किंग कोब्रा रेल्वेनं गोव्याला जातात? शास्त्रज्ञांनी उलगडलं आश्चर्यकारक रहस्य

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जय शुक्ला
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
पश्चिम घाटातील जंगलात राहणारे किंग कोब्रा आता गोव्यातील रेल्वे स्टेशनजवळ दिसू लागले आहेत आणि हा योगायोग नाही. सुरतचे शास्त्रज्ञ आणि हर्पेटोलॉजिस्ट (सर्पतज्ज्ञ) दिकांश परमार आणि त्यांच्या टीमच्या संशोधनानुसार, हे अतिविषारी साप कधीकधी शिकार करताना नकळत मालगाड्या किंवा प्रवासी गाड्यांमध्ये चढतात आणि दूर अंतरावर उतरतात.
गोव्यातील 47 ठिकाणांच्या अभ्यासात पाच रेल्वे स्टेशनजवळ 'नागराज' आढळला असून, ही ठिकाणं त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून खूप लांब आहेत. या निष्कर्षामुळे सापांच्या सुरक्षिततेसह मानवी जीवितावरही नवे प्रश्न उभे राहिले आहेत.
भारताच्या पश्चिम घाटातील घनदाट जंगलं किंग कोब्राचे नैसर्गिक अधिवास (घर) आहेत. किंग कोब्रा प्रामुख्याने जंगलात राहतो, कारण तिथेच त्याला शिकार, पाणी आणि सुरक्षित जागा सहज मिळते.
पण परमार यांच्या संशोधनातून जंगलात राहणाऱ्या किंग कोब्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिकांश परमार यांनी एक अनोखं संशोधन केलं आहे. भारतातील किंग कोब्रा, म्हणजेच नागराज, कदाचित रेल्वेतून प्रवास करत असावेत, असं त्यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
पण प्रश्न असा आहे की, जंगलात राहणारा हा कोब्रा रेल्वेच्या रुळांपर्यंत किंवा रेल्वेपर्यंत पोहोचतो कसा?
गोव्याकडे जाणारे अनेक रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातात. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, किंग कोब्रा कधीकधी शिकार किंवा आश्रयाच्या शोधात रेल्वेच्या रुळाजवळ किंवा रेल्वेमध्ये पोहोचतात.
अशा प्रकारे ते निसर्गापासून दूर अशा ठिकाणी जातात, जिथे त्याला अन्न किंवा सुरक्षित ठिकाण मिळत नाही.
त्यांचं हे संशोधन अमेरिकेतील प्रसिद्ध जर्नल 'बायोट्रॉपिका'मध्ये प्रकाशित झालं आहे. हे जर्नल पर्यावरण आणि निसर्ग संरक्षणाबाबतच्या अभ्यासासाठी ओळखलं जातं.
या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जगातील सर्वात लांब आणि विषारी नाग, किंग कोब्रा (ओफिओफॅगस कालिंगा), कदाचित नकळत खूप लांब अंतराच्या रेल्वेतून प्रवास करत असेल.
या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित होणं शास्त्रज्ञांसाठी मोठी गोष्ट असते, कारण केवळ 36 टक्के संशोधन इथे प्रकाशित होऊ शकतात.
हा अभ्यास सूचित करतो की, किंग कोब्राच्या राहण्याच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे या सापांच्या संरक्षणाला, संवर्धनाला आणि लोकांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण होत आहे.
दिकांश परमार यांनी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमसोबत गोव्यात किंग कोब्राचा अभ्यास 47 वेगवेगळ्या ठिकाणी केला, जे प्रामुख्याने पश्चिम घाटातील दुर्गम जंगलांच्या आसपासच्या भागात होते.
त्यासाठी त्यांनी गोव्यातील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचीही मदत घेतली. ही टीम गेल्या अनेक वर्षांपासून सापांसह इतर वन्य प्राण्यांना वाचवण्याचं काम करते.
'गोव्यातील पाच रेल्वे स्टेशनजवळ सापडला किंग कोब्रा'
दिकांश परमार यांनी गोव्यातील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडने कोब्रा वाचवलेल्या 47 ठिकाणांचा अभ्यास केला. यात 18 ठिकाणं उत्तर गोव्यात आणि 29 ठिकाणं दक्षिण गोव्यात होती.
दिकांश परमार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "किंग कोब्रा भारताचा राष्ट्रीय साप मानला जातो. पूर्वी जरी त्याचे रंग किंवा पट्ट्यांचे नमुने वेगळे असले तरी संपूर्ण भारतात त्याची एकच प्रजाती समजली जात असत."
"शास्त्रज्ञांना शंका होती की, त्याची दुसरी प्रजाती असावी. त्यामुळे त्यांनी विशेषतः पश्चिम घाटात आढळणाऱ्या नागराजांना ओफिओफॅगस कालिंगा म्हणून ओळख दिली. हा साप संरक्षित श्रेणीत येतो."
ते सांगतात की, जर हा नाग चावला तर माणूस पाणीही मागू शकत नाही. त्याचा लगेच मृत्यू होतो.

