पायलट कसं होतात? ट्रेनिंगसाठी किती खर्च येतो, किती पगार मिळतो?

भारतात पायलट होण्याचे दोन मार्ग आहेत

फोटो स्रोत, Elke Scholiers/Getty

फोटो कॅप्शन, वैमानिक प्रशिक्षण (संग्रहित)
    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हवाई वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सर्वांनीच पाहिली. पायलटचा तुटवडा, विमानतळावर लांबच लांब रांगा, रद्द झालेली उड्डाणं, त्रासलेले प्रवासी, मक्तेदारीचे आरोप आणि कंपनीचं स्पष्टीकरण, असं हे चित्र होतं.

मात्र या लेखात आपण याबद्दल नाही, तर या क्षेत्रातील नोकरीबद्दल आणि करियरबद्दल जाणून घेऊया.

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा वेगानं विस्तार होतो आहे आणि हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं होत चाललं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचा 53.6 अब्ज अमेरिकन डॉलरचा वाटा आणि 75 लाखांहून अधिक लोकांना मिळालेल्या नोकऱ्या, याचाच पुरावा आहेत.

2024 मध्येच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीएनं 1300 हून अधिक व्यावसायिक पायलटचे परवाने जारी केले. म्हणजेच या वर्षी इतके नवीन पायलट या क्षेत्रात आले.

करियरविषयीच्या या लेखात आपण अशा नोकरीबद्दल, करियरबद्दल जाणून घेणार आहोत जे करिअर तुमच्या स्वप्नांना पंख देईल. ज्या करिअरमुळे तुम्ही आकाशात उड्डाण घेऊ शकाल असं हे करिअर आहे.

कॉकपिटपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण होऊ शकतो?

सर्वात आधी आपल्या मनात प्रश्न येतो की पायलट कसं होतात? त्याचं उत्तर एका प्रसिद्ध एअरलाईन्स कंपनीशी संबंधित पायलटनं आम्हाला दिलं.

ते म्हणाले की भारतात पायलट होण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे जो अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे आणि दुसरा आहे, एअरलाईन्स कंपनीच्या कॅडेट पायलट प्रोग्रॅमचा.

दोन्हींसाठी उमेदवाराचं वय 18 वर्षे असलं पाहिजे. त्याचबरोबर बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणितात 50 टक्के गुण आवश्यक आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जर उमेदवाराला कॉमर्स किंवा आर्ट्सची पार्श्वभूमी असेल, तर त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग किंवा कोणत्याही स्टेट बोर्डच्या ओपन परीक्षेद्वारे 12 वीची भौतिकशास्त्र आणि गणिताची परीक्षा पास होणं आवश्यक आहे.

भारताच्या विमान वाहतुकीचं नियमन डीजीसीए म्हणजे डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन करतं.

डीजीसीएनं देशभरात अनेक डॉक्टरांना मान्यता दिली आहे की ते पायलटच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी करू शकतात.

पायलटच्या प्रशिक्षणाआधी विद्यार्थ्यांकडे क्लास 2 वैद्यकीय प्रमाणपत्र असलं पाहिजे. डीजीसीएनं मान्यता दिलेले डॉक्टर ते देतात. यातून ती व्यक्ती प्रशिक्षणासाठी वैद्यकीयदृष्ट्या फिट आहे की नाही हे स्पष्ट होतं.

त्यानंतर होते क्लास 1 वैद्यकीय तपासणी. ती डीजीसीए घेते. ही परीक्षा भारतीय हवाई दलाकडून मान्यताप्राप्त डॉक्टरकडून केली जाते.

कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. यात डोळे, ईसीजी, रक्तचाचणी, नाक-कान-गळ्याच्या तपासणीचा समावेश असतो.

दोन्ही तपासण्यांसाठी जवळपास दहा हजार रुपयांचा खर्च येतो.

अर्थात, जर एखाद्याला कलर ब्लाईंडनेस म्हणजे रंग अंधत्व असेल, तर ती व्यक्ती पायलट होऊ शकत नाही. त्याचबरोबर सुरुवातीला रक्त, लघवी यासारख्या प्राथमिक तपासण्या होतात. जर यात कोणी नापास झाला, तर ती व्यक्ती पायलट होऊ शकत नाही.

