पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते असं 'या' गावातले लोक का मानतात?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते?
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

14 जानेवारी 1761 पानिपत युद्धाचा स्मरणदिवस. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ कामी आल्याचा इतिहास आहे, पण हरियाणाच्या एका गावातले लोक म्हणतात की, सदाशिवराव भाऊ लढाईनंतर जिवंत होते आणि ते या गावात येऊन राहिले होते.

रोहतकजवळच्या सांघी गावातल्या त्यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन मांडलेला रिपोर्ताज.

Presentational grey line

"दोन मोती गळाले, दहा-वीस अश्रफी गेल्या, खुर्दा-रुपयांची तर गणतीच नाही…" पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या झालेल्या हानीचं हे वर्णन अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे.

या दोन मोत्यांपैकी एक मोती म्हणजेच पानिपत मोहिमेतले मराठा सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे. सदाशिवराव भाऊ या युद्धात कामी आले हा इतिहास महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. पण हरियाणाच्या रोहतकमधले लोक वेगळा इतिहास सांगतात.

मध्यभागी सदाशिवराव भाऊ, डावीकडे इब्राहिमखान गारदी आणि पेशव्यांचे अन्य सेवक.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY

फोटो कॅप्शन, मध्यभागी सदाशिवराव भाऊ, डावीकडे इब्राहिमखान गारदी आणि पेशव्यांचे अन्य सेवक.

पानिपतपासून थोड्याच अंतरावर हरियाणातला रोहतक जिल्हा आहे. याच रोहतक जिल्ह्यात सांघी हे गाव आहे.

या गावातल्या लोकांचा असा विश्वास आहे की, युद्धानंतर सदाशिवराव भाऊ या गावात येऊन राहिले होते आणि त्यांनी याच गावात समाधी घेतली.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या स्मृतिदिनी हरियाणामध्ये जत्रा

रोहतक शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सांघी गावात सदाशिवराव भाऊंच्या नावाने एक आश्रम आहे. या आश्रमाचं नाव 'डेरा लाधिवाला'! या डेऱ्यातच श्री सिद्ध बाबा सदाशिवराय तथा भाऊ राव यांची 'गद्दी' आहे.

गावकरी सांगतात की...

सांघी गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की, 1761मध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या फौजेचा पराभव निश्चित झाला त्या वेळी सदाशिवराव भाऊ पेशवे जखमी अवस्थेत आपल्या घोड्यावरून युद्धभूमीतून बाहेर पडले.

जखमी आणि अर्धवट शुद्धीत ते उग्राखेडी गावात पोहोचले. तिथून ते सोनीपत जिल्ह्यातल्या मोई हुड्डा गावात आले. त्यापुढे रूखी गावात त्यांनी आसरा मागितला.

सांघी ग्रामस्थ मानतात हीच सदाशिवराव भाऊंची समाधी.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC

फोटो कॅप्शन, सांघी ग्रामस्थ मानतात हीच सदाशिवराव भाऊंची समाधी.

त्यावर त्यांना तिथल्या लोकांनी पुढे सांघी गावात जाण्याचा सल्ला दिला. या गावाजवळ पिंपळ आणि वडाची झाडं आणि घनदाट जंगल आहे. तिथे आसरा घेता येईल, असं त्यांना सांगण्यात आलं.

गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अखेर 22 जानेवारी 1761 रोजी म्हणजे पानपितपच्या युद्धानंतर आठ दिवसांनी सदाशिवराव भाऊ सांघी गावात पोहोचले. इथे त्यांना गावकऱ्यांनी आसरा दिला, असं गावातले लोक सांगतात.

श्री भाऊनाथजी की गद्दी

डेरा लाधिवाला हा भाऊसाहेबांचा मठ सांघी गावाच्या परिघावर आहे. सांघी गावही मुख्य रस्त्यापासून चांगलंच आतमध्ये आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं असलेला रस्ता गावात जातो.

गावातल्या कोणालाही डेरा लाधिवाला किंवा श्री भाऊनाथजी की गद्दी कुठे, असं विचारलं की, कोणीही रस्ता दाखवतं. गावातल्या हमरस्त्यापासून एक फाटा आत वळतो.

२० एकर जमिनीवर हा मठ पसरला आहे.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC

फोटो कॅप्शन, २० एकर जमिनीवर हा मठ पसरला आहे.

त्या रस्त्यावरूनही शेतात जाणारा एक छोटासा कच्चा रस्ता लागतो. त्या रस्त्यानं पुढे गेलं की, मठाचं मुख्य प्रवेशद्वार लागतं. हा मठ २० एकर जमिनीवर पसरला आहे.

