पुरुषी सत्ता, पैसा आणि वर्चस्व कसे बनले लैंगिक हिंसेचे कवच? एपस्टिन फाइल्सची कहाणी

लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन आणि त्याची सहकारी गिलीन मॅक्सवेलशी संबंधित फाइल्समध्ये जगातील अनेक नामवंत व्यक्तींची नावं समोर आली आहेत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन आणि त्याची सहकारी गिलीन मॅक्सवेलशी संबंधित फाइल्समध्ये जगातील अनेक नामवंत व्यक्तींची नावं समोर आली आहेत.
    • Author, नासिरुद्दीन
    • Role, बीबीसी हिंदी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

स्वतःवर झालेल्या लैंगिक हिंसाचाराबद्दल बोलणं खूप अवघड असतं. आणि जेव्हा आरोपी सर्व बाजूंनी ताकदवान पुरुष असतो, तेव्हा हे बोलणं आणखी कठीण होतं.

अडचणी आणि धोके असतानाही ताकदवान लोकांविरोधात बोलणं किती महत्त्वाचं आहे, हे वारंवार दिसून येतं. अनेक वेळा अशी हिंमत गोळा करून आवाज उठवायला खूप वेळ लागतो.

अशी अनेक उदाहरणं आपल्या देशातही पाहायला मिळतील. आवाज उशिरा उठवला गेला, याचा अर्थ गुन्हा झाला नाही, असं अजिबात होत नाही.

होय, या सगळ्या प्रक्रियेत बोलण्याचं धाडस करणाऱ्या महिलांना फार वेदनादायक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यांच्या हेतूंवर, चारित्र्यावर आणि मौन राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.

ताकद वेगवेगळ्या गोष्टींची असू शकते- पैसा, प्रभाव-ओळखी, सत्ता किंवा पद... आणि जेव्हा एखाद्या पुरुषाकडे ही सगळी ताकद असते, तेव्हा अनेकजण त्याची भीती न बाळगता लैंगिक छळ आणि हिंसाचारासाठी याचा वापर करतात.

लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन आणि त्याच्या मित्रांच्या टोळीची कहाणीही अशीच आहे.

याच कारणांमुळे गेल्या काही काळापासून जेफ्री एपस्टिन आणि त्याचे मित्र-सहकारी सतत चर्चेत आहेत. हा लैंगिक गुन्हेगार व्यक्ती कोण होता आणि त्याचे मित्र कोण होते, याबबतची बरीच माहिती आता समोर आली आहे.

त्याच्या मित्रांमध्ये शिक्षक, लेखक, कलाकार, उद्योगपती, संगणक क्षेत्रातील मोठी नावं, राजकारणी, नोकरशहा आणि अधिकारी... अशा अनेकांचा समावेश आहे. या प्रकरणाची झळ भारतापर्यंतही पोहोचली आहे.

या सगळ्या गोंधळात हे देखील वारंवार सांगितलं जात आहे की, एपस्टिन फाइल्समध्ये एखाद्याचं नाव असणं म्हणजे तो व्यक्तीने 'लैंगिक शोषण' केलंय किंवा ती व्यक्ती 'अत्याचारी' आहे, असं ठरवता येत नाही. हे खरं आहे. खरं तर कायद्याने दोषी ठरवलं जात नाही, तोपर्यंत कुणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही.

म्हणूनच एपस्टिन प्रकरणाबद्दलची थोडी माहिती इथे सांगितली आहे.

'20 वर्षांपूर्वी प्रकरणाची सुरुवात'

ही गोष्ट साधारण 20 वर्षांपूर्वी, 2005 साली सुरू झाली होती. जेफ्री एपस्टिनने आपल्या घरात मुलीवर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप एका 14 वर्षांच्या मुलीच्या पालकांनी केला होता.

इतकंच नाही, एपस्टिनच्या घराची झडती घेतली असता अनेक इतर मुलींचे फोटोही तिथे सापडले.