पायलट कसं होतात, किती खर्च येतो आणि किती पगार मिळतो?

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं होत चाललं आहे. अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचा 53.6 अब्ज अमेरिकन डॉलरचा वाटा आणि 75 लाखांहून अधिक लोकांना मिळालेल्या नोकऱ्या, याचाच पुरावा आहेत.

कॉकपिटपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण होऊ शकतो?

  • भारतात पायलट होण्यासाठी उमेदवाराचं वय 18 वर्षे असलं पाहिजे. त्याचबरोबर बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणितात 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • जर उमेदवाराला कॉमर्स किंवा आर्ट्सची पार्श्वभूमी असेल, तर त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग किंवा कोणत्याही स्टेट बोर्डच्या ओपन परीक्षेद्वारे 12 वीची भौतिकशास्त्र आणि गणिताची परीक्षा पास होणं आवश्यक आहे.
  • पायलटच्या प्रशिक्षणाआधी विद्यार्थ्यांकडे क्लास 2 वैद्यकीय प्रमाणपत्र असलं पाहिजे. डीजीसीएकडून मान्यताप्राप्त डॉक्टर ते देतात.
  • यानंतर क्लास 1 वैद्यकीय तपासणी होते. ती डीजीसीए करवून घेते. भारतीय हवाई दलानं मान्यता दिलेले डॉक्टर ती करतात.
  • कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. यात डोळे, ईसीजी, रक्त चाचणी, नाक-कान-गळ्याच्या तपासणीचा समावेश असतो.

यानंतर काय होतं?

  • पात्रतेशी निगडीत सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर डीजीसीएची सीपीएल परीक्षा द्यावी लागते. सर्वसाधारणपणे ही परीक्षा वर्षातून चार वेळा होते.
  • ग्राऊंड ट्रेनिंग हे पायलट ट्रेनिंगची अकेडमिक फेज असते. यात मेटरोलॉजी किंवा हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन, नॅव्हिगेशन, रेडिओ टेलीफोनी, टेक्निकल सारखे विषय शिकवले जातात. यांच्या लेखी परीक्षेत किमान 70 टक्के गुण मिळणं आवश्यक असतं.
  • यानंतर उमेदवार भारतातील डीजीसीएनं मान्यता दिलेल्या वेगवेगळ्या फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) मध्ये दाखल होतात. तिथे ते विमान उड्डाणाचा 200 तासांचा अनुभव घेतात.
  • एअरलाईन्स कंपन्यांकडून देखील काही कॅडेट पायलट प्रोग्रॅम चालवले जातात.
पायलट लायसन्ससाटी 200 तासांच फ्लाइंग ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं

फोटो स्रोत, Udit Kulshrestha/Bloomberg via Getty

फोटो कॅप्शन, पायलट लायसन्ससाटी 200 तासांच फ्लाइंग ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं
  • जर एखाद्या उमेदवारानं त्याचं एव्हिएशन करिअर एअरलाईन कॅडेट पायलट प्रोग्रॅममधून सुरू केलं, तर यात एक निश्चित अभ्यासक्रम असतो. यात थ्योरिटिकल आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण होतं.
  • कॅडेट प्रोग्रॅमद्वारे एअरलाईन कंपन्या स्वत:देखील 12 वी नंतर काही चाचण्यांच्या आधारे विद्यार्थी निवडतात. मग त्यांची फ्लाइट ट्रेनिंग होते. एअरलाईन्स कंपन्यांमध्ये परतल्यानंतर त्यांना टाईप रेटिंग मिळते. मात्र याची फी अधिक असते.
  • प्रशिक्षणाच्या वेळेस उमेदवारांना छोट्या विमानांच्या उड्डाणाचं प्रशिक्षण दिलं जातं. मात्र प्रवासी विमान चालवण्यासाठी त्यांना आणखी एका परवान्याची आवश्यकता असते. याला टाईप रेटिंग म्हणतात.

फ्लाइट ट्रेनिंग, खर्च आणि पगार?

