तुमची मान काळी दिसतेय? काखेत, मानेवर काळा पट्टा आलाय? मग या तपासण्या करुन घ्याच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आजकाल तरुणवयातच काही लोकांच्या मानेवर काळा पट्टा दिसू लागतो. महिलांच्या बाबतीत हे दागिन्यांमुळे किंवा मंगळसुत्रामुळे होत असेल असं समजून सोडून दिलं जातं. पण हेच कारण दरवेळेस असेल असं नाही.
काही लोकांच्या मान, काख, तसेच जांघेमध्ये त्वचा एका मर्यादेपेक्षा जास्त काळी पडलेली दिसू लागते. शरीराला जिथं घड्या पडतात अशा जागची त्वचा अतिशय काळी होणे, काळा पट्टा आल्यासारखं होणं तसेच तिथली त्वचा राठ, गडद होणं असे प्रकार होत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
यामागे प्रदूषण किंवा धूळ अशी बाह्य कारणं नसून त्याचं कारण आपल्या शरीरात आत दडलेलं असू शकतं.
या स्थितीला इंग्रजीत अकान्थोसिस निग्रिकन्स (Acanthosis nigricans) असं म्हटलं जातं.

अकान्थोसिस निग्रिकन्सची काही ठळक कारणे आहेत. त्यातील सर्वात सामान्यतः दिसणारं कारण म्हणजे लठ्ठपणा. अतिरिक्त चरबी आणि अतिवजन असलेल्या लोकांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो.
त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे मधुमेह म्हणजेच डायबेटिस किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स काही लोकांना विशिष्ट आजारांमुळे त्वचेवर हे बदल दिसून येतात, काही लोकांना औषधांमुळेही असा परिणाम दिसू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
काही दुर्मिळ वेळा कर्करोगात हे लक्षण दिसून येतं, तसेच अनुवंशिक कारणही यामागे असू शकतं. त्यामुळे याची लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाऊन सखोल तपासणी करणं गरजेचं आहे. कोणत्याही आजाराचं निदान डॉक्टरांकडून तपासणी करुनच झालं पाहिजे. केवळ अंदाजावर स्वतःच निदान करणं व परस्पर औषधं घेणं धोकादायक आहे.

आता आधी इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय हे सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊ.
आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा शरीर त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये करतं. ग्लुकोज आपल्या शरीरासाठी आवश्यक ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे.
नंतर हे ग्लुकोज आपल्या रक्तात जातं आणि स्वादुपिंडाला म्हणजेच पॅनक्रियाजला इन्सुलिन स्रवण्याचे संकेत देतो.
इन्सुलिन रक्तातून आलेले ग्लुकोज स्नायू, चरबी आणि यकृत पेशींमध्ये पाठवण्यास मदत करतं, ज्यामुळं शरीर या ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करू शकतं किंवा नंतर वापरण्यासाठी साठवून ठेवू शकतं. जेव्हा ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करतं तेव्हा रक्तात त्याची पातळी कमी होते. त्यामुळं पॅनक्रियांजना इन्सुलिनचं उत्पादन बंद करण्याचे संकेत मिळतात.
इन्सुलिन प्रतिरोध किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स ही एक गुंतागुतांची प्रक्रिया आहे. जेव्हा स्नायू, चरबी आणि यकृत पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा असं होतं.यामुळे, पेशी रक्तातील ग्लुकोज प्रभावीपणे शोषून घेणं किंवा साठवणं थांबवतात आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली राहाते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करतं. या स्थितीला हायपरइन्सुलिनमिया म्हटलं जातं.
जोपर्यंत स्वादुपिंड पेशींच्या प्रतिसादावर मात करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करतात, तोपर्यंत ब्लड शुगर लेव्हल म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत राहते.
त्याच वेळी, इन्सुलिनच्या दिशेनं पेशींचा प्रतिकार वाढल्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील वाढते. रक्तातील ग्लुकोजच्या वाढीमुळे टाइप 2 मधुमेहासह इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.