यानंतर 2008 साली एपस्टिनला लैंगिक गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं. त्याला 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

पण त्याला दररोज 12 तास तुरुंगाबाहेर जाण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळाली होती. साधारण 13 महिने अशी शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

हे छायाचित्र 9 फेब्रुवारी रोजी पॅरिसच्या बाहेर काढण्यात आले होते. याआधी 30 जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने (जस्टिस डिपार्टमेंट) जेफ्री एपस्टिन फाइल्समधील आणखी काही फोटो जाहीर केले होते. त्यामध्ये अनेक हाय-प्रोफाइल लोकांची नावं समोर आली.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, हे छायाचित्र 9 फेब्रुवारी रोजी पॅरिसच्या बाहेर काढण्यात आले होते. याआधी 30 जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने (जस्टिस डिपार्टमेंट) जेफ्री एपस्टिन फाइल्समधील आणखी काही फोटो जाहीर केले होते. त्यामध्ये अनेक हाय-प्रोफाइल लोकांची नावं समोर आली.

या शिक्षेसोबतच 2008 साली एपस्टिनचं नाव न्यूयॉर्कमधील लैंगिक गुन्हेगारांच्या नोंदवहीत (रजिस्टर) आयुष्यभरासाठी नोंद करण्यात आलं. लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात ही नोंदवही खूप महत्त्वाची मानली जाते.

या नोंदवहीत ज्यांची नावं असतात, त्यांच्यावर अनेक प्रकारच्या मर्यादा, निर्बंध आणि सतत देखरेख ठेवली जाते.

मात्र या सगळ्याआधी त्याच्या वकिलांनी कमी शिक्षा आणि जास्त संरक्षण मिळेल असा मार्ग काढला. सरकारी वकिलांशी एक समझोता करण्यात आला. या समझोत्यामुळे तपासाची व्याप्ती खूपच कमी झाली होती.

याचा अर्थ पुढे हे तपासलं जाणार नव्हतं की, या प्रकरणात आणखी काही मुली लैंगिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या होत्या की नाही. तसंच एपस्टिनसोबत या गुन्ह्यात अजून कोण कोण सहभागी होतं, याचाही तपास झाला नाही.

त्यामुळे त्या वेळी या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी होतं, हे कळू शकलं नाही. इतकंच नाही, तर एपस्टिनविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाही या समझोत्याची माहिती देण्यात आली नाही.

'प्रभावशाली लोकांना वाचवण्याचे आरोप'

गुन्हेगारी न्याय प्रक्रियेचा ताकदवान पुरुष आपल्या फायद्यासाठी कसा वापर करतो, याचं उदाहरण म्हणजे एपस्टिन प्रकरण. अनेक वेळा संपूर्ण यंत्रणाच त्यांना वाचवण्यासाठी काम करताना दिसते.

भारतामध्येही एखादा ताकदवान व्यक्ती लैंगिक छळ किंवा गुन्ह्याच्या आरोपात अडकला, तर अशी अनेक उदाहरणं सहज पाहायला मिळतात. आजही आरोप होत आहेत की, एपस्टिनसोबत असलेल्या ताकदवान पुरुषांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, एपस्टिनच्या लैंगिक छळाशी संबंधित चर्चा तेव्हा वेगाने वाढल्या, जेव्हा 'मियामी हेराल्ड' या वृत्तपत्रातील शोध पत्रकार ज्युली के. ब्राऊन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

या रिपोर्टमुळे एपस्टिनने उभारलेल्या 'लैंगिक हिंसाचाराच्या जाळ्या'कडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. या रिपोर्टनुसार, शोध पत्रकार ज्युली ब्राऊन यांनी सुमारे 80 पीडित महिलांची ओळख पटवण्यात यश मिळवलं.

मायकेल जॅक्सनसोबत एपस्टिन

फोटो स्रोत, US Department of Justice

फोटो कॅप्शन, मायकेल जॅक्सनसोबत एपस्टिन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यापैकी सुमारे 60 महिलांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी 8 जण बोलायला तयार झाल्या, आणि फक्त 4 महिलांनी आपली ओळख उघड करून बोलण्याची तयारी दाखवली.

यावरून हे स्पष्ट होतं की, ताकदवान लोकांच्या अन्याय आणि अत्याचारांविरोधात महिलांसाठी बोलणं किती कठीण असतं.

