इराणमध्ये 13 दिवसांपासून आंदोलनं, हिंसाचारात 48 आंदोलक आणि 14 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू; खामेनी काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
इराणची राजधानी तेहरान तसंच इतर शहरांमध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनांचे अनेक व्हीडिओही समोर आले आहेत.
धार्मिक सत्तेविरोधात शक्तिप्रदर्शन करणारी ही आंदोलनं असल्याचं व्हीडिओंमधून सांगितलं जात आहे.
मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनांतील हिंसाचारात किमान 48 आंदोलक आणि 14 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
गुरुवारी (8 जानेवारी) संध्याकाळी तेहरान आणि देशाच्या दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये शांततापूर्ण निदर्शनं झाली. सुरक्षा दलांनीही या आंदोलकांना अडवलं नाही. बीबीसी फारसीने या व्हीडिओंना दुजोरा दिला आहे.
यानंतर संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं एका मॉनिटरिंग गटाने सांगितलं.
व्हीडिओ फुटेजमध्ये आंदोलक इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांना हटवण्याची मागणी करताना दिसत आहेत. तसंच देशाच्या शेवटच्या शाहचे निर्वासित पुत्र रझा पहलवी यांच्या परतण्याच्या घोषणा देताना ऐकू येतात. रझा पहलवी यांनी आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
देशातील ढासळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे या आंदोलनांना सुरुवात झाली होती. दरम्यान, हे आंदोलन गेल्या काही वर्षांतलं सर्वात मोठं आंदोलन ठरलं आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी काय म्हणाले?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी म्हणाले की, सरकारविरोधी आंदोलन करणारे हे असे उपद्रवी आहेत, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
खामेनी यांनी सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांना 'दंगलखोर' आणि 'गुंडांचा कळप' म्हटलं आहे. हे लोक केवळ "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याचा" प्रयत्न करत असल्याचं खामेनी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं. तर आता आंदोलनकर्त्यांची हत्या झाली, तर अमेरिका इराणवर "जोरदार हल्ला" करेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
खामेनी यांनी आंदोलनकर्त्यांवर सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, Office of the Iranian Supreme Leader/WANA (West Asia News Agency)
खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली असून, त्यामध्ये ट्रम्प यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, "जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण जगाबाबत अहंकाराने निर्णय घेतात, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की फिरौन, निमरूद, मोहम्मद रझा पहलवी आणि अशा इतर हुकूमशहा व अहंकारी शासकांचा अंत तेव्हाच झाला, जेव्हा त्यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता. त्यांचाही (ट्रम्प यांचाही) असाच अंत होईल."
खामेनी यांनी दावा केला, "आज इराण क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत अधिक सुसज्ज आणि सशस्त्र आहे. आमची आध्यात्मिक ताकद आणि पारंपरिक शस्त्रास्त्रे यांची तुलना आता जुन्या काळाशी होऊ शकत नाही.
पूर्वीप्रमाणेच आजही अमेरिकेचा इराणबद्दलचा समज चुकीचा आहे."
खामेनी म्हणाले की, लाखो सन्माननीय लोकांच्या बलिदानातून उभा राहिलेला इराण, देशाची नासधूस करणाऱ्यांसमोर कधीही झुकणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
आतापर्यंत काय घडलं?
इराणमध्ये 13 दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजूनही देशात अशांतताच आहे.
इराणी चलनाच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या संतापानंतर या आंदोलनांना सुरुवात झाली. आंदोलनाचं हे लोण इराणच्या 31 प्रांतातल्या 100 हून अधिक शहरांमध्ये पसरलं.
या आंदोलनांदरम्यान इराणच्या इस्लामिक रिपब्लिकला संपवण्याची मागणी केली जात असून, काही लोक राजेशाही पुन्हा बहाल करण्याची मागणी करत आहेत.
मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनांतील हिंसाचारात किमान 48 आंदोलनकर्ते आणि 14 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील ह्यूमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने (HRANA) म्हटलं की, आतापर्यंत किमान 34 आंदोलकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 5 मुलांचा समावेश आहे.
याशिवाय 8 सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला असून 2 हजार 270 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
नॉर्वेतील संस्था 'इराण ह्यूमन राइट्स'ने (IHR) सांगितले आहे की, सुरक्षादलांच्या कारवाईत किमान 45 आंदोलक मारले गेले असून त्यामध्ये 8 मुलांचा समावेश आहे.
बीबीसी फारसीने 22 मृतांची ओळख पटवली आहे, तर इराणी अधिकाऱ्यांनी 6 सुरक्षा रक्षकांच्या मृत्यूची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
गुरुवारी (8 जानेवारी) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या आणि बीबीसी फारसीने पडताळणी केलेल्या व्हीडिओंमध्ये देशाच्या उत्तर-पूर्वेकडील मशहद शहरातील एका प्रमुख रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक उतरलेले दिसत आहेत.
