साडेतीन शहाणेः महाराष्ट्राच्या इतिहासातील साडेतीन शहाणे कोण होते?

नाना फडणवीस, मराठी, पेशवे, महाराष्ट्र, पानिपत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पेशवाईमध्ये चार असामान्य व्यक्तिमत्त्वांनी आपली छाप त्या काळावर उमटवली. त्यांना साडेतीन शहाणे असं नाव मिळालं. या चार जणांमध्ये सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस यांचा समावेश होतो.

बोकील, चोरघडे आणि विठ्ठल सुंदर हे मुत्सद्दी तर होतेच पण ते योद्धेही होते त्यामुळे त्यांना पूर्ण शहाणे म्हणत. तर नाना फडणवीस हे फक्त मुत्सद्दी असल्यामुळे त्यांना अर्धे शहाणे म्हटले जाते.

अर्धे शहाणे असं नानांना म्हटलं असलं तरी पेशवाईतील एका मोठ्या काळावर त्यांचा पगडा होता. अनेक महत्त्वाचे निर्णय, घडामोडी केवळ त्यांच्या निर्णयांमुळे झाल्या. त्यात भरपूर चांगल्या-वाईट घटनांचा समावेश आहे.

1. सखारामपंत बोकील

सखारामपंत बोकील यांचा सखारामबापू बोकील किंवा बापू अशा नावाने इतिहासात उल्लेख आढळतो. त्यांचे नाव सखाराम भगवंत बोकील असे होते. त्यांचा जन्म 1716 आणि मृत्यू 1781 साली झाला. त्यामुळे पेशवाईचा एक प्रदीर्घ काळ त्यांना पाहायला मिळाला होता.

नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर बारभाईंचा उदय झाला. याला बारभाईंचे कारस्थान, कारभार असेही म्हटले जाते. बारभाईंनी रघुनाथराव पेशव्यांच्याऐवजी नारायणराव पेशव्यांच्या वंशजाबरोबर कारभार करण्याचा निश्चय केला होता. या बारभाईंमध्ये सखारामपंत बोकील यांना महत्त्वाचे स्थान होते.

पेशवे दरबार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेशवे दरबार

छ. शिवाजी महाराजांतर्फे अफजलखानाकडे शिष्टाई करणारे गोपीनाथपंत बोकील हे सखारामपंतांचे पूर्वज होते. (छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला गाफील ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले होते. त्यात महाराजांतर्फे अफजलखानाला हे संदेश सांगण्याचं काम गोपीनाथपंतांनी केले होते.)

मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, सखारामबापूचा चुलतभाऊ महादजी यमाजी छ. संभाजी महाराजांच्या सेवेत होता. रायगडच्या पाडावानंतर तो छ. शाहूंबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होता. पुढे शाहूंनी त्यास हिंवरे गाव व कुलकर्णी वतन करून दिले. त्यास पुत्रसंतती नव्हती म्हणून बापूचा जेष्ठ भाऊ निंबाजीस ते वतन वारसाहक्काने मिळाले. बापूचा उल्लेख शनिवारवाडयाच्या बांधकामप्रसंगी (1732) मिळतो. सुरूवातीस सखारामबापू महादजीपंत पुरंदरे याच्याकडे कारकून व शिलेदार होता. बाळाजी बाजीरावाने त्यास 1746 मध्ये सदाशिवरावभाऊंबरोबर कर्नाटकच्या स्वारीवर पाठविले. या स्वारीत त्याने भरपूर धनदौलत जमवून छ. शाहूंचे कर्ज फेडले. पुढे रघुनाथरावांबरोबर गुजरात (1754) व उत्तर हिंदुस्थान (1758) अशा दोन स्वाऱ्यांत त्याने भाग घेतला.

रघुनाथरावांचे कारभारी

रघुनाथरावांबरोबर केलेल्या कार्यामुळे पेशव्यांनी त्यांची रघुनाथरावांचा कारभारी म्हणून नियुक्ती केली. रघुनाथराव पेशवे आपला सर्व कारभार सखारामबापूंच्याच सल्ल्याने करत होते.

