बेडरूमच्या भिंतीवरील 'त्या' खुणेने लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगाराला कसं पकडलं?

ग्रेग स्क्वायर
फोटो कॅप्शन, ग्रेग स्क्वायर
    • Author, सॅम पिरँटी
    • Role, बीबीसी आय इन्वेस्टिगेशन्स
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

(इशारा: या लेखामध्ये लैंगिक शोषणाबद्दलचे काही अस्वस्थ करणारे तपशील आहेत.)

40 हजार घरांचं एक अथांग जाळं आणि त्यामध्ये कुठेतरी कैद करून ठेवण्यात आलेली एक चिमुरडी.

एकीकडे तिला वाचवण्यासाठी पोलीस अटोकाट प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे गुन्हेगाराकडून पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात येत होते.

पोलिसांनी या चिमुरडीला म्हणजेच 'ल्यूसी'ला वाचवण्यासाठी आकाश-पाताळ एक केलं होतं, पण एकही सुगावा त्यांना गुन्हेगारापर्यंत पोहोचवू शकत नव्हता.

सरतेशेवटी, पोलिसांना एक असा सुगावा मिळाला ज्यातून त्या मुलीचा जीव वाचवता आला.

हा सुगावा मिळाला तो ल्यूसीला जिथं ठेवण्यात आलं होतं, त्या खोलीच्या भिंतीवर.

काय होता तो सुगावा? त्या भिंतीवर असं नक्की काय होतं? ल्यूसीचा जीव नक्की कसा वाचला?

डार्क वेबचं जाळं आणि आक्षेपार्ह फोटो

काही वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अत्यंत आक्षेपार्ह असे फोटो 'डार्क वेब'वर पसरवले जात होते.

'डार्क वेब' हा इंटरनेटचाच एक असा भाग असतो, जो सहजासहजी उघडता येणार नाही इतका गुप्त असतो. त्याला उघडण्यासाठी एका खास सॉफ्टवेअरचीच गरज लागते.

शिवाय, या सॉफ्टवेअरची रचनाच अशा प्रकारे केलेली असते की, ते वापरणारी व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी बसलेली आहे, हे शोधून काढता येत नाही.

ल्यूसी ज्या गुन्हेगाराच्या तावडीत सापडली होती, तो गुन्हेगार याच डार्क वेबच्या जाळ्यात लपून बसला होता. आणि त्याला शोधण्याचं काम पोलीस करत होते.

ग्रेग स्क्वायर या पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते. सध्या ते अमेरिकेच्या 'होमलँड सिक्युरिटी' या अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त पथकात कार्यरत आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून पसरवले जाणारे अश्लिल फोटो आणि व्हीडिओ आणि यातून लहान मुला-मुलींचं होणारं लैंगिक शोषण रोखणं, हे आव्हान त्यांच्यासमोर होतं.

ल्यूसी अशाच गुन्ह्याला बळी पडली होती.

अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा पत्ता शोधण्यासाठी, ग्रेग स्क्वायर आणि त्यांची टीम 'डार्क वेब'वर चोवीस तास बारीक नजर ठेवून असते
फोटो कॅप्शन, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा पत्ता शोधण्यासाठी, ग्रेग स्क्वायर आणि त्यांची टीम 'डार्क वेब'वर चोवीस तास बारीक नजर ठेवून असते

बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिस टीमनं तब्बल 5 वर्षे ग्रेग स्क्वायर यांच्यासोबत अशा प्रकारच्या तपास मोहिमेत सहभाग नोंदवला.

रशिया, ब्राझील, पोर्तुगाल यांसारख्या देशांमधील तपास पथकांच्या कामाचाही या टीमनं मागोवा घेतला.

रशियातील एका 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण झालेलं होतं. खरं तर तो या गुन्ह्यात मृत्युमूखी पडलाय, असंच समजलं जात होतं. पण, तपासाअंती त्याची सुटका करण्यात आली होती.

असंच दुसरं एक प्रकरण ब्राझीलमधलं. तिथे डार्क वेबच्या माध्यमातून लहान मुलांच्या शोषण करणारे पाच मोठ्ठे तळ शोधण्यात आले होते.

