इराणवर हल्ला करून इस्रायलने नेमकं काय साध्य केलं? तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील 12 दिवसांचं युद्ध थांबलं आहे.
या 12 दिवसांच्या युद्धाची तुलना ही इस्रायलने 1967 मध्ये तीन देशांसोबत केलेल्या सहा दिवसांच्या युद्धाबरोबर केली जात आहे.
संरक्षण आणि गुप्तचर विश्लेषक योना जेरेमी बॉब यांनी इस्रायलच्या इंग्रजी वृत्तपत्र जेरुसलेम पोस्टमध्ये याविषयी एक लेख लिहिला आहे .
त्यात जेरेमी बॉब लिहितात की, "इस्रायलची स्थापना 1948 मध्ये झाली पण 1967 मध्ये झालेल्या सहा दिवसांच्या युद्धाने आखाती भागाचा नकाशा बदलला. त्यामुळं इस्रायलनं एक नवी ओळख निर्माण केली.
सहा दिवसांच्या त्या युद्धात इस्रायलने तीन देशांना पराभूत केलं होतं. इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन हे ते देश होते. या युद्धानंतर, सिनाई, गोलान, वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेम हे नवीन भाग इस्रायलमध्ये समाविष्ट झाले. हे तीन देश इस्रायलचा नाश करतील असं लोकांना या युद्धापूर्वी वाटलं होतं."
बॉब यांच्या मते, "त्यावेळी इस्रायलचं लष्कर प्रतिस्पर्धी लष्कराच्या तुलनेत खूप चांगलं होतं. फक्त क्षमता आणि व्यावसायिकता नव्हे तर ध्येय मिळवण्यासाठी असलेली कटिबद्धताही त्यांच्यात होती. त्यामुळंच इस्रायलने अचानक हल्ल्याची धाडसी योजना आखली होती."
"इस्रायल आणि इराण कधीही समान नव्हते. तरीही इराणनं वेळोवेळी स्वतःची क्षमता सिद्ध केली. प्रतिकूल परिस्थितीतही लढण्यासाठी लागणारी साधणं आणि त्याचबरोबर क्षमता आणि संयमही असल्याचं त्यांनी दाखवलं.
इराण इस्रायलपासून 1500 किलोमीटर अंतरावर आहे. पण गाझा, लेबनॉन, सीरिया, इराक, वेस्ट बँक, येमेन आणि स्वतः इराण या सात आघाड्यांवर इस्रायलला घेरण्यात त्यांना यश आलं."
कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव?
या संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी (24 जून) रात्री एका भाषणात, 12 दिवसांच्या युद्धात त्यांचं ध्येय साध्य करण्यात यश आल्याचं म्हटलं आहे. ही ऐतिहासिक चाल होती आणि पिढ्यानपिढ्या ती लक्षात ठेवली जाईल, असंही त्यांनी म्हटलं.
पण, नेतन्याहू विजयाचा दावा करत असले तरीही पेंटागॉनच्या सुरुवातीच्या गुप्तचर अहवालानुसार, अमेरिकेनं केलेल्या अणुकेंद्रांवरील हल्ल्यात इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात आलेला नाही. ट्रम्प यांनी मात्र ते नाकारलं आहे.
त्यामुळं इस्रायलला या 12 दिवसांच्या युद्धातून नेमकं काय मिळालं? हा प्रश्न उपस्थित होतो.
शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी x वर एक पोस्ट केली. त्यात म्हटलं की, "इराणचे लोक आणि त्यांचा इतिहास ज्यांना माहिती आहे, त्यांना इराण हा शरणागती पत्करणारा राष्ट्र नाही, हे माहिती आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पोर्तुगालच्या मिन्हो विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक मोहम्मद इस्लामी यांनी याबाबत मिडल ईस्ट आय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "इराणच्या अणुकार्यक्रमाला या 12 दिवसांत मोठा धक्का बसला यात शंका नाही. इराण अनेक दशकांपासून नतांझ, फोर्डो आणि इस्फहानमध्ये युरेनियम समृद्धीकरणाचं काम करत होता.
तसंच इस्रायलनं इराणच्या अनेक शास्त्रज्ञांनाही मारलं आहे. पायाभूत सुविधा उभारणं महत्त्वाचं आहेच, पण शास्त्रज्ञांची एक नवीन पिढी तयार करणं हे खूप कठिण काम आहे."