पिंपळ, वड असे वृक्ष, पेरूची, कडुलिंबाची झाडं आणि आसपासची थोडीशी शेती यांच्या मध्यभागी हा मठ उभा आहे. या मठाची स्थापना भाऊसाहेबांनी केली, असं इथले लोक मानतात.

पानिपतच्या युद्धाचं चित्रण.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY

फोटो कॅप्शन, पानिपतच्या युद्धाचं चित्रण.

सांघी गावचे रहिवासी आणि या गावातली भाऊरावजी की गद्दी ही कहाणी सांगत असले तरी ऐतिहासिक संदर्भ वेगळाच इतिहास सांगतात.

ऐतिहासिक संदर्भ सांगतात वेगळाच इतिहास

इतिहासकार एस. जी. सरदेसाई यांनी आपल्या 'सिलेक्शन्स ऑफ पेशवा दफ्तर' मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे २४ फेब्रुवारी १७६१ रोजी नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात सदाशिवराव भाऊ आणि विश्वासरावांचे अंत्यसंस्कार झाल्याचं कळवलं होतं. नानासाहेब पेशव्यांना हे पत्र मिळालं त्यावेळी ते मजल-दरमजल करत झाशी जवळच्या पिछोडी गावापर्यंत येऊन पोचले होते, अशीही या दफ्तरात नोंद आहे.

पानिपतच्या युद्धाच्या अखेरच्या टप्प्याचं वर्णन करताना इतिहासकार एच. जी. रॉलिन्स म्हणतात, 'युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात सदाशिवराव भाऊ पेशवे आपल्या अरबी घोड्यावर स्वार झाले आणि आपल्या सैनिकांना बरोबर घेऊन उमद्या पुरुषाला शोभेल अशा वृत्तीनं आघाडीवर पोचले आणि त्यांनी वीरमरण पत्करलं. दिसेनासे होईपर्यंत ते या ओंगळ लुटारूंशी लढत होते.'

'काला आंब'- पानिपतावर झालेल्या युद्धांचे स्मारक.

फोटो स्रोत, RAVINDRA MANJREKAR/BBC

फोटो कॅप्शन, 'काला आंब'- पानिपतावर झालेल्या युद्धांचे स्मारक.

इतिहासकार काहीही म्हणाले, तरी या गावातल्या लोकांना भाऊसाहेबांच्या इथल्या वास्तव्याबाबत प्रचंड विश्वास आहे.

नाथ संप्रदायाची दीक्षा आणि समाधी

"पानिपतच्या युद्धावर आधारित अनेक मालिकांमध्ये सदाशिवराव भाऊ या युद्धात मारले गेले, असं सर्रास दाखवतात. पण ते खरं नाही. सदाशिवराव भाऊंनी या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. एवढंच नाही, तर त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन मठही उभारला होता," सांघी गावचे रहिवासी राज सिंग हुड्डा सांगतात.

सदाशिवरावांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असं गावकरी मानतात.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC

फोटो कॅप्शन, सदाशिवरावांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असं गावकरी मानतात.

या गावकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे सदाशिवराव भाऊंनी 1761मध्येच नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यासाठी ते कुरुक्षेत्राजवळच्या पेहोवा इथल्या श्रवणनाथ धाम इथे गेले होते. तिथे त्यांनी गुरू गरीब नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी प्राप्त केली.

"त्यानंतर ते पुन्हा सांघी गावात आले. 1764मध्ये त्यांनी रोहिला पठाणांच्या लुटीपासून गावाला वाचवण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची फौजही बांधली. गावाभोवती खंदक खोदून त्यांनी या पठाणांचा बंदोबस्त केला. या पठाणांशी झालेल्या लढाईत त्यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी विजय मिळवला," या मठातले सध्याचे महंत सुंदरनाथ यांनी ही माहिती दिली.

या चकमकीनंतर भाऊ नाथ यांनी या ठिकाणीच समाधी घेतली. तेव्हापासून त्यांचे शिष्य या मठाची देखभाल करत आहेत. ही शिष्य परंपरा अजूनही सुरू असल्याचंही सुंदरनाथ यांनी सांगितलं.

भाऊंची अखेर : ज्ञात इतिहास काय सांगतो?