या साऱ्या मोहिमांचं वृत्तांकन बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टीमनं जवळून केलं.

त्यातीलच एक प्रकरण ल्यूसीचं. तिला वाचवण्यासाठी ग्रेग स्क्वायर प्रयत्नांची काष्ठा करत होते.

ग्रेग स्क्वायर सांगतात की, ल्यूसी ही केस त्यांच्या करिअरच्या अगदी सुरुवातीलाच्या काळातील होती. ही केस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. ती त्यांना सोडवता आल्यामुळे पुढच्या काळात ती त्यांच्यासाठी सतत प्रेरणादायी ठरली.

फोटोत दिसणाऱ्या वस्तूंवरून शोध

ल्यूसीचं वय त्यांच्या मुलीइतकंच होतं. त्यामुळे, ही गोष्ट त्यांना सतत अस्वस्थ करत होती.

शिवाय, जेव्हा जेव्हा डार्क वेबवर तिचे नवनवे फोटो समोर यायचे, तेव्हा त्यांचं हृदय पिळवटून निघायचं.

ग्रेग स्क्वायर आणि त्यांच्या टीमनं डार्क वेबवर येणाऱ्या या फोटोंचे अतिशय बारकाईनं निरीक्षण केलं.

या फोटोंमध्ये दिसणारे लाईटचे सॉकेट्स आणि स्वीचेस पाहून त्यांना केवळ इतकाच पुसटसा अंदाज आला की, ल्यूसी ही उत्तर अमेरिकेतच कुठेतरी आहे.

पण, एवढ्या अफाट पसरलेल्या देशात ती नेमकी कुठे आहे, हे शोधणं म्हणजे एका अतिशय किचकट कोड्यासारखंच होतं.

ल्यूसीच्या मागे दिसणाऱ्या भिंतीवरील विटांचा नेमका प्रकार जॉन हार्प यांनी अचूक ओळखला
फोटो कॅप्शन, ल्यूसीच्या मागे दिसणाऱ्या भिंतीवरील विटांचा नेमका प्रकार जॉन हार्प यांनी अचूक ओळखला
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांनी फेसबुकशी संपर्क केला. कारण, त्या काळात फेसबुक हाच प्लॅटफॉर्म इतरांपेक्षा अधिक प्रसिद्ध होता आणि लोक त्यावर आपले फॅमिली फोटो अपलोड करायचे.

ग्रेग स्क्वायर यांनी फेसबुकला विनंती केली की, ल्यूसीचा डार्क वेबवरून मिळालेला हा फोटो फेसबुकवर अपलोड झालेल्या फॅमिली फोटोंशी जुळवून पहावा, जेणेकरून तिच्याबाबत अधिक माहिती मिळेल.

पण, 'फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी' असूनही फेसबुकनं या गोष्टीला नकार दिला. आमच्याकडे यासाठीचं टूल उपलब्ध नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

ग्रेग स्क्वायर आणि त्यांच्या टीमनं डार्क वेबवर प्रसिद्ध झालेल्या ल्यूसीच्या फोटोचं आणखी बारकाईनं निरीक्षण केलं.

ल्यूसीचा बेड, तिचे कपडे, आजूबाजूला पसरलेली खेळणी अशा सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहण्यात आल्या.

त्यांना लक्षात आलं की, त्या खोलीत असलेला सोफा हा फक्त एका विशिष्ट भागातच विकला जात असल्यामुळे तो सोफा फार कमी जणांकडेच असणार.

पण तरीही त्या विशिष्ट प्रदेशाची लोकसंख्या चाळीस हजार इतकी होती.

ग्रेग स्क्वायर सांगतात, "आमच्यासमोर अमेरिकेची 29 राज्यं होती. हजारो शहरांमधील, लाखो रस्ते समोर होते. त्यामुळे, हे महाकठीण काम होतं."

भिंतीने दाखवला मार्ग

टीमनं आणखी काही धागेदोरे सापडतात का, यावर लक्ष केंद्रित केलं.