  • भारतात कोणत्याही चांगल्या केंद्रात हे प्रशिक्षण 14 ते 15 महिन्यांमध्ये होतं. यासाठी 50-55 लाख रुपयांचा खर्च येतो.
  • अमेरिकेत हे प्रशिक्षण 10 महिन्यांमध्ये होतं. तिथे यासाठी 50-52 लाख रुपयांचा खर्च येतो.
  • दक्षिण आफ्रिकेत हे प्रशिक्षण 12-14 महिन्यांचं असतं. यात 35-40 लाख रुपयांचा खर्च येतो.
  • तर पगाराचा विचार करता, फर्स्ट ऑफिसरला दरमहा सव्वा लाख ते अडीच लाख रुपयांचा पगार असतो.
  • कॅप्टनच्या पोस्टसाठी दरमहा चार ते आठ लाख रुपयांचा पगार मिळतो. नोकरी जर आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीत असेल तर पगार यापेक्षाही जास्त असू शकतो.
पायलट होण्यासाठीचं प्रशिक्षण कोणत्याही देशात घेतलं जाऊ शकतं

फोटो स्रोत, Elke Scholiers/Getty

फोटो कॅप्शन, पायलट होण्यासाठीचं प्रशिक्षण कोणत्याही देशात घेतलं जाऊ शकतं

यानंतर काय असतं?

पात्रतेशी निगडीत सर्व निकष पूर्ण केल्यानंतर डीजीसीएची सीपीएल परीक्षा द्यावी लागते. सर्वसाधारणपणे ही परीक्षा वर्षातून चार वेळा होते.

ही परीक्षा पास होणाऱ्यांचं प्रशिक्षण दोन प्रकारचं असतं. एक ग्राऊंड ट्रेनिंग आणि दुसरं फ्लाइंग.

ग्राऊंड ट्रेनिंग हा पायलट ट्रेनिंगचा अकॅडमिक टप्पा असतो. यात मेटरोलॉजी किंवा हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन, नॅव्हिगेशन, रेडिओ टेलीफोनी, टेक्निकल यासारखे विषय शिकवले जातात.

या विषयांच्या लेखीत परीक्षेत किमान 70 टक्के गुण मिळणं आवश्यक असतं.

यानंतर उमेदवार भारतात डीजीसीएची मान्यता असलेल्या वेगवेगळ्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमध्ये (एफटीओ) दाखल होतात. तिथे ते विमान उड्डाणाचा 200 तासांचा अनुभव घेतात.

याव्यतिरिक्त दुसरा मार्ग असतो, कॅडेट पायलट प्रोग्रॅम, जो एअरलाईन्स कंपन्या चालवतात.

जाणकारांच्या मते, जर एखादा उमेदवारानं त्याचं एव्हिएशन करिअर एअरलाईन्स कॅडेट पायलट प्रोग्रॅममधून सुरू केलं तर यात एक निश्चित अभ्यासक्रम असतो. यात थ्योरिटिकल आणि प्रॅक्टिकल, अशी दोन्ही प्रकारची ट्रेनिंग असते.

यात एव्हिएशनच्या मूलभूत गोष्टी सखोलपणे शिकवल्या जातात. त्याचबरोबर पार्टनर फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) मध्ये फ्लाइंग सेशन देखील असतात.

पायलटचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Imtiyaz Khan/Anadolu Agency/Getty

फोटो कॅप्शन, पायलटचे संग्रहित छायाचित्र

हे एकात्मिक प्रशिक्षण यासाठी दिलं जातं, जेणेकरून विमान वाहतूक उद्योगाच्या गरजेनुरूप कौशल्यं पायलटमध्ये असावीत.

म्हणजेच, एअर इंडियाचा एक कॅडेट पायलट प्रोग्रॅम आहे. त्याच्याअंतर्गत उमेदवाराला एअर इंडिया फ्लाइंग ट्रेनिंग अकॅडमीबरोबरच एअरलाईन्स कंपनीच्या दोन ग्लोबल पार्टनर स्कूलमध्ये कमर्शियल पायलट लायसन्स ट्रेनिंग (सीपीएल) आणि टाइप रेटिंग दिलं जातं.

फ्लाइट ट्रेनिंगमध्ये उमेदवारांना छोटी विमानं चालवायला शिकवलं जातं.