फोटो स्रोत, Sourabh Yadav
या अभ्यासात समोर आलं की, ही सर्व ठिकाणं एकतर तर रेल्वे स्टेशनजवळ होती किंवा रेल्वे मार्गाजवळची होती.
ते सांगतात, "गोवा ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडने 2002 ते 2024 दरम्यान एकूण 120 किंग कोब्रा वाचवले. आम्ही सर्व ठिकाणांचा अभ्यास केला, त्यात 47 ठिकाणं रेल्वेच्या आसपास होती. एक नाग तर गोव्यातील एका रेल्वे स्टेशनच्या रुळाजवळ आढळून आला."
गोव्यातील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे प्रमुख अमृतसिंह यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, "दक्षिण गोव्यात चांदोर नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. तिथे आम्हाला किंग कोब्रा असल्याचं समजलं. आम्ही त्याची सुटका करून तो वन विभागाला दिला. तो नाग जखमी अवस्थेत होता. ही अशी जागा होती जिथे सामान्यतः असे साप किंवा नाग दिसत नाहीत."

फोटो स्रोत, Mehul Thakur
अमेरिकेच्या प्रसिद्ध जर्नल 'बायोट्रॉपिका'मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, "चांदोर स्टेशनजवळ हा कोब्रा आढळून आल्यावर आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की, हा नागराज पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अशा अनपेक्षित ठिकाणी कसा आला?"
असे किंग कोब्रा सामान्यतः कर्नाटकच्या कॅसल रॉक आणि दांडेली व्याघ्र प्रकल्पात आढळतात. आता, जेव्हा रेल्वे गोव्यात प्रवेश करते, तेव्हा त्या हे नागांचा अधिवास असलेल्या भागात थांबतात.
सप्टेंबर 2021 मध्ये वास्को-दा-गामा जवळ गोवा ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडने एक नागराज वाचवला, जो रेल्वे स्टेशनपासून फक्त 200 मीटर दूर आढळला. त्याशिवाय, तीन अन्य नाग लोलिम, पेलोलेम आणि पेडणे रेल्वे स्टेशनजवळ सापडले.
दिकांश यांच्या म्हणण्यानुसार, ही पाचही ठिकाणं किंग कोब्राचे नैसर्गिक निवासस्थान नव्हते. त्यामुळे शास्त्रज्ञांना नाग आणि रेल्वे यांच्यातील हा 'आश्चर्यकारक दुवा' पाहायला मिळाला.
'हा किंग कोब्रा रेल्वेतून इथे पोहोचला असावा'
या संशोधनाचे प्रमुख्य शास्त्रज्ञ दिकांश परमार बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले की, "आम्ही हा नाग रेल्वे स्टेशनजवळ कसा पोहोचला, हे तपासलं. आता, जेव्हा रेल्वे कर्नाटकातून गोव्यात येते, ती मुख्यतः कर्नाटकच्या कॅसलरॉक भागातून येते. तिथे घनदाट जंगलं आहेत. या भागात किंग कोब्रा मोठ्या प्रमाणात आढळतो."
दिकांश परमार म्हणतात, "संशोधनाच्या आधारे, आमच्या टीमने 'रेल्वे डिस्पर्सल हायपोथिसिस' ही नवीन कल्पना मांडली."
"यानुसार, किंग कोब्रा कधी कधी जंगलातील डोंगराच्या बाजूने असलेल्या रेल्वे यार्डमध्ये उंदीर किंवा इतर प्राण्यांची शिकार करताना मालगाडी किंवा प्रवासी ट्रेनमध्ये चढतो आणि नकळत अनेक किलोमीटर दूर, अशा ठिकाणी उतरतो, जिथे त्याच्यासाठी योग्य परिस्थिती नसते."