तेव्हा त्यांचं ल्यूसीच्या खोलीच्या भिंतीवरील विटांकडे लक्ष गेलं. त्यांना वाटलं की, कदाचित या विटा आपल्याला त्या घरापर्यंत घेऊन जाऊ शकतील.

ग्रेग स्क्वायर सांगतात की, "त्यावेळी मी गुगलवर विटांचे प्रकार शोधायला सुरुवात केली. शोध घेता घेता माझा संपर्क 'ब्रिक इंडस्ट्री असोसिएशन'शी झाला."

पुढे ते सांगतात की, "फोनवर बोलणारी बाई खूपच चांगली होती. ती म्हणाली की, 'ब्रिक इंडस्ट्री असोसिएशन' तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकेल, ते सांगा."

वीटांचा हा फोटो देशातील वीट तज्ज्ञांना आपण पाठवू शकतो, असंही तिने म्हटलं. आणि याचा फायदा झाला. तातडीनं प्रतिसादही मिळाला.

ग्रेग स्क्वायर हे न्यू हॅम्पशायरमधील आपल्या घरी असताना त्यांना एक गोष्ट प्रचंड अस्वस्थ करत होती. ती म्हणजे ल्यूसीचं वय त्यांच्या स्वतःच्या मुलीइतकेच होतं
फोटो कॅप्शन, ग्रेग स्क्वायर हे न्यू हॅम्पशायरमधील आपल्या घरी असताना त्यांना एक गोष्ट प्रचंड अस्वस्थ करत होती. ती म्हणजे ल्यूसीचं वय त्यांच्या स्वतःच्या मुलीइतकेच होतं

यातून वीटतज्ज्ञ जॉन हार्प यांच्याशी संपर्क झाला. ते 1981 सालापासून विटांच्या व्यवसायात कार्यरत होते.

जॉन हार्प सांगतात, "त्या विटांना एक विशिष्ट गुलाबी रंगाची छटा होती. तसेच, त्यावर चारकोलचा थर होता. ती 8 इंचाची चौरसाकार वीट होती. मी पाहताक्षणीच ओळखलं आणि ग्रेग स्क्वायर यांना फोनवर सांगितलं, 'फ्लेमिंग अलामो'.

पुढे ते म्हणाले, "आमच्या कंपनीकडून 1960 च्या दशकाच्या अखेरीपासून ते 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंतच अशा प्रकारच्या लाखो मी विटा विकल्या आहेत"

हे ऐकून ग्रेग स्क्वायर यांना आनंद झाला. त्यांना वाटलं की, ज्या ग्राहकांनी या विटा विकत घेतल्या त्यांची यादी त्यांना मिळेल. पण हार्प म्हणाले की, त्यांच्याकडे फक्त अलीकडच्या वर्षातील विक्रीच्याच नोंदी उपलब्ध आहेत.

पण जाता जाता त्यांनी या विटांबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली.

ते म्हणाले की, या विटा जड आहेत. जड असल्याने त्या फार लांबपर्यंत नेल्या जाऊ शकत नाहीत.

त्यांच्या या विधानामुळे सगळंच बदललं.

अशी सापडली ल्यूसी

आता त्यांच्या टीमला आपला तपास मर्यादित वर्तुळापर्यंत आणण्यात यश मिळालं होतं. हार्प्स ब्रिक कंपनीच्या 100 मैल परिघातील ज्या लोकांनी तो विशिष्ट प्रदेशात विकला जाणारा सोफा खरेदी केला होता, फक्त त्याच ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.

आता ही यादी 40 ते 50 व्यक्तींपुरती मर्यादीत झालेली होती. या व्यक्तींना सोशल मीडियावर शोधणं आणि त्यांचा तपास करणं सोपं होतं.

त्यांना फेसबुकवर ल्यूसीचा एका प्रौढ व्यक्तीसोबतचा फोटो सापडला. ती बाई तिच्या जवळची कुणीतरी दिसत होती. कदाचित ती तिची नातेवाईक होती.