इन्सुलिन रेझिस्टन्सची कारणं अनेक आहेत. यात महत्त्वाची कारणं आपण येथे पाहू. इन्सुलिन रेझिस्टन्सला सर्वात जास्त कारणीभूत घटक मानला जातो तो वजनवाढीचा आणि लठ्ठपणाचा. आपल्या पोट, मान, मांड्या, कंबर, नितंब इथं अतिरिक्त चरबी साठलेली असेल तर ती धोक्याची घंटा मानली जावी. तसेच आपली जीवनशैली बैठी असेल, शारीरिक श्रम अत्यंत कमी असतील, हालचाल कमी असेल, व्यायामाचा पूर्ण अभाव असेल तर हा धोका वाढू शकतो.
काही लोकांमध्ये अनुवंशिक कारणांमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होऊ शकतो. अशा लोकांनी याप्रकारचा काही कौटुंबिक इतिहास असेल तर तो डॉक्टरांच्या लक्षात आणून दिला पाहिजे.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), कुशिंग सिंड्रोम आणि फॅटी लिव्हर आजारातही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
यापुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार. पाकिटबंद आणि बाहेर मिळणारं वारंवार प्रक्रिया केलेलं अन्न खाणं, भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि साखर यांचा समावेश आहारात असेल तर याचा धोका वाढतो. काही लोक बाटलीबंद पेयंही भरपूर पितात त्यातून मोठ्या प्रमाणात साखर पोटात जात असते.
सतत तणावात जगणाऱ्या लोकांच्या शरीरात कार्टिसोलचंसारखं हार्मोन वाढतं आणि त्यामुळे इन्सुलिनच्या कामात अडथळा येतो. अपुरी झोप तसेच झोपेची गुणवत्ता चांगली नसेल तरीही हा अडथळा येतो. वाढत्या वयामुळेही इन्सुलिनच्या कामात अडथळा येतो. थोडक्यात आहार आणि जीवनशैली चांगली ठेवणं हा मुख्य उपाय आपल्या हातात आहे.

अकान्थोसिस निग्रिकन्सबद्दल आम्ही मुंबईच्या झँड्रा हेल्थकेअर रुग्णालयाच्या मधुमेह विभागाचे प्रमुख आणि 'रंग दे निला' या आरोग्य उपक्रमाचे सहसंस्थापक डॉ. राजीव कोविल यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "हा प्रकार बहुतांशवेळा टाइप टू डायबेटिस, प्रीडायबेटिस म्हणजे डायबेटिस होण्याची शक्यता असलेले लोक तसेच इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंधित असतो. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरातल्या पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात आणि रक्तात अधिक इन्सुलिन पाठवावं लागतं. मग हे अतिरेकी इन्सुलिन त्वचेच्या पेशींच्या अयोग्य वाढीला कारणीभूत ठरतं. त्यामुळेच अशी जाड, काळी त्वचा दिसून येते. याचा पुढचा धोका डायबेटिस, लठ्ठपणा, पीसीओएस, फॅटी लिव्हर असा असू शकतो.
यावर उपचार काय असतात, असं विचारल्यावर डॉ. कोविल म्हणाले, "यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबेटिस आटोक्यात आणणं आहे. त्यानंतर वजन कमी करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं दररोज व्यायाम केला पाहिजे. कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. तुमच्या तपासणीनंतर डॉक्टर देत असलेल्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि काही रुग्णांना लेजर थेरपीही घ्यावी लागते."
या स्थितीवर एकच एक ठराविक, विशिष्ट अशी उपचारपद्धती नसली तरी रुग्णाला काही गोष्टीत बदल करावे लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल मुंबईतल्या अपोलो रुग्णालयातील सिनियर कन्सल्टंट जनरल मेडिसिन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वैशाली लोखंडे यांनी अधिक माहिती दिल.
त्या सांगतात, "रक्तातील साखरेची पातळी कमी करणं, चांगला आहार, व्यायाम, औषधं घेणं गरजेचं आहे."
"रेटिनॉईड्स किंवा ट्रेटिनॉइनसारख्या उपचारांनी काही रुग्णांची त्वचा सुधारता येते मात्र ते सर्वांना लागू पडेल असं नाही. काही औषधांनी तसेच मलमांनी त्वचेचा काळपटपणा घालवता येतो आणि काही मलमांनी त्वचेचा दाह कमी होऊन तिचा पोत थोडा सुधारता येतो. अगदी गंभीर स्थिती लेजर उपचार करावे लागतात. अर्थात हे सर्व उपचार डॉक्टरांनी निदान केल्यावर त्यांच्याकडेच करणं गरजेचं आहे."
डॉ. लोखंडेसुद्धा सर्वांनी व्यायाम, चांगला आहार आणि वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावं असं सांगतात. त्या म्हणतात, "पाच ते दहा टक्के वजन कमी झालं तरी इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये लक्षणीय बदल होतो. तंतुमय पदार्थ आहारात भरपूर घेणं गरजेचं आहे. प्रथिनं आणि चांगल्या गुणवत्तेचे मेदपदार्थ आहारात असावेत. साखर आणि साखर वापरलेले पदार्थ कमी खावेत. नियमित व्यायाम करणाऱ्यांची चयापचयाची गती चांगली असते."
याबरोबरच डॉ. लोखंडे चयापचय निट राहावं यासाठी झोपेकडं लक्ष देण्यास सांगतात. किमान सात ते नऊ तास झोप घेणं आवश्यक असून झोपेची गुणवत्ता चांगली असली पाहिजे असं त्या अवर्जून सांगतात. वेळेवर झोपणं आणि झोपेचं एक ठराविक वेळापत्रक असणं आवश्यक आहे असं त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