पानिपतच्या युद्धानंतर माधवराव पेशवे 1761 साली पेशवे झाले. परंतु त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत निजामाला तोंड द्यावे लागले. निजामाने पुण्याच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर माधवरावांनी निजामाच्या प्रदेशात हल्ला करून मोठी आगेकूच केली. निजामाला अगदी कोंडीत पकडल्यावर मात्र रघुनाथरावांनी एकदम निर्णय बदलला. निजामाचा पूर्ण बीमोड करण्याऐवजी त्याला स्वराज्याचा 27 लाखांचा भाग तोडून दिला. हा पूर्ण बीमोड न करण्याचा सल्ला सखारामबापूंनी दिला होता असं संगितलं जातं.

राक्षसभुवनची लढाई

27 लाखांचा मुलूख मिळाला असला तरीही निजामाने नागपूरच्या जानोजी भोसल्यांच्या मदतीने पुण्यावर हल्ला केला आणि मोठी नासधूस केली. त्यानंतर पेशवा होण्यासाठी रघुनाथरावांनी प्रयत्न केले त्यामध्ये सखारामपंत बोकीलांचा मोठा वाटा होता. रघुनाथराव आणि माधवराव यांच्यामध्ये आळेगाव येथे लढाई झाली. यात माधवरावांचा पराभव झाला व दोघांमध्ये तह झाला.

निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असल्यामुळे आता त्याचे खरे रुप रघुनाथरावास कळाले होते. नागपूरकर भोसल्यांनाही आपली चूक समजली आणि ते ही निजामाविरुद्ध सज्ज झाले. त्यानंतर या सर्वांनी राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला.

शनिवार वाडा, मराठी, बीबीसी, ओंकार करंबेळकर, नाना फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शनिवारवाडा

आळेगावच्या लढाईनंतर वरचढ ठरलेल्या रघुनाथरावांनी गोपाळराव पटवर्धनांची जहागिरी जप्त करुन ती सखारामबापूंना दिली. ( संदर्भः मराठी विश्वकोश)

नारायणरावांची हत्या

माधवरावांनंतर नारायणराव पेशवे अत्यंत अल्पवयात पेशवेपदी आले होते. पण रघुनाथरावांनी कट करुन गारद्यांकरवी त्यांची हत्या घडवून आणली. या हत्येनंतर पेशवाईला एक निराळीच कलाटणी मिळाली. पेशवाईत बारभाईंचा उदय झाला.

नारायणराव पेशवे

फोटो स्रोत, Wellcome Collection, London

फोटो कॅप्शन, नारायणराव पेशवे

रघुनाथरावांनी नारायणराव पेशव्यांना 'ध'रण्याचा कट रचला. नारायणरावांना धरण्याचा रघुनाथराव, सखारामबापू, मोरोबा फडणीस यांनी निश्चय केल्याचं इतिहासअभ्यासक अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या 'पुण्याचे पेशवे' या पुस्तकात लिहिलं आहे.

नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर काय झाले याचा वृत्तांत इतिहासअभ्यासक अ. रा. कुलकर्णी यांनी लिहिला आहे. ते लिहितात या हत्येनंतर पुण्याहून मिरजेस पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे, "सखारामबापू काल दोन प्रहरी पळून गेले. पर्वतीजवळ माणसास आढळले. बायकामुले घरातच आहेत. चार कोस गेला. मागती विचार केला न कळे. फिरोन रात्री घरास आले."

बारभाई

नारायणरावांच्या हत्येनंतर मात्र रघुनाथरावांना सखारामबापूंनी वरवर आपला पाठिंबा आहे असं भासवलं आणि नारायणरावांना न्याय मिळण्यासाठी बारभाईंमध्ये सहभागी झाले. रघुनाथरावांच्या पक्षाऐवजी आपण नारायणरावांच्या वंशजाबरोबर राहायचे असं या बारभाईंनी ठरवलं. बारभाईंमध्ये शिंदे, होळकरांसह, त्रिंबकजी पेठे, हरिपंत फडके यांचाही समावेश होता.

नारायणरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांनी कर्नाटक मोहीम आखली होती. त्या मोहिमेतून सखारामबापूंनी स्वतःची सुटका करुन पुणे गाठलं होतं.

