे अगदी हलकी होती. त्यामुळे ती पकडण्यासाठी शक्तीही कमी लागली. पण, ओल्या वातावरणात जास्त शक्ती लागणारं कठीण काम करायचं असेल, तेव्हा मात्र हा फरक खूप महत्त्वाचा ठरतो.

डेव्हिस म्हणतात, "एखादी वस्तू पकडण्यासाठी फार जोर लागत नसेल, तर हातातले स्नायू कमी थकतात. परिणामी ती वस्तू जास्त वेळ धरून ठेवता येते."

इतर संशोधकांचे निष्कर्षही असेच होते. त्यांच्या प्रयोगातही हे आढळून आलं होतं की, सुरकुतलेल्या बोटांमुळे ओल्या वस्तू हाताळणं सोपं होतं.

2013 साली यूकेतल्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीतल्या न्युरोसायंटिस्टच्या एका गटाने एक प्रयोग केला. त्यांनी प्रयोगात सहभागी व्यक्तींना वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या वस्तू आणि मासेमारीसाठी वापरली जाणारी वजनं एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकायला सांगितली.

पहिल्यांदा या वस्तू पूर्णपणे कोरड्या होत्या. नंतर मात्र त्या पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवल्या होत्या. यात असं आढळलं की सुरकुत्या नसलेल्या हातांनी कोरड्या वस्तूंपेक्षा ओल्या वस्तू एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकण्यासाठी 17 टक्के अधिक वेळ लागला.

मात्र, जेव्हा स्वयंसेवकांनी सुरकुतलेल्या हातांनी ओल्या वस्तू एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकल्या तेव्हा त्यांना ओल्या मात्र सुरकुत्या नसलेल्या हातांनी ओल्या वस्तू एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकण्यासाठी जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षा 12 टक्के कमी वेळ लागला.

विशेष म्हणजे सुरकुतलेल्या किंवा सुरकुत्या नसलेल्या हातांनी कोरड्या वस्तू टाकण्यामध्ये काहीही फरक पडलेला नव्हता.

काही शास्त्रज्ञ असंही सुचवतात की, हाता-पायांच्या बोटांवरच्या सुरकुत्या टायर किंवा जोड्यांच्या खालच्या बाजूला असलेल्या खवल्यांसारखं काम करतात. सुरकुत्यांमुळे ज्या वळ्या पडतात त्यातला खोलगट भाग बोटं आणि वस्तू यांच्या मधे येणारं पाणी शोषून घेतात.

यातून असं मानलं जाऊ शकतं की, मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ओल्या वातावरणात ओल्या वस्तू किंवा पृष्ठभागावर मजबूत पकड निर्माण करण्यासाठी हाताच्या आणि पायांच्या बोटांना सुरकुत्या विकसित झाल्या असतील.

न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये न्युरोसायंटिस्ट असणारे टॉम स्मल्डर्स म्हणतात, "(सुरकुत्या) पाण्यात चांगली पकड देतात असं वाटत असल्यामुळे मी असं मानतो की, याचा संबंध एकतर अतिशय ओल्या वातावरणात हालचाल करण्याशी किंवा पाण्याखाली वस्तू हाताळण्याशी असावा."

कदाचित आपल्या पूर्वजांना ओल्या दगडांवर चालण्यासाठी किंवा ओल्या फांद्यांवरून उड्या मारण्यासाठी याचा उपयोग झाला असावा. शिवाय, शेलफिशसारखे काही मासे पकडण्यासाठीही या सुरकुत्यांचा उपयोग होत असावा.

स्मल्डर्स म्हणतात, "मानवी उत्क्रांतीनंतर (सुरकुत्या) माणसांमधलं एक खास वैशिष्ट आहे. पण, जर हे पूर्वीपासूनच असेल, तर मानव प्राण्याच्या नातेवाईकांमध्येही हे वैशिष्ट्यं आढळत असावं."

चिंपाझींसारख्या मानवाच्या अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये सुरकुत्या अजून आढळलेल्या नाहीत. मात्र, जपानी मॅकाक जातीच्या माकडांमध्ये बोटांच्या सुरकुत्या दिसल्या आहेत. ही माकडं खूप वेळ कोमट पाण्यात बसून असतात.

त्यांच्या हाताच्या आणि पायांच्या बोटांना सुरकुत्या पडतात. मात्र, इतरांमध्ये सुरुकुत्या पडत असल्याचे पुरावे नाहीत. याचा अर्थ सुरकुत्या पडतच नसतील, असा नाही. कदाचित इतर माकडांचा तेवढा जवळून अभ्यास झालेला नाही. स्मल्डर्स म्हणतात, "या प्रश्नाचं उत्तर अजून आपल्याला माहिती नाही."

आपल्या प्रजातीमध्ये हा बदल कधी विकसित झाला, याच्या काही रंजक खुणा आहेत. गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात सुरकुत्या पडायला वेळ लागतो. कदाचित त्वचेत आणि पाण्यात दोन्हीकडे क्षार असल्यामुळे हे होत असावं.