मात्र जेव्हा त्यांना प्रत्यक्षात प्रवासी विमान चालवायचं असतं, तेव्हा त्यांना आणखी परवान्याची आवश्यकता असते. याला टाइप रेटिंग म्हणतात.

एअर इंडियाची ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीमध्ये आहे आणि दोन ग्लोबल पार्टनर स्कूल अमेरिकेत आहेत.

कॅडेट प्रोग्रॅमद्वारे एअरलाईन्स कंपन्या स्वत:च 12 वी नंतर काही चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करतात.

मग त्यांची फ्लाइट ट्रेनिंग होते आणि एअरलाईन्स कंपन्यांमध्ये परतल्यानंतर त्यांना टाइप रेटिंग मिळते. मात्र याची फी जास्त असते.

फ्लाइट ट्रेनिंग आणि खर्च

लेखी परीक्षा पास होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर फ्लाइट ट्रेनिंग सुरू होते.

यात उमेदवारांना कोणत्या देशात ही ट्रेनिंग घ्यायची आहे ते ठरवतात. भारत किंवा कोणत्याही देशात ही ट्रेनिंग घेतली जाऊ शकते.

कॅप्टन मोहित, विमानात काव्यमय शैलीत अनाउन्समेंट करून व्हायरल झाले आहेत. आता ते एका एअरलाईन्स कंपनीत इंस्ट्रक्टर पदावर कार्यरत राहूनच 'पोएटिक पायलट' नावाची ट्रेनिंग अकॅडमीदेखील चालवत आहेत.

ते म्हणतात, "बहुतांश लोक भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिकेची निवड करतात आणि माझ्यासारखे काहीजण कॅनडातदेखील जातात. तुम्ही फ्लाइट ट्रेनिंग कुठे घेतली आहे, यामुळे काहीही फरक पडत नाही."

"कारण डीजीसीएच्या लेखी परीक्षेत तुम्हाला पास व्हावंच लागतं. एअरलाईन्स कंपन्यादेखील एखाद्या विशिष्ट देशातील ट्रेनिंगला पसंती देत नाहीत. तुमच्याकडे भारतीय पायलटचा परवाना आहे की नाही हे महत्त्वाचं असतं."

भारतात एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये हे प्रशिक्षण 14 ते 15 महिन्यांमध्ये होतं. यात 50- 55 लाख रुपयांचा खर्च येतो.

अमेरिकेत हे प्रशिक्षण 10 महिन्यांमध्ये होतं आणि त्यासाठी 50-52 लाख रुपये खर्च येतो.

तर दक्षिण आफ्रिकेत हे प्रशिक्षण 12-14 महिन्यांचं असतं. त्यासाठी 35-40 लाख रुपयांचा खर्च येतो.

भारतात फ्लाइट कॅप्टनचा पगार दरमहा चार लाख ते आठ लाख रुपये असू शकतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात फ्लाइट कॅप्टनचा पगार दरमहा चार लाख ते आठ लाख रुपये असू शकतो

कॅप्टन मोहित म्हणतात, "हे एखाद्या पदवीप्रमाणे नसतं की ज्यात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तीन-चार वर्षांचा अभ्यासक्रम असेल. इथे उमेदवाराकडे 200 तासांची फ्लाइट ट्रेनिंग म्हणजे विमानात बसण्याचा अनुभव असला पाहिजे. काहीजण ते दहा महिन्यात पूर्ण करतात. तर काहींना थोडा अधिक वेळ लागू शकतो."

प्रशिक्षणानंतर ज्या एअरलाईन्स कंपनीत पायलटची भरती होईल, तिथे काम करण्यासाठी हे उमेदवार पात्र असतात.

कॅप्टन मोहित यांच्या मते, जेव्हा एखादा पायलट एअरलाईन्स कंपनीत रुजू होतो. तेव्हा त्याचं पहिलं पद फर्स्ट ऑफिसरचं असतं. तो विमानात कॅप्टनसोबत को-पायलट म्हणून काम करतो.

कॅप्टन होण्यासाठी एक वेगळा परवाना हवा असतो. त्याला एटीपीएल म्हणजे एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स म्हणतात.

