माओवादी नेता 'देवजी'चं आत्मसमर्पण; त्याची इतकी चर्चा का होतेय? कोण आहे देवजी?

तिप्पिरी तिरुपति उर्फ देवजीनं अनेक नावांचा वापर केला
फोटो कॅप्शन, तिप्पिरी तिरुपति उर्फ देवजीनं अनेक नावांचा वापर केला
    • Author, प्रवीण शुभम आणि बल्ला सतीश
    • Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'देवजी' या प्रमुख माओवादी नेत्यानं तेलंगणात आत्मसमर्पण केल्याच्या बातम्यांबद्दल छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, "बसवराजूनंतर देवजींनंच नक्षल चळवळीची (सशस्त्र नक्षल चळवळीचं) धुरा सांभाळली होती. देवजींनं आज (22 फेब्रुवारी) तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर, केंद्रीय समितीचा सदस्य, संग्राम उर्फ मुरली यानं देखील आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे."

याआधी पीटीआय या वृत्तसंस्थेनं तेलंगणा पोलिसांचा संदर्भ देत पुष्टी केली होती की देवजींनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

अर्थात तेलंगणा पोलीस, तेलंगणा सरकार किंवा केंद्रीय गृह मंत्रालयानं सार्वजनिकरीत्या या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

विजय शर्मा म्हणाले की 31 मार्चपर्यंत देशातील सशस्त्र नक्षलवादी चळवळीची समस्या संपुष्टात येईल.

गेल्या वर्षी मे महिन्यात छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये पोलिसांनी एका चकमकीत 27 माओवाद्यांसह नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजूला मारल्याचा दावा केला होता.

माओवादी पार्टी संघटनेनुसार, सद्यपरिस्थितीत तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी हेच त्यांचे सर्वोच्च नेते होते.

कुटुंबातील सदस्य काय म्हणाले?

देवजींचा भाऊ तिप्पिरी गंगाधर यानं स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं, "त्यांच्या अटक आणि चकमकीची बातमी चिंताजनक आहे. सत्य काय आहे, हे आम्हाला माहीत नाही. जर ते पोलिसांच्या ताब्यात असतील, तर त्यांना कोणताही अपाय न करता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पाहिजे. ते सुरक्षित राहावेत, अशी आमची इच्छा आहे."

देवजीचा राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)च्या सर्वात वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देवजींचा राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)च्या सर्वात वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश आहे.

देवजींच्या छोट्या भावाची मुलगी, तिप्पिरी सुमानं यापूर्वी त्यांना एक खुलं पत्र लिहून आत्मसमर्पण करण्याची विनंती केली होती.

तिनं लिहिलं होतं, "जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं, तेव्हा मला एक विचित्र अभिमान आणि वेदनेची जाणीव होते. तुमची हिंमत आणि दृढनिश्चय मला बराच विचार करण्यास भाग पाडते. तुम्ही एक समतावादी समाज बनवण्यासाठी गेला होता. अलीकडच्या काही घटना पाहून मला खूप चिंता वाटते. या कठीण परिस्थितीत तुम्ही परत येण्याची मी मनापासून इच्छा व्यक्त करते."

देवजींच्या आत्मसमर्पणाची इतकी चर्चा काय होते आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकवेळा दावा केला आहे की 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षल चळवळ संपुष्टात आणली जाईल.

त्या दृष्टीकोनातून देवजींचं आत्मसमर्पण ही एक मोठी घटना मानली जात आहे.

गेल्या वर्षी पोलिसांबरोबरच्या चकमकीत नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देवजींनं पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदावर होते.

अमित शाह काही दिवसांपूर्वीदेखील म्हणाले होते की या 31 मार्चआधी नक्षल चळवळ पूर्णपणे संपुष्टात येईल

फोटो स्रोत, @AmitShah

फोटो कॅप्शन, अमित शाह काही दिवसांपूर्वीदेखील म्हणाले होते की या 31 मार्चआधी नक्षल चळवळ पूर्णपणे संपुष्टात येईल

कोरुटलामधील तिप्पिरी तिरुपतींचा जन्म सध्याच्या जगतियाल जिल्ह्यातील एक दलित कुटुंबात झाला होता. ते 1980 च्या दशकात करीमनगरमधील एसआरआर महाविद्यालयात बीएससी करत असताना विद्यार्थी राजकारणात आले.

महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ते भूमिगत झाले.

तिरुपती (देवजी) करीमनगर भागात सक्रिय होते. ते एका कट्टरतावादी विद्यार्थी संघटनेत सहभागी झाले होते.

प्रतिबंधित संघटनेचे माजी सदस्य आणि करीमनगरचे रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितले की "1981-82 मध्ये, रायथु कुल्ली संगमनं एक विशाल सभा घेतली होती. त्यावेळेस ती एक ऐतिहासिक सभा होती. त्याचं आयोजन तिरुपतीनंच केलं होतं. नंतर 1983-84 मध्ये पक्षानं त्याला दंडकारण्यात पाठवलं."

दंडकारण्यातील जंगलात

देवजी यांनी करीमनगर शहरात आणि नंतर सिरोंचा परिसरात माओवादी पक्षाचा आयोजक म्हणून काम केलं. देवजींनी जवळपास 15 वर्षे गडचिरोलीत काम केलं. त्यांनी पक्षाचा डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणूनही काम केलं.

नंतर 1993-94 मध्ये त्याला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य म्हणून निवडण्यात आलं.

देवजी 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत पक्षाच्या उभारणीच्या प्रक्रियेत कार्यरत होते. नंतर ते सशस्त्र गटाकडे वळले. तेव्हापासून ते पक्षाच्या सशस्त्र गटामध्येच होते.

सीपीआय (माओवादी)नं 1996 च्या जवळपास दंडकारण्यात त्यांची पहिली प्लॅटून तयार केली. ती एक सशस्त्र प्लॅटून होती. देवजींनी या प्लॅटूनचा पहिला कमांडर म्हणून काम केलं.

नंतर 2001 मध्ये ते पक्षाच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाले. त्यावेळेस ते केंद्रीय समितीमधील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होते. केंद्रीय समितीबरोबरच, देवजी सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) चा सदस्यही झाले.

त्यांनी माओवादी पार्टीमध्ये संजीव, चेतन, सुदर्शन आणि रमेश अशा वेगवेगळ्या नावांनी काम केलं.

एनआयएनं तिप्पिरी तिरुपति उर्फ देवजीचा हा फोटो वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत टाकला आहे

फोटो स्रोत, NIA

फोटो कॅप्शन, एनआयएनं तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजींचा हा फोटो वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत टाकला आहे

एका माजी माओवाद्यानं बीबीसीला सांगितलं, "2004 मध्ये पीपल्स वॉर माओवादी झाल्यानंतरदेखील, ते केंद्रीय समिती आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनमध्ये होते. बसवराजू सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख असताना तिरुपतींनी यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

"2018 मध्ये बसवराजू केंद्रीय समितीचे सरचिटणीस झाल्यानंतर देवजी हे सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रमुख झाले."

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये देवजींची प्रमुख भूमिका असल्याचं सांगितलं जातं.

पक्षाच्या जवळच्या निरीक्षकांचं म्हणणं आहे की देवजींनं माओवादी लष्करी प्रशिक्षण आणि मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

असंही म्हटलं जातं की पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) च्या उभारणीमागे त्याचा हात होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.