रघुनाथराव पेशवे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रघुनाथराव पेशवे

नारायणराव पेशव्यांच्या हत्येवेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती. त्यांना झालेल्या मुलाला म्हणजे सवाई माधवरांवाना पेशवाईची वस्त्रं देऊन त्यांच्यानावे हे बारभाई कारभार पाहू लागले. त्या बारभाईत सखारामबापू अग्रेसर होते.

सवाई माधवरावांच्या काळात रघुनाथरावांना पेशवाईपासून लांब राहावे लागले होते. त्यांना पुन्हा पुण्यात घेऊन यावे यासाठी मोरोबादादा फडणीसांनी इंग्रजांकडे प्रयत्न केले होते. त्यातही सखारामबापूंचा समावेश होता.

इंग्रज व रघुनाथराव यांजबरोबर बारभाईंनी वडगावचा तह केला. तेव्हा बापूचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला, तेव्हा नानांनी त्यांना कैदेत टाकले. रायगडावर कैदेत असतानाच सखारामबापूंचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास सर्व कारभार नाना फडणवीसांकडे एकवटला.

2. देवाजीपंत चोरघडे

देवाजीपंत चोरघडे हे नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. सातारा, तंजावर आणि नागपूर ही भोसले घराण्याची तीन मुख्य केंद्रे. त्यात नागपूरकर भोसल्यांच्या दरबारात चोरघडे होते.

पेशव्यांकडे नाना फडणवीसांना जे स्थान होतं तेच स्थान देवाजीपंतांना नागपूरकर भोसल्यांकडे होतं. त्यांना दिवाकरपंत या नावानेही ओळखलं जाई.

नागपूरचे सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांचं निधन झाल्यावर त्यांच्या जानोजी आणि मुधोजी या मुलांमध्ये वारसासाठी स्पर्धा सुरू झाली. सेनासाहेबसुभा पदाची वस्त्रं मिळवण्यासाठी पेशव्यांना काही रक्कम द्यावी लागे. यासाठी जानोजींनी आपल्यातर्फे त्रिंबकजी भोसले, बाबुरावर कोन्हेर यांना पुण्याला पाठवले.

विश्वकोशाच्या नोंदीनुसार या पुणे भेटीत देवाजीपंतही उपस्थित होते. त्यांचं पेशव्यांशी सेनासाहेबसुभ्याच्या वस्त्रांसाठी सुरू असलेल्या चर्चेवर बारीक लक्ष होते.

शनिवार वाडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शनिवारवाडा

विश्वकोशातील नोंद सांगते, 'त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर हे नजराण्याची रक्कम दीड लाख रुपये ठरवण्याच्या तयारीत आहेत; तथापि जानोजींना मात्र नजराण्याची रक्कम 7लाख रुपये सांगून ते लबाडी करत असल्याचे देवाजीपंताना समजले. तेव्हा त्यांनी जानोजींना भेटून याबाबत तपशीलवार सांगितले आणि ही कामगिरी माझ्याकडे दिल्यास मी नजराण्याची रक्कम अडीच लाख ठरवून आणतो, असे सांगितले. जानोजींनीही आपला फायदा ओळखून हे काम देवाजीपंतांवर सोपविले. देवाजीपंतांनी पुण्यास जाऊन नानासाहेब पेशव्यांना सांगितले की, 'त्रिंबकजी व बाबूराव जर दीड लक्ष देत असतील, तर मी जानोजींकडून अडीच लक्ष देववितो.ʼ नानासाहेबांचाही एक लाखाचा फायदा होत असल्याने त्यांना ही गोष्ट पसंत पडली. अखेर देवाजीपंतांच्या मध्यस्थीने नजराण्याची रक्कम ठरली. देवाजींपंतांनी हुशारीने व संयमाने ही सर्व परिस्थिती हाताळली. त्यामुळे जानोजींची मर्जीही त्यांच्यावर पंतांवर बसली.'

अशाप्रकारे देवाजीपंत नागपूरकर भोसल्यांच्या मर्जीत आले. त्यांना साडेतीन शहाण्यांच्या यादीमध्ये स्थान मिळालं.