फोटो स्रोत, AMRUT SINGH
दिकांश यांचा असा दावा आहे की, या संशोधनाला भारतभरातील सोशल मीडिया रिपोर्ट्स आणि इतर बातम्यांमधून पाठिंबा मिळाला आहे. या रिपोर्ट्सनुसार रेल्वे किंवा रेल्वे स्टेशनजवळ साप आढळतात, ज्यात किंग कोब्राचाही समावेश आहे.
दिकांश परमार म्हणतात, "आम्ही जिथे संशोधन केलं, तिथे साधारणपणे किंग कोब्रा आढळून येत नाही, पण कर्नाटकच्या जंगलांमध्ये तो आढळतो. आम्हाला जे किंग कोब्रा आढळून आले, ते जवळपास रेल्वे स्टेशनजवळ होते. त्यामुळे असा निष्कर्ष काढता येतो की, काही कारणामुळे ते रेल्वे मार्गे गोव्यात येऊन आसपासच्या भागात पोहोचले असावेत."
यापूर्वी, सुमारे 2017 मध्ये, दिकांश परमार यांनी सुरत रेल्वे स्टेशनजवळही अशाच प्रकारे एका सापाला वाचवले होते.
'नागाचा प्रवास, अपघात की अन्नाच्या शोधात?'
संशोधकांच्या टीमचं म्हणणं आहे की, रेल्वेच्या आसपास किंग कोब्रा दिसण्यामागे एक साधं कारण असू शकतं. धान्य, फळं किंवा पॅक केलेल्या अन्नाचा कचरा रेल्वे परिसरात पडतो, त्यामुळे तिथे उंदीर जास्त होतात. उंदीर तिथेच राहू लागतात आणि हेच उंदीर सापांचं अन्न असल्यामुळे सापही त्या भागाकडे येतात.
पावसाळ्यात जेव्हा पाणी साचतं, पूर येतो, तेव्हा सुरक्षित आसरा शोधण्यासाठी हे साप कधी कधी रेल्वेचा आधार घेत असावेत.
या संशोधनात कॅलिफोर्नियाच्या व्हिक्टरव्हॅली कॉलेजचे जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. हेन्रिक केसर आणि असोसिएट प्राध्यापक डॉ. डेनिस रोडर (लिबनीज इन्स्टिट्यूट फॉर द ॲनालिसिस ऑफ बायोडायव्हर्सिटी चेंज, बोन, जर्मनी) यांचाही सहभाग होता.

फोटो स्रोत, DIKANSH PARMAR
डॉ. हेन्रिक यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "साधारणपणे रस्ते आणि रेल्वे हे वन्य प्राण्यांसाठी अडथळा किंवा धोकादायक मानले जातात. पण या संशोधनातून असं दिसतं की, कधी कधी नकळत हेच वेगवान मार्ग प्राण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं कामही करु शकतात."
ते म्हणतात की, "अन्नाच्या शोधात किंवा इतर कारणांमुळे हे किंग कोब्रा चुकून रेल्वेमधून प्रवास करत असावेत किंवा रेल्वे मार्गाजवळ पोहोचत असावेत."
असोसिएट प्राध्यापक डॉ. डेनिस रोडर बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले की, "माणसांनी उभारलेली रस्ते-रेल्वेसारखी व्यवस्था अनावधानाने या शिकारी प्राण्यांच्या हालचालींवर कसा परिणाम करू शकते, हे या संशोधनातून दिसून येते."
ते सांगतात की, हे वैज्ञानिक संशोधन असून ते पुराव्यांवर आधारित आहे. 'तथ्यं आणि कारणं दोन्ही ठोस पुराव्यांसह मांडली आहेत.'
'सापांवरील हे संशोधन महत्त्वाचं का आहे?'
या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. रोडर सांगतात, "किंग कोब्राचं संरक्षण फार गरजेचं आहे. जर हे साप मालगाडी किंवा प्रवासी रेल्वेमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील, तर ते माणसांसाठीही धोकादायक आहे आणि स्वतः सापांसाठीही."
"त्यामुळे या संशोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून मानवी जीवाला धोका टाळता येईल आणि किंग कोब्राचं संरक्षणही होईल."
दिकांश परमार सांगतात, "किंग कोब्रा फार विषारी साप आहे. त्यामुळे तो दिसताच लोक बहुतेक वेळा त्याला मारून टाकतात. तो जर मानवी वस्तीमध्ये राहू लागला, तर माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो. म्हणून जंगलातील संतुलन राखण्यासाठी आणि जैवविविधतेसाठी किंग कोब्राचं संरक्षण अत्यंत गरजेचं आहे. हे संशोधन याच मुद्द्यावर भर देतं."

फोटो स्रोत, DIKANSH PARMAR
संशोधकांनी सांगितलं की, रेल्वे जंगलात अनावश्यकपणे थांबवू नयेत. रेल्वेच्या डब्यांत अन्न ठेवू नये, कारण त्यामुळे उंदीर येतात. तसेच जंगलांचा नाश थांबवला पाहिजे, जेणेकरून सापांसारखे वन्य प्राणी रेल्वेच्या रुळांपर्यंत येण्यास भाग पडणार नाहीत.
दिकांश म्हणतात, "जरी हे साप रेल्वे किंवा इतर मार्गांनी मानवी वस्तीच्या आसपास येत असले, तरी तिथे त्यांचे जिवंत राहण्याचे प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच त्यांचं संरक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे."
त्यांच्या मते, मानवी वस्तीमध्ये किंग कोब्रा आढळल्याने माणूस आणि साप यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वाढते. अशा ठिकाणी आलेल्या सापांना भूक, ताण आणि मृत्यूचा धोका जास्त असतो.
डॉ. रोडर सांगतात, "हे संशोधन केवळ एक रंजक पर्यावरणीय कथा नाही, तर वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेला इशाराही आहे. जर रेल्वेमुळे नकळत विषारी साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील, तर याबाबत जागरूकता आणि स्पष्ट नियमांची आवश्यकता आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