विविध ऐतिहासिक नोंदी असं सांगतात की, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने शुजानं त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी लोक पाठवले. ते भाऊशी मिळताजुळता मृतदेह परत घेऊन आले. काही मराठ्यांना तो देह दाखवला गेला. त्याच्यावरच्या जन्मखुणा आणि पूर्वीच्या काही युद्धांत झालेल्या आघातांच्या खुणांवरून तो देह भाऊंचाच असल्याचं मराठ्यांनी सांगितलं.

ऐतिहासिक संदर्भांमध्ये भाऊसाहेब युद्धात मरण पावले असा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, VENUS PRAKASHAN/BOOKGANGA.COM

फोटो कॅप्शन, ऐतिहासिक संदर्भांमध्ये भाऊसाहेब युद्धात मरण पावले असा उल्लेख आहे.

शुजाने तो मृतदेह अब्दालीकडे पाठवला आणि अब्दालीने त्यावर योग्य अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. काशिराज आणि राजा अनूपगीर गोसावी यांनी त्या देहावर अंत्यसंस्कार केले. अशीही इतिहासात नोंद आहे.

का. ना. साने आणि गो. स. सरदेसाई या इतिहासकारांनी संकलित केलेल्या पत्रांमधून आणि याद्यांमधून सदाशिवराव भाऊंचा वध आणि शिरच्छेद केलेल्या पठाणाने सांगितलेली कहाणी सापडते.

'उंची अलंकार घालून घोड्यावर बसलेल्या एका मराठा स्वाराशी सामना झाल्यावर पठाण सैनिकांच्या एका तुकडीने अलंकारांच्या मोहाने त्याला अडवून ओळख विचारली. काही क्षणातच त्या सैनिकांत आणि त्या स्वारात झटापट झाली. संतापून एका पठाण सैनिकाने त्या मराठा स्वाराचा शिरच्छेद केला.'

ते कापलेलं शीर शुजाच्या छावणीत आल्यानंतर मराठा सैनिकांनी त्याची ओळख पटवली. ते भाऊसाहेबांचंच शीर होतं. भाऊसाहेबांच्या देहावर आधीच अंत्यसंस्कार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या शिरावर अग्निसंस्कार करण्यात आला, असा संदर्भ पेशवे दफ्तरात सापडतो.

भाऊसाहेबांनी इथेच समाधी घेतली असं गावकरी सांगतात.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC

फोटो कॅप्शन, भाऊसाहेबांनी इथेच समाधी घेतली असं गावकरी सांगतात.

माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या 13व्या दिवशी सदाशिवराव भाऊंनी समाधी घेतली, असं सुंदरनाथ यांनी सांगितलं. या दिवशी दर वर्षी समाधीच्या ठिकाणी मोठी जत्रा भरते.

समाधीच्या दिवशी अजूनही भरतो मेळा!

"लहान असल्यापासून या जत्रेला मी नेमाने जातो. गावातल्या सगळ्याच लोकांची भाऊ नाथ बाबांवर श्रद्धा आहे. नरहर विष्णु गाडगीळ म्हणजेच काकासाहेब गाडगीळ पंजाबचे राज्यपाल होते. त्या वेळी पंजाब-हरयाणा ही दोन वेगळी राज्यं झाली नव्हती. ते दर वर्षी या मेळ्याला आवर्जून हजेरी लावायचे," राज सिंग हु्ड्डा सांगतात.

या दिवशी भाऊनाथांच्या समाधीची पूजा होते. तसंच त्यांच्या वीरश्रीला वंदन करण्यासाठी कुस्त्यांचे फड लागतात, अशी माहिती हुड्डा यांनी दिली.

'विश्वास गेला पानिपतात', 'मराठ्यांचं पानिपत झालं...' ह्या म्हणी सर्रास वापरल्या जातात. एके काळी अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांच्या उत्तरेतल्या वर्चस्वाला या युद्धानंतर धक्का लागला असाही पानिपतच्या युद्धाचा उल्लेख अनेकदा आढळतो.

एका बाजूला मराठ्यांची एक अख्खी पिढी आणि त्या सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे या युद्धात मारले गेल्याचा सल इतकी शतकं महाराष्ट्राच्या मनात आहे.

पण दुसरीकडे तत्कालीन मराठा साम्राज्याच्या केंद्रापासून एक हजार मैलांहून जास्त अंतरावर असणाऱ्या या सांघी गावात आजही सदाशिवराव भाऊंचा उत्सव साजरा होतो. त्यांच्या लेखी भाऊसाहेब पेशवे युद्धात मारले गेले नव्हते. त्यांच्या गावाचं रक्षण करणारे ते बाबा भाऊनाथ महाराज होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)