त्यांनी त्या महिलेचा पत्ता शोधला. त्या आधारावर तिच्याशी संबंधित इतर सर्व जणांचे पत्तेही शोधण्यात आले.

आता ल्यूसीला शोधणं अधिक सोपं झालेलं होतं.

पण, मिळालेल्या सर्व पत्त्यांवर जाऊन त्यांची दारं ठोठावून चौकशी करणंही गुन्हेगाराला सावध करण्यासारखंच होतं.

ग्रेग स्क्वायर यांना त्यांच्या या कामामुळे मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले
फोटो कॅप्शन, ग्रेग स्क्वायर यांना त्यांच्या या कामामुळे मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले

तेव्हा ग्रेग स्क्वायर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व संशयित घरांचे फोटो काढले आणि ते पुन्हा एकदा विट तज्ज्ञ असलेल्या जॉन हार्प यांना पाठवले.

पण बाहेरून या विटांवर कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा थर असल्याने त्या विटा सुस्पष्टपणे ओळखणं तसं कठीण होतं.

परंतु, टीमनं हार्प यांना विटांची शैली आणि बाहेरचा दिसणारा भाग यांना पाहून अंदाज बांधण्यास सांगितलं.

"आम्ही घराचा स्क्रीनशॉट घ्यायचो आणि तो जॉनला पाठवायचो आणि म्हणायचो की 'या घरासाठी त्याच विटा वापरलेल्या असतील का?' ग्रेग स्क्वायर सांगतात.

अखेर त्यांना यश मिळालं. त्यांना असा एक पत्ता सापडला जो हार्प यांच्या मते फ्लेमिंग अलामो ब्रिक वॉल असलेला होता शिवाय, सोफा खरेदी केलेल्या ग्राहकांच्याही यादीत होता.

"म्हणून आम्ही आमचा तपास एका पत्त्यापर्यंत मर्यादित केला. स्टेट रेकॉर्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच शाळांची माहिती याद्वारे तिथं कोण राहतं याची माहिती मिळवण्यास सुरुवात केली," असं स्क्वायर सांगतात.

गुन्हेगाराला झाली 70 वर्षांहून अधिक शिक्षा

सरतेशेवटी टीमला असं लक्षात आलं की, ल्यूसीसोबत घरात तिच्या आईचा प्रियकर राहत होता. तो लैंगिक गुन्ह्यात दोषी ठरलेला एक गुन्हेगार होता.

अगदी काही तासांतच, स्थानिक होमलँड सिक्युरिटी एजंट्सनी त्या गुन्हेगाराला अटक केली.

तो गेल्या सहा वर्षांपासून ल्यूसीवर बलात्कार करत होता. त्यानंतर त्याला 70 वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

विट तज्ञ हार्प यांना ल्यूसी सुरक्षित असल्याचं ऐकून आनंद झाला.

आपल्या कामाबद्दल बोलताना ग्रेग स्क्वायर अभिमानाने म्हणतात, बदल घडवणाऱ्या या टीममध्ये मी आहे, हे माझं भाग्य आहे (फोटोत ग्रेग स्क्वायर आणि त्यांचे सहकारी पिट मॅनिंग)
फोटो कॅप्शन, आपल्या कामाबद्दल बोलताना ग्रेग स्क्वायर अभिमानाने म्हणतात, बदल घडवणाऱ्या या टीममध्ये मी आहे, हे माझं भाग्य आहे (फोटोत ग्रेग स्क्वायर आणि त्यांचे सहकारी पिट मॅनिंग)

पालक म्हणून त्यांनाही दीर्घकालीन अनुभव होता.

ते सांगतात की, "आमच्या घरात 150 हून अधिक मुले आहेत. आम्ही तीन मुले दत्तक घेतली आहेत. तर, त्या काळात, आमच्या घरात अशी अनेक मुले आहेत ज्यांचं पूर्वी शोषण झालेलं होतं."

"स्क्वायर यांची टीम दिवसेंदिवस जे पाहते आहे, ते मी पाहिलेल्या किंवा मला ज्या गोष्टींना सामोरे जावं लागलं आहे, त्यापेक्षा शेकडो पटीने वाढलेलं वास्तव आहे." असंही ते सांगतात.