या रिपोर्टनुसार, त्यांच्यावर झालेल्या हिंसेबद्दल त्यांना लाज आणि भीती वाटत होती. तसंच, इतके ताकदवान लोक असल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही, अशीही भावना त्यांना होती. पण या धाडसी आवाजांमुळेच 2019 साली एपस्टिनला पुन्हा अटक करण्यात आली.

अटक झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात तो तुरुंगातील कोठडीत मृत अवस्थेत आढळला. आता त्याच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

जेफ्री एपस्टिनच्या लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणात तीन महत्त्वाचे टप्पे आहेत- 2005, 2008 आणि 2019.

या काळात त्याच्यावर अनेक आरोप झाले. काही गुन्हे सिद्ध झाले. नंतर आरोपांची मोठी यादी समोर आली आणि त्याला पुन्हा अटकही करण्यात आली.

हे सगळं त्या अमेरिकेत घडत होतं, जिथली शक्तिशाली सत्ता स्वतःला आधुनिक आणि न्यायप्रिय मानत आली आहे.

खरं तर आधुनिक आणि न्यायप्रिय असल्याचं खऱ्या अर्थानं मोजमाप होतं, ते दुर्बल घटकांबद्दल-विशेषतः महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना मिळणाऱ्या न्यायातून.

'लैंगिक हिंसाचारामागचं मूळ कारण: असमानता आणि श्रेष्ठत्वाची भावना'

एपस्टिन आणि त्याची पुरुषप्रधान टोळी अशा व्यवस्थेचं खरं रूप दाखवतात, जिथे महिलांकडे फक्त पुरुषांच्या लैंगिक इच्छांसाठीची वस्तू म्हणून पाहिलं जातं. आणि असं फक्त एका देशातच होतं असं नाही, तर जगाच्या इतर भागांतही हे घडतं.

काही पुरुष सत्ता, पद, पैसा आणि ओळखीच्या ताकदीवर महिलांना सेवक किंवा लैंगिक वस्तू बनवू पाहतात. त्यांच्या दृष्टीने स्त्री ही फक्त एक शरीर असते. हे शरीर आपल्याच वापरासाठी आहे, असा त्यांचा समज असतो, म्हणून ते तिला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितात.

या लैंगिक शोषण आणि लैंगिक हिंसाचाराच्या मुळाशी एकच विचार आहे - श्रेष्ठत्व आणि असमानता. म्हणजेच पुरुष स्वतःला श्रेष्ठ मानतो. स्त्री त्याच्या बरोबरीची नाही, आणि होऊही शकत नाही, असा त्याचा समज असतो. त्याच्या मते स्त्री ही पुरुषांच्या सेवेसाठीच आहे.

हा फोटो 12 फेब्रुवारी 2000 रोजी फ्लोरिडातील पाम बीच येथील मार-ए-लागो मध्ये काढण्यात आला होता. या फोटोत डावीकडून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प, तसेच जेफ्री एपस्टिन आणि गिलीन मॅक्सवेल दिसत आहेत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, हा फोटो 12 फेब्रुवारी 2000 रोजी फ्लोरिडातील पाम बीच येथील मार-ए-लागो मध्ये काढण्यात आला होता. या फोटोत डावीकडून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प, तसेच जेफ्री एपस्टिन आणि गिलीन मॅक्सवेल दिसत आहेत.

एपस्टिनच्या फाइल्समध्ये काही महिलांचीही नावं आहेत. त्या एपस्टिनला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. इतकंच नाही, तर समोर आलेल्या कागदपत्रांनुसार त्यांच्याशी झालेलं संभाषण केवळ कामापुरतंच मर्यादित नव्हतं.

त्याही मुलींना फक्त शरीराच्या चौकटीत पाहतात. यांपैकी काही पुरुषांच्या टोळ्यांकडून लैंगिक छळासाठी निरागस, कमी वयाच्या मुलींना भुलवलं जातं, फूस दिली जाते आणि त्यांना तयार केलं जातं.

स्वतःवर झालेल्या लैंगिक हिंसाचार आणि छळाविरुद्ध बोलणाऱ्या एका मुलीने सांगितलं की, तिला शिकवलं जात होतं की सर्व काही शांतपणे सहन करावं आणि जेफ्री जे म्हणेल ते करून त्याला खुश करावं.