मोहम्मद इस्लामी यांच्या मते, "इराणचं नुकसान झालं असलं तरी त्यांच्या क्षेपणास्त्रांनी छाप सोडण्यात यश मिळवलं आहे. इराणी क्षेपणास्त्रं इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यशस्वी झाली."
अमेरिका या 12 दिवसांच्या युद्धात इस्रायलसोबत होता आणि इतर पाश्चात्य देशांनीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्याला पाठिंबा दिला.
इराण मात्र एकटा होता. डोनाल्ड ट्रम्प हे इतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत इस्रायल समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी गाझामध्ये युद्धबंदी आणण्यासही नकार दिला होता.
इराणने आपलं उद्दिष्टं साध्य केलं का?
श्रीराम चौलिया जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सचे डीन आणि 'फ्रेंड्स: इंडियाज क्लोझेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर्स' या पुस्तकाचे लेखक आहेत. इस्रायलला 1967 च्या युद्धात मोठा विजय मिळाला होता, असं ते सांगतात.
"इस्रायलला 1967 मध्ये झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात जे यश मिळालं होतं, त्या तुलनेत हे काहीच नाही. इस्रायलनं यावेळीही त्यांची शक्ती दाखवली आणि युद्धात वर्चस्वही गाजवले. संपूर्ण हवाई क्षेत्र इस्रायलने नियंत्रणाखाली ठेवले होते. पण 1967 प्रमाणे त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं नाही."
चौलिया यांच्या मते, "इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची क्षमता अजूनही कायम आहे. इराणकडे किमान 2500 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं असल्याचं समजतं. त्यापैकी फार तर 25 टक्के या युद्धात वापरल्या असतील असं मला वाटतं.
त्यामुळं इस्रायलला इराणचा संपूर्ण अणुकार्यक्रम नष्ट करण्यात किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची शक्ती संपवण्यात यश आलं असं म्हणता येणार नाही. इस्रायलने 1967 मध्ये मोठं यश मिळवलं होते. ते फक्त जिंकले नव्हते, तर त्यांनी इतरांच्या भूमीवरही ताबा मिळवला होता. "

फोटो स्रोत, Getty Images
चौलिया म्हणतात की, "इस्रायलने इराणमध्ये सत्तापालट केला असता, तर त्यांना 1967 सारखं यश मिळालं असं म्हणता आलं असतं. पण इराणचीही क्षमता देखील आहे. त्यांची 10 टक्के क्षेपणास्त्रं इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यशस्वी झाली. हीच एक मोठी बाब आहे.
इराणला हे युद्ध काही महिने लढता आलं असतं. त्यांनी प्रत्युत्तर देण्यातही कसर सोडली नाही. त्यामुळं इराण हे युद्ध काही महिने खेचू शकतो हे इस्रायलला समजल्यानंच नेतन्याहू शस्त्रसंधीला तयार झाले."
इराणला या युद्धामुळं त्यांच्या कमकुवत बाजू आणि इस्रायची शक्ती समजल्यामुळं, त्यांना या युद्धातून धडा मिळेल, असंही चौलिया म्हणतात.
"इराणमध्ये सत्तापालट करण्याची इच्छा इस्रायलची आहे अमेरिकेची नव्हे. अमेरिकेनं तीन देशांत करून काहीही साध्य केलं नाही. मग, अफगाणिस्तान असो इराक असो किंवा लिबिया.
इराण हा मोठा देश आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 10 कोटी आहे. तसंच परिसर डोंगराळ आहे. त्याठिकाणी लष्कर कसं पोहोचणार? इराणमध्ये सत्ता बदलण्यासाठी भूदलाची आवश्यकता असेल. इस्रायलला ते कसं करता येईल? गाझामध्ये लढण्यासाठीच सध्या त्यांच्याकडं सैनिक नाहीत," असंही चौलिया सांगतात.
इस्रायलची तयारी
आखाती भागाच्या भू-राजकीय स्थितीतवर लक्ष असणाऱ्या मंजरी सिंह यांच्या मते, इस्रायलनं इराणवर अचानक नव्हे तर संपूर्ण तयारीनिशी हल्ला केला.