3. विठ्ठल सुंदर

विठ्ठल सुंदर यांचं पूर्ण नाव विठ्ठल सुंदर परशुरामी असं होतं. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदर नारायण परशुरामी असं होतं. विठ्ठल सुंदर हे निजामाचे म्हणजेच मीर निजाम अली खान असफजाह दुसरे यांचा दिवाण होते. विठ्ठल सुंदर यांनीच निजामाला लढाईचा सल्ला दिला.

मराठे आणि निजाम यांच्यामध्ये राक्षसभुवन येथे लढाई झाली. या लढाईमध्ये विठ्ठल सुंदर मारले गेले. उत्कृष्ठ मुत्सद्दी म्हणून त्यांना ओळखलं जाई. त्यामुळेच साडेतीन शहाण्यांमध्ये त्यांना स्थान मिळालं. मुत्सद्दी आणि रणांगणात थेट तलवार हातात घेण्यामुळे त्यांना पूर्ण शहाणे मानलं जातं.

4. नाना फडणवीस अर्धे शहाणे का?

नाना फडणवीस या नावाशिवाय महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक वर्षांचा लेखाजोखा मांडताच येणार नाही इतका त्यांचा महाराष्ट्रावर सखोल परिणाम होता. एखादी व्यक्ती बुद्धीचातुर्याच्या जोरावर कशी उत्तुंग झेप घेऊ शकते याचं ते आदर्श उदाहरण होतं. नाना फडणवीस हे नाव गेल्या तीनशे वर्षांमध्ये अनेकवेळा अनेक कारणांनी वापरलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या मृत्यूनंतरही इतकी वर्षे वापरलं जाण्याची उदाहरणं फार कमी असतात.

नाना फडणवीसाचं भानू घराणं आणि पेशव्याचं भट घराणं यांचा संबंध अनेक वर्षांपासूनचा आणि पिढ्यांचा होता. बाणकोटच्या खाडी या दोन्ही घराण्यांशी संबंधित आहे. खाडीच्या उत्तरेस भट घराण्याचं श्रीवर्धन आणि दक्षिणेस भानू घराण्याचं वेळास.

भट घराण्यात बाळाजी विश्वनाथ आणि जानोजी विश्वनाथ हे दोघे भाऊ होते तर भानू घराण्यात नारायण, हरी, रामचंद्र, बळवंत हे चार भाऊ होते. त्यापैकी नारायण वगळता इतर तीन भावांबरोबर घाटावर जाऊन नाव कमवावे अशी भट बंधूंची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी घाटाच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला. वाटेत अंजनवेल इथं सिद्दीने भट बंधूंना पकडून ठेवले. मोठ्या हिकमतीने भानू बंधूंनी त्यांची सुटका केली.

वेळास

फोटो स्रोत, Prajakta Kulkarni

फोटो कॅप्शन, वेळास येथील नानांची मूर्ती आणि तसबिर

ही सुटका केल्यानंतर 'आम्हास जी भाकर मिळेल तीत तुम्हाला चतकोर मिळेल' असं आश्वासन बाळाजी विश्वनाथांनी भानू बंधूंना दिलं. या भानूंच्या घराण्याला दिलेलं आश्वासन भट घराण्यानं पाळलंही. वासुदेवशास्त्री खरे यांनी नाना फडणवीसांचे जे चरित्र लिहिले आहे यात या घटनेचा उल्लेख आहे.

कोकणातून साताऱ्यात आल्यावर 1714 साली सातारच्या शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदी नेमलं. बाळाजी विश्वनाथांनी शाहु महाराजांकडे शब्द टाकून हरी भानू यांना फडणवीशी दिली. मात्र हरी भानू यांचे चार-पाच महिन्यात निधन झालं. त्यांच्यानंतर बाळाजी (बळवंत) यांच्याकडे फडणवीशी आली. ते दिल्लीच्या स्वारी असताना त्यांना दिल्लीत मारण्यात आले.