सुरकुत्या येण्यासाठी मज्जातंतूंना चालना मिळावी लागते. ही चालना मिळते त्वचा आणि पाणी यांच्यातल्या क्षाराच्या असंतुलनामुळे. पण, खाऱ्या पाण्यात हे असंतुलन कमी असतं. त्यामुळे सुरकुत्या पडायला वेळ लागतो. त्यामुळे हे एक ॲडॅप्टेशन आहे ज्यामुळे आपल्या पूर्वजांना गोड्या पाण्याजवळ राहण्यास मदत केली.

मात्र, हे सगळे अंदाज आहेत. ठोस उत्तर कुणाकडेही नाही. काहींच्या मते बोटांना पडणाऱ्या सुरकुत्या या उत्क्रांतीदरम्यान सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी झालेला बदल नसून ती केवळ योगायोगाने घडलेली शारीरिक प्रक्रिया आहे.

सुरकुत्यांची कहाणी इथेच संपत नाही. यात आणखीही काही गुपितं आहेत. उदाहरणार्थ पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या बोटांना सुरकुत्या पडायला वेळ लागतो. आणखी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे सुरकुत्यांचा ओल्या वस्तू धरण्यात फायदा होतो आणि कोरड्या वस्तू धरताना काहीही फरक पडत नाही. म्हणजे कोरड्या वस्तू धरण्यात सुरकुत्यांचा तोटा नाही. असं असेल तर 10-20 मिनिटांनंतर सुरकुत्या जाऊन बोटांची त्वचा पुन्हा नॉर्मल का होते?

याचं एक कारण सुरकुत्यांमुळे संवेदनेत होणारा बदल हेही असू शकतं. सुरकुतलेल्या बोटांनी वस्तुंना स्पर्श केल्यावर जरा वेगळं वाटतं.

सुरकुतलेली बोटं

फोटो स्रोत, Getty Images

सुरकुत्या आपल्या आरोग्याविषयी काय सांगतात?

डेव्हिस म्हणतात, "सुरकुतलेल्या बोटांनी एखाद्या वस्तुला स्पर्श केल्यावर विचित्र वाटतं. काहींना हे अजिबात आवडत नाही. त्वचेमध्ये असणाऱ्या रिसेप्टर्सचा बॅलन्स बिघडल्यामुळे हे होऊ शकतं. मात्र, त्यामागे काही मानसशास्त्रीय कारणंही असू शकतात. अशाही काही गोष्टी असतील ज्या सुरकुतलेल्या हातांना सहजपणे जमत नसतील. त्याचा शोध घ्यायला हवा."

सुरकुत्यांच्या या कहाणीत एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे या सुरकुत्या आपल्या आरोग्याविषयी माहिती देऊ शकतात. सोरायसीस किंवा पांढरे डाग येणे, अशा त्वचेशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना लवकर सुरकुत्या पडत नाहीत.

सिस्टिक फायब्रोसिस असणाऱ्या व्यक्तींच्या हाता-पायांच्या बोटांना जास्त सुरकुत्या पडतात. इतकंच नाही तर या आजाराचे अनुवांशिक वाहक असणाऱ्यांमध्येही हे लक्षणं दिसतं. (सिस्टिक फायब्रोसिस हा एक अनुवांशिक रोग आहे ज्यामध्ये शरीरातून बाहेर पडणारे द्रव जसे घाम, म्युकस आणि पाचक रस घट्ट आणि चिकट होतात. त्यामुळे हे सगळं शरीराच्या वेगवेगळ्या भागातून बाहेर पाडणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात. या आजाराने ग्रस्त मुलांमध्ये अतिसार आणि पचनाच्या समस्या आयुष्यभर राहू शकतात.)

टाईप-2 डायबिटिज असणाऱ्या व्यक्तींनाही हाता-पायाला सुरकुत्या पडायला जास्त वेळ लागतो. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या व्यक्तींमध्येही सुरकुत्या कमी झाल्याचं दिसतं.

तसंच जर एका हाताला जास्त आणि दुसऱ्या हाताला कमी सुरकुत्या पडत असतील, तर ही नर्व्हस सिस्टिम म्हणजेच मज्जासंस्था शरीराच्या एका बाजूने योग्यरित्या काम करत नसल्याची सूचना आहे. हे पार्किन्सस आजाराचं पूर्वलक्षणं असू शकतं.

तात्पर्य काहीवेळ पाण्यात राहिल्याने हातांच्या आणि पायांच्या बोटांना सुरकुत्या का पडतात, या प्रश्नाचं अंतिम उत्तर अजून मिळालं नसलं, तरी सुरकुत्या डॉक्टरांसाठी आणि निरोगी आयुष्याची कामना करणाऱ्या प्रत्येकासाठी एकाअर्थाने फायद्याच्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)