ती म्हणते की, स्त्री म्हणून मला हे जास्त त्रासदायक वाटायचं की, या सगळ्या गोष्टी फक्त एका स्त्रीमुळेच घडत होत्या, ती स्त्री यासाठी त्यांना मदत करत होती.

हे पितृसत्तेचं उदाहरण आहे. स्त्रियांनाही असं वाटतं की पुरुषांचं जग असंच चालतं. जर त्यांना त्यात टिकायचं असेल, तर पुरुषांच्या म्हणण्यानुसार वागावं लागेल.

'पुरुषप्रधान ताकदीचं दुष्टचक्र'

एपस्टिनची अशीच एक महत्त्वाची सहकारी, गिलीन मॅक्सवेल. 2021 साली अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचा लैंगिक छळ करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरली आहे.

मुलींसाठी पुरुषप्रधान ताकदीचं दुष्ट चक्र अंधारातील खोल विहिरीसारखं आहे. त्यांना फसवलं जातं आणि त्या हळूहळू एखाद्या दलदलीत सापडल्यासारख्या अडचणीत येतात. त्यांच्यासाठी बोलणं सोपं नसतं.

ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावरच लाजीरवाणी वेळ आणली जाते. गुन्हा त्यांच्याबाबतीत घडतो आणि हा समाज त्यांनाच शिक्षा देतो. म्हणूनच एपस्टिन प्रकरणातही सुरुवातीला फक्त काही धाडसी मुलींनी बोलण्याची हिंमत दाखवली.

इतकंच नाही, एपस्टिन फाइल आणखी काही सांगते. जिथे महिलांशी कसं वागलं जातं, त्या बाबतीत प्रगतिशील समजल्या जाणाऱ्या पुरुषांवरही विश्वास ठेवणं कठीण आहे.

Caption- गिलीन मॅक्सवेल सध्या तुरुंगात असून शिक्षा भोगत आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, गिलीन मॅक्सवेल सध्या तुरुंगात असून शिक्षा भोगत आहे.

एपस्टिन जगातील हुशार लोकांकडून मदत मागत होता. लैंगिक गुन्ह्यांविषयी प्रसिद्ध होणार्‍या बातम्या कशा हाताळायच्या, याचा सल्ला हे लोक त्याला देत असत. अशा लोकांच्या सहभागामुळे अनेकांच्या विश्वासाला तडा गेला आहे. अनेक लोक संतापले आणि धक्का बसला आहे.

म्हणजेच, आजही जगातील सत्ता प्रणाली मोठ्या प्रमाणावर पुरुषप्रधान आहे. दबंग पुरुषांची सत्ता आहे. या विषारी पुरुषत्वाचा भार समाजावर खूप जास्त आहे. आजही स्त्रियांना सन्मान देणारा समाज निर्माण व्हायचा आहे.

मात्र अनेक स्त्रिया आता शांत बसायला तयार नाहीत. त्यांना हे सगळं बदलायचं आहे. यात जेफ्री एपस्टिन आणि त्याच्या मित्रांच्या टोळीच्या लैंगिक छळ, शोषण आणि हिंसाचाराला सामोरं गेलेल्या अनेक मुलींचा समावेश आहे.

या महिलांमधील एक लिझा फिलिप्स म्हणतात की, "आम्हाला संपूर्ण फाइल आणि (एपस्टिनचे सर्व कथित सहकारी) उघडकीस आणली जावी, असं वाटतं. माझ्यासाठी न्याय म्हणजे लैंगिक छळाचा पर्दाफाश करून दाखवणं, जेणेकरून पुढे ते कुणाचंही नुकसान करु शकणार नाहीत."

या सर्व धाडसी महिला आता आपला आवाज, नाव आणि चेहरा लपवायलाही तयार नाहीत. त्या अनेक वर्षांच्या लैंगिक हिंसाचाराच्या त्रासाविरुद्ध बोलत आहेत. आपला आवाज मजबूत करत आहेत आणि अमेरिकेच्या संसदेसमोर आपली मागणी मांडत आहेत.

जबाबदारी निश्चित केली जावी आणि ताकदवान लोकांना वाचवू दिलं जाऊ नये, अशी मागणी त्या करत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)