बीई की बी.टेक? इंजिनिअरिंगच्या दुनियेतील दोन कोर्सचा फरक समजून घ्या

वर्ष 2023-24 मध्ये 30 लाख 79 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. (सांकेतिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वर्ष 2023-24 मध्ये 30 लाख 79 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. (सांकेतिक छायाचित्र)
    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दीप्तिमान पुरबे हैदराबादमधील एका मोठ्या कंपनीत इंजिनिअरिंग मॅनेजर आहेत. तर पंकज बिश्त पुणे विद्यापीठातून शिक्षण घेऊन नाशिकमधील एका मोठ्या टेक कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत.

दोघांचं काम जवळपास सारखंच आहे आणि दोघेही इंजिनिअर आहेत. दोघांची शाखा (ब्रँच) इलेक्ट्रिकल होती. पण दोघेही वेगवेगळ्या कोर्स किंवा अभ्यासक्रमातून इथंपर्यंत पोहोचले. एकाने बी. टेक. निवडलं, तर दुसऱ्याने बी.ई.

कुणी या क्षेत्राशी संबंधित असो किंवा नसो. पण प्रत्येकाने या दोन्ही कोर्सेसचे नाव मात्र नक्की ऐकलेलं असतं, ते म्हणजे बीई आणि बी.टेक.

पण या दोन वेगवेगळ्या कोर्समध्ये काय फरक असतो? या दोन्ही पदव्या खरोखरच सारख्या आहेत का, अभ्यासाची पद्धत सारखी आहे का, कोर्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन किंवा त्याचे उद्दिष्ट यात काही फरक आहे का?

'करिअर कनेक्ट' सिरीजच्या या भागात, हे कोर्स शिकलेले आणि शिकवणाऱ्या लोकांच्या अनुभवातून आम्ही बीई आणि बी.टेक.मधील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

'मग बी.ई. आणि बी.टेकमध्ये नेमका फरक काय?'

बीई म्हणजे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग आणि बी. टेक म्हणजे बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी, हे तर सर्वांनाच माहिती आहे.

पण बीई हा बी.टेकपेक्षा इतकाच वेगळा आहे का, की यात प्रॅक्टिकलपेक्षा थिअरीवर जास्त भर दिला जातो.

आयआयटी कानपूरचे प्रा. शलभ हे सांख्यिकी आणि डेटा सायन्समधील एक मोठं नाव आहे. ते सांगतात की, बीई ही आधी वापरात असलेली संज्ञा होती, जी आजही काही संस्था वापरतात. पण आता बीई आणि बी.टेकच्या अभ्यासक्रमात कोणताही फरक राहिलेला नाही, तसेच प्रवेशासाठीच्या अटीही सारख्याच आहेत.

Caption- तज्ज्ञ सांगतात की, बीई आणि बी.टेक यातला फरक प्रामुख्याने ती डिग्री कोणतं विद्यापीठ देतं यावर ठरतं. (सांकेतिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञ सांगतात की, बीई आणि बी.टेक यातला फरक प्रामुख्याने ती डिग्री कोणतं विद्यापीठ देतं यावर ठरतं. (सांकेतिक छायाचित्र)

दीप्तिमान पुरबे हे सध्या उबर कंपनीत इंजिनिअरिंग मॅनेजर आहेत. तसेच ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयआयटी ग्वाल्हेरमध्ये गेस्ट फॅकल्टी म्हणून शिकवायलाही जातात.

त्यांनी सांगितलं, 'पूर्वी बीई हा ज्ञानाभिमुख अभ्यासक्रम समजला जात असत, ज्यात थिअरी आणि तत्त्वांवर भर असायचा, म्हणजे गोष्टी का काम करतात. तर बी.टेकला प्रॅक्टिकल आणि कौशल्यावर आधारित मानलं जात असे, ज्यात गोष्टी कशा काम करतात हे शिकवलं जातं.

पंकज बिश्त जिओमध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत. त्यांनी 2014 मध्ये बीई पूर्ण केलं होतं.

भारतात बीई आणि बी.टेक दोन्हींना समान मानलं जातं, असंही ते म्हणतात.