त्यांच्यानंतर रामचंद्र फडणवीस झाले. त्यांचे 1724 साली निधन झाले. त्यानंतर बाळाजी यांचे पुत्र जनार्दन यांच्याकडे फडणवीशी आली.

नाना फडणवीसांचा जन्म

जनार्दन फडणवीस आणि रखमाबाई यांच्यापोटी जन्मास आलेले बाळाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणवीस होय. नाना फडणवीस यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी सातारा येथे झाला. राघोबा दादांबरोबर उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेच जनार्दन फडणवीस यांचं निधन झालंय.

राज्यकारभारात महत्त्व वाढले

पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत. सहा महिन्यांतच त्यांचा 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले.

पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, किल्लेकोट नानांच्या भरवशावर टाकून जात. पराक्रमापोटी ते मोहिमांमध्ये विजयी होत असले तरी त्याचं थोडं श्रेय नाना फडणवीसांनाही दिलं पाहिजे असं मत वासुदेवशास्त्री खरे नोंदवतात. मोहिमांना लागणारा पैसा, दारुगोळा वेळेच्यावेळेस नाना पाठवत आणि राज्याची काळजी घेत म्हणूनच या मोहिमा पेशव्यांना निर्धोकपणे पार पाडता येत असं ते खऱ्यांनी लिहून ठेवलं आहे.

नाना फडणवीस

फोटो स्रोत, Getty/KARAN RASKAR

फोटो कॅप्शन, नाना फडणवीस आणि त्यांचा पुण्यातला वाडा

माधवरावांच्या कार्यकाळामध्ये नाना फडणवीसांकडे फडणीशीबरोबर अनेक जबाबदाऱ्या आल्या असं 'नाना फडणवीस अँड द एक्स्टर्नल अफेअर्स ऑफ द मराठा एंपायर' या पुस्तकाचे लेखक वाय. एन. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे.

फडणीशी म्हणजे बजेटची आखणी, हिशेब ठेवणे, ऑडिट आणि पेशव्यांच्या राजधानी जबाबदारी पाहाणे हे काम नानांकडे आलं. तसेच मोहिमांच्यावेळेचीही व्यवस्था त्यांच्याकडे आली. देवधरांच्या या शब्दांमधून नानांच्या वाढत्या दबदब्याचा अंदाज येतो.

राघोबादादांची कैद आणि माधवरावांचा मृत्यू

राघोबादादा आणि माधवराव यांच्यात बेदिली होतीच. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यात कैद करून ठेवलं होतं. त्यांच्यावर देखरेखीसाठी नाना फडणवीसांना नेमण्यात आलं. 2 एप्रिल 1769 रोजी राघोबादादांनी शनिवारवाड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नानांनी त्यांना पुन्हा पकडून बंदोबस्तात ठेवले.

माधवरावांचा 1772 साली क्षयामुळे मृत्यू झाला. मृत्यूपर्यंत नाना फडणवीस आणि हरिपंत फडके त्यांच्याबरोबर होते.

माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे कनिष्ठ पुत्र नारायणराव पेशवेपदावर आले. नारायणराव आणि राघोबादादा यांच्यात अजिबात सख्य नव्हते. नारायणरावांविरोधात कारस्थान सुरू असल्याची कुणकुण नानांच्या कानावर गेली होती असं सांगितलं जातं. मात्र नारायणरावांना मारलं जाईल हे काही कोणाच्याही कल्पनेतही नव्हतं. नारायणरावांचा खून झाल्यावर मात्र पुण्यात मोठा गजहब उडाला.

नारायणरावांच्या हत्येनंतर अल्पकाळासाठी रघुनाथराव म्हणजे राघोबादादा यांच्याकडे 31 ऑक्टोबर 1773 रोजी सूत्रे आली. मात्र सखारामबापू, नाना फडणवीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके यांच्या बारभाई कारभारामुळे सात महिन्यांमध्येच राघोबांची कारकीर्द संपली.

सवाई माधवराव आणि चौकडीचं राज्य

नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं. त्यांना जो मुलगा झाला त्याला वयाच्या 40 व्या दिवशी पेशवे म्हणून नेमण्यात आलं. त्यालाच सवाई माधवराव म्हणून ओळखलं जातं.