या व्हीडिओंमध्ये 'शाह जिंदाबाद' आणि 'ही शेवटची लढाई आहे, पहलवी परत येतील' अशा घोषणा ऐकू येतात. एका ठिकाणी काही लोक ओव्हरब्रिजवर चढताना आणि तिथे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढताना दिसतात.
ऑनलाइन पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये पूर्व तेहरानमधील एका प्रमुख रस्त्यावरही मोठ्या संख्येने आंदोलक दिसत आहेत.
मध्यवर्ती शहर इस्फहानमधील एका व्हीडिओमध्ये आंदोलक 'हुकूमशहा मुर्दाबाद' घोषणा देत आहेत. या घोषणा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याशी जोडून पाहिल्या जात आहेत.
पश्चिमेकडील देझफुल शहरातून बीबीसी फारसीकडे आलेल्या फुटेजमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक दिसत आहेत. तिथे एका मध्यवर्ती चौकातून सुरक्षा रक्षक गोळीबार करतानाही दिसत आहेत.
वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणारे रझा पहलवी यांनी इराणी नागरिकांना रस्त्यावर उतरून एकत्र येत आपल्या मागण्या ठामपणे मांडण्याचे आवाहन केल्यानंतर गुरुवारी (8 जानेवारी) संध्याकाळी हे आंदोलन झाले.
रझा पहलवी यांच्या वडिलांना 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेतून हटवण्यात आले होते.
इराणमधील सरकारी माध्यमांनी काय म्हटलं?
इराणच्या सरकारी माध्यमांनी मात्र गुरूवारच्या आंदोलनाची तीव्रता कमी करून दाखवली. काही प्रकरणांत तर कुठेच आंदोलन झालं नाही, असं म्हटलं गेलं. ते सिद्ध करण्यासाठी रिकाम्या रस्त्यांचे व्हीडिओही दाखविण्यात आले.
दरम्यान, इंटरनेटशी संबंधित असलेल्या 'नेटब्लॉक्स' या संस्थेने सांगितले की त्यांच्या आकडेवारीनुसार इराणमध्ये सध्या संपूर्ण देशातच इंटरनेट बंद असण्याची परिस्थिती आहे.
या आधी काही दिवसांपूर्वी पश्चिमेकडील इलाम प्रांतातील छोट्याशा लोमार शहरातल्या व्हीडिओमध्ये लोक 'तोफ, टँक, फटाके- मौलवींना जायचंच आहे' अशा घोषणा देताना दिसले. या घोषणांचा संदर्भ धार्मिक सत्तेशी जोडून पाहिला जात आहे. अजून एका व्हीडिओमध्ये लोक एका बँकेबाहेर कागद हवेत उडवताना दिसले.
इलाम, केरमनशाह आणि लोरेस्तान प्रांतांतील कुर्द बहुसंख्याक असलेल्या अनेक शहरांमध्ये दुकानं बंद असल्याचं दिसून आलं.
कुर्द मानवाधिकार संघटना 'हेंगाव'च्या मते आंदोलनादरम्यान इलाम, केरमनशाह आणि लोरेस्तानमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत किमान 17 निदर्शकांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक जण कुर्द किंवा लोर या जातीय अल्पसंख्याक समुदायातील होते.

फोटो स्रोत, EPA/Shutterstock
बुधवारी (7 जानेवारी) पश्चिम इराणमधील अनेक शहरं आणि गावांमध्ये तसंच इतर भागांतही निदर्शक आणि सुरक्षादलांमध्ये हिंसक झटापटी झाल्या होत्या.
'इराण ह्यूमन राइट्स' (IHR) या संस्थेने सांगितलं की, हा आतापर्यंतचा सर्वाधिक प्राणघातक दिवस होता. या दिवशी देशभरात 13 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली.
संस्थेचे संचालक महमूद अमीरी-मोगद्दम यांनी म्हटलं की, "कारवाई दिवसेंदिवस हिंसक होत असून तिची व्याप्ती वाढत आहे."
हेंगावने सांगितलं की, बुधवारी (7 जानेवारी) रात्री उत्तरेकडील गिलान प्रांतातील खोश्क-ए-बिजार इथं सुरक्षादलांनी दोन निदर्शकांवर गोळीबार केला.
रिव्होल्युशनरी गार्ड्सशी जवळीक असलेली इराणची अर्धसरकारी वृत्तसंस्था 'फार्स'ने म्हटलं की, बुधवारी (7 जानेवारी) तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिमेकडील लोर्देगन शहरात शस्त्रधारी लोकांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू तेहरानच्या पश्चिमेकडील मलार्ड काउंटीमध्ये अशांतता नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना चाकूच्या वारामुळे झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











