शरीरातील 'व्हिटॅमिन डी' वाढवण्यासाठी औषधांइतकाच व्यायाम फायदेशीर असतो का?

फोटो स्रोत, Getty Images
हिवाळ्यात दररोज व्यायाम केल्याने शरीरातील 'ड' जीवनसत्त्वाची पातळी वाढण्यास मदत होते, असं एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या या जीवनसत्त्वाची कमतरता 10 पैकी एका माणसात जाणवते, असं ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं. शरीरातल्या स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी हे जीवनसत्त्व फार गरजेचं असतं.
ब्रिटनमधल्या बाथ, कॅम्ब्रिज आणि बर्मिंगहॅम या तीन विद्यापीठांनी एकत्र येऊन याबाबत एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास 10 आठवड्यांच्या एका व्यायाम सत्रात सहभागी झालेल्या, वजन जास्त असणाऱ्या आणि स्थूल प्रकारात मोडणाऱ्या काही प्रौढांवर करण्यात आला.
त्यातून असं लक्षात आलं की, जे नियमित व्यायाम करतात त्यांच्यात 'ड' जीवनसत्त्व घटण्याचा वेग किंवा प्रमाण अगदी कमी होतं. तर व्यायाम न करणाऱ्यांमध्ये 'ड' जीवनसत्त्व जास्त प्रमाणात घटतं.
बाथ विद्यापीठाच्या डॉ. ओली पर्किन यांनी या अभ्यासाचं नेतृत्त्व केलं होतं. ते म्हणाले, "फक्त व्यायाम केल्यानेही हिवाळ्यात 'ड' जीवनसत्त्व कमी होण्यापासून थांबवता येऊ शकतं हे दाखवून देणारा हा पहिला अभ्यास आहे."
50 हून अधिक लोकांनी या अभ्यासात भाग घेतला होता. तिथं सुर्यप्रकाश कमी असतो अशा काळात म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांत हा अभ्यास केला गेला.

फोटो स्रोत, PA Media
अभ्यासात सामील झालेले स्वयंसेवक आठवड्यातून चार वेळा व्यायाम करत होते. त्यात दोन वेळा ट्रेडमिलवर चालणं, एक तासभर किंवा त्यापेक्षा जास्त स्थिरगतीनं सायकल चालवणं आणि खूप कष्ट पडतील अशा तीव्रतेनं सायकल चालवणं असे व्यायाम होते.
हे सगळे व्यायाम घरात किंवा एखाद्या खोलीच्या आत मशिन्स वापरून केले जात होते.
हा व्यायाम करणाऱ्यांमध्ये हिवाळ्यात 'ड' जीवनसत्त्व जवळपास 15 टक्क्यांनी कमी झालं. तर व्यायाम न करणाऱ्यांमध्ये ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याचं संशोधकांनी नोंदवलं. म्हणजेच व्यायाम करणाऱ्यांमध्ये 'ड' जीवनसत्त्वाच्या पातळीत घट होण्याचं प्रमाण कमी होतं.
शिवाय, व्यायाम करणाऱ्यांच्या शरीरात 'ड' जीवनसत्त्व सक्रीय स्वरूपात साठवलं गेलं असल्याचंही संशोधकांना समजलं. हे सक्रीय स्वरूपातलं जीवनसत्त्व हाडं, दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी आणि एकूणातच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, PA Media
डॉ. पर्किन सांगतात, "हिवाळ्यात शरीरातलं 'ड' जीवनसत्त्व कमी होईल अशी काळजी तुम्हाला वाटत असेल, तर नियमित व्यायाम करणं फायद्याचं ठरेल. त्याने तुमच्या आरोग्याला इतरही अनेक फायदे होतील जे 'ड' जीवनसत्त्वाची पूरक औषधं घेऊन मिळणार नाहीत."
"व्यायामानं आपल्या शरीराला काय काय फायदा होतो यात आणखी किती शिकण्यासारखं आहे याची यातून आठवण होते."
बाथ विद्यापीठातले प्राध्यापक डायलन थॉम्पसन म्हणतात की, व्यायामानं तुमच्या शरीरातल्या 'ड' जीवनसत्त्वाला दुहेरी फायदा होतो हेच या अभ्यासातून दिसून येतं.
"हा अभ्यास ठामपणे दाखवून देतो की, हिवाळ्यातील जीवनसत्त्व 'ड' टिकवण्यासाठी व्यायाम चांगला पर्याय आहे," ते म्हणाले.
"विशेषतः ज्यांच्यावर 'ड' जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांचा फारसा परिणाम होत नाही, अशा वजन जास्त असणाऱ्या किंवा स्थूल या प्रकारात मोडणाऱ्यांसाठी."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