रॉबर्ट मॅबन यांनी काढलेले पेशव्यांचे चित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट मॅबन यांनी काढलेले पेशव्यांचे चित्र

सवाई माधवरावांच्या काळात आधी सखारामबापू नंतर नाना फडणीस, महादजी शिंदे आणि होळकर यांच्या हातात सारी सत्ता होती. त्यामुळे त्याला 'चौकडीचं राज्य' म्हणत असं अ. रा. कुलकर्णी यांनी 'पुण्याचे पेशवे' पूर्वरंग भाग-2 पुस्तकात लिहून ठेवलं आहे. 1775 साली पेशवे आणि इंग्रजांमध्ये पुरंदरचा तह झाला. त्यानंतर नानांनी शिंदे, होळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राज्यकारभारातील सुधारणा

पेशवाईतील बहुतांश जबाबदारी अंगावर घेणाऱ्या नानांनी राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या होत्या. पडजमिनी लागवडीखाली आणल्या. नवीन वसाहतींची निर्मिती, पाटबंधाऱ्याची अनेक कामं त्यांनी केल्याचं त्यांचे चरित्रकार वासुदेवशास्त्री खरे लिहितात.

पुण्यातल्या नाना वाड्यातल्या भिंतीवरचे एक चित्र

फोटो स्रोत, KARAN RASKAR

फोटो कॅप्शन, पुण्यातल्या नाना वाड्यातल्या भिंतीवरचे एक चित्र

सरकारी कामात दक्षता आणि टापटिपपणा हे नानांचे विशेष गुण होते. सरकारी कामाला ते प्राणापलिकडे जपत असत असे खरे लिहितात. गावातून पिकाऊ जमिनीचाच सारा गोळा करावा असा आदेश त्यांनी काढला होता. दरवर्षाला मामलेदार बदललाच पाहिजे असा त्यांचा नियम होता.

माधवरावांच्या काळात सदाशिवराव भाऊंसारखा दिसणारा एक माणूस पुण्यात उगवला. मीच सदाशिवरावभाऊ असल्याची आवई त्यानं उठवली. त्यावर काही लोकांचा विश्वासही बसला. अखेर चौकशीअंती तो सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण असल्याचं सिद्ध झालं होतं. त्याला उचलून थेट रत्नागिरी किल्ल्यावर डांबण्यात आलं होतं.

याच तोतयानं सवाई माधवरावांच्या काळात पुन्हा तोंड वर काढलं. रत्नागिरीच्या किल्लेदार रामचंद्र नाईक परांजप्यांनी त्याची मुक्तता केली. तोतया सुखलालला पाठिंबा द्यायला स्वराज्याचे अनेक शत्रू तयार झाले. तसेच पेशव्यांचे अनेक नातेवाईक, सरदार मंडळी आणि आरमारातील लोकही सामील झाले.

शक्ती वाढवत तो पुण्याच्या दिशेने कूच करु लागला. हे पाहून त्याच्याशी लढाई करण्यात आली. त्यातून पळून जाताना आंग्र्यांनी त्याला पकडून पेशव्यांच्या स्वाधिन केलं. पुण्यात त्याची पुन्हा चौकशी करुन त्याला देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं. त्याला एकदा शिक्षा दिल्यावर मात्र नानांनी बंडात सामील असणाऱ्या सर्वांची हजेरी घेतली. सर्वांना प्रायश्चित्त दिलं. दंड केले अनेकांना अटकही केली.

नानांचे चुलत आजोबा रामचंद्र यांचा नातू मोरोबा हा होता. त्याने राघोबांचा पक्ष घेऊन जमवाजमव करण्याचा निर्णय घेतला. सखारामबापू, मोरोबा फडणवीस, तुकोजी होळकर यांनी राघोबादादांना मुंबईतून पुण्यात घेऊन येण्यास इंग्रजांना सांगितले. मात्र इंग्रजांनी वडगाव येथे माघार घेतली. त्यावेळेस राघोबादादांना 12 लाखांची जहागिरी देऊन शांत बसवण्यात आलं आणि सखारामबापूंना अटकेत ठेवलं गेलं.