त्यांचं म्हणणं आहे की, "बीईचा अभ्यासक्रम थोडासा पारंपरिक आहे आणि हा कोर्स साधारण जुन्या विद्यापीठांमध्ये असतो. यात मूलभूत गोष्टींवर जास्त भर दिला जातो. तर बी.टेकचे अभ्यासक्रम अपडेटेड म्हणजे अद्ययावत आहे, ज्यात लॅब, प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपवर जास्त लक्ष दिलं जातं. आयआयटी, एनआयटी आणि खासगी कॉलेजांमध्ये बी.टेकच शिकवलं जातं."

मग ही वेगवेगळी नावं का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतातील अभियांत्रिकीचं शिक्षण देणाऱ्या सर्व टेक्निकल संस्था ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच एआयसीटीइकडून नियंत्रित केल्या जातात.

एआयसीटीइच्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये भारतात 8 हजार 264 संस्था डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट स्तरावर इंजिनिअरिंग कोर्स चालवत होत्या. तर 2024-25 मध्ये या यादीत आणखी 211 संस्थांचा समावेश करण्यात आला.

वर्ष 2023-24 मध्ये 30.79 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. 2025 च्या आयआयआरएफ (इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) रँकिंगनुसार, भारतातील टॉप इंजिनिअरिंग संस्था म्हणजे आयआयटी बॉम्बे आहे.

खासगी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या टॉप इंजिनिअरिंग संस्था पाहिल्यास, सर्वात वर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स (बिट्स पिलानी) आहे. या संस्थांमध्येही बीईची डिग्री म्हणजेच पदवी दिली जाते.

याशिवाय, कोलकात्यातील जाधवपूर विद्यापीठ, चेन्नईचे अण्णा विद्यापीठ, हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ, बंगळुरूचे आरव्ही कॉलेज, पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ याही संस्थांमध्ये इंजिनिअरिंगसाठी बीईची डिग्री दिली जाते.

ही पदवी कोणतं विद्यापीठ देतं यावर साधारणपणे बीई आणि बी.टेक अभ्यासक्रम अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण अनेक जुनी विद्यापीठं या अभ्यासक्रमाला बीई म्हणतात आणि तांत्रिक म्हणजेच टेक्निकल संस्था त्याला बी.टेक म्हणतात.

पण केवळ नावावरून अभ्यासाच्या दर्जात किंवा गुणवत्तेत काही फरक पडत नाही.

दोन्हीही चार वर्षांचे कोर्स आहेत आणि दोन्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रताही एकसारखीच आहे.

म्हणजे, बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स असणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स उत्तीर्ण करावी लागते.

दीप्तिमान पुरबे सांगतात की, दोन्ही कोर्सचे मुख्य विषय सारखेच असतात, म्हणजे जे विषय एका इंजिनिअरिंग शाखेला दुसऱ्या शाखेपासून वेगळं करतात.

जसं की,

  • पहिल्या वर्षातील विषयांमध्ये मॅथ्स, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असतात. हे असे विषय आहेत जे सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी शिकणं आवश्यक असतं.
  • नंतर दुसऱ्या ते चौथ्या वर्षात काही प्रमुख शाखांचे विषय शिकवले जातात.
  • कॉम्प्यूटर सायन्समध्ये: डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम, ऑपरेटिंग सिस्टिम आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम (डीबीएमएस).
  • मेकॅनिकलमध्ये: थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स आणि काईनेमॅटिक्स ऑफ मशीन.
  • इलेक्ट्रिकलमध्ये: सर्किट थिअरी, कंट्रोल सिस्टिम आणि पॉवर सिस्टिम.

'कोणता कोर्स कोणासाठी योग्य?'

दीप्तिमान पुरबे म्हणतात की, वास्तविक जगात बीई आणि बी.टेकमधला फरक आता संपला आहे. आता या दोन्ही अभ्यासक्रमानंतर मिळणाऱ्या करिअरच्या संधींमध्ये कोणताही फरक नाही.