"इस्रायलनं आधी इराणच्या प्रॉक्सींची शक्ती कमी केली. हिजबुल्लाहच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवले. हमासला कमकुवत केलं. तर, अमेरिकेने येमेनमध्ये हुती बंडखोरांवर आणि त्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला केला. इस्रायलने इराणच्या प्रॉक्सींना कमकुवत न करता हल्ला केला असता तर ते त्यांच्यासाठी कठीण ठरलं असतं", असं मंजरी सिंह यांनी म्हटलं.
त्यांच्या मते, "इस्रायलला इराणची शक्ती माहिती आहे. इराणकडे लष्करी सामर्थ्यही आहे आणि तंत्रज्ञानही आहे. त्यामुळं इस्रायल आणि इराणमधील कोणतंही युद्ध साधं नसेल. इराण या भागातील लष्करी सामर्थ्य असलेला देश आहे. त्यामुळं इस्रायलला कमी लेखू शकत नसल्याचं इस्रायलचे तज्ज्ञही मान्य करतात."

फोटो स्रोत, Getty Images
मग, इस्रायलला या 12 दिवसांत त्यांचं उद्दिष्ट साध्य करता आलं का?
मंजरी सिंह म्हणतात की, "इस्रायलनं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य केलं असं मी म्हणणार नाही. इराणने हल्ल्यापूर्वीच अणुसाठा काढला होता, असं बातम्यांतून समोर येत आहे.
इराणकडे अणुसाठा असेल तर याचा अर्थ, अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळं इस्रायलला असलेला इराणचा अणुधोका कमी झालेला नाही."
इराणचं किती नुकसान?
सौदी अरेबियामधील भारताचे माजी राजदूत तलमीज अहमद सांगतात की, इस्रायलचे पहिले उद्दिष्ट इराणच्या अणु कार्यक्रम उद्ध्वस्त करणे होतं. पण हे उद्दिष्ट साध्य करण्यात इस्रायलला पूर्ण यश आलं नाही.
ते म्हणतात, "पेंटागॉनकडून आलेल्या अहवालांवरून इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झालेला नसल्याचं दिसतंय. त्यांचा वेग मंदावलेला असू शकतो, पण इराणचं अणु केंद्र नष्ट झालेलं नाही.
आतापर्यंत कोणतीही रेडिओॲक्टिव्हिटी दिसून आली नाही. याचा अर्थ तिथे काहीच रेडिओॲक्टिव्ह सामग्री नव्हती किंवा ते बॉम्ब त्या सामग्रीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
इराणकडून इतका यशस्वी प्रतिहल्ला होऊ शकेल याची इस्रायलला कल्पना नव्हती. त्यामुळे बाराव्या दिवसापर्यंत इस्रायललाही वाटू लागलं की शस्त्रसंधी झाली तर चांगलं होईल."

फोटो स्रोत, Getty Images
अहमद पुढे सांगतात, "तरीही इस्रायलने इराणचं मोठं नुकसान केलं आहे. इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना ठार केलं. त्यामुळे इराणची सुरक्षा यंत्रणा काय करत होती, हा प्रश्न उपस्थित होतोच.
हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले. याचा अर्थ त्यांच्या व्यवस्थेमध्ये काही मूलभूत त्रुटी आहेत. इराणची एअर डिफेन्स सिस्टमही पूर्णपणे अपयशी ठरली. इराणची अणू धोरणंही आता चुकीची ठरत आहेत.
2003 पर्यंत त्यांनी आपला अणू कार्यक्रम बंद करायला हवा होता किंवा मग थेट अणुबॉम्बच बनवायला हवा होता. पण 2003 पासून म्हणजे गेल्या 22 वर्षांमध्ये इराण ना अणुबॉम्ब बनवू शकला, ना आंतरराष्ट्रीय विश्वास संपादन करू शकला. त्यामुळे इराणला दोन्ही बाजूंनी तोटा झाला."
ते म्हणतात, "इराण आपली पारंपरिक लष्करी ताकद वाढवू शकला नाही. इराण अमेरिका समोर उभं राहण्याची भाषा करत होता, पण इस्रायली हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करू शकला नाही.
इराणला स्वतःच्या लष्करी अधिकाऱ्यांना, वैज्ञानिकांना आणि आपल्या जनतेला वाचवता आलं नाही.कतारमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ला इराणने आपली अब्रू वाचवण्यासाठी केला. या हल्ल्यात काहीही नुकसान झालं नाही. कारण त्याची माहिती आधीच देण्यात आली होती."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











