नोटांनी भरलेलं लष्करी विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू, घटनास्थळी पैसे लुटण्यासाठी मोठा गोंधळ; नेमकं काय घडलं?

बोलिव्हियन सशस्त्र दलाचे सैनिक विमानाच्या अवशेषांची सुरक्षा करताना.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, बोलिव्हियन सशस्त्र दलाचे सैनिक विमानाच्या अवशेषांची सुरक्षा करताना.
    • Author, जारोस्लाव लुकीव्ह
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

बोलिव्हियामध्ये शुक्रवारी (27 फेब्रुवारी) संध्याकाळी एक भीषण विमान अपघात झाला. हवाई दलाचे एक मालवाहू विमान उतरताना धावपट्टीवरून घसरले आणि थेट विमानतळाबाहेरील रस्त्यावर असलेल्या वाहनांना जाऊन धडकले.

या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांना प्राण गमवावे लागले असून 31 जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आधी 15 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं.

हे विमान सरकारी 'सेंट्रल बँक ऑफ बोलिव्हिया'साठी नोटांचा मोठा साठा घेऊन जात होते.

सांता क्रूझ शहरातून निघालेले हे C-130 Hercules विमान शुक्रवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास 'एल अल्टो' विमानतळावर उतरत होते.

यावेळी विमानाचा वेग प्रचंड असल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीची सीमा ओलांडून बाहेर आले.

विमानाची धडक इतकी भीषण होती की, बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं. काही वाहने तर विमानाखाली अक्षरशः चेपली गेली.

हवाई दल प्रमुख सर्जियो लोरा यांनी माहिती दिली की, विमानात चालक दल आणि मालवाहतूक कर्मचाऱ्यांसह एकूण 8 जण होते.

नोटांची लूट आणि पोलिसांची कारवाई

विमान कोसळल्यानंतर त्यातील नोटांची पाकिटे फाटली आणि चलनी नोटा खाली पडल्या. ही बातमी पसरताच स्थानिक लोकांनी नोटा गोळा करण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

हे विमान सरकारी 'सेंट्रल बँक ऑफ बोलिव्हिया'साठी नोटांचा मोठा साठा घेऊन जात होते. अपघातानंतर घटनास्थळी बोलिव्हियन नोटा विखुरलेल्या दिसल्या.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हे विमान सरकारी 'सेंट्रल बँक ऑफ बोलिव्हिया'साठी नोटांचा मोठा साठा घेऊन जात होते. अपघातानंतर घटनास्थळी बोलिव्हियन नोटा विखुरलेल्या दिसल्या.

बचावकार्यात अडथळा निर्माण झाल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर अश्रुधुराचा वापर करून जमावाला पांगवले.

यावेळी जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. नोटा चोरल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत किमान 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

पत्रकारांनाही मारहाण

या भीषण दुर्घटनेचे वार्तांकन करणाऱ्या मीडिया प्रतिनिधींनाही जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. 'बोलिव्हिया पत्रकार संघाने' दिलेल्या माहितीनुसार, पैसे चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांनी चोरीचे चित्रीकरण होऊ नये म्हणून पत्रकारांवर हल्ला केला.

अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images

एका टीव्ही चॅनलच्या गाडीला मुद्दाम लक्ष्य करण्यात आले असून यात काही पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.

संरक्षणमंत्र्यांचा इशारा

विखुरलेल्या नोटा गोळा करणाऱ्यांना संरक्षण मंत्री मार्सेलो सॅलिनास यांनी कडक इशारा दिला आहे.

ते म्हणाले, "या नोटा अद्याप बँकेने चलनात आणलेल्या नाहीत आणि त्यावर कोणताही सिरियल नंबर नाही. कायद्याने या कागदाच्या तुकड्यांना शून्य किंमत आहे. त्यामुळे त्या वापरण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरेल. हा देश सध्या शोकात असून लोकांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल आदर दाखवावा आणि तोडफोड थांबवावी."

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा.

एएफपीशी बोलताना एका महिलेने सांगितले, "विमान कोसळले तेव्हा विजांचा कडकडाट आणि गारांचा मोठा पाऊस सुरू होता."

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमानाचे टायर थेट त्याच्या बहिणीच्या कारवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली.

सध्या जखमींवर उपचार सुरू असून रक्ताची मोठी गरज असल्याने प्रशासनाने नागरिकांना तातडीने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)