मुलांना झोपू देणारी पुण्यातली जिल्हा परिषद शाळा, जगभरातील 10 शाळांमध्ये असं मिळवलं स्थान

जेवणाच्या सुटीनंतर इथे मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते.
फोटो कॅप्शन, जेवणाच्या सुटीनंतर इथे मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते.
    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मधली सुट्टी झाली, डबे खाऊन झाले तरी पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकू येत नाही. कुणी आपल्याच हाताची उशी करून त्यावर डोकं टेकवलेलं असतं, तर कुणी दप्तरात आणलेलं पांघरूण अंगावर घेऊन जमिनीवर शांतपणे पहुडलेलं असतं.

वर्गाच्या बंदिस्त भिंती आणि बाकांची शिस्त नसलेल्या कण्हेरसर गावाजवळच्या या शाळेतली मुलं दररोज डब्बा खाल्ल्यानंतर चक्क अर्धा तास झोपतात.

ही शाळा आहे जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

दुपारची झोपच नाही, तर या शाळेत इतरही अनेक वेगवेगळे उपक्रम चालतात. सृजनशील कल्पनांची, वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या शक्यतांची ही शाळा आहे.

म्हणूनच 'टी फोर एज्युकेशन' या लंडनमधल्या संस्थेनं घेतलेल्या जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेत जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे.

काही वर्षांपूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा, आता जागतिक पातळीवर झळकणारी राज्यातली सरकारी शाळा ठरली आहे.

जगभरातल्या शेकडो शाळांमधून जालिंदरनगरच्या या शाळेची निवड झाल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी सांगितलं. बुधवारी म्हणजेच 18 जूनला या स्पर्धेचा निकाल लागला.

मुलांना वाचण्यासाठी जमिनीवर लोटून वाचायलाही परवानगी आहे.
फोटो कॅप्शन, मुलांना वाचण्यासाठी जमिनीवर लोटून वाचायलाही परवानगी आहे.

स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात ऑनलाईन मतदानाद्वारे या दहा शाळांमधून सर्वोच्च शाळा निवडली जाईल. जिंकणाऱ्या शाळेला एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'लोकांच्या आधारासोबतच एखादी शाळा मुलांना मुलांना हवी असणारी मोकळीकता देऊ शकली तर किती प्रगती होते हेच जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या यशातून दिसून येतं.'

मुलांना हवी असणारी मोकळीकता दिली तर ते किती बहरू शकतात, हेच या सरकारी शाळेच्या यशातून दिसून येतं.

स्पर्धेच्या 'लोकसहभागातून शाळा विकास' या विभागात जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेने सहभाग घेतला होता. या विभागात लॅटिन अमेरिका या भागातून ब्राझीलची एस्कोला सीओसी साओ लुईस, कोस्टा रिकाची एस्कुएला आणि कोलेजिओ सिऐंटिफिको इंटरअमेरिकानो आयएचएस काटी, अर्जेंटिनाची एस्कुएला मीडिया गोबर्नादोर पिएद्राबुएना अशा तीन शाळांची निवड झाली.

युरोपमधून ब्रिटनची हेअनर गेट स्पेन्सर्स ॲकॅडमी आणि इटलीची आयटीआय जिआम्बातिस्ता बोस्को लुकारेली या दोन शाळा आहेत.

तर आशियामधून पाकिस्तानमधल्या बीकनहाउस कॉलेज प्रोग्रॅम, जुनिपर कॅम्पस आणि नॉर्डिक इंटरनॅशनल स्कूल लाहोर अशा दोन शाळा आहेत. भारतातली जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळाही आशिया भागातच आहे.

याशिवाय मध्यपूर्व भागातून दुबई ब्रिटिश स्कूल जुमेैराह पार्क आणि उत्तर अमेरिका या भागातून मेक्सिकोची आ फावोर डेल निन्यो ही शाळा निवडली गेली.

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेव्यतिरिक्त भारतातल्या आणखीही तीन शाळा या यादीत वेगवेगळ्या विभागांतर्गत झळकल्या आहेत.