सखारामबापूंनंतर महादजी शिंदे आणि नाना फडणीस राज्यकारभार पाहू लागले. टिपूविरुद्धच्या लढाया, खर्ड्याची लढाई, घाशीराम कोतवालाचं प्रकरण याच काळात झालं.

अटक आणि शेवट

दुसऱ्या बाजीरावानं पेशवा होताच वर्षभरासाठी नाना फडणवीसांनाच नगरला कारागृहात टाकलं.

दुसऱ्या बाजीरावांच्या काळात नाना फडणवीस यांच्या कारकिर्दीचा अस्त झाला. अनेक दशकं राजकारणावर प्रभाव असणाऱ्या नानांना बाजूला करायला दुसरे बाजीराव प्रयत्न करत होते.

नगरवरून सुटका झाल्यावर काही काळातच 13 मार्च 1800 रोजी नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्काराच्यावेळेस हजारो लोक उपस्थित होते, असं अ. रा. कुलकर्णी यांनी लिहून ठेवलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कर्नल विल्यम पामर म्हणाला, "नाना मेले, आणि त्याबरोबरच मराठी राष्ट्रांतील शहाणपणा व नेमस्तपणाही लयाला गेला."

नाना फडणवीसांची 'शहाणीव'

नाना फडणवीसांना लढाईत योद्धा नसल्यामुळे अर्धा शहाणा म्हटलं असलं तरी काही मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येतं. नानासाहेब पेशव्यांबरोबर ते 1757 साली श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यानंतर ते सदाशिवभाऊ आणि विश्वासरावांबरोबर पानिपतच्या युद्धातही सहभागी झाले होते.

पानिपतच्या युद्धात आपला जीव वाचवून नाना फडणवीस दक्षिणेला आले. बुऱ्हाणपूर इथं त्यांनी नानासाहेब पेशव्यांना पानिपतचा सगळा वृत्तांत सांगितला. आपल्या आईचाही या युद्धात मृत्यू झाल्याचं नाना फडणवीसांना नंतर समजलं.

पेशव्यांच्या अनेक लढाया मोहिमांच्यावेळेस पुण्याचा कारभार सुरळीत ठेवणे, स्वारीला रसद वेळोवेळी पोहोचवणे अशा अनेक महत्त्वाच्या कामात नाना फडणवीसांनी जबाबदारी उचलली होती. इतकेच नव्हे तर राजकीय वाटाघाटींमध्ये त्यांचे चातुर्य, हुशारी कामाला येत असे त्यामुळे मोहिमा, स्वाऱ्या यशस्वी होण्यात त्यांचा अप्रत्यक्ष पण आवश्यक सहभाग होता.

मेणवलीमधला नाना फडणवीसांचा वाडा

फोटो स्रोत, KARAN RASKAR

फोटो कॅप्शन, मेणवलीमधला नाना फडणवीसांचा वाडा

साडेतीन शहाण्यांबद्दल बोलताना इतिहास अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, "या सर्व जणांचा महाराष्ट्राच्या इतिहासावर मोठा प्रभाव दिसून येतो. नागपूरकर भोसल्यांनी महाराष्ट्राच्या पूर्वेस स्वाऱ्या केल्या त्यात देवजीपंतांचा सहभाग होता. विठ्ठल सुंदर आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर निजामाच्या दिवाणपदापर्यंत पोहोचले होते. सखारामबापूंचा पेशवाईत दीर्घ काळ प्रभाव आहे. मात्र त्यांना नारायणरावांची हत्या, रघुनाथरावांचे बंड अशा घटना थांबवता आल्या असत्या."

नाना फडणवीस यांना अर्धे शहाणे म्हणत असले तरी त्यांचं कर्तृत्व पूर्ण शहाण्याहून जास्त होतं असं लवाटे सांगतात.

"महाराष्ट्र, इतिहास, भूगोल, राजकीय ज्ञान, दरबारी राजकारण, हिशेब या सर्वांचं त्यांचं ज्ञान उत्तम होतं. परदेशात काय चाललंय याकडेही त्यांचं लक्ष होतं", असं मंदार लवाटे सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)