गुन्ह्यांच्या तपासाचा झाला मानसिकतेवर परिणाम

काही वर्षांपूर्वी, स्क्वायर यांच्यावरील सततच्या दबावामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ लागला.

ते स्वत: कबूल करत सांगतात की, त्या काळात, दारू त्यांच्या आयुष्याचा नको तितका भाग बनलेली होती.

ते म्हणतात, "ग्रेग नक्की कोण आहे? त्याला स्वतःला काय करायला आवडतं? त्याचे छंद काय आहेत?" हेच मला आठवेनासं झालं होतं. एका मुलीला वाचवण्याच्या मिशनवर असताना, मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा पत्ता हरवून बसलो होतो.

त्यांच्या आयुष्यात एक भयानक एकाकीपण आलं होतं. ते अशा एका जगात जगत होते जिथे सामान्य लोकांशी त्यांचा संपर्क तुटला होता. ते म्हणतात, "दिवसभर माझे मित्र कोण असायचे? तर फक्त ते गुन्हेगार.

ल्यूसीने (डावीकडे), जी आता मोठी झाली आहे, ग्रेग स्क्वायर यांना सांगितले की कोणीतरी मदतीला येईल यासाठी ती प्रार्थना करत होती
फोटो कॅप्शन, ल्यूसीने (डावीकडे), जी आता मोठी झाली आहे, ग्रेग स्क्वायर यांना सांगितले की कोणीतरी मदतीला येईल यासाठी ती प्रार्थना करत होती

कारण तपासासाठी आणि त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ग्रेग यांना 24 तास त्यांच्याशीच संपर्क ठेवावा लागायचा. "दिवसभर ते गुन्हेगार, भयानक, क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टींबद्दलच बोलायचे.

या मानसिक तणावाची किंमत त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याने मोजावी लागली. 6 वर्षे ज्या आरोपीचा पाठलाग त्यांनी केला, त्या नादात त्यांचं स्वतःचं सुंदर घर उद्ध्वस्त झालं.

त्यांचं लग्न मोडलं आणि ते पूर्णपणे एकाकी पडले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, एका निष्पाप मुलीला वाचवणाऱ्या या जिगरबाज अधिकाऱ्याच्या मनात स्वतःचं आयुष्य संपवण्याचे विचार येऊ लागले.

अशा कठीण काळात त्यांचे सहकारी पिट मॅनिंग त्यांच्या मदतीला धावून आले. पिट यांच्या लक्षात आलं होतं की ग्रेग खूप मोठ्या संघर्षातून जात आहेत.

त्यांनीच ग्रेग यांना योग्य उपचार आणि मदत घेण्यास प्रवृत्त केले.

फेसबुकनं काय म्हटलं?

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ग्रेग पहिल्यांदाच ल्यूसीला भेटले. ती आता 20 वर्षांची आहे.

तिने ग्रेग यांना सांगितलं की, तिला ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्यावर चर्चा करण्याची तिची क्षमता तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आहे.

"मला आता अधिक स्थिरता मिळाली आहे. झालेल्या शोषणाबद्दल लोकांशी बोलण्याची ऊर्जा आता माझ्यात आहे, जी मी एरव्ही करू शकत नव्हते, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत..."

डार्क वेब

फोटो स्रोत, Getty Images

तिनं सांगितलं की, जेव्हा होमलँड सिक्युरिटीनं तिचा छळ थांबवला तेव्हा ती "तो संपावा यासाठीच मनोमन प्रार्थना करत होती".

तिची प्रार्थना फळाला आली, असं ती सांगते.

बीबीसीने फेसबुकला विचारलं की, ल्यूसीच्या शोधमोहिमेत मदत करण्यासाठी ते त्यांच्या फेस रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर का करू शकले नाहीत?

तेव्हा फेसबुकनं उत्तर दिलं की, "युझर्सच्या प्रायव्हसीचं रक्षण करण्यासाठी. योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं महत्वाचं आहे, परंतु आम्ही शक्य तितकं कायदा अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी काम करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)