असं नाही की, एखादा कोर्स दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे. मास्टर्स किंवा एमबीएसाठी अर्ज करताना दोन्ही कोर्सची नावं एकत्र दिली जातात. त्यामुळे दोन्ही कोर्सचं मूल्य समान आहे.

Caption- इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे. (सांकेतिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

पण ते काही असे मुद्दे सांगतात, ज्याकडे प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला हवेत.

ते म्हणतात:

  • कोणत्याही विद्यार्थ्याने फक्त डिग्री किंवा पदवीच्या नावावर अभ्यासक्रम निवडू नये. त्याऐवजी ही डिग्री कोणत्या विद्यापीठातून मिळत आहे आणि कोणती शाखा मिळणार आहे, हे पाहावं.
  • नेहमी लक्षात ठेवा की, संस्थेची पायाभूत सुविधा कशाप्रकारची आहे, तिथली फॅकल्टी कशी आहे, प्लेसमेंट कसं आहे, संशोधनाचा अनुभव कसा आहे आणि ज्या अभ्यासक्रमाचा निवड करता, तिथलं वातावरण कसं आहे.
  • जर कोणाला बीई आणि बी.टेक दोन्हीमध्ये सारखी शाखा मिळत असेल, तर दोन्ही कोर्ससारखे समजून, बाकी सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या.

भविष्याच्या दृष्टीने काही फरक आहे का?

तज्ज्ञ म्हणतात की, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर, डेटा अनॅलिस्ट किंवा इतर कोणत्याही शाखेच्या जॉबसाठी, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी बीई/बी.टेक लिहिलेलं असतं.

दोघांच्या वेतनात काही फरक नसतो. वेतन प्रामुख्याने मुलाखत कशी गेली, प्रॉब्लेम सॉल्विंग कौशल्ये कशी आहेत आणि नोकरी कोणत्या पदासाठी आहे, यावर अवलंबून असते. डिग्रीचा या गोष्टींवर कोणताही परिणाम होत नाही.

पंकज बिश्त म्हणतात, "आजकाल ट्रेंड बीई किंवा बी.टेकवर नाही तर शाखेवर अवलंबून असतो. जर मार्केटमध्ये आयटी सेक्टर तेजीत असेल, तर प्रवेश घेताना ही शाखा मिळेल की नाही हे पाहावं. जर मेकॅनिकल तेजीत असेल, तर त्याकडे लक्ष द्यावं. मार्केटनुसार शाखेची निवड महत्त्वाची आहे."

ते सांगतात की, साधारणपणे कोणत्याही कंपनीत असा नियम नसतो की एखाद्या पदासाठी फक्त बीई किंवा बी. टेकच्याच लोकांना ठेवायचं.

Caption- तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कंपन्या बीई आणि बी.टेक दोघांनाही समान संधी देतात. (सांकेतिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढं म्हणाले की, "आत्तापर्यंत मी चार कंपन्या बदलल्या आहेत. तुम्ही बीई असाल किंवा बी.टेक, जर तुमच्याजवळ आवश्यक कौशल्यं असतील, तर कंपनी तुम्हाला घेते. ज्या पदासाठी बी.टेक झालेल्यांना अर्ज करता येतो, त्या पदासाठी बीई झालेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही, असा नियम नाही."

उज्ज्वल भविष्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबाबत दीप्तिमान सांगतात,

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात उद्योग डिग्रीपेक्षा कौशल्यांवर जास्त लक्ष देत आहेत.
  • सध्याच्या ट्रेंडनुसार, कंपन्या आता मशीन लर्निंग, डेटा सायन्स, न्यूरल नेटवर्क यासारख्या खास कौशल्यांकडे लक्ष देत आहेत.
  • म्हणून, कोणाकडे बीई असो किंवा बी.टेकची डिग्री, करिअरची वाढ पूर्णपणे उमेदवाराच्या पोर्टफोलिओ, कोडिंग कौशल्ये आणि गणितीय समजुतीवर अवलंबून असते.

शेवटी ते म्हणतात की, बीई आणि बी.टेकमधला फरक फक्त शैक्षणिक आहे. खरी गोष्ट म्हणजे हे दोन्ही एकाच ध्येयापर्यंत घेऊन जाणारे मार्ग आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)