इराणचे पहिले सर्वोच्च नेते खोमेनी यांना 'भारताचे एजंट' का म्हटलं गेलं? असा आहे भारताशी संबंध

- Author, राकेश भट्ट
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे संस्थापक आणि पहिले सर्वोच्च नेते अयातुल्लाह रुहोल्ला खोमेनी यांचे पूर्वज भारतीय होते.
अयोतुल्लाह रुहोल्ला खोमेनी यांचे आजोबा, सय्यद अहमद मौसावी यांचा जन्म 1790 मध्ये भारतातील एका छोट्या गावात झाला होता.
रुहोल्ला खोमेनी यांचे आजोबा 40 वर्षांचे असताना अवधच्या नवाबांबरोबर आध्यात्मिक यात्रेसाठी इराकला गेले होते.
तिथून ते इराणमधील अनेक आध्यात्मिक स्थळांना गेले आणि इराणमधील खामेन नावाच्या गावात स्थायिक झाले.
ते जरी इराणमध्ये स्थायिक झाले होते, तरी त्यांना त्यांचं भारतीय मूळ लक्षात ठेवायचं होतं. त्याबद्दल सन्मान व्यक्त करायचा होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या नावाचा 'हिंदी' शब्दाचा वापर कायम ठेवला.
नंतर त्यांचा मुलगा 'अयातुल्ला मुस्तफा हिंदी' इस्लामच्या महान विद्धानांपैकी एक बनला.
याच 'मुस्तफा हिंदी' यांचा धाकटा मुलगा म्हणजे रुहोल्ला खोमेनी. त्यांचा जन्म 1902 मध्ये झाला होता. नंतर ते अयातुल्ला खोमेनी आणि इमाम खोमेनी म्हणून ओळखले जाऊ लागले.
बंड आणि इस्लामिक रिपब्लिकची निर्मिती
रुहोल्ला यांचा जन्म झाल्यानंतर पाच महिन्यांनी त्यांचे वडील सय्यद मुस्तफा हिंदी यांची हत्या करण्यात आली.
वडिलांच्या मृत्यूनंतर रुहोल्ला यांचं संगोपन त्यांची आई आणि काकूनं केलं. त्यांनी त्यांचे मोठे भाऊ मूर्तजा यांच्या देखरेखीखाली इस्लामिक शिक्षण घेतलं.
रुहोल्ला खोमेनी यांना इस्लामिक न्यायशास्त्र आणि शरिया कायद्यात खूप रस होता. मात्र त्यांनी फक्त इस्लामिक शिक्षणच घेतलं नाही तर, पाश्चात्य तत्वज्ञानाचाही अभ्यास केला.
ते अराक आणि कोम या इराणमधील शहरांमध्ये असणाऱ्या इस्लामिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अध्यापनाचं काम देखील केलं. याच काळात त्यांनी इराणमधील राजेशाहीला विरोध करण्यास सुरुवात केली.
राजेशाहीऐवजी ते विलायत-ए-फकिह नावाच्या व्यवस्थेला पाठिंबा देत होते. त्याचा अर्थ होतो कायदेतज्ज्ञांचं सार्वभौमत्व.
पहलवी सुलतानाविरोधात रुहाल्ला खोमेनी यांनी बंड केल्यानंतर त्यांना इराणमधून हद्दपार करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला, इराणच्या जनतेनं मात्र रुहाल्ला खोमेनी यांना त्यांचा नेता म्हणून स्वीकारलं होतं.

खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली जनतेची आणि इतर विरोधी राजकीय गटांची एकजूट झाली आहे, ही बाब पहलवी राजवटीच्या लक्षात आली.
त्यानंतर, 7 जानेवारी 1978 इत्तेहाद या इराणमधील वृत्तपत्रानं खोमेनी यांना भारतीय वंशाचा 'मुल्ला' (मुस्लिम धर्मगुरूंची एक पदवी) असं संबोधलं. खोमेनी हे भारत आणि ब्रिटनचे एजंट असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न होता.
वृत्तपत्रातील लेखात खोमेनी यांचं वर्णन ब्रिटिश-भारतीय वसाहतीचा एक सैनिक असं करण्यात आलं. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर, इराणमधील क्रांती अधिक तीव्र झाली. सरकारनं ही क्रांती दडपण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील लोकं रस्त्यावर ठाण मांडून बसली होती.
ही क्रांती दडपता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर, 16 जानेवारी 1979 पहलवी राजघराण्याचे दुसरे राजा, आर्य मेहर मोहम्मद रेझा पहलवी, इराण सोडून परदेशात निघून गेले.
त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 1 फेब्रुवारी 1979 ला खोमेनी इराणमध्ये परतले.
हद्दपार केल्यानंतर जवळपास 14 वर्षांनी ते इराणमध्ये परतले होते. खोमेनी इराणमध्ये परतल्यानंतर त्यांनी राजेशाहीऐवजी इस्लामिक रिपब्लिक म्हणजे इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना केली.
खोमेनी यांचं इराणमधील स्थान
खोमेनी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विशेष ओळख मिळाली. त्यांनी काही महत्त्वाची वक्तव्यं देखील केली.
यात "आमचा पूर्वेशी किंवा पश्चिमेशी कोणताही संबंध नाही. आमचा फक्त इस्लामिक रिपब्लिकशी संबंध आहे," आणि "अमेरिकेकडे कोणतीही शक्ती नाही," या वक्तव्यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रुहोल्ला हिंदी इरफाना गझल्स (गझल म्हणजे फारसी आणि ऊर्दूमध्ये लिहिली जाणारी पारंपरिक कविता) लिहायचे.
27 जुलै 1980 ला परागंदा झालेले इराणचे राजे, आर्य मेहर मोहम्मद पहलवी यांचं निधन झालं. त्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे 4 जून 1989 ला अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचं निधन झालं.
अयातुल्लाह अली खामेनी यांचा प्रवास
इराणचे सर्वोच्च नेते रुहोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर, 1989 मध्ये धर्मगुरूंनी अयातुल्ला अली खामेनी यांची रुहोल्ला यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली.
अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म 1939 मध्ये इराणमधील दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये झाला.
1962 मध्ये अयातुल्ला अली खामेनी, शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्या विरोधात रुहोल्ला खोमेनी यांनी सुरू केलेल्या धार्मिक संघर्षात सहभागी झाले होते.
"अयातुल्ला अली खामेनी, त्यानंतर रुहोल्ला यांचे शिष्य बनले. माझा आज ज्यावर विश्वास आहे आणि मी जे काही करतो आहे, ते रुहोल्ला खामेनी यांच्या इस्लामविषयीच्या दृष्टीतून येतं," असं अयातुल्ला अली खामेनी म्हणतात.

त्यांनी शाहविरुद्ध मोठा संघर्ष केला आणि त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगात देखील जावं लागलं.
1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर एक वर्षानं, खामेनी यांची नियुक्ती तेहरानमध्ये होणाऱ्या शुक्रवारच्या नमाजाचे प्रमुख म्हणून करण्यात आली.
त्यांनी हंगामी सरकार आणि तिथलं सरकार चालवणाऱ्या रिव्होल्युशनरी कौन्सिल म्हणजे क्रांतिकारक परिषदेत काम केलं.
नंतर ते संरक्षण उपमंत्री झाले. या पदामुळे त्यांना इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) उभारण्यास मदत झाली. नंतरच्या काळात आयआरजीसी ही इराणमधील सर्वात शक्तिशाली संघटनांपैकी एक बनली.
1981 मध्ये अयातुल्ला अली खामेनी यांची इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