हा परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराला डीजीसीएची परीक्षा पास व्हावं लागतं. यात नेव्हिगेशन, रेडिओ नेव्हिगेशन, मेटरोलॉजी सारखे विषय असतात. मात्र किमान 1500 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव असला पाहिजे.

त्याच्या जागा निघताच, अर्ज करायचा असतो. मग संबंधित एअरलाईन कंपनी एक लेखी परीक्षा घेते. ही परक्षा डीजीसीएच्या परीक्षेपेक्षा वेगळी असते आणि ती मेरिटवर आधारित असते.

कॅप्टन मोहित म्हणतात, "जर एअरलाईन कंपनीला 300 पायलट हवे असतील आणि 1000 जणांनी परीक्षा दिली. तर कंपनी सर्वाधिक गुण मिळणाऱ्यांनाच पुढच्या राउंडसाठी बोलवेल. तर डीजीसीएच्या परीक्षेत मात्र 70 टक्के गुण मिळणं आवश्यक असतं. मात्र त्यात असं नसतं की 80 किंवा 90 टक्के गुण मिळणाऱ्यांना काही वेगळी सुविधा मिळते."

पगार आणि प्रगतीच्या संधी

एका पायलटनं आम्हाला सांगितलं की भारतात विमान वाहतूक क्षेत्रात पायलटचा पगारदेखील चांगला असतो.

त्याचबरोबर डीजीसीएनं आता असे नियम बनवले आहेत, ज्यात पायलटच्या वर्क लाईफ बॅलन्सलादेखील लक्षात घेतलं आहे.

कॅप्टन मोहित यांच्या मते, "एका पायलटला 12 तासांची विश्रांती बंधनकारक आहे. यात विमानतळावर जाण्या-येण्याचा वेळ लक्षात घेतला तर हा 15 तासांचा ब्रेक असतो. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा पायलटला लागोपाठ 48 तासांचा म्हणजे दोन दिवसांचा ब्रेक मिळणंदेखील आवश्यक आहे. आधी हा ब्रेक 36 तासांचा होता."

पगाराचा विचार करता, फर्स्ट ऑफिसरला सर्वसाधारणपणे दरमहा सव्वा लाख ते अडीच लाख रुपये पगार मिळतो.

तर कॅप्टनला दरमहा चार लाख ते आठ लाख रुपये पगार असतो. जर नोकरी एखाद्या आंतरराष्ट्रीय एअरलाईन कंपनीत असेल तर पगार यापेक्षाही जास्त असू शकतो.

कॅप्टन मोहित म्हणतात की अनेकदा पश्चिम आशियातील देशांमध्ये पायलटच्या जास्त वॅकन्सी असतात. कारण तिथले लोक या पेशात कमी संख्येनं आहेत.

तिथे फर्स्ट ऑफिसरला दरमहा 8-9 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. करदेखील कमी असतो. मात्र यासाठी तुम्हाला दुसऱ्या देशात राहावं लागतं. म्हणजे खर्चदेखील जास्त होणार.

कॅप्टन मोहित यांच्या मते, पायलट फक्त विमानांचं उड्डाण करण्यापुरताच मर्यादित नसतो. तो एखाद्या एअरलाईन्सच्या अकॅडमीत इंस्ट्रक्टर देखील होऊ शकतो.

फ्लाइट डिस्पॅचर म्हणून देखील काम करू शकतो. तसंच चार्टर्ड प्लेनचा देखील पायलट होऊ शकतो.

पायलट होण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण देखील महागडं आहे. जो कन्व्हेन्शनल सीपीएल ट्रेनिंग कोर्स आहे, त्यासाठी जवळपास 55 लाख ते 85 लाख रुपयांदरम्यान खर्च येतो.

तर काही एअरलाईन कंपन्या कॅडेट पायलट ट्रेनिंगसाठी एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक फी घेतात.

कॅप्टन मोहित यांना आम्ही विचारलं की सर्वसाधारण कुटुंबातून येणारा विद्यार्थी इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करू शकतो.

त्यावर ते स्वत:चं उदाहरण देत म्हणाले, "शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय असतो. कारण जर तुमच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नसेल, तर तुम्ही पाच ते सहा वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करू शकता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)