बंगरुळूमधली एकव्या स्कूल या शाळेची 'नावीन्य' या विभागातून, वाराणसीतली दिल्ली पब्लिक स्कूल ही शाळा 'पर्यावरणीय कृती' या विभागातून आणि हरियाणा राज्यातली फरीदाबाद मुलींची सरकारी उच्च माधमिक शाळा 'निरोगी जीवनाचं समर्थन' या विभागातून निवड झाली आहे.

लोकांच्या आधारासोबतच मुलांना हवी असणारी मोकळीक दिली, तर ते किती बहरू शकतात हेच या जालिंदरनगरच्या सरकारी शाळेच्या यशातून दिसून येतं.

मुलांना झोपू देणारी शाळा

शाळेत मुलांना एक तास जेवायची सुट्टी असते. त्यातल्या अर्ध्या तासात मुलं जेवतात आणि उरलेला अर्धा तास योगनिद्रा करतात.

"खेडेगावात शेतकरी पहाटेपासून काम करतात. दुपारच्या जेवणानंतर काही वेळासाठी अंग टाकतात. त्या छोट्या विश्रांतीतही मन, मेंदू आणि शरीर यांना चांगल्याप्रकारे आराम मिळतो," असं मुख्याध्यापक म्हणाले. ते 'वारे गुरूजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.

वारे गुरुजी.
फोटो कॅप्शन, शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक वारे गुरुजी.

मुलांना योगनिद्रेसाठी स्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात. सोबत हळूवार संगीतही सुरू असतं. काही मुलं अर्धवट झोपेच्या स्थितीत जातात. काहींचं शरीर झोपतं, पण मेंदू जागा राहतो. तर काही मुलांना खरंच झोपही लागते.

"अशा स्थितीत 25-30 मिनिटं घालवल्यानंतर मुलं उठतात तेव्हा ती अतिशय तरतरीत झालेली असतात. त्यांच्या मेंदूवरचा थकवा निघून गेलेला असतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मेंदूची शिकण्याची जितकी तयारी असते ती परत येते," असं वारे गुरूजी सांगतात.

अर्धा तास संपला तरी मुलं जाग आल्यावर उठतात आणि अवांतर वाचनाच्या तासासाठी आवडीचं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचत बसतात.

शाळेत वेगवेगळ्या इयत्तेसाठी वेगवेगळे वर्ग, मुलांना बसण्यासाठी बाक असं काहीही नसल्यानं मुलांना जमिनीवर आरामशीर आडवं होऊन किंवा झाडाखाली पडूनही वाचता येतं.

याठिकाणी मुलांचं मंत्रिमंडळ तयार करून त्यांना जबाबदारी दिल्या आहेत.
फोटो कॅप्शन, याठिकाणी मुलांचं मंत्रिमंडळ तयार करून त्यांना जबाबदारी दिल्या आहेत.

शाळेची इमारत मुलांना आवडेल, आपली वाटेल अशीच तयार करण्यात आल्याचं, वारे गुरूजी सांगत होते. शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत. तर, सरकवून उघडता येतील अशी काचेची दारं आहेत.

"आम्हाला आत बसल्यावर बाहेरचं मोकळं आकाश दिसलं पाहिजे, ही मुलांची इच्छा विचारात घेऊनच शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. शिवाय, वाटेल तेव्हा जमिनीवर आणि वाटेल तेव्हा वर असं बसण्याची सोय हवी असंही मुलांनी सांगितलं होतं," असं वारे गुरूजी म्हणाले.

त्यामुळेच बाकं न बसवता, शाळेच्या आत काही ठिकाणी पायऱ्या तयार केल्या आहेत.

जेवणाच्या सुटीनंतर इथे मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते.
फोटो कॅप्शन, जेवणाच्या सुटीनंतर इथे मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते.

सकाळी 9 च्या सुमारास शाळा भरली की, सगळे मुलं-मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात. हातात झाडू घेऊन अंगण झाडणं, काचेची दारं पुसून घेणं, हायड्रोपोनिक पद्धतीनं लावलेल्या झाडांची काळजी घेणं आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास-बाथरूम साफ करणं अशी सगळी कामं मुलं एकत्र मिळून करतात.

शाळेची जबाबदारी मुलांचीच असावी यासाठी त्यांचं एक मंत् मंडळही स्थापन करण्यात आलंय. त्यातून मुलांकडे आरोग्यमंत्री, सफाईमंत्री, शिक्षणमंत्री, अन्नपुरवठा मंत्री अशा भूमिका दिल्या गेल्यात.

शाळेबद्दलचे निर्णय घेण्याची, काही ठराव पास करण्याचं काम या मंत्रिमंडळांच असतं. त्यांच्या सूचना शिक्षकांनाही लागू असतात.

मुलंच होतात मुलांचे शिक्षक

जालिंदरनगर जिल्हा परिषदेत शाळेत मुलंच मुलांचे शिक्षकही होतात. शिक्षक शिकवतायत आणि मुलं लिहून घेतायत असं चित्र या शाळेत कधीही दिसत नाही.

मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषयमित्र म्हणून नेमलं जातं. त्या विषयमित्रासोबत चार-पाच मुलांचा एक गट जोडून दिला जातो. हा विषयमित्रच त्यांना शिकवतो.

"आमच्या 28-29 वर्षांच्या अनुभवातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे. ती म्हणजे मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीनं शिकतात," अशी या संकल्पनेमागची भूमिका वारे गुरूजी स्पष्ट करतात.

मुलांना मुलांकडूनच शिकवलं जातं.

शिक्षकाला शंका विचारताना मुलं घाबरतात, संकोच करतात. पण त्यांच्या या विषयमित्राला एकच प्रश्न हजारवेळा विचारू शकतात. शाळेतून घरी गेल्यावरही त्यांच्या विषयमित्राला फोन करून शंका विचारतात.

"त्यामुळेच शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर विषयमित्र शिक्षकाला समांतर म्हणून काम करतात," असं वारे सरांनी सांगितलं.

शाळेत मुलांना चार पातळ्यांवर शिक्षण मिळावं असा त्यांचा प्रयत्न असतो. "पहिली पायरी म्हणजे स्वतः शिकणं. व्यवस्थित नियोजन केलं तर अभ्यासक्रमाचा 60 ते 70 टक्के भाग ते स्वतःच शिकू शकतात," असं वारे गुरुजी म्हणाले.

पहिल्या पायरीवर अडचण आली तर दुसरी पायरी म्हणजेच विषयमित्राची मदत घेणं.

"एकमेकांच्या मदतीनं पुढं जाणं किती महत्त्वाचं आहे हेही मुलं यातून शिकतात. म्हणूनच बंधुता, सौहार्द त्यांना वेगळं शिकवावं लागत नाही."

"स्वतः शिकूनही कळालं नाही आणि आपल्या विषयमित्रालाही येत नाही तर तिसरी पायरी येते ती म्हणजे तंत्रज्ञानाची मदत घेऊन शिकणं. मग शेवटच्या पायरीवर शिक्षकांची मदत घेतली जाते," असं वारे गुरुजींनी सांगितलं.

या पायरीवरही मुलांना तयार उत्तरं न देता त्यांना उत्तराकडे जायची दिशा देणं एवढंच शिक्षकाचं काम असतं असं त्यांना वाटतं.

इथं मुलांना मुलांकडूनच शिकवलं जातं.
फोटो कॅप्शन, इथं मुलांना मुलांकडूनच शिकवलं जातं.

जालिंदरनगरच्या या शाळेतल्या मुलांना एकमेकांकडून शिकण्याचा पुरेपूर फायदा होतो. ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलिकडेही मुलं शाळेत खूप काही शिकतात.

उदाहरणार्थ, मुलं एकमेकांकडून जपानी भाषा शिकतात. त्यासाठी इंटरनेटची आणि वेगवेगळ्या ॲप्सचीही मदत घेतात. काहींनी जपानी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या 'जॅपनिज लँग्वेज प्रोफेशिअन्सी टेस्ट' या भाषा परीक्षेत एन5 पर्यंतची मजल गाठली आहे.

यावर्षी एकूण 45 मुलं एन5 परीक्षेची तयारी करत आहेत.

सुप्रिया दौंडकर ही त्यातलीच एक विद्यार्थिनी. ती जपानीसोबतच फ्रेंचही शिकली आहे. "जपानी आणि फ्रेंच ड्युओलिंगो या ॲपवरून शिकलं. इंग्रजी तर शाळेतच शिकवलं जातं," असं सुप्रिया म्हणाली. तसंच तिला कन्नडही बऱ्यापैकी बोलता येतं.

"भारतातल्याच एखाद्या इतर राज्यात गेलो तर मुलभूत संवाद साधता येईल एवढी भाषा आमच्यापैकी प्रत्येकानेच शिकली आहे. मला कन्नड येतं तसं माझ्या मैत्रिणींना मल्याळम येतं, एकीला तमिळ येते, एकीला कश्मिरीही येते," असं ती सांगत होती.

कौशल्यावर भर

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत कौशल्यावर भर दिला जातो. शाळेत 22 प्रकारची कौशल्य शिकण्याची सोय आहे. त्यात चित्रकला, हस्तकला, ज्वेलरी बनवणं, प्लंबिंग, सुतारकाम, मेकअप आर्ट आणि अगदी कोडिंग आणि थ्रीडी ॲनिमेशनही शिकवलं जातं. मुलं त्यांना आवडेल ते शिकतात.

या कौशल्याचा वापर करूनच शाळेत शिकणाऱ्या शिवम खरपुडेनं वयाच्या आठव्या वर्षी टाकाऊ वस्तूंचा वापर करून रोबोट बनवला आहे. शाळेत पहिलीत आल्यापासूनच त्याला रोबोटिक्सची आवड असल्याचं तो सांगत होता.

मुलांना ज्या विषयात आवड असेल त्याविषयी त्यांना स्वतः शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
फोटो कॅप्शन, मुलांना ज्या विषयात आवड असेल त्याविषयी त्यांना स्वतः शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

"या रोबोटमध्ये आम्ही प्लायवूडचा पीस, टीव्हीचे स्टँड, जुने पाईप वापरलेत. त्याला खाली तुटलेल्या रिमोट गाडीची चाकं लावल्याने तो पुढेही जातो," असं शिवम सांगत होता.

पहिल्यांदा रोबोट कुठेही जाऊन धडकू लागला तेव्हा त्यानं विचार करून त्यात सेन्सर्सही बसवले. शिवाय, आतमध्ये ॲलेक्सा बसवल्यानं शिवमचा रोबोट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देतो.

त्याच्यासारख्या कोडींगमध्ये रस असणाऱ्या मुलामुलींना ऋतुजा ताम्हाणे या शाळेच्या शिक्षिका मदत करतात. ऑर्गनिक केमिस्ट्री विषयात पदवी घेतलेल्या ताम्हाणे यांनी कोडिंगचा कोर्स केला आहे. त्यांचा पगारही लोकसहभागातून जमलेल्या निधीतून केला जातो.

"कोडींगमधल्या स्क्रॅच, एचटीएमएल, सी प्रोग्रॅमिंग आणि रोबोटिक्सला लागणारं पायथॉन या चारही लँग्वेजेस पहिलीपासूनच मुलांना शिकवल्या जातात. त्यातून मुलं गाड्यांचे लोगो बनवणं, वेबसाईट डिझाईन हेही शिकतात," असं ऋतुजा ताम्हाणे म्हणाल्या.

अशा मोठ्यांच्या गोष्टी लहान मुलांना शिकवताना आपल्यालाही त्यांच्यासारखं लहान होऊनच शिकवावं लागतं, असंही त्या पुढे म्हणाल्या.

"मुलं लहान असल्याने स्पेलिंगच्या चुकाही होतात. पण मुलांना इंटरेस्ट येईल अशा गोष्टी आधी शिकवल्या जातात. मग नंतर स्पेलिंग पाठांतर ते स्वतःच करतात," असं त्या म्हणाल्या.

मुलांना ज्या विषयात आवड असेल त्याविषयी त्यांना स्वतः शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

ज्या विद्यार्थ्याच्या पालकांना जे कौशल्य आत्मसात आहे ते विद्यार्थ्यांना त्याच्या वेळेनुसार शिकवण्यासाठी शाळेचं धोरण आहे. "मुलींना मेकअप आर्ट शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षिका या खरंतर शाळेतल्याच एका विद्यार्थीनीच्या पालक आहेत," असं ताम्हाणे म्हणाल्या.

तसंच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करणारे तुषार पुन्दीर शाळेला भेट द्यायला आले होते. "त्यांनी आम्हाला सगळ्या मोटर्स, सेन्सर्स कसं काम करतात ते सांगितलं. तर त्यावरून आम्ही अल्ट्रासॉनिक साऊंड्सचा सॅटेलाईट बनवला आहे," असं शाळेतला विद्यार्थी यश दप्तरी म्हणाला.

यामागची भूमिका समजावून सांगताना दत्तात्रय वारे म्हणाले की, "मुलांचं भविष्य घडावं यासाठी आपण त्यांना शाळेत पाठवत असतो. हे भविष्य म्हणजे ही मुलं जवळपास पुढच्या 15-20 वर्षांनी जगाच्या स्पर्धेत उतरणार ती वेळ. तेव्हा नेमकं काय असेल हे शिक्षकाने ओळखून त्याचं शिक्षण आज मुलांना इथं दिलं जातं."

मुलांचं ऐकायला हवं

याचाच परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. 2022 मध्ये शाळेची पटसंख्या 3 होती. मात्र, 2025-26 या वर्षात शाळेत जवळपास 150 विद्यार्थी आहेत.

"माझा मोठा मुलगा एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होता. पण इथली शिक्षणपद्धती आवडल्यानं मी मुलाला या शाळेत टाकलं," असं थिटेवाडी गावाजवळ हॉटेल चालवणारे योगेश करडे म्हणाले.

इथं आल्यापासून मुलात खूप बदल झाले असल्याचं त्यांना जाणवतं. "अभ्यासक्रमापलिकडचं बरंच काही त्याला कळायला लागलंय. जगाचं शहाणपण येत आहे," असं ते म्हणाले. मोठ्या दादाचं पाहून त्यांची लहान मुलगी अंगणवाडीत न जाता या शाळेतच येऊन बसते. तिच्यासारखी अंगणवाडीतली आणखीही काही मुलं शाळेत आहेत.

शाळेच्या आवाराज डबा खाणारी मुलं

पालकांच्या मदतीनंच शाळा एवढी उभी राहिली आहे. शाळेला माती आणण्यापासून, नर्सरीत रोपं आणण्यापर्यंत सगळी कामं पालकांनी मिळून केली आहेत. लोकसहभागातूनच शाळेसाठी नवा स्विमिंग पूल बांधण्याचं काम सुरू आहे.

"शाळेतून फक्त आपल्याच मुलाचं भलं व्हावं अशी भावना आम्ही कोणीही पालक ठेवत नाही. इथलं प्रत्येक मूल प्रत्येक पालकाचं आहे," असं योगेश करडे सांगत होते.

या लोकसहभागातून शाळेचा विकास झाला तरच तो शाश्वत असतो, असं वारे गुरुजींनाही वाटतं. "शाळा आज आहे तशीच पुढेही ठेवायची असेल तर त्यासाठी लोकांनीच पुढे यायला हवं," असं ते म्हणतात.

जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा.

हाच लोकसहभाग मुलांच्याही मनात रुजलेला असतो. वारे सरांनी याबाबतची एक आठवण सांगितली.

"काही दिवसांपूर्वी शाळेतली दोन तीन मुलं काही शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला गेली होती. तेव्हा आमच्याही शाळा अशा चांगल्या बनवायच्या असतील तर कोणत्या दोन गोष्टी करायला हव्यात असा प्रश्न एका शिक्षकांनी विचारला."

"तेव्हा मुलांनी त्यांना दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. मुलं म्हणाली की दोन नको, एकच गोष्ट करा. जरा मुलांचं ऐकत चला."

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा मुलांचं ऐकते म्हणूनच आज जगभरातल्या दहा सर्वोत्तम शाळांमध्ये